किरण जोशी – पोथ्यांनी झपाटलेला संग्राहक!

9
62
carasole

काही व्यक्ती रुढ शिक्षणात रस न वाटल्याने वेगळा मार्ग चोखाळतात. त्यांच्या हातून वेगळेच कार्य घडत असते. त्यांचे समाजावर मोठे ऋण तयार होