केळशीच्या महालक्ष्मी मंदिराचा उत्सव खूपच मोठा असतो. मंदिर हा पेशवेकालीन वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. उत्सवास केवळ धार्मिक स्वरूप नाही; तर त्यातून केळशी गावाचे समाजजीवन प्रतिबिंबित होते. उत्सव चैत्रशुद्ध अष्टमी ते पौर्णिमा या कालावधीत होतो…
केळशीचे महालक्ष्मी मंदिर इसवी सन 1808 च्या दरम्यान बांधले गेले. मंदिर गावापासून थोडे बाजूला, शांत ठिकाणी आहे. त्याला दोन घुमट व तीन दरवाजे आहेत. देवीची मूळ मूर्ती सोन्याची आहे. ती मूर्ती वर्षभर कोणा एकाकडे सुरक्षित ठेवली जाते. त्याखेरीज गणपती व महादेव यांच्याही मूर्ती देवळात आहेत. देवळाच्या पाठीमागील तळ्यात कमळाची फुले आहेत. मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. देवीची यात्रा दरवर्षी चैत्री पौर्णिमेला भरते.
उत्सव चैत्र शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा या कालावधीत खूपच मोठा असतो. मंदिर परिसर स्वच्छ करण्यात येतो. रोज कीर्तन, गोंधळ व आरती होते. उत्सवाचा खर्च वर्गणी (पट्टी) काढून गावसईच्या खर्चातून केला जातो. गावकऱ्यांना एकत्र बोलावून ज्या गोष्टींचा निर्णय केला जातो त्याला ‘गावसई’ म्हणतात. त्या शिवाय देवीची जमीन आहे. तिच्यातून उत्पन्न येते. पूर्वी घरटी अर्धा शेर तेल, अर्धा शेर सुपारी (सुमारे तीस सुपाऱ्या) व नगद पैसे आठ–बारा आणे घेतले जात. ते गावसईत ठरवल्यानुसार होई. चैत्र पाडव्याच्या दिवशी सगळे ब्राह्मण देवीच्या देवळात जमून उत्सवासाठी लागणाऱ्या गोष्टी नक्की करत. त्या दिवशी ग्रामजोशी पंचांगाचे वर्षफल वाचत. त्याला दक्षिणा गावसईच्या खर्चातून देत. प्रत्येकाच्या घरी जाऊन वर्षफळ वाचण्याची प्रथाही होती. भटजींना दक्षिणा म्हणून एक सुपारी देत. भटजींना उत्पन्न लग्नकार्ये, मुंजी, नामकरण विधी यांतून होई. मात्र प्रत्येक भटजीचे घर गरिबीचे असे. जर गावातील भटजीकडेच काही कार्य निघाले तर त्याची टंचाई गावकरी भरून काढत. भटजी एकादशी सांगण्यास येत असत. ते त्या महिन्यातील ठळक तिथी–वार–नक्षत्रे सांगत. तेव्हाही त्यांना सुपारी दिली जाई.
गावात वेगवेगळ्या जातींची वस्ती असे. त्यात भाटी भज भज, पाखाडी, कुंभारवाडा, नवनगर, दडली वाद, गुजर, भगत अशांचा समावेश असे. देवीच्या उत्सवात त्या त्या जातीची कामे वेगवेगळी ठरवून दिलेली असत. ब्राह्मण अंगमेहनतीची कामे करत नसत. देवीच्या देवळाच्या आवारात जमीन करायचे काम नव्या नगरातील लोक करत. जमीन खणून खणून सारखी करून, चोपून –सारवण घालून तयार करत. मुख्य मंडपाचे सामान देवीचे असते. मंडपाच्या मेढीवर खुणा केलेल्या असल्याने त्यांची जागा बदलत नाही. मुख्य मंडप माळी लोक घालत व त्याच्यावर देखरेख कारभारी किंवा ‘वारी’ करत असे. वारी म्हणजे दर वर्षी पाडव्याच्या दिवशी चार ब्राह्मणांची निवड करत, ते लोक वर्षभर, नवी वारी होईस्तोवर ते काम पार पाडत.
माडांच्या झावळ्यांचे विणलेले झाप मांडवावर घालण्याचे काम ठरलेले असे. मंडपाचे पाच भाग असत. प्रत्येक भागावरील झाप ठरलेल्या लोकांनीच करावे अशी प्रथा आहे. मंडप साडेतीनशे वर्षांपासून त्याच पद्धतीने घातला जातो. मंडपात विजेचे दिवे लावत नाहीत. मंडपाला आतून कापडाचे छत लावत व त्याला हंड्या लटकावत. कापडाचे छत घालण्याचे काम ब्राह्मणांचे असे. ते छत धुण्याचे काम परीट करत. त्याशिवाय ते गोंधळात पेटवण्याच्या वातीही करून देत. परीट सगळी कापडी छते धुऊन देई. शिंपी शिवून देई. तसेच, तो रथाला कापडी सुशोभन करण्याचे कामही करी. कासार भांड्यांना कल्हई करून देत. सोनार देवीच्या मूर्तीला झळाळी देण्याचे काम करी. बाकी, देवीची काळी मूर्ती म्हणजे एक शिळा आहे.
