पूर्वीच्या काळी गाव, गावाकडची संस्कृती, गावची अर्थव्यवस्था कशी होती याचे प्रातिनिधिक रूप म्हणजे केळशी. गावाकडचे निसर्गसौंदर्य, तेथील लोकजीवन आणि त्यातील वेगळेपण हे सगळेच भूरळ घालणारे होते. आज गावे शहरीकरणामुळे सुधारली. पूर्वीच्या गावांबाबत अनभिज्ञ असलेल्या आजच्या पिढीला जुन्या गावची सैर केळशी या गावातून घडेल…
दापोली तालुक्यातील केळशी हे गाव निसर्गसंपन्न आहे. केळशीला तीन किलोमीटर लांबीचा मऊशार वाळूचा भव्य किनारा आहे. केळशीच्या समुद्रकिनाऱ्यावर नैसर्गिक रीत्या तयार झालेली वाळूची टेकडी आहे. त्या टेकडीचा शोध प्रा. श्रीकांत कार्लेकर यांनी 1990 मध्ये लावला. त्यानंतर अशोक मराठे यांनी सर्वसमावेशक संशोधन पुढे आणले. ती टेकडी त्सुनामीमुळे झाली असावी. जुन्या वस्तीचे अवशेष भारजा नदीच्या मुखाजवळील प्रदेशात आणि किनाऱ्यालगत सापडले आहेत. ते अवशेष सुमारे अठरा मीटर वाळूच्या थराखाली आढळले. वाळूच्या टेकडीच्या तळापासून चार मीटर उंचीवर मिळालेल्या कोळशाचे कार्बन-14 पद्धतीने कालमापन केले असता, तो कोळसा 1180 वर्षांपूर्वीचा असल्याचे आढळून आले.
केळशी गावात एसटी 1951 नंतर आली. त्या आधी, गाडी पकडण्यासाठी महाडला किंवा दापोलीस जावे लागे. दापोली केळशीपासून एकोणतीस किलोमीटर आहे. पूर्वी केळशी ते आडे गावी चालत किंवा बैलगाडीने पाच किलोमीटर जावे लागे. आंजर्ले गाव तेथून पाच किलोमीटरवर होते. तेथे खाडी पार करून आंजर्ले ते दापोली आठ-नऊ किलोमीटर चालावे लागे.
पूर्वी केळशीच्या समुद्रकाठी नारळीच्या बागा होत्या. खाऱ्या जमिनीत पोफळी विशेष होत नाहीत. गावात केळी, फणस, आंबे, रामफळ, पोफळी पेरू होते. गावापासून दूर डोंगराळ भागात बोरे, जांभळे, करवंद, काजू मिळत. केळशी गावात आजघडीला समुद्रापासून पूर्वेला जावे तसे केळी, पोफळीच्या बागा व नागवेलीच्या पानांचे मळे दिसून येतात. पावसाळ्यात भातशेती व उन्हाळ्यात वाल, उडीद, चवळी वगैरे कडधान्ये होत. काही ब्राह्मण पौरोहित्य करत. ज्यांची मुले मुंबईला असत, ते घरी मनिऑर्डर पाठवत. ते उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. ज्यांच्याकडे नारळी-पोफळी असत, त्यांना त्यांचे उत्पन्न होई. शेतीमाल वाहनव्यवस्थेची सोय नसल्याने गावातच विकावा लागे. बहुतांश लोकांची शेती असल्याने गावात शेतकऱ्यांच्या मालाला उठाव नव्हता. काही लोक उलाढाली करून माल विकण्यास बाहेर पाठवत. रेशनचे धान्य दळण्यासाठी सहा मैलांवरच्या आंजर्ल्याला चालत चक्कीवर जावे लागे. सुपारी, फणसाचे साठे बनवून मुंबईला जात असत. ब्राह्मणेतर जातींचे लोक पैशांची गरज पडली, की शहाळी पाडत आणि ती गावातच विकत. एक शहाळे एक आण्याला, तर नारळ चार आण्याला मिळत असे. सुक्या नारळाला थोडी जास्त किंमत येई. बऱ्याच लोकांकडे एक-दोन म्हशी असत. ते स्वतःपुरते दूध ठेवून बाकीचे बाजारात विकत. काही कारागिर हाताने माती लिपून गणपती बनवत. गणपतीचे साचे नंतर आले. तांबडी माती पाण्यात घालून-गाळून जी माती मिळेल, ती माती मूर्ती बनवण्यास वापरत. गावात सुतार होता. लोहार बाहेरगावाहून येत असे. त्याच्याकडून सगळे जण नांगर बनवून घेत. तांदूळ महाडहून येई. तसेच घरचेही भात असे. माल समुद्रमार्गे गलबतांनी गावात येत असे. समुद्रातील वाहनव्यवस्था पावसाळ्यात बंद असल्याने चार महिने बाहेरून काही सामान येत नसे. माल गावात येण्यास दिवाळी झाली, की मग सुरुवात होई. गव्हाचा वापर फक्त दिवाळीत होत असे. त्या दरम्यान साखर मिळे. जेवणात जास्त करून भात, वाल व ताक असे. तूरडाळ बाहेरून येई. त्याची आमटी करत. कापडचोपड मारवाड्याकडे मिळत असे. मारवाड्याकडे जवळ जवळ सगळ्याच वस्तू मिळत. गावातील लोकांना सावकार गरजेच्या वेळी वस्तू, शेतमाल याच्या मोबदल्यात किंवा जमिनी, दागिने गहाणवट ठेवून घेऊन पैशांची मदत करत.
लग्नात नातेवाईक आणि पंचक्रोशीतील माणसे बोलावण्याची पद्धत होती. साधारणपणे, आजूबाजूच्या गावातील मुली करून घेतल्या जात. अंगणात मांडव घालून लग्ने होत. घरच्या अंगणात मांडव घालण्यास खड्डा खणला तर त्यात तूस घातलेले असे. त्यामुळे खांब काढण्यास सोपा जात असे. घराच्या प्लास्टरमध्येही तुसाचा वापर केला जाई. तो वर्षानुवर्षे टिकतो. घाटावर गवताचे बारीक तुकडे करून ते प्लास्टरमध्ये वापरत.
सरकारी नोकरी फारशी कोणाला नसे. गावातील माणूस पोस्ट मास्तर असे. त्याच्या घरी टपाल (पोस्ट) येई. पोस्टमन किंवा रनर्स टपालाची वाटणी करणारे सरकारी नोकर असत. नंतर नव्या काळात रीतसर पोस्ट ऑफिस झाले. शिक्षकांना नियमित पगार मिळत असल्याने त्यांचे जीवन सुरळीत चाले. तेव्हा दळणवळणासाठी जलवाहतूक चाले. जास्त बोटी चालू असतील तेव्हा टपाल चार दिवसांत मुंबईला जात असे. बोटी बंद असताना रनर्स हर्णेला जाऊन टपाल पोचवत. आज गेलेला रनर उद्या परत येत असे. रनरच्या हाती खुळखुळा असलेली भाल्याची काठी असे. केळशीचे दोन पोस्टमन होते. एक गावात असे, तर दुसरा आजूबाजूच्या गावांत जाई. तो गावात एकाच ठिकाणी उभा राही. गावातील लोक त्या ठिकाणी जमत. पत्रे वाचण्यास फार कोणाला येत नसे. पण ते वाचून दाखवणारी माणसे असत किंवा कोणाकडून तरी वाचून घ्यावी लागत. पत्रांची पिशवी सीलबंद केली, की रनरच्या हाती पत्र देत व त्याला योग्य जागी पोचवण्यास सांगत. लहान गावातील माणसे रनरच्या हाती चिठ्ठी देत व तो ते काम विनामूल्य करे. रनर पत्रे घेऊन या गावाहून दुसऱ्या गावी झटपट चालत जाई व वाटेतील पोस्टाच्या पिशव्या घेऊन हर्णे बंदराला जाई. कोकणात परप्रांतीय नव्हते. बाहेरचा कोणी व्यापार उदिमास गावात आला तर त्याला त्याची नोंद गावाच्या पोलीस पाटलाकडे करावी लागे. साधारणपणे ही परवानगी तीन दिवसांची असे. सगळे मराठीत बोलत. अन्य भाषा वापरात नव्हती. गावाला बँकेची निकड कधी भासली नसावी. कारण लोकांकडे पैसे नव्हते.
मुलांची लोकल बोर्डाची शाळा होती. शाळेत प्रत्येक इयत्तेला एक याप्रमाणे सात मास्तर असत. सहाव्या-सातव्या वर्षी मुलाला शाळेत दाखल करत. पहिलीत का.भा.जाधव नावाचे मास्तर होते. ते उत्कृष्ट चित्रकार होते. त्या शाळेत व्हर्नाक्युलर फायनलपर्यंत शिक्षण होई. ती परीक्षा देण्यास तालुक्याच्या गावी, दापोलीला जावे लागे. स्पेशल क्लासमध्ये केळशी एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत इंग्रजी विषय शिकवत. त्यानंतर भूमिती व बीजगणित हे विषय शिकवण्यास सुरुवात झाली. उच्च शिक्षण घेण्याचे झाल्यास मुंबई किंवा पुण्यास जावे लागे. आजूबाजूला कॉलेज नव्हते. केळशीत नव्या काळात बारावीपर्यंत शिक्षण मिळे. पुढील शिक्षणासाठी मुलांना दापोलीस जावे लागे. दापोलीस आल्फ्रेड गॅडनी नावाची शाळा टेकडीवरील उंच जागी होती व सभोवताली आमराई होती. त्यामुळे शाळेत अगदी शांतता असे. इंग्रजांनी ती शाळा जांभ्याच्या दगडात बांधली होती. तिच्या खिडक्या अरुंद असल्या तरी उंच होत्या. शाळेत गणवेश नव्हता. अर्धी चड्डी आणि पत्र्याच्या गुंड्या असलेला सदरा. चड्डीला चिनी मातीची बटणे असत. विद्यार्थी तसा पेहराव करत; ब्राह्मण समाजातील मुले कधी धोतर-सदरा घालत व इतर जमातींत आखूड वस्त्र नेसत. शाळा दोन सत्रांत चाले. मुलाला दोन वेळा शाळेत जावे लागे. ड्रिल व ड्रॉर्इंग शिकवणारे शिक्षक वेगवेगळे होते.
गावातील काही जण तबला-पेटी वाजवत; भजन करत. सार्वजनिक गणपती नव्हता. सगळ्यांच्या घरी श्रीगणेशाची स्थापना होत असे.
रोजच्या जेवणात भात, आंबट वरण किंवा आमटी व ताक असे. त्याबरोबर लोणची, मिरच्या, पापड ‘तोंडी लावणे’ म्हणून घेतले जाई. सकाळी पातळ भात व दही. दुपारी फडफडीत भात, आमटी आणि पुन्हा संध्याकाळी पातळ भात, ताक असे. चहा मोठी माणसे घेत. रविवारी मुलांना कॉफी मिळे.
आखवे आळीत चारपाच आखवे कुटुंबे होती. आप्पा गोखले, बिवलकर, केळकर, वर्तक यांची चार घरे होती. ओक हे केळकर यांच्या घरात महाडहून आले. आज ओक कुटुंब गावात नाही, गोंधळेकर, साठे व घैसास आहेत. ती कोकणस्थ ब्राह्मणांची घरे होती. गावात आखवे आळी, परांजपे आळी, साठे आळी, तीठठे आळी, उभा घर आळी, ज्याला आता टिळक आळी म्हणतात. या सगळ्या आळ्या ब्राह्मणांच्या होत्या.
मुसलमान वस्ती गावाच्या एका टोकाला उंडीवर गावात; तसेच, खाडीच्या बाजूला होती. त्यांचा सगळा व्यवहार केळशीबरोबर होता. महार जातीचे लोक मुसलमान वाडीत राहत. केळशी गावात चैत्र महिन्यात हळदीकुंकू करत. देवी मांडून हरभऱ्याची डाळ, पन्हे यांचा प्रसाद दिला जाई. देवीच्या देवळाजवळ वडाचे झाड आहे. त्याला ‘सावित्रीचा वड’ असे म्हणतात. गावातील सर्व सुवासिनी तेथे वटपौर्णिमेच्या पूजेला जात. प्रत्येक शाखेचा पुरोहित वेगळा असे. सत्यनारायणाची पूजा क्वचित होत असे.
केळशीशी संबंध ठेवणारी आजूबाजूची कुटुंबे – आंबोली गाव केळशीपासून एक-दीड किलोमीटर आहे. तेथे राहणारी दोन ब्राह्मण कुटुंबे होती. त्यांपैकी केळकर यांची जमीनजुमला व आमराई होती. त्यांना अज्ञात संपत्ती मिळाली असावी असे म्हटले जाई. पण ते श्रीमंत होते ही गोष्ट खरी. त्यांची खोती वडवली गावी होती. कोकणात पाटाचे पाणी हे डोंगरातून येणाऱ्या नद्या, झरे यांचे. बारा महिने येणाऱ्या पाण्याचा उपयोग शेतीकामासाठी होत असे. डोंगराजवळ वस्ती असणाऱ्या गावात पाटाच्या पाण्याची सोय केलेली असे.
वेश्वी, उम्बरोल आणि वेळास ही खाडीच्या काठी असणारी गावे. तेथे करमरकर कुटुंबाची वस्ती होती. त्या तिन्ही गावी एकेकच ठोसर असे. ‘ठोसर’ म्हणजे श्रीमंत ब्राह्मण कुळे होती. त्यांच्याकडे धर्मकृत्ये करण्यासाठी जवळपासच्या गावातून पुरोहित बोलावले जात. बाकी सर्व मुस्लिम व बौद्ध वस्ती होती. मुसलमान लोक मोसमात आंब्याचा धंदा करत व परदेशी सफरीवर जात.
दालदी – कोकणचे कोळी ज्यांचे धर्मपरिवर्तन झाले होते, त्यांना दालदी म्हणतात. त्यांची मूळ आडनावे कायम आहेत. कोकणातील हिंदू-मुसलमानांचे एकमेकांशी सलोख्याचे व्यवहार आहेत. त्यांची भाषा मराठीच आहे. दालदी लोकांचा पेहेराव सदरा आणि लुंगी असा होता. स्त्रिया रंगीत घागरा चोळी व पांढरी ओढणी वापरत. त्या मासे खारवणे, वाळवणे, विकणे हा व्यवसाय करत. काही दालद्यांची मोठी गलबते होती. ते शंभर-सव्वाशे आंब्याची टोपली आठ आण्यांत कोकणातून मुंबईला नेत.
दंतमंजन म्हणून कणेचा वापर होई. कणे म्हणजे भाताच्या तुसावर पेटलेल्या गवरीचा तुकडा ठेवत. रात्रभरात तूस जाळून राख होई, तीच दात घासण्याची पावडर.
अळवंडी – म्हणजे दोन घरांमध्ये असलेली अरुंद जागा. व्यक्ती मुंबईहून बोटीने प्रवास करून आल्यावर, पाठीमागील दारी असलेल्या विहिरीवर तिने सर्व कपड्यांसह आंघोळ करून घेतल्यावरच तिला घरात घेत. कारण तेव्हा समुद्र प्रवास निषिद्ध होता.
लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांचे माहेर चिपळूणला व सासरचे घर केळशीला आहे.
– पुरुषोत्तम मुकुंद वर्तक (जन्म – 1934, मृत्यू – 2011)
शब्दांकन: प्रकाश पेठे 9427786823 prakashpethe@gmail.com
——————————————————————————————-