फेब्रुवारी ते जूनपर्यंतच्या काळात शेतीची कामे नसल्याने स्त्रिया वर्षभरासाठी, विशेषतः पावसाळ्यासाठी अनेक पदार्थ तयार करून ठेवत असत. या काळात तयार केल्या जाणाऱ्या वाळवणाच्या पदार्थांपैकी एक म्हणजे कुरडया. हा पदार्थ गव्हाच्या चिकापासून तयार केला जातो. कुरडयांना ग्रामीण भाषेत कुरवड्या असे म्हटले जाते. हा पदार्थ महाराष्ट्रातील अनेक परिसरांमध्ये आढळतो. काही बोलीभाषांमध्ये कुरडयांना वेगवेगळी नावे असल्याचे दिसते. उन्हात वाळवून तयार केला जाणारा हा पदार्थ आरोग्यासाठी पोषक असतो. तळणाचे पदार्थ तळताना कुरडया सर्वप्रथम तळल्या जातात. ब्राम्हणांप्रमाणे कुरडयांना मिळणारा पहिला मान पाहून खानदेशात त्यांना ‘ब्राम्हण’ असे म्हटले जाते.
साहित्य – 2 किलोग्रॅम गहू (खपली गहू असेल तर उत्तम) आणि चवीनुसार मीठ
कृती – गहू तीन दिवस भिजत घालावे. त्यातील पाणी दररोज बदलावे. पाणी न बदलल्यास गव्हाचा घाण वास येतो. तीन दिवसांनंतर गहू चांगले भिजतात. गव्हातील पाणी अलगद काढून टाकावे. त्यानंतर गव्हाचा चीक काढावा लागतो. पाणी काढताना गव्हावर दाब दिल्यास चीक पाण्यात वाहून जातो. चीक काढण्यासाठी भिजलेले गहू पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावेत. चीक मिक्सरच्या साह्यानेही काढता येतो. मिक्सरमधे गव्हाची साल बारीक वाटली जाते. त्यामुळे कुरडयांचा रंग तांबूस लाल होतो. गावाकडे अजूनही चीक काढण्यासाठी पाटा-वरवंट्याचाच वापर करतात.
गहू वाटल्यानंतर तयार झालेला लगदा हाताने दाबून त्यातून चीक बाहेर काढावा. सच्छिद्र कापडाच्या साह्यानेही चीक काढता येतो. एकदा चीक काढल्यानंतर गव्हाच्या चोथ्यात पाणी टाकून त्यावर पुन्हा दाब द्यावा. त्यामुळे उरलासुरला चीक बाहेर निघण्यास मदत होते. काढलेला चीक एका भांड्यात ठेवावा. सुमारे आठ तासांनंतर चीक खाली बसतो आणि पाणी वर राहते. ही प्रक्रिया रात्री योजल्यास चीकातील पाणी वर येण्यास सकाळपर्यंत पुरेसा वेळ मिळतो. वर आलेले पाणी फेकून द्यावे. त्यानंतर चीक मंद आचेवर शिजवावा. चीक शिजून घट्ट होईल अशा प्रमाणात पाणी घालावे. शिजवताना त्यात चवीप्रमाणे मीठ घालावे. चीक शिजत असताना पळीने (चमच्याने) सतत हलवत राहावे. त्यामुळे त्यात गाठी होत नाहीत. चीक गरम आणि घट्ट आहे तोपर्यंत शेवेच्या साच्यात घालून त्याच्या कुरडया पाडाव्यात. तयार झालेल्या कुरडया कडक उन्हात वाळत घालाव्यात. काही वेळानंतर कुरडया उलटून घ्याव्यात. यामुळे कुरडया ओलसर राहत नाहीत. जर रंगीत कुरडया हव्या असतील तर त्यात खाण्याचा रंग टाकला जातो. कुरडया सणासुदीला, विशेषतः पुरणपोळीच्या जेवणासोबत तळल्या जातात.
कुरडया करताना जो चीक शिजवला जातो तो आरोग्यास पौष्टिक आणि शक्तिवर्धक असतो. आजारपणात रूग्णास ताकद यावी यासाठी गरम चीक खाण्यास दिला जातो. जुलाब झालेल्या व्यक्तीला औषध म्हणून कुरडया तळून दह्यात टाकून खाण्यास दिल्या जातात.
कुरडयांना ग्रामीण भाषेत कुरवड्या असे म्हटले जाते. फेब्रुवारी ते जूनपर्यंतचा काळ शेतीची कामे नसल्याने त्या काळात स्त्रिया वर्षभरासाठी, विशेषतः पावसाळ्यासाठी अनेक पदार्थ तयार करून ठेवत असत. त्यामुळे त्या दिवसांना ‘सामानाचे दिवस’ असे म्हटले जाते.
प्रांतागणिक कुरडया तयार करण्याची पद्धत काही प्रमाणात बदललेली दिसते. खानदेशात गहू चांगला आठ दिवस भिजत ठेवून त्याचा काढलेला चीक दोन दिवसांपर्यंत अॅल्युमिनियमच्या भांड्यात ठेवला जातो. जो चीक शिजवला जातो त्यास ‘घेरणं’ असे म्हटले जाते. शिजवत असताना त्यात गरम पाणी टाकले जाते.
कुरडया तळताना इतर कोणत्याही पदार्थापूर्वी तळून घ्याव्यात. भजी, वडे अशा पदार्थांनंतर कुरडया तळल्यास त्या नीट फुलत नाहीत. याकरता कुरडया सर्वप्रथम तळल्या जातात. ब्राम्हणांप्रमाणे कुरडयांना मिळणारा पहिला मान पाहून खानदेशात त्यांना ‘ब्राम्हण’ असे म्हटले जाते. खानदेशात श्राद्धाला, विशेषतः पितृपक्षाला कुरडया लागतात. अक्षय तृतीयेलाही डांगरावर (खरबूज) ठेवण्यासाठी कुरडया आवश्यक असतात. शेवेच्या साच्यातून कुरडया पाडताना अगदी शेवटी जे पीठ साच्यात उरते त्याचे लहान वडे तळले जातात. अहिराणी भाषेत त्या पदार्थाला वडे तर तावडी भाषेत करोळे असे म्हटले जाते.
चोथ्याची भाजी
गव्हाचा चीक काढताना निघालेल्या गव्हाच्या चोथ्याची कांदा टाकून भाजी केली जाते. कांदा तेलात खरपूस परतून घ्यावा. त्यात थोडेसे पाणी टाकून त्यास उकळी आणावी. उकळी आल्यानंतर त्यात गव्हाचा चोथा टाकावा. चवीनुसार मीठ-मसाला घालावा. त्यानंतर भांड्यावर झाकण ठेवून पाणी आटेपर्यंत भाजी शिजू द्यावी. चवीला आंबूस (आंबट) लागणारी ही भाजी आरोग्यास पौष्टिक असते. कष्टाची कामे करणा-या गुरांना गव्हाचा चोथा खाण्यास दिला जातो. मात्र तो गाई-म्हशींसारख्या दुभत्या जनावरांना दिला जात नाही.
कुरडयांची भाजी
वाळलेल्या कुरडयांची भाजीही करता येते. कांदा तेलात खरपूस परतून घ्यावा. त्यात थोडेसे पाणी टाकून त्यास उकळी आणावी. पाण्यास उकळी आल्यानंतर कुरडयांचा चुरा करून त्यात टाकावा. त्यात चवीनुसार मीठ-मसाला घालावे. पाणी आटेपर्यंत भाजी शिजवावी.
संकलन साह्य – कविता कोळी, जळगाव
सुवर्णा गायकवाड,
रामायण चौक, मु. पो. अकलूज,
ता. माळशिरस, जि. सोलापूर,
९९७५०७५८८४
coolvishalsalunkhe@gmail.com
टिप –
तावडी– जळगाव-धुळे-नंदूरबार या परिसरात तावडा नावाच्या जमातीकडून बोलल्या जाणा-या बोलीभाषेचे नाव तावडी असे आहे. ही मूळात भिल्लांची भाषा. ती अहिराणीची पोटबोलीही समजली जाते.