Home संस्था गुणवंत कामगारांची आदिवासी सेवा

गुणवंत कामगारांची आदिवासी सेवा

4
_GunvantKamgaranchi_AadivasiSeva_1.jpg

‘गुणवंत कामगार सेवा संघ’ ही संघटना आदिवासी व गरीब मुलांना सुखी जीवनाचा आनंद देण्यासाठी गेले एकोणतीस वर्षें कल्याणमधील शहाड येथे कार्यरत आहे. संघटनेची स्थापना 1988 मध्ये करण्यात आली. संस्थेच्या सौजन्याने महिला गटसुद्धा कार्यरत आहे. संस्था कामगारांच्या मदतीतून वेगवेगळे उपक्रम राबवत असते.

दुर्गम क्षेत्रातील शहापूर तालुक्यातील शेंद्रणी या भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी जुन-जुलै महिन्यात दोनशे विद्यार्थ्यांना दप्तर, पेन, पेन्सिल, वह्या, रबर, शॉर्पनर, पटटी, कंपास पेटी, लंच बॉक्स, सँडल, छत्री, शालेय गणवेश, बिस्किट पुडे इत्यादी वस्तू पुरवल्या जातात. 2016 मध्ये हा कार्यक्रम 03 जुलै 2016 या दिवशी ठेवण्यात आला.

दुर्गम भागातील आदिवासी लोकांना साध्या एक वेळच्या जेवणाची समस्या असते. ती मंडळी सण साजरा कसा करणार? म्हणून संस्था प्रत्येक वर्षी दीपावलीनिमित्त मुरबाड, शहापूर, वाडा, मोखाडा, कसारा, जव्हार, विक्रमगड या तालुक्यातील एखाद्या गावाची निवड करून आदिवासी कुटुबांना दिवाळीचा फराळ, सतरंजी, ब्लँकेट, टॉवेल, मुलांना बनियन, अंडरवेअर, शर्ट, पँट, मुलींना आणि महिलांना गाऊन, साडी, लहान मुलांना फटाके व बिस्किटे, चॉकलेटे वाटण्यात येतात. वाटपाच्या कार्यक्रमाआधी संघटनेचे काही कार्यकर्ते त्या गावात जाऊन, घरातील परिस्थिती पाहून प्रत्येक घरातील सदस्यांची नोंद घेतात. घरात किती पुरुष/महिला, मुलं/मुली आहेत? त्यांची वये नोंदवून त्यानुसार त्यांना कपडे घेतले जातात. अगदी पाच महिन्यांचे बाळ जरी असले तरी त्याला नवीन कपडे दिले जातात. त्यासाठी निधी शहाडमधील ‘सेंच्युरी रेयॉन कंपनी’ कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते स्टाफपर्यंतचे लोक उभा करतात. इच्छुक व्यक्ती दोनशे ते एक हजार रुपयांपर्यंत निधीत भर टाकतात. दिवाळी फराळ वाटपासाठी फार दूर जावे लागते. जाण्या-येण्याच्या सोयीसाठी सेंच्युरी कंपनी संघटनेला बसेसची सुविधा उपलब्ध करून देते. भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम दिवाळी सुरू होण्याआधीच्या रविवारी घेण्यात येतो. ऑक्टोबर 2017 मध्ये विक्रमगड तालुक्यातील दातेलपाडा येथे एकशेसाठ आदिवासी कुटुंबीयांना फराळ वाटप करण्यात आले होते.

आदिवासी विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन ‘विद्यार्थी दत्तक योजना’ या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीपर्यतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दप्तर, गणवेश, छत्री, सँडल व इतर खर्च देण्यात येतो. पन्नास विद्यार्थी त्या योजनेचा लाभ घेत आहेत. संघटनेचे वर्षभरातील हे दोन्ही उपक्रम नियमित होत असतात.

शहापुर तालुक्यातील ‘तृष्णापूर्ती…एक अभियान’ या अंतर्गत फणसवाडी या गावामध्ये बोअरवेल खणून, त्यावर पंप बसवून दोन हजार लीटर क्षमतेची टाकी बसवण्यात आली. तसेच, चार नळ बसवून पाणीपुरवठा करण्यात आला. त्यासाठी एक लाख अठरा हजार रुपये खर्च आला. ती रक्कम महिला व पुरुष यांनी मिळून ‘सेंचुरी रेयॉन कॉलनी’मधून दरमहा रद्दी जमा करून त्या विक्रीतून वर्षभरात उभी केली. त्यामुळे त्या उपक्रमाला ‘रद्दीतून लघुपाणी योजना’ असे नाव देण्यात आले.

संस्थेतर्फे एकोणतीस वर्षांत कल्याण, उल्हासनगर, मुरबाड, कर्जत, रायगड, शहापूर, विक्रमगड, मोखाडा, जव्हार, वाडा, भिवंडी, पालघर या सर्व तालुक्यांमध्ये उपक्रम राबवले गेले आहेत. त्यासाठी ‘सेंचुरी रेयॉन कंपनी’, ‘सेन्रे महिला प्रगती’ आणि ‘लायन्स क्लब’ या संस्था सहकार्य करत असतात.

गुणवंत कामगार सेवा संघ, शहाड
विलास साने, 9967024190

– नेहा जाधव

About Post Author

4 COMMENTS

  1. सुंदर लिखाण आणि कार्यहि…
    सुंदर लिखाण आणि कार्यहि अप्रतिम

  2. We all proud of you. खूप…
    We all proud of you. खूप चांगलं कार्य करत आहात तुम्ही. कधी मदत लागली तर फुल नाही पण फुलाची पाकळी देण्याचा भगवंताच्या कृपेने नक्कीच प्रयत्न करेन.

  3. लेख उत्तम लिहलाय…
    लेख उत्तम लिहलाय
    गुणवंत कामगार सेवा संघ फार उपकारक काम करते आहे सेवा संघाला कधीही काहीही कमी पडू नये

Comments are closed.

Exit mobile version