‘विरी’ व ‘खोरे’ या दोन वस्तू जेवणघरात वाढपासाठी उपयुक्त असत. त्या पोफळीच्या झाडापासून तयार केलेल्या तात्पुरत्या पण टिकाऊ असत. ‘पातवडा’ हे ज्याचे नाव असेल तो जेवणावळीच्या वेळी लागणारे पोफळीच्या ‘विरी’चे खोरे वापरले जाते ते काम करी. विरी म्हणजे पोफळीच्या झावळ्यांचे भांडे. जेथे पोफळीच्या झावळ्या धरतात त्या लवचीक भागास विरी म्हणतात. विरीचा उपयोग कोरडे पदार्थ वाढवण्याच्या कामी करतात. ते गरम होत नसल्याने वाढण्यास हलके नि सोपे पडते. त्यात अन्नपदार्थ कळकतही नाही. जे लोक जेवण्यास येऊ शकत नाहीत त्यांना देवीचा प्रसाद देण्यास ‘खोरे’ वापरले जाते.
कुंभाराला उत्सवात लागणाऱ्या पणत्या आणि रोज गोंधळाला लागणारे लोटे द्यावे लागत. प्रत्येक आळीचे छत वेगळे असे. माळी व भगत यांच्या स्त्रिया भाजी चिरण्याचे काम करत. त्या सगळ्या स्त्रिया शिकलेल्या, स्वच्छ आणि शाकाहारी असत. त्यांची भाषा शुद्ध असे. न्हावी देवीला बघण्यासाठी आरसा व तेलाच्या दिव्यांच्या वाती कापण्यासाठी कात्री देई. पैशांची गरज असेल तेव्हा देवीच्या इस्टेटीमधून खर्च केला जाई. बहुतेक कामे देवीची सेवा म्हणून विनामूल्य होत. त्यांच्या सेवेचा मान म्हणून प्रत्येक जमातीला देवीचा विदा दिला जाई. उत्सवात सर्व गावकऱ्यांचा सहभाग असेल अशा प्रकारे कामाचे नियोजन होई. त्याच पद्धतीने सगळे काम होते. ते काम ज्याचे त्याने ठरवल्यानुसार करावे लागते. कोणी कामास नाही म्हणत नाही.
ठोसर, वर्तक व महाजन हे मानकरी आहेत. त्यांना ‘वारी’ पणाचे काम करावे लागत नसे. वर्तक हे देवीचे कारभारी होते; इतरांना तो मान नाही हे कोर्टात सिद्ध झाले होते. आखवे हे गावाचे धर्मोपदेशक होते. त्यांची अनुमती घेऊन उत्सवाचे कार्य चालवले जाते. कारण ते गावाचे पहिले गावकरी होते. त्यांच्या संमतीने सर्व व्यवहार होत. हे सगळे प्रथेनुसार चालते.
उत्सवाच्या मुख्य मंडपात सहा बैठका असत. तेथे कीर्तन करणाऱ्या हरिदासाच्या उजव्या बाजूस सर्व मानकरी, हरिदासाच्या समोर वैद्य, डाव्या बाजूस उरलेले गावकरी याप्रमाणे बैठका असत. बाकीच्या बैठकांवर इतर समाजाने बसण्याची प्रथा आहे.
केवळ केळशीत नव्हे तर एकूण रत्नागिरी जिल्ह्यातील ब्राह्मण टिळक पंचांग वापरत. पुण्यातील देशस्थ ब्राह्मण निर्णयसागर पंचांग वापरत. एकदा उत्सवाच्या वेळी शिमगा आणि चैत्र एक आल्याने गोंधळ उडाला होता. टिळक पंचांगातील सणांच्या भिन्न तिथी महिन्यांमुळे इतर पंचांगाच्या संदर्भात फरक पडत असे व दर साडेतीन वर्षांनी अधिक मास आल्याने फरक नाहीसा होई. शेवटी सामोपचाराने ब्राह्मणांनी समेट घडवण्याचा प्रयत्न केला होता.
याकूब बाबा हे सूफी संत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी केळशीस वास्तव्यास होते. याकूब बाबा हे सिंध प्रांताकडून बाणकोटमार्गे केळशीला आले असे सांगितले जाते. याकूब बाबांची समाधी साधी आहे. त्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याला आशीर्वाद दिल्याचे सांगितले जाते. महाराजांनी त्यांच्या दर्ग्याचे बांधकाम सुरू केले व ते छत्रपती संभाजी महाराजांनी पूर्ण केले.
(प्रस्तुत लेखातील माहिती 1956 पर्यंतच्या कालखंडावर आधारित आहे. ती पुरुषोत्तम मुकुंद वर्तक (जन्म 1934 मृत्यू 2011) यांनी कथन केल्याप्रमाणे आहे. (शब्दांकन: प्रकाश पेठे 14 ते 20 सप्टेंबर 2006 पुरुषोत्तम वर्तक हे प्रकाश पेठे यांच्या बहिणीचे यजमान)
-प्रकाश पेठे 9427786823 prakashpethe@gmail.
———————————————————————————————————