Home व्यक्ती कुस्तीचे समालोचक – शंकर पुजारी

कुस्तीचे समालोचक – शंकर पुजारी

1
_KusticheSamalochan_ShankarPujari_1_1.jpg

कुंडलचे कुस्तीमैदान. मैदानावर हजारो लोक आलेले होते. एकास एक कुस्त्या सुरु होत्या. पैलवानांच्या जोडया आखाड्यात येत होत्या. वेधक कुस्ती करणा-या पैलवानाला कुस्तीशौकीन दाद देत होते. त्या कुस्त्यांचे समालोचन करत होते शंकर पुजारी, कुस्तीमैदानातील अण्णा! आखाड्यात एक कुस्ती झाली आणि त्यांचा आवाज आला, “ओह ऐका… आता ज्या पोरानं कुस्ती केलीय तो धनदांडग्याचा पोरगा न्हाय… ते एका हमालाचं पोरगं हाय… ज्ञानेश्वर हांडे त्याचं नाव… नुसत्या टाळ्या वाजवू नका जरा खिशात हात घालून त्याचं कौतुक करा…” असे त्यांनी सांगताच अनेकांचे हात खिशात जातात आणि ज्ञानेश्वर हांडे यांचे कौतुक सुरू होते.

शंकर पुजारी… कुस्तीमैदानावरचा आवाज. कुस्ती निवेदनातील महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नाव… शंकर पुजारी यांचा आवाज तीन-चार वाडीवस्तीवरच्या लहान कुस्तीमैदानांपासून ‘महाराष्ट्र केसरी’च्या आखाड्यापर्यंतच्या कुस्तीमैदानात लोकांच्या कानावर पडत आहे. त्या आवाजाने अनेक पैलवानांना प्रोत्साहन दिले आहे; काही पैलवान घडवले आहेत. शंकर पुजारी यांनी कुस्तीसारख्या भारतीय खेळाला संजीवनी प्राप्त करून देण्यासाठी आगळीवेगळी निवेदनशैली निर्माण केली आहे. पुजारी कुस्तीचे हे काम निरपेक्ष भावनेने करतात. त्यांचा आवाज कुस्तीच्या आखाड्यातील मैदानी आवाज ठरला आहे. ‘मला स्वतःला पैलवान होता आलं नाही, पण मुलाला पैलवान केलं, ते पुजारीअण्णांची कॉमेण्ट्री ऐकूनच…’ असे सांगणारे पैलवानांचे वडील मैदानावर भेटतात. त्यांच्या उत्कंठावर्धक आणि अभ्यासपूर्ण ‘लाईव्ह’ निवेदनामुळे कुस्ती जनसामान्यांत नेऊन तिला लोकमान्यता मिळवून देण्यात पुजारी यांचा वाटा सिंहाचा आहे. कुस्तीचा अभ्यास करणा-यांना पुजारी हा कुस्ती खेळाचा चालता-बोलता संदर्भग्रंथ वाटतो. पुजारी कुस्तीमैदानात तारीख-वार-सालासहित मागील वीस वर्षांतील कुस्त्यांचे वर्णन ऐकवू शकतात.

शंकर पुजारी यांचे शिरोळ तालुक्यातील कोथळी हे मूळ गाव. त्यांना लहानपणासून कुस्तीची आवड असलेल्या पुजारींना मोठा नामांकित पैलवान व्हायचे होते. वडिलांची तशी इच्छाच. म्हणूनच वडिलांनी त्यांना पैलवानकीसाठी सांगलीला पाठवले. पण 1972चा दुष्काळ अनेकांच्या आयुष्याचा काळ ठरला. त्या दुष्काळाने भल्याभल्यांच्या तोंडाला फेस आणला. पुजारी यांच्या पैलवान होण्याच्या मार्गात तो दुष्काळ मोठा अडथळा ठरला. त्यांची शेवटची कुस्ती हरिचंद्र बिराजदार यांच्याबरोबर झाली होती. ती सोडवली गेली. पुढे, बिराजदार हिंदकेसरी झाले आणि पुजारींना सांगलीची तालीम सोडून गावी यावे लागले. दुष्काळामुळे कुस्ती सुटली असली तरी कुस्ती त्यांच्या डोक्यातून गेली नाही. असाच एकदा रेडिओवरील क्रिकेटची कॉमेण्ट्री ऐकताना त्यांच्या मनात विचार चमकून गेला… मरगळलेल्या कुस्तीला आधुनिक कॉमेण्ट्रीची जोड दिली तर?

मग त्यासाठीचा त्यांचा प्रयत्न सुरू झाला. त्यांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, गाथा  हे ग्रंथ वाचलेले होते; कीर्तन, भारुडे, पोवाडे ऐकलेले होते. त्यामुळे भाषाप्रभुत्व आले होते. पुजारी यांनी कुस्तीपर्यंतचा इतिहास, कुस्तीवरचे ग्रंथ अभ्यासले. त्यांनी अक्षरशः पुराणकाळापासून  ते आधुनिक कुस्तीचा इतिहास मुखद्गत केला. शंकर पुजारी यांनी खेळणारा पैलवान, त्याची खासीयत, त्याचा  वस्ताद, त्याच्या वस्तादाचा वस्ताद, त्याचे घराणे, त्याचे गाव, त्या गावाचे वैशिष्ट्य, त्याची कोणत्या डावावर कमांड आहे आदी सर्व बाबींची अचूक माहिती मिळवून प्रत्यक्ष कॉमेण्ट्रीला सुरुवात केली… अल्पावधितच त्यांची कॉमेण्ट्री कुस्तीशौकिनांना आवडू लागली. कुस्तीच्या मैदानात जिवंतपणा आला… कुस्तीला आलेली  मरगळ दूर झाली आणि तेव्हापासून आजतागायत शंकर पुजारी यांचा आवाज कुस्तीचा स्टार प्रचारक बनला आहे.

त्यांचा प्रवास कुस्तीसाठी म्हातारपणातही पायाला भिंगरी बांधून सुरू आहे. कुस्तीच्या कॉमेण्ट्रीसाठी एक फोन केला की पुजारी हजर… ते मैदानात हजर झाले की टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत होतं. माईक हातात घेताच सुरुवात होते… ‘चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान… लोक म्हणत्याती पैलवानाचा मेंदू गुडघ्यात असतुया.  खर  हाय पण एक गुडघ्यात असलं  पण दुसरा डोक्यात असतुया. हे ध्येनात घ्या . पैलवान पेशाची थट्टा  करू नका ’ असं म्हणतच  ते मैदानावर एक नजर टाकून उपस्थित मल्लांची नावं, त्यांची कामगिरी सांगण्यास ते सुरुवात करतात… काहींना आखाड्यात बोलवतात… पुजारी यांच्या हातात माईक आला की आखाड्यात शांतता पसरते. कुस्तीशौकीन  कानात जीव आणून त्यांची कॉमेण्ट्री ऐकू लागतात… मैदान जसेजसे भरत जाते तशी  पुजारींच्या आवाजाला धार येते. मोठ्या कुस्त्या लागतात… मैदानात रंग भरतो… मध्येच ‘1978चे महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम मैदानात येताहेत… महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे मैदानात येत आहेत… महाराष्ट्र केसरी धनाजी फडतारे आलेत…’ असा पुकारा होतो.

 कुस्तीशौकिनांच्या नजरा त्या मल्लांचा शोध घेऊ लागतात. अप्पा कदम आखाड्यात येतात आणि मग  पुजारी यांचा आवाज येतो आवाज येतो ‘अप्पा कदम. 1978 चे महाराष्ट्र केसरी  अप्पा  कदम… जिस नाम में है दम, वह कदम अप्पा कदम…’ पुजारी यांची ही कोटी ऐकल्यावर टाळ्यांच्या गजरात अप्पांचे  स्वागत होते.

त्यानंतर काही वेळातच पुजारींचा पुकार ऐकायला येतो… ‘याच समयाला भारतमातेच्या कीर्तिमुकुटातील मानाचा तुरा हिंदकेसरी गणपतराव आंधळकर येत आहेत… या उत्साही तरुणाचे  वय आहे अवघे  एक्याऐशी… एक्याऐशी वर्षांचा तरुण, आंधळकर, आखाड्यात या…’ आणि मग हिंदकेसरी आखाड्यात येतात. हलगीवादक हलगी वाजवतात. आंधळकर जनताजनार्दनाला अभिवादन करत मंद पावलं टाकत चालतात. कुस्ती शौकीन टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करतात…

 कुस्त्या सुरु असतात. दरम्यान, पुजारी यांची कॉमेण्ट्री. पुन्हा आवाज येतो.

‘आलेऽऽऽ आलेऽऽऽ शेतक-यांचे कैवारी राजू शेट्टी आले. ज्यांनी कुस्तीचा आवाज भारताच्या संसदेत पोचवला, ज्यांनी कुस्तीची चर्चा संसदेच्या सभागृहात केली ते, कुस्तीवर जीवापाड प्रेम करणारे खासदार राजू शेट्टी आले…’ शेट्टी आखाड्यात येतात. पुजारी त्यांना दोन शब्द बोलण्याचा आग्रह करतात.

कुस्तीचे मैदान जसे रंगात येते तसा पुजारींचा आवाज वाढतो. शाब्दिक कोट्या सुरू होतात. ‘नुस्तं कुस्ती बघायला येऊ नका. घरात एक तरी पैलवान तयार करा. गल्लीगल्लीत रावण वाढलेत. घराघरांत राम तयार करा…’ असे आवाहन ते करतात…

‘महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर आलेत, महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर आलेत, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील… किती नावं घेऊ, आबा सूळ, खडकीची सगळी सूळ कंपनी आलीय, कौतुक करावं असा कौतुक डाफळे आलाय, सुनिल साळुंखे आलाय, अहो, या कुस्तीपंढरीत मल्लांची मांदियाळी आलीय. सर्वांचं स्वागत…’

कॉमेण्ट्री करताना शंकर पुजारी कुस्तीच्या इतिहासाचा आढावा घेतात. त्यांना कधी हरिश्चंद्र बिराजदार विरुद्ध सतपालची कुस्ती आठवते तर कधी मारूती माने विरुद्ध भगवान मोरे यांची कुस्ती आठवते… या ऐतिहासिक कुस्त्यांची माहिती दिल्यामुळे मैदानातील वातावरण कुस्तीमय होऊन जाते… आणि पुजारी यांची लाईव्ह कॉमेण्ट्री सर्वांनाच वेड लावते…

ते फक्त मोठ्या पैलवानांचे कौतुक करत नाहीत तर अगदी गरिबीतून आलेल्या पैलवानांकडेही त्यांचे लक्ष असते. ‘अरे, तो नाथा पवार कुठं हाय? दशरथ-श्रीपती, कर्णवर भावाभावांची जोडी कुठं हाय? मैदानात या…’

नाथा पवार हा नंदीवाले समाजातील शाळकरी मुलगा. खानापूर तालुक्यातील बेणापूर येथे सराव करतो. त्याची कमांड ढाक या डावावर आहे. तो भविष्यात चांगला पैलवान होऊ शकतो. पुजारी यांनी त्याच्यातील गुणवत्ता हेरली आहे. त्यामुळे ते नाथाने कुस्ती केली, की त्याची माहिती सांगतात…

“आवं हे नकट्या नाकाचं पोरगं कुस्तीतला  उगवता तारा हाय. एका नंदिवाल्याचं  पोर हाय. समोरच्याला  ढाक  देतो म्हणून देतं बघा. करा जरा कौतुक त्या पोराचं. गरीबाचं  पोरगं हाय.” पुजारीअण्णांनी असे सांगताच अनेक शौकीन नाथाला बक्षीस देतात. शंकर पुजारी यांच्या मैदानी आवाजाने असे अनेक पैलवान घडले आहेत, घडत आहेत. अनेक गावांत तालमी उभ्या राहिल्या आहेत. पुजारी यांच्या कामाची दखल घेत त्यांना सेवाभावी संस्थांनी पुरस्कार दिले आहेत. महाराष्ट्र सरकारकडे मात्र कुस्तीचा हा चालताबोलता संदर्भग्रंथ आणि स्टारप्रचारक उपेक्षित आहे. क्रीडाक्षेत्रातील मानाचा पुरस्कार अद्याप त्यांना मिळालेला नाही.

कुस्तीचे मैदान संपले, की पैलवानांची पुजारीअण्णांना  भेटण्यास गर्दी होते. शौकीनही येऊन भेटतात. आजारपणावर मात करत कुस्तीसाठी मैलोन् मैल प्रवास करतात. कुस्तीने त्यांना वेडे केले आहे.

(दिव्य मराठी डॉट कॉम, जून 2016 वरून उद्धृत)

– संपत  मोरे

About Post Author

1 COMMENT

  1. माझे गुरुवर्य आण्णाना उदंड…
    माझे गुरुवर्य आण्णाना उदंड आयुष्य लाभले ते फक्त कुस्ती मुले
    त्रिवार मुजरा आण्णांच्या निवेदनाला

Comments are closed.

Exit mobile version