किल्‍ले सुमारगड

0
126
carasole-3

सुमारगड हा गिरिदुर्ग दोन हजार फूट उंचीचा आहे. महाबळेश्वर-कोयना डोंगररांगेतील तो किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने कठीण समजला जातो. सुमारगड हा नावाप्रमाणे सुमार आहे. ‘उगवतीच्या कड्यावर एका झाडाला धरून वर यावे लागते’ असे गोनीदांनी त्या किल्ल्याच्या वर्णनात म्हटले आहे. किल्ला रसाळगड आणि महिपतगड यांच्या मध्ये येतो. आजुबाजूला असणारे जंगल आणि किल्ल्यावर जाण्यासाठी असणारी अवघड वाट यांमुळे किल्ला दुर्लक्षित झालेला आहे. मुख्य रांगेपासून सुटलेल्या अनेक रांगा पाच-पंचवीस मैल लांबवर पसरलेल्या आहेत. पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे जाताना रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे तीन दुर्ग लक्ष वेधून घेतात. सह्याद्री रांगेला समांतर धावणा-या एका रांगेवरच्या या तीन किल्ल्यांपैकी सुमारगड हा मधला किल्ला आहे.  सर्व किल्ले जावळीच्या खो-यात येतात. प्रतापगड, मधुमकरंद गड, रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड हा ट्रेकही प्रसिद्ध आहे. रसाळगड, सुमारगड, महिपतगड या तिन्ही किल्ल्यांची रांग मुख्य सह्याद्री रांगेला समांतर असल्याने परिसरातील वनश्रीचे सुंदर दर्शन इथून होते. पठारावरचा मकरंदगड इशान्येकडे दिसतो तर अग्नेय दिशेला वासोटा व नागेश्वराचे सुळके दिसतात. पश्चिमेकडे पालगड व मंडणगड ही दिसतात.

किल्ल्यावर पोचल्यावर समोर पाण्याची दोन टाकी आहेत. टाक्यांच्या पोटात गुहा आहे. त्यात शिवाची पिंड आणि देवीची मूर्ती आहे. पाण्याच्या टाक्यांच्या उजव्या अंगास थोडे वर गेल्यावर पाण्याचे एकखांबी टाके लागते. एक वाट समोरच्या टेकाडावर जाते तर एक टेकाडाला वळसा घालून पुन्हा टाक्यापाशी येते. समोरच्या टेकडीला वळसा मारताना एका ठिकाणी दगडमातीने बुजलेली गुहा दिसते. गुहेत दोन खोल्या आहेत; मात्र त्यात ब-याच मोठ्या प्रमाणावर माती जमा झालेली आहे. गडमाथा फार लहान असल्यामुळे गडफेरीस अर्धा तास पुरतो.

गडाचे प्रवेशद्वार तेथून साधारण पंधरा-वीस मिनिटांवर लागते. कातळात कोरलेल्या पाय-यांच्या साह्याने थोडे वर गेल्यावर माचीसारख्या भागात प्रवेश होतो. गडाच्या उत्तर बाजूला पाणयाचे टाके  आढळतात. समोरच पारश्यांचा बंगला आहे. कुंपण घातलेले टाके बंगल्यासमोर आहे. तेथून बालेकिल्ल्याच्या दिशेने चालत गेल्यास वाटेत काही अवशेष दिसतात तर एका ठिकाणी पाण्याची सलग सहा टाकी आढळतात. त्यांपैकी पाण्याचे एक टाके मोठे असून त्याच्या आतील बाजूस खांबदेखील आहेत. गावक-यांच्या मते, टाक्यातील पाण्याचा रंग वेगवेगळा होता. तेथूनच पायवाट बालेकिल्ल्याकडे जाते. बालेकिल्ल्याला काही पाय-या व तटबंदी शिल्लक आहे.

सुमारगड समुद्रसपाटीपासून ८८३ मीटर उंच आहे व त्याच्या उभ्या कातळकड्यांमुळे उठून दिसतो. वर जाताना आपल्याला ह्या कड्यांखाली जावे लागते व तिथून पूर्वेकडील सोंड घरून उत्तरेच्या बाजूला वर जावे लागते. सुमारगडावर जाण्यासाठी वाट एकच आहे. ती वाट एका खिंडीतून वर जाते. महिपत-गडावरून वाडीबेलदार या गावात न उतरता उलट्या दिशेने खाली उतरावे. वाटेत धनगरांची दोन-तीन घरे लागतात. तेथून थोडे खाली उतरल्यावर ओढा लागतो. तो पार करून समोरचा डोंगर चढावा. तो रस्ता पुढे अर्ध्या तासात एका कड्यापाशी पोचतो. कड्याला लागून वाट पुढे जाते. पुढची वाट अवघड आहे. जवळ रोप असल्यास उत्तम. खिंडीपासून किल्ल्यावर जाण्यास पाऊण तास पुरतो. रसाळगडावरून सुमारगडाकडे जायचे झाल्यास वाटेत राया धनगराचा झाप लागतो; मात्र रसाळगड ते सुमारगड हे अंतर साडेचार तासांचे आहे.

गडावर राहण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही. पाण्याची सोय बारामाही उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी महिपतगडामार्गे अडीच तास लागतात.

About Post Author