महाराष्ट्रात प्रत्येक पट्ट्याची खास खाद्यसंस्कृती आहे. त्यात प्रामुख्याने कोकणी, पुणेरी, मराठवाडी, कोल्हापूरी, खान्देशी, वऱ्हाडी या म्हणता येतील. कोकणात नारळ व तांदूळ मुबलक उपलब्ध असल्यामुळे तेथील पारंपरिक खाद्यपदार्थांत खोबरे व तांदूळ यांपासून बनवलेले पदार्थ जास्त आढळतात…
- सांजण : तांदुळाचा रवा बरक्या फणसाच्या रसात टाकून इडलीप्रमाणे मोदक पात्रात वाफवतत्याला सांजण म्हणतात. तो नारळाच्या दुधाबरोबर खात. त्याच रसात तांदुळाचा रवा घालून तळलेले घारगे बनवत.
- खापरपोळ्या : हा पदार्थ तांदुळाच्या पिठात थोडे उडीदाचे पीठ टाकून मातीच्या खापरावर पातळ पीठ भांड्याने टाकत. ते सारखे होईस्तोवर त्यावर झाकण ठेवून चुलीवर ठेवत. ते शिजल्यावर गूळटाकलेल्या नारळाच्या दुधात टाकून मुरत ठेवत व त्यानंतर खात.
- पातोळे : हा पदार्थ बनवताना काकडीचा कीसकाढून त्यात तांदुळाचे पीठ व गूळ घालत. ते पीठ थापण्याइतपत मळून, हळदीच्या पानावर थापत. तेच पान मुडपून झाकून नारळाच्या करवंट्या शेंडीसह उभ्या करून वाफवत. पातोळ्या नारळाच्या दुधाबरोबर खात. याच पदार्थाला ‘पानमोडे’ सुद्धा म्हणतात.
- खीर, नारळी भात व मोदक : श्रावणात नागपंचमीलातांदुळाच्या रव्याची नारळाचे दूध व साखर घालून खीर बनवत. नारळी पौर्णिमेला नारळी भात असे आणि गणपतीत मोदक बनवत.
- बोरे : बोरे नावाचा पदार्थ भोपळा, तांदूळ व गूळ यांचे मिश्रण तयार करून, त्याचे बोराच्या आकाराएवढे गोळे बनवून तळतात. तो पदार्थ दिवाळीत करत.
- आंबोळ्या : संक्रांतीला गुळाच्या पोळ्या व रथ सप्तमीला खीर बनवत. त्या खिरीत गाई-म्हशीचे दूध बोळक्यातून उतू गेले, की ते त्यात टाकत.संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रान्त. त्या सणाला आंबोळ्या बनवत असत. तांदूळ व मेथीचे पीठ आदल्यादिवशी भिजत टाकून हळद, तिखट, मीठ व लसणाचे तुकडे टाकून त्याचे घावन तयार करत. नवरात्रात दसऱ्याला पातोळे बनवत. दिवाळीत फराळाच्या पदार्थांची मेजवाणी असे.
– पुरुषोत्तम मुकुंद वर्तक (जन्म – 1934, मृत्यू – 2011)
शब्दांकन: प्रकाश पेठे 9427786823 prakashpethe@gmail.com
————————————————————————————————————-