कुटुंब रंगलंय नेत्रदानात!

1
31
netradaan1

विष्णू नगर, ठाणे. गणेशोत्सव स्टॉलमी वैयक्तिक पातळीवर १९८१च्या सुरुवातीस कल्पाक्कम, तमिळनाडू येथे नेत्रदान  प्रचार-प्रसार कार्यास सुरुवात केली. आमच्या घरात कोणाला अंधत्व आले किंवा अंधत्व घेऊनच कोणी जन्माला आले म्हणून नाही. माझे वास्तव्य अणुशक्ती खात्यातील नोकरीनिमित्ताने (१९७१ ते १९९१) तेथे असताना १९८०च्या अखेरीस Reader’s Digest मध्ये ‘Sri Lanka gives eyes to the world’ हा लेख मी वाचला आणि अचंबित झालो. हा इवलासा देश छत्तीस देशांना नेत्र पुरवतो हे वाचून फारच आश्चर्य वाटले. याला कारणीभूत होते डॉ. हडसन सिल्वां चे अथक प्रयत्न आणि त्यांना मिळालेली त्यांच्या पत्नीची साथ! भारतात नेत्ररोपणे होतात, त्यांतील अर्धेअधिक नेत्र हे श्री लंकेतू न येतात हे वृत्तपत्रांतून वाचून फारच लज्जास्पद वाटले. आपला एवढा मोठा देश आणि हे असले अत्यंत लाजिरवाणे परावलंबन? थूत!

काही दिवसांतच ऐंशी किलोमीटर वरील चेन्नई ला जाऊन तेथील सरकारी (भारतातील पहिल्या) नेत्रपेढी तून माहिती घेतली. लगेच कार्यालयात सूचना लावून, अर्ज सायक्लोस्टाइल करून घेऊन कार्याला सुरुवात केली. मुंबईला जे जे आणि हरकिसनदास रुग्णालयांतील नेत्रपेढ्यां तून माहिती घेतली..

त्या वेळी एकूण दृष्टिहीन होते ऐंशी लाख, त्यात नेत्ररोपणा ने दृष्टी मिळू शकणारे होते वीस लाख आणि नेत्रदाने  होत होती फक्त अडीच हजार! आपण थंड होतो,षंढ होतो आणि श्री लंका आपल्याला नेत्र पुरवत होती. आजही आपण तसेच आहोत आणि श्री लंका नेत्र पुरवतच आहे!

हे सर्व पाहता आपल्याला जमेल तेवढे,जमेल तसे आणि जमेल तेथे या क्षेत्रात काही ना काही करत राहण्याची भावना सहजीच मनात रुजली.

दस-याला आयुधांची पूजा व्हायची, यानिमित्ताने थोडी मानवतेचीही पूजा करा अशी सूचना लावल्यावर बरा प्रतिसाद मिळाला. नंतर देशात मोठा दुष्काळ पडलेला असताना मी नेत्रदात्यांचाही दुष्काळ असल्याचे एक पोस्टर बनवून लावले आणि प्रतिसाद वाढला.‘EYE DONATION : NEED OF THE NATION’ असे एक घोषवाक्य एका पोस्टरसाठीसहजच तयार झाले.

आमच्या रुग्णालयातील नेत्रतज्ञ, अधिष्ठाते यांना भेटून, पत्रे लिहून नेत्रदानाविषयीही काही करण्याविषयी सुचवले. श्री लंकेतून येणा-या नेत्रांची व्यवस्था पाहणा-या लायन्स क्लबमधून एक खास फ्लास्क मिळवून तो आमच्या नेत्रतज्ञांकडे सुपूर्द केला. ते नेत्र काढण्याचे प्रशिक्षणही घेऊन आले. कल्पाक्कम रिक्रिएशन क्लबतर्फे भरणा-या कार्निवलमध्ये स्टॉल मिळवून जनजागृतीचा पहिला प्रयत्न केला आणि प्रतिसाद चांगला मिळून तो माझा परिपाठ झाला. दहा वर्षांत सुमारे बाराशे प्रतिज्ञापत्रे भरली गेली, त्यांत साठ टक्के महिला होत्या. शास्त्रज्ञ म्हणवणा-या नव-याचा विरोध असतानाही काही जणींनी ती भरली होती. मला याच प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळतो.

कौटुंबिक-सामाजिक कारणे, आवडीनिवडी आणि मुख्यतः नेत्रदाना त अधिक काही करता येईल या विचारातून १९९२ साली मी मुंबईला बदली घेऊन आलो आणि कार्य थोडेफार वाढले. नेत्रदान मोहिमा कोणी घेत असल्यास किंवा घेण्याविषयी सुचवून त्यांना मदत करू लागलो. १९९३ च्या सुमारास बोरीबंदर रेल्वे स्थानकावर के.सी. महाविद्यालया तील मुलांनी मोहीम घेतली होती. रजा घेऊन (माझ्या अर्ध्याअधिक रजा या कार्यासाठीच घेतल्या जातात) आणि माझ्याकडची तुटपुंजी पोस्टर्स (आज माझ्याकडे या पोस्टर्सचा मोठा संग्रह आहे ) घेऊन मी त्यांना सामील होत लोकांना माहिती देण्यासाठी तेथे नऊ तास उभा राहिलो. माझा उभे राहण्याचा हा विक्रमच झाला! असाच दादर, चेंबूर, बोरीवली, ठाणे स्थानकांत बसलो. गणेशोत्सवात नेत्रदानावरील सजावटीसाठी हातभार लावला.’तरुण पिढी काही करत नाही’ या म्हणण्याला उत्तर  देणारा उत्साह पाहिला, तसाच थोडा विरोधाभासही पाहिला. काही ठिकाणी, वृद्ध व्यक्ती नेत्रदानास तयार असतात परंतु तरुण अन् मध्यमवयीन बिचकतात.

नेत्रतज्ञ डॉ वावीकर, श्री.वि. आगाशे आणि व्यंगचित्रकार श्री.विवेक मेहेत्रेनेत्रचिकित्सा शिबिरे, विविध उत्सव वगैरे अशा निदान पन्नास ठिकाणी टेबल टाकून बसलो. किमान पन्नास ठिकाणी दोन ते दहा दिवसांचे स्टॉल घेऊन बसलो (बरेच स्टॉल मला उद्योजक महिला मोफत देतात). यांत माझी पत्नी, पुष्पाचाही वाटा मोठा आहे. जरूर असेल तेथे रजा घेऊनही ती दहा-दहा तास माझ्याबरोबर बसते, साहित्याची हमाली करते, खाण्यापिण्याचेही पाहते, उभी राहून लोकांना इत्थंभूत माहिती देते. इतर आवडी-निवडी,छंद बाजूला सारून मी किती वेळ श्रम आणि पैसा या कार्यात घालवतोय याचा विचार न करता तिची कृतिशील साथ १९८१ पासून मला लाभली आहे.

मी पोस्टर प्रदर्शने सुमारे चाळीस ठिकाणी भरवली आहेत. स्टॉल टाकून बसतो तेव्हा मी नेत्रदानासोबत देहदान, त्वचादान, रक्तदान तसेच अवयवदानावरही माहिती आणि माहितीपत्रके देतो. (मी आतापर्यंत छत्तीस वेळा आणि पत्नीने सहा वेळा रक्तदान केले आहे)

उन,धूळ,वारा,पाऊस, भयानक उकाडा,विविध दर्प-वास -गंध ,कलकलाट,प्रसाधन गृह – पिण्याच्या पाण्याचा अभाव अशा विविध बाबींना तोंड देत चिकाटीने बसावे लागते, प्रसंगी मान-अपमान गिळावे लागतात. मी हे का करतो? काही जण याला सोशल वर्क म्हणतात, मी सोशल मार्केटिंग म्हणतो. नेत्रदानासाठी लोक आपल्याकडे येणार नाहीत,आपणच गर्दीत जाऊन बसले पाहिजे. ब-याच जणांची नेत्रदान करण्याची , त्यासंबंधी जाणून घेण्याची इच्छा असते, परंतु त्यांना कुठे जायचे ते माहीत नसते किंवा नेत्रपेढीत जायला वेळ नसतो किंवा जाणे राहून जात असते. अशांची सोय होते.

बरेच जण म्हणतात, की हे मी समाधानासाठी करत असेन. यात समाधान कसले? या महाप्रचंड देशात, महाप्रचंड लोकसंख्या असताना, त्यात प्रचंड सुशिक्षित- महासुशिक्षितही असताना असे काही करावे लागावे, सव्वा कोटी दृष्टिहीनांपैकी तीस लाखांना अमूल्य दृष्टि मिळण्यासाठी लाख-दीड लाख नेत्रदाने होणे अत्यावश्यक आहे. भारतात मृत पावणा-या ऐंशी-पंचाऐंशी लाखांपैकी फक्त सुमारे पंधरा हजारांची नेत्रदाने होऊन या अगदी थोड्या  देशबांधवांना दृष्टिलाभ होऊ शकतो. एरवी त्यांना श्री लंकेतून येणा-या नेत्रांकडे आशाळभूतपणे डोळे लावून बसावे लागावे याची खंत अन् शरमच वाटते.

सुमारे पंधरा वर्षांपूर्वी दोन डॉक्टरांची नेत्रदानावरील व्याख्याने ऐकल्यावर आपणही या विषयावर बरे बोलू शकू आणि त्यातून ही नितांत राष्ट्रीय गरज अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवता येईल असे वाटून मी व्याख्याने द्यायला सुरुवात केली. सर्वसामान्यांना नेत्रदान-का? कसे? कधी? कोठे? कोणी? कोणासाठी? अशा प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे मिळाली तर जास्त चांगले होईल असे वाटले. लाजिरवाणे परावलंबन अधोरेखित करू लागलो. नेत्रदानावरील अधिकाधिक माहिती कायमच मिळवत जाऊन ती सादर करत गेलो. माहितीच्या अचूकतेवर भर दिला.

सुमारे बारा वर्षांपूर्वी, डॉ. तात्याराव लहाने यांनी त्यांच्या कार्यालयात त्यांच्या विभागातील सर्व नेत्रतज्ञांना बोलावून, त्यांच्या समोर पुष्पगुच्छ देऊन माझा छोटासा सत्कार केला, मला माझ्या अल्पशा कार्याची पोचपावतीच मिळाल्यासारखे वाटले. सुमारे सहा वर्षांपूर्वी पार्ल्याच्या संवेदना प्रतिष्ठानने दीनानाथ नाट्यगृहात दादरच्या डॉ. निखिल गोखलेंच्या उपस्थितीत नेत्र विषयावरील गाणी सादर करत घडवून आणलेला माझा सत्कार म्हणजे कडीच वाटली. अशाच गाण्यांसह विरारच्या ‘स्नेह’  संस्थेने चार वर्षांपूर्वी संस्मरणीय सत्कार केला.

– श्री.वि. आगाशे

About Post Author

1 COMMENT

  1. डॉ. लहांने महात्मा देव माणूस
    डॉ. लहांने महात्मा देव माणूस …माझी आई लक्शामाबाई पाटील ह्या किडनी कॅन्सरने ग्रस्त होत्या जे जे ला डॉ ना भेट्लो विनती केली आई वाचली .. सर …शब्ध नाहित बोलायला….

Comments are closed.