कुमारप्पा हे शाश्वत, पर्यावरणस्नेही, न्याय्य व अहिंसक अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते, गांधीवादी विचारवंत होते. त्यांनी शाश्वत, सर्वसमावेशक व विकेंद्रित विकासाची संकल्पना ऐंशी वर्षांपूर्वी मांडली. कुमारप्पा यांनी सुचवलेला मार्ग अधिक शहाणपणाचा व शाश्वततेकडे नेणारा आहे.अक्षय ऊर्जेच्या मदतीने विकेंद्रित उद्योग व सेवा यांच्या नवीन संधी सूक्ष्म, लहान व श्रमप्रधान उद्योगांत विकसित कराव्या लागतील असे त्यांचे म्हणणे आहे…
‘द वेब ऑफ फ्रीडम’ हे पुस्तक बंगलोरच्या नामवंत भारतीय विज्ञान संस्थेतील संशोधक-प्राध्यापक डॉ. वेणुमाधव गोविंदु व डॉ. दीपक मालघन यांनी लिहिलेले आहे. वेणुमाधव हे विद्युत अभियांत्रिकीत तर दीपक मालघन हे पर्यावरणीय अर्थशास्त्रात पीएच डी आहेत. त्यांनी लिहिलेले पुस्तक अर्थतज्ज्ञ जे.सी. कुमारप्पा ह्यांचे जीवन, विचार व कार्य ह्यांविषयी आहे. कुमारप्पा हे शाश्वत, पर्यावरणस्नेही, न्याय्य व अहिंसक अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते, गांधीवादी विचारवंत होते.
कुमारप्पा यांनी शाश्वत, सर्वसमावेशक व विकेंद्रित विकासाची संकल्पना ऐंशी वर्षांपूर्वी मांडली हे विशेष. त्याची दखल देशात किंवा परदेशात तेव्हा घेण्यात आली नाही. पण संयुक्त राष्ट्रांच्या एकशेअठ्याहत्तर देशांच्या आमसभेने सप्टेंबर 2015 मध्ये एकमताने स्वीकारलेली शाश्वत विकास उद्दिष्टे हा कुमारप्पा यांच्या विचारांचाच विकास आहे !
कुमारप्पा यांनी त्यांच्या ‘सार्वजनिक वित्त व भारतातील गरिबी’ या शोधनिबंधात इंग्रज सरकारच्या आर्थिक धोरणांची समीक्षा केली आहे. त्यातील करपद्धत, सरकारी यंत्रणेवर होणारा खर्च, गरीब व वंचित जनतेसाठी असणारी तरतूद आणि श्रम व नैसर्गिक संसाधनांचे शोषण ह्या निकषांवर भारत सरकारच्या पंच्याहत्तर वर्षांतील कामगिरीचे विश्लेषण करणे शक्य आहे. त्यानुसार, भारत सरकारही इंग्रज सरकार सारखीच आर्थिक धोरणे स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षे राबवत आहे हे स्पष्ट होते. त्यात बदल कसा करण्यास हवा याची दिशाही कुमारप्पा यांच्या लिखाणातून मिळते.
देशाचे आर्थिक नियोजन स्थानिक साधनसंपत्ती व कौशल्ये; तसेच, वंचित व उपेक्षित लोकांच्या जीवनावश्यक गरजा डोळ्यांसमोर ठेवून, प्रत्यक्ष गावात जाऊन लोकांच्या सहभागाने करण्यास हवे. त्याचा वस्तुपाठ त्यांनी केलेले मातर तालुका; तसेच, मध्य प्रांत व विदर्भ येथील सहाशे गावांचे सर्वेक्षण ह्यांतून मिळतो. त्यांनी त्यात मांडलेले विकासाचे प्रारूप सरकारी पातळीवर मान्य झाले आहे. पंचायत राज कायदा, पेसा कायदा व वन अधिकार कायदा ह्यांना मिळालेली मंजुरी व त्यांच्या अंमलबजावणीत येणारे अनुभव हे कुमारप्पा यांची अंतर्दृष्टीच अधोरेखित करतात. आज, शेतीला बाजारू स्वरूप आले आहे व शेतकरी अधिकाधिक कंगाल होत आहे ! या पार्श्वभूमीवर कुमारप्पा यांनी सुचवलेला मार्ग – नगदी पिकांऐवजी धान्य, डाळी, तेलबिया, भाजीपाला, फळे यांना प्राधान्य, मोठ्या धरणांवर खर्च करण्यापेक्षा गावातील तलावदुरुस्ती व शेतीची बांधबंदिस्ती करणे व गुरांचा शेतीत वापर – अधिक शहाणपणाचा व शाश्वततेकडे नेणारा होता, हे भारतीय जनतेला आता समजते ! मोठ्या भांडवलप्रधान उद्योगामुळे बेकारी व अर्धबेकारी या समस्या अधिक बिकट झाल्या आहेत. त्या सोडवण्याच्या असतील तर अक्षय ऊर्जेच्या मदतीने विकेंद्रित उद्योग व सेवा यांच्या नवीन संधी सूक्ष्म, लहान व श्रमप्रधान उद्योगांत विकसित कराव्या लागतील. मात्र हे उत्पादन मुख्यत: स्थानिक गरजा लक्षात घेऊन करण्यास हवे. कोरोना, मंदी व दुष्काळाचे अनुभव यांनी भारतीय जनतेला हे शिकवले, की विकेंद्रित अर्थव्यवस्था ही अधिक स्थिर व शांततापूर्ण असते. कुमारप्पांचा अनोखा अर्थविचार समजून घेण्यास हे पुस्तक मदत करते. आजच्या गोंधळलेल्या परिस्थितीत कुमारप्पांच्या जीवनकार्याचा साकल्याने अभ्यास करून, त्यांतील प्राणतत्त्वे वाचकांसमोर मांडल्याबद्दल लेखकांचे अभिनंदन करण्यास हवे. त्यांनी अफाट मेहनत घेऊन त्या पुस्तकातील ऐवज सिद्ध केला आहे. अर्थव्यवस्था, पर्यावरण, ग्रामविकास, शेती, विकासाची संकल्पना, गांधीविचार ह्यांपैकी कोणत्याही विषयात रस असणाऱ्यांनी हे पुस्तक वाचण्यास हवे.
– संध्या एदलाबादकर 8830241952
(सर्वंकष- एप्रिल-मे-जून 2022 अंकावरून उद्धृत)
————————————————————————————————————————————–