गडाचे प्रवेशद्वार तेथून साधारण पंधरा-वीस मिनिटांवर लागते. कातळात कोरलेल्या पाय-यांच्या साह्याने थोडे वर गेल्यावर माचीसारख्या भागात प्रवेश होतो. गडाच्या उत्तर बाजूला पाणयाचे टाके आढळतात. समोरच पारश्यांचा बंगला आहे. कुंपण घातलेले टाके बंगल्यासमोर आहे. तेथून बालेकिल्ल्याच्या दिशेने चालत गेल्यास वाटेत काही अवशेष दिसतात तर एका ठिकाणी पाण्याची सलग सहा टाकी आढळतात. त्यांपैकी पाण्याचे एक टाके मोठे असून त्याच्या आतील बाजूस खांबदेखील आहेत. गावक-यांच्या मते, टाक्यातील पाण्याचा रंग वेगवेगळा होता. तेथूनच पायवाट बालेकिल्ल्याकडे जाते. बालेकिल्ल्याला काही पाय-या व तटबंदी शिल्लक आहे.
गडावर राहण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही. पाण्याची सोय बारामाही उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी महिपतगडामार्गे अडीच तास लागतात.