‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम ‘स्टारप्लस’ या हिंदी वाहिनीवर लागत असे. आता, तो ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवर लागतो. त्या कार्यक्रमाची जबाबदारी अमिताभ बच्चन यांच्यावर असे. सूत्रसंचालनाचा प्रयत्न मध्ये अन्य नटांनी केला. पुन्हा अमिताभ अकराव्या सीझनला आले. तो कार्यक्रम घरातील सगळी मंडळी एकत्र येऊन पाहत. त्यावेळी कायम वाटे, की काय लोक खेळतात! प्रत्येकाची कहाणी वेगळी. त्या कार्यक्रमाचा पहिला करोडपती झालेली व्यक्ती हर्षवर्धन नवाथे आठवतो. त्याला इतके पैसे जिंकल्यावर किती आनंद झाला असेल! हिंदीतून ‘कौन बनेगा करोडपती’चे दहा सीझन झाले. ‘कोण होईल मराठी करोडपती’ हा कार्यक्रम मराठी कलर्स मराठी वाहिनीवर (आधीचे ई टीव्ही) सुरू झाला. सचिन खेडेकर त्या कार्यक्रमाची सूत्रे सांभाळायचे. पुढे, तो ‘सोनी मराठी’ वाहिनीवर आला. नागराज मंजुळे यांनी त्याची सूत्रे सांभाळण्यास मार्च 2019 पासून सुरू केले.
माझा मित्र दर्शन मुंदडा याला ‘ऑनलाईन क्विज’चे भयंकर वेड आहे. केंद्र सरकारद्वारा काही क्विज येत असतात. तो त्यात सातत्याने खेळत असतो. कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये सुरू होते. त्यावेळी त्यांच्या ऑनलाईन क्विजही होत्या. दर्शनने त्यात सहभाग नोंदवला आणि तो त्या क्विजमध्ये यशस्वी झाला. त्याला दिल्लीला बोलवण्यात आले. त्याला तेथे कॉमनवेल्थ गेम्स संयोजनाकडून एक पदक, विंगशुटर, शूज आणि प्रमाणपत्र बक्षीस म्हणून मिळाले. तो काही कारणांमुळे दिल्लीला प्रत्यक्ष जाऊ शकला नव्हता. तो ‘कौन बनेगा करोडपती’ हिंदी आणि मराठीसाठीदेखील मागील चार वर्षांपासून प्रयत्न करत आहे. तो मला ऑनलाईन क्विजबद्दल सतत सांगत असे. मी जसा वेळ मिळेल तसा त्यात सहभागी व्हायचो. त्याने मला मराठीच्या ‘कोण होणार मराठी करोडपती’ (2019 चा सीझन) कार्यक्रमाविषयी सांगितले. मी विचार केला, “चला, प्रयत्न तर करून पाहूया!” कार्यक्रमादरम्यान माहिती यायची, की ‘मोबाईलवर ‘सोनी लाइव्ह’ अॅप डाउनलोड करा आणि हॉटसीटवर येण्याची संधी मिळवा किंवा घरबसल्या पैसे जिंका.’ मी मोबाईलवर ‘सोनी लाइव्ह’ अॅप डाउनलोड केले. त्यात ‘केबीसी प्ले अलाँग’मध्ये जाऊन पहिली नोंदणी केली. मी जेव्हा नोंदणी करत होतो, तेव्हा कार्यक्रम सुरू होऊन जवळपास दीड महिना झाला होता.
‘कोण होईल मराठी करोडपती’ हा कार्यक्रम सोमवार ते गुरूवार रात्री आठ ते साडेनऊपर्यंत सुरू असायचा. त्या चार दिवसांत रात्री आठ ते साडेनऊ हा वेळ त्या कार्यक्रमासाठी द्यावा लागायचा. मराठी ‘केबीसी’ खेळणे जेव्हा सुरू केले, तेव्हा माझा क्रमांक एकूण खेळणाऱ्यांमध्ये एकोणपन्नास हजारावर होता. मी त्या खेळात सातत्य ठेवून शेवटपर्यंत खेळलो तेव्हा माझा क्रमांक पाच हजाराच्या घरात आला होता. मराठी ‘केबीसी’ 15 ऑगस्टला संपले आणि 19 ऑगस्टला हिंदी ‘केबीसी’ सुरू झाले. त्या दिवसापासून सतत तेवढा वेळ तेथे द्यावा लागत आहे. तेथे माझी सुरूवात एकूण खेळणाऱ्यांमध्ये वीस लाखाव्या क्रमांकाने झाली. मी लक्षपूर्वक खेळू लागलो. बघता बघता, माझा क्रमांक दोन हजाराच्या जवळपास आला. खरे तर, तो आकडा मी उत्तर दिले, की सतत बदलत जायचा. क्रमांकात तो चढउतार सतत सुरू असतो. जर सगळीच उत्तरे बरोबर येत गेली तर क्रमांकात सुधारणा होते. पण एखादा मोठा प्रश्न चुकला, की खेळणाऱ्याचा क्रमांक कोठेतरी दूरवर फेकला जातो. ‘केबीसी’चे दररोज खेळणारे विजेते यांना विविध बक्षिसे ठरवून दिलेली आहेत. मी ‘केबीसी’च्या तीन भागांमध्ये सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिली, म्हणून मला तेथून दोन वेळा शंभर आणि एक वेळा दीडशे रुपये अशी बक्षीसे माझ्या बँकेतील अकाउंटमध्ये ‘कॅश ट्रान्स्फर’ने जमा झाली. तेथून खेळता खेळता जर ‘केबीसी’च्या ऑडिशनपर्यंत जाण्याची संधी मिळाली तर उत्तमच. पण समजा, नाहीच संधी मिळाली, तरी काही हरकत नाही. कारण तेथे मिळणारे ज्ञान ते मिळवण्यासाठी खेळाडू घेत असलेले कष्ट वाया जात नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, की तेथे येणाऱ्या काही व्यक्तींची परिस्थिती खूपच गंभीर असते. त्यातून ते कसे मार्ग शोधून बाहेर पडतात हेही शिकण्यासारखे आहे. ‘केबीसी’बद्दलची एकूण नियमावली अॅपवर आहे, पण तरीही थोडक्यात त्याबद्दल सांगतो.
जेव्हा टीव्हीवर कार्यक्रम सुरू होईल त्याच्या पाच मिनिटे आधी ‘सोनी लाइव्ह’ अॅप ओपन करून ‘केबीसी प्ले अलाँग’वर जाऊन क्लिक करायचे. जेव्हा टीव्हीवर कार्यक्रम सुरू होईल, तेव्हा अॅपवर दाखवायचे, की कार्यक्रम सुरू झाला आहे. कृपया प्रतीक्षा करा आणि समजा, प्रश्न येणार असेल तर पुढील प्रश्न लवकरच येत आहे असे दिसते. ‘केबीसी’च्या हॉटसीटवर बसणाऱ्या व्यक्तीची थोडक्यात माहिती दिसते. त्यावर खेळण्यासाठी ‘केबीसी’ने काही नियमावली तयार केली आहे. हॉटसीटवर बसलेल्या व्यक्तीला एकूण सोळा प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न एक हजार रुपयांसाठीचा असतो तर पंधरावा प्रश्न एक कोटी रुपयांसाठी असतो आणि शेवटचा प्रश्न सात कोटींचा जॅकपॉट प्रश्न असतो. त्याचे तीन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात दहा हजार रुपये, दुसरा टप्पा तीन लाख वीस हजार रुपये आणि तिसरा टप्पा एक कोटी रुपये. दुसरा टप्पा पार केल्यानंतर सात कोटींच्या प्रश्नाचे द्वार उघडते. खेळण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर त्यासाठी आधार म्हणून चार लाईफलाइन दिलेल्या असतात.
खेळ जेव्हा अॅपवर खेळला जातो, तेव्हा जरा वेगळ्या पद्धतीने खेळावा लागतो. टीव्हीवर प्रश्न विचारला जातो त्याच्या दोन ते तीन सेकंद आधी अॅपवर प्रश्न येतो. टीव्हीवर असलेल्या वेळेपेक्षा अॅपवर वेळ निम्मा असतो. पण जर समजा, टीव्हीवर बसलेल्या व्यक्तीला तो प्रश्न येत नाही, तो जर ‘लाईफलाइन’चा वापर करणार असेल तर मग अॅपवर वेळ जरा जास्त असतो. जेव्हा ‘हॉटसीट’वर बसलेल्या व्यक्तीला हजार रुपयांसाठीचा प्रश्न असतो; तेव्हा त्या प्रश्नाचे अॅपवर खेळणाऱ्या व्यक्तीला दहा गुण मिळतात. उदाहरणार्थ, दहा हजार रुपयांच्या प्रश्नाला शंभर गुण, तीन लाख वीस हजार रुपयांच्या प्रश्नाला तीन हजार दोनशे गुण, एक कोटीच्या प्रश्नाला एक लाख गुण. अॅपवर खेळणाऱ्या व्यक्तीचा प्रश्न चुकला; तर ते गुण त्याला मिळणार नाहीत. जोवर हॉटसीटवर बसलेली व्यक्ती खेळत आहे तोवर ऑनलाइन खेळाडूला प्रश्न विचारले जातात. नवीन व्यक्ती आली, की खेळ पुन्हा नव्याने सुरू. पण, अॅपवर खेळणाऱ्या व्यक्तीने आधी कमावलेले गुण त्याच्या नावावर राहतात. खेळाडूने कमावलेले गुण हे तो जेथून खेळत आहे तेथे दिसतात आणि एकूण खेळणाऱ्या व्यक्तींमध्येही दिसतात. उदाहरणार्थ – जर मी पालघर येथून खेळत असेन, तर मला तेथील ‘टॉप दहा’मध्ये असलेल्या व्यक्तींचे गुण समजतील.
जो गेममध्ये सातत्य ठेवेल आणि टॉप दोनशेमध्ये असेल अशा व्यक्तीला ऑडिशनसाठी बोलावले जाते. मग तेथे त्याला प्रश्नावली देऊन एक ‘टेस्ट’ घेतली जाते. त्यांनतर व्हिडीओ ऑडिशन होते. तेथून निवड झालेल्या व्यक्तीला ‘केबीसी’च्या सेटपर्यंत पोचता येते. मग हॉटसीटवर येण्यासाठी ‘फास्टर फिंगर फर्स्ट’मध्ये लवकरात लवकर उत्तर द्यावे लागते. केबीसीपर्यंत जाण्यासाठीचा असा हा प्रवास आहे. अॅपवर खेळून आनंद तर मिळतोच पण त्यात ज्ञानातही अधिक भरणा होत जातो. त्यामुळे खेळाडू जगाच्या माहितीशीही जोडूनराहतो.
– शैलेश दिनकर पाटील 9673573148
patilshailesh1992@gmail.com