आपल्या हयातीतच दंतकथा बनण्याचे भाग्य फारच थोड्या कलाकारांच्या वाट्याला येते. जागतिक कीर्तीचे चित्रकार आणि छायाचित्रकार केकी मूस यांच्या वाट्याला हे भाग्य आले. महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात त्यांच्याविषयी एक आदरयुक्त दबदबा होता. ते करत असलेल्या प्रयोगांविषयी उत्सुकता होती. पण हे सर्व सहजासहजी झाले नाही. एखाद्या तपस्व्याने तप करावे तशी त्यांनी कलेची साधना केली. त्यांच्यामुळे चाळीसगाव सारखे तालुक्याचे गाव कलेच्या जागतिक नकाशावर आले. त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती गूढतेचे वलय होते. कलेविषयी खोलात जाऊन विचार करण्याची किंवा समीक्षा करण्याची सवय नसलेल्या माध्यमांनी त्यांच्या एकाकीपणाविषयी आणि प्रेमकथेविषयी गुढतेचे वलय निर्माण केले. त्यांच्या कलेविषयी आदिती जाधव आपल्या आजच्या लेखात सांगत आहेत.
मोगरा फुलला या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
-सुनंदा भोसेकर
केकी मूस हे जागतिक किर्तीचे चित्रकार आणि छायाचित्रकार. चित्रकला आणि टेबल टॉप फोटोग्राफी यांच्या संयोगातून त्यांनी काही अद्वितीय कलाकृती निर्माण केल्या. त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती एक गुढतेचे वलय होते. ते राहात होते त्या चळीसगावातच नाही तर एकूणच कलाजगतात त्यांच्याविषयी कथा, दंतकथा प्रसृत होत असत. चाळीसगाववरून रेल्वेने प्रवास करत असताना भारताचे पहिले पंतप्रधान, पंडित नेहरू, केकी मूस यांना भेटण्यासाठी मुद्दाम चाळीसगावला उतरले. केकी मूस यांनी त्यांना मुलाखतीसाठी फक्त दहा मिनिटांची वेळ दिली होती. प्रत्यक्षात या गप्पा दीड तास लांबल्या. या भेटीतून पंडीत नेहरूंचे एक अप्रतिम छायाचित्र जन्माला आले. टेबल टॉप फोटोग्राफीविषयी जाणून घ्यायला उत्सुक असणारा कलासक्त, जाणकार साहित्यिक आणि एक अवलिया कलाकार यांची ही भेट होती.
केकी मूस ह्यांचा जन्म सधन पारसी कुटुंबात २ ऑक्टोबर, १९१२ साली झाला. ते मुंबईतील मलबार हिल या परिसरात वास्तव्यास होते. वयाच्या आठव्या वर्षी ते त्यांच्या आईवडिलांसोबत मुंबईहून जळगाव जिल्हातील चाळीसगाव ह्या तालुक्याच्या गावी स्थायिक झाले. त्यांचे वडील चाळीसगातल्या त्यांच्या बंगल्याजवळच सोडावॉटरची फॅक्टरी आणि वाईन शॉप चालवत असत. मुलाने आपल्या व्यवसायात लक्ष घालावे अशी त्यांची इच्छा होती पण केकींना लहानपणापासूनच कलेमध्ये रस होता. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये झाले होते आणि त्यानंतर कमर्शियल आणि फाईन आर्टस् मधला डिप्लोमा घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले होते. 1938 मध्ये हा डिप्लोमा घेतल्यानंतर त्यावेळच्या धनिक लोकांमध्ये प्रथा होती त्याप्रमाणे शिक्षण पूर्ण करून जगप्रवासाला गेले होते. त्यानंतर चाळीसगावला परत आल्यावर एक दोन वर्षे केकी चाळीसगाव बाहेरच्या डोंगराळ भागात चित्र, फोटो काढण्यासाठी फिरत असत पण 1940 नंतर त्यांनी घराबाहेर पडणे बंद केले आणि 1989 मध्ये त्यांचा मृत्यू झाला तोपर्यंत ते घराबाहेर पडले नाहीत. मात्र घरात राहून त्यांनी अक्षरश: हजारो कलाकृती जन्माला घातल्या. ते सतार शिकले, शास्तीय संगीत शिकले. 3000हून अधिक पुस्तके त्यांच्या संग्रही होती. त्यांनी काही भाषांतरेही केली आहेत.
वयाच्या १४-१५ व्या वर्षापासून त्यांनी जगभरातील छायाचित्र स्पर्धांसाठी आपली छायाचित्रे पाठवायला सुरुवात केली होती. १९४९ मध्ये ‘फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडिया’च्या पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत केकी यांना पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. प्रकाशचित्रकार, उत्तम संगीततज्ञ, संगीतप्रेमी, संगीतसंग्राहक, शिल्पज्ञ, मृद्-मूर्तिकार, काष्ठकारागीर, ओरिगामिस्ट, लेखक, अनुवादक भाषांतरकार, तत्त्वज्ञ, तरल कविमनाचा साहित्यिक असे अनेक पैलू असणारे केकी ह्यांचे व्यक्तिमत्व होते. कलेच्या विविध प्रांतातले पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत. पण हे पुरस्कार स्वीकारण्यासाठी ना कधी ते चळीसगावच्या बाहेर गेले ना कधी त्यांनी पुरस्कार जाहीर करणारे लिफाफे उघडून बघितले. एकटे पंडित नेहरूच त्यांना भेटायला आले असे नाही तर जयप्रकाश नारायण, धोंडो केशव कर्वे, महादेवशास्त्री जोशी, साने गुरूजी, बालगंधर्व अशी अनेक आणि अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसे मुद्दाम वाट वाकडी करून त्यांना भेटायला येत राहिली.
टेबल-टॉप फोटोग्राफी, स्थिर-चित्रण फोटोग्राफी, व्यंगचित्र फोटोग्राफी, फेक्ड फोटोग्राफी अशा विविध प्रकारात त्यांनी काम केले. टेबल टॉप फोटोग्राफीहे सर्वस्वी त्यांनी निर्माण केलेले आणि परिपूर्णतेला नेलेले तंत्र. त्यांच्या टेबल-टॉपनेच तीनशे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळवली. या कलेला त्यांनी अमूर्त चित्रकलेच्या स्तरावर नेऊन ठेवले, हे त्यांचे मोठे यश. मराठी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, हिंदी, गुजराथी, उर्दू, इत्यादी भाषा त्यांना अवगत होत्या. चाळीसगावच्या बाहेर न जाता त्यांनी छायाप्रकाशाचे अनेकानेक विभ्रम दगडी बंदिस्त हवेलीत राहून टिपले. लेखक दिलीप कुलकर्णी ह्यांना जवळपास २२ वर्ष केकींचा सहवास लाभला. त्यांनी केकींच्या कार्याचा लोकांना परिचय व्हावा म्हणून ‘केकी मूस लाइफ ॲण्ड स्टील लाइफ – ए फोटोग्राफिक पोर्टफोलिओ ऑफ केकी मूस’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. ह्या पुस्तकात दिलीप कुलकर्णी ह्यांनी केकींच्या व्यक्तिमत्वाची ओळख तर करून दिलीच आहे सोबतच त्यांच्या कलाकृतींची छायाचित्रेही आहेत. हे पुस्तक साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केले आहे. दिलीप कुलकर्णी ह्यांनी केकींविषयी लिहिताना म्हटले आहे – “पन्नास वर्ष वाट पाहत या खिडकीतून सतत रंग न्याहाळत तो पडून राहिला. दिवाळी, नाताळ यांचा पाठशिवणीचा खेळ त्याने डोळे म्हातारे होईपर्यंत पाहिला. एक दिवस निळे, लाल, हिरवे, पिवळे, प्रकाशाचे सारे दूत खिडकीबाहेरच थांबले. अर्धशतक वाट पाहूनही न थकलेला हा मित्रवर्य आता शतकानुशतके वाट पाहण्यासाठी दार आणि खिडकी नसलेल्या खोलीत अजूनही थांबला आहे.”
दिलीप कुलकर्णी ह्यांनी किस्त्रीम – दिवाळी विशेषांक १९९१ मधील ‘आत्मकैद…’ ह्या लेखात असे लिहिले आहे की, केकी ह्यांनी दिवभरातल्या दोन गोष्टी न चुकता केल्या आहेत. त्या म्हणजे – एक सूर्यास्त बघणे आणि दुसरे कलकत्ता मेल गेल्यावरच जेवणे. केकी ह्यांचे त्यांच्या एका बालमैत्रिणीवर प्रेम होते, त्यांनी मुंबई सोडली तेव्हा ती त्यांना व्हीटी स्टेशनला (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) निरोप द्यायला आली होती, तिथे तिने त्यांना वचन दिले होते की, ‘याच गाडीने मी तुझ्याकडे येईन’ पण तो दिवस कधी उगवलाच नाही, ती पुढे लंडनला निघून गेली आणि अखेरपर्यंत ती आलीच नाही. या मैत्रिणीचे नावही कोणाला माहीत नाही. पण केकी तिची आयुष्यभर वाट पाहत राहिले. १९३५ ते १९४५ अशा १० वर्षात तिची १०-१२ तिची पत्रं आली असे म्हणतात पण केकींनी त्यातलं एकही पत्र उघडून वाचले नाही कारण त्यांची अशी रोमँटिक कल्पना होती की, ‘ती आल्यावर तिच्या आवाजातच ती, तिने लिहिलेले पत्र वाचेल.’ लंडनहून येणारी फ्लाईट मुंबईला संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी यायची, वन डाऊन म्हणजे कलकत्ता मेल मुंबईहून बरोबर ८ वाजता सुटायची आणि रात्री १ वाजता चाळीसगावला यायची. रात्रीचा एक वाजायला आला की, केकी अस्वस्थ होत असत, ते बंगल्याची दारे खिडक्या उघडत आणि संध्याकाळीच खुडून ठेवलेल्या गुलछडीच्या फुलांचा एक गुच्छ व्हरांड्यात आणून ठेवत असत. आणि मगच ते रात्रीचे जेवण घ्यायचे. ही कथा पहिल्यांदा कोणी कोणाला सांगितली याचा शोध घ्यायला हवा.
‘विन्टर’ हा केकींचा लोकप्रियता मिळालेला टेबल-टॉप फोटोग्राफ. ह्या चित्रात बर्फाळ प्रदेशाची सकाळ दाखवली आहे. तसेच ‘को-एक्झिस्टन्स’ हेही त्यांचे गाजलेले टेबल टॉप छायाचित्र. काटेरी तारांच्या कुंपणाच्या भेंडोळ्याखाली रानफुले उगवली आहेत असे हे छायाचित्र. ‘दि पोट्रेट ऑफ नेहरू’, ‘ओनियन्स अवेकन्ड’ अशा त्यांच्या अनेक चित्रांना लोकप्रियता लाभली. केकी गेले तेव्हा ते एकटेच होते. जाण्याआधी काही दिवस त्यांनी आपलं इच्छापत्र तयार केलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं, “एखाद्या सागरी तुफानात, वावटळीत सापडलेल्या जहाजाचा कप्तान अखेरच्या क्षणीदेखील आपलं जहाज सोडायला तयार नसतो. त्याचप्रमाणे माझ्या अखेरच्या क्षणीदेखील माझी ही कलानगरी सोडण्याची माझी इच्छा नाही. माझ्या मृत्यूनंतरही शक्यतोवर या परिसरातच मला मूठमाती द्यावी, इथून दूर नेऊ नये.” त्यांच्या सूचनेनुसार स्थापन झालेल्या ट्रस्टने त्यांच्या इच्छापत्रानुसार आणि त्यांच्या चाळीसगावातील हवेलीत कलावस्तूसंग्रहालय स्थापन केले आहे. त्यांच्या सर्व कलाकृती येथे मांडून ठेवण्यात आल्या आहेत. या प्रतिभावान कलाकाराचे कायमस्वरूपी स्मारक नव्या कलाकारांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल असे आहे.
-आदिती जाधव
9665355974
aaditi2192003@gmail.com
संदर्भ :
- आत्मकैद… (लेख) – दिलीप कुलकर्णी, किस्त्रीम – दिवाळी विशेषांक १९९१
- स्मरण केकी मुसचे (लेख) – सुधीर जोगळेकर, अंतर्नाद, मे २०१४
- ‘KEKI MOOS – LIFE AND STILL LIFE’. Published by Maharashtra State Board for Literature & Culture, Bombay, 1983 –Script Writing Cover Design and Layout by Dilip Kulkarni, Pune (संजय सहस्रबुद्धे, आसाम; यांच्या सौजन्याने)
- https://kekimoosfoundation.org/about-keki-moos/
के की मूस यांना मी भेटलो आहे अनेक वेळा, विशेषतः सायंकाळच्या वेळी. माझे काका राष्ट्रीय स्तरावरील पैलवान होते. त्यांचा केकी मूस मॉडेल म्हणून उपयोग करीत. त्यांनीच करून दिलेल्या परिचयामुळे पुढे अनेक वर्ष मला त्यांच्याकडे जाण्यासाठी त्यांच्या बंगल्याचा दरवाजा खुला असे. एका इंग्रजी पुस्तकाचे केलेले भाषांतर त्यांनी मला वाचूनही दाखविलेले होते. पुढे मुंबईला आल्यानंतर त्यांच्याशी संपर्क राहिला नाही ही बाब मात्र दुःखद आहे. तरी देखील त्यांच्या भेटीचा आनंद कायम सोबत आहे. अजूनही चाळीसगावला गेलो की त्यांच्या आताच्या परिवर्तित झालेल्या बंगल्यात अगत्याने जाऊन येतो.
खूप भावना प्रधान. आदरणीय श्री के कीं सर ना विनम्र प्रणाम. असाधारण. 💐🌹🙏🌹💐🌺☘️🌻