‘अस्सल कच्चा चिवडा’ हा विस्मृतीत चाललेला खास विदर्भी पदार्थ आहे. त्यासाठी जाडे किंवा पातळ असे, कसलेही पोहे घ्यावे. त्यात कच्चे तेल, कच्चे शेंगदाणे, कच्चा कांदा, हाताने तोडलेली कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून जरासे मीठ टाकावे की कच्चा चिवडा तयार होतो ! त्या चिवड्यात मेथी व गूळ घालून केलेला कैरीच्या ताज्या लोणच्याचा खारपण जातो. त्या पोह्यात चुलीवरच्या निखाऱ्यात भाजून घेतलेली मिरची कालवली तर एकदमच सुपर–डुपर कच्चा चिवडा बनतो.
त्या कच्च्या चिवड्याला विशेष महत्त्व मार्च महिन्यात असायचे, कारण दुपारच्या वेळी परीक्षेची तयारी करताना झोप यायची, अशा वेळी वाडगाभर कच्चा चिवडा रिचवला की अभ्यासासाठी तरतरी येई. ‘कच्चा चिवडा’ दोघातिघांनी मिळून खाण्याचा असेल तर खाणाऱ्यांच्यामध्ये आपसांत सख्य असावे लागते. कारण मोठी माणसे घरात दुपारच्या वेळी झोपलेली असावीत आणि आपण स्वयंपाकघरात खुडबुड करत कच्चा चिवडा बनवून खाणे यासारखे सुख नाही ! दादरा लावलेल्या बरणीत भरून ठेवलेल्या आंब्याच्या लोणच्यातल्या फोडी चोरून त्या कच्च्या चिवड्यात घालणे म्हणजे ‘अल्टिमेट’ साहस असायचे ! कधी कधी, आम्हांकडून ताज्या कैरीच्या तिखटमीठ लावलेल्या फोडीही त्या कच्च्या चिवड्याबरोबर खाल्ल्या जात आणि वर माठातील थंडगार पाणी ! अहाहा !
काही वेळा, कच्च्या चिवड्यात डाळही घालत. काही हौशी लोक त्यात चुरमुरेही घालत. तर काही घरांमध्ये ‘कच्चा चिवडा’ म्हणजे फक्त चुरमुऱ्यांचाही करत. कच्चा चिवडा खाण्यास दात मात्र पक्के असावे लागतात.
आमच्या हिंगणघाटला राहणाऱ्या एका मुलीचे लग्न कोल्हापूरात झाले. तिचे सासर आणि नवरा, सगळे चांगले होते पण तिला बाकी कसली नाही तरी कच्च्या चिवड्याची फार आठवण येई. बरे, कोल्हापूरला कोणाला कच्च्या चिवड्याची कल्पनाही करता येत नसे. तिच्या सासरच्या घरी कोल्हापूरात मिळणाऱ्या टपोऱ्या चुरमुऱ्यांच्या भडंगांचे डबे अक्षय भरलेले असत. पण त्यामुळे तर तिची तिच्या माहेरच्या चुरमुऱ्यांची आणि त्या कच्च्या चिवड्याची आठवण अधिकच तीव्र होई. शेवटी, तिच्या आईने ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’मधून कोणाच्या तरी हाती चक्क चुरमुऱ्याचे पोते पाठवून दिले ! तिकडे मिळणारे चुरमुरे म्हणजे पातळ आणि लांबट असतात. त्यामुळे त्यावर तेल, तिखट मीठ टाकले की ते आतपर्यंत मुरते. मग त्यात बाकी काहीच घालावे लागत नाही.
तेल, तिखट, गोडा मसाला आणि चवीपुरते मीठ, यांबरोबर हाताने फोडलेले कांदे तसेच चुरून त्या चुरमुऱ्यात घालून केलेल्या कच्च्या चिवड्याला तिकडे ‘भत्ता’ असेही नाव आहे. कधी त्यात भाजलेले शेंगदाणे आणि फुटाणेही घालतात. घरात पाहुणे जमले आणि संध्याकाळी काही खावेसे वाटले की ‘भत्ता’ लावायचा. कार्यकर्त्यांच्या, संघटनांच्या बैठकीसाठी ‘भत्ता तयार करणे’ हे एक कामच असायचे.
उत्तर कर्नाटकातील ‘लावलेले किंवा कालवलेले पोहे’ ही लज्जत वेगळीच ! त्यासाठी पोहे भाजून घेतात आणि त्यात तेलात कालवलेले मेतकूट, तिखट, हळद आणि मीठ चोळून डबे भरून ठेवतात. कधी ते पोहे दही घालून खावेत किंवा भरपूर ओले खोबरे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे आणि खाराच्या तळलेल्या मिरच्या घालून उतरत्या दुपारी खावेत. वयाच्या साठीनंतर अनेक जण रात्रीचे जेवण सोडून देतात. त्यांच्यासाठी रात्रीसाठी ‘लावलेले पोहे’ म्हणजे अगदी ‘द बेस्ट फराळ’ असतो. लावलेल्या पोह्यांसाठी पातळ पोहेच वापरले जातात. तशाच प्रकारचे कच्चे पोहे बिहारमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी दह्याबरोबर खातात. त्याचे नाव ‘दही च्युडा/च्युरा’ असे आहे. त्यासाठी साधेच पोहे थोडेसे भाजून घेतात. काही ठिकाणी फुलवलेले पोहेही भाजून घेतात. त्यावर फक्त किंचित मीठ घातलेले असते. मकर संक्रांतीच्या सुमाराला त्या दही च्युड्यावर गूळ किंवा साखर घालून त्याबरोबर मलईदार दही देतात. एकूणच, पोहे भातापेक्षा हलके आणि त्यात लोह असल्यामुळे ‘दही च्युडा’ हा एक पित्तशामक, आरोग्यासाठी उपयुक्त उत्तम नाश्ता प्रकार आहे.
कच्च्या चिवड्याचे अतिप्रगत रूप गोवा, कारवार ते थेट गोकर्ण-महाबळेश्वरपर्यंत चाखण्यास मिळते. कच्च्या पोह्यांवर नारळाचे दूध आणि भरपूर ओले खोबरे आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या असे सगळे घातले की त्यांचा नाश्ता तयार होतो. कधी त्यावर चिरलेला गूळ घालतात तर कधी दही घालतात. बाकी कोथिंबीर, शेंगदाणे वगैरे आवडीप्रमाणे किंवा कोणी पाहुणे आले तरच त्या पोह्यात जाते.
गगनबावड्याला ताज्या कांडून आणलेल्या लालसर पोह्यांना तूप, तिखटमीठ लावून खाण्यायोग्य करतात. ते पोहे चवीला एकदमच भारी लागतात. आज्यांना चावण्यास सोपे जावेत म्हणून त्याच पोह्यात किंचित साखर आणि भरपूर ताक घालतात. त्या पोह्यांना ताकातले तिखमिखले पोहे म्हणतात.
या सर्व पोहे प्रकारांना कच्चे का म्हणायचे? कारण त्यांपैकी कशालाच फोडणी घालत नाहीत म्हणून. सुदाम्याने श्रीकृष्णासाठी नेलेल्या पोह्यांना देखील काही पुराणात कच्चे पोहे किंवा कच्चा चिवडा म्हटले आहे. कच्च्या चिवड्याचे अजून एक रूप म्हणजे भरतात किंवा आमटीत कालवलेले पोहे. कच्चे पोहे वांग्याच्या, कोहळ्याच्या, दूधी किंवा घोसावळ्याच्या भरतात किंवा शिळ्या आमटीत कालवून त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घातली तर त्या प्रकारचे कच्चे पोहेही फार छान लागतात.
– मंजूषा देशपांडे 9158990530 dmanjusha65@gmail.com
धामणगाव रेल्वे,तिवसा हा तालुक्यात हे रस्त्यावरही मिळते.कौडण्यपूर येथे घाटावर ह्याची अनेक दुकाने आहेत.देशी दारूच्या दुकानाबाहेर पण ह्याचे दुकान असतेच.दुकान म्हणजे जमिनीवर ओटा व त्यावर पाल.ह्याची चव घरच्यापेक्षा थोडी खमंग असते.
विदर्भात ह्यातच खारोड्या टाकतात.खाताना स्वर्गीय आनंद मिळतो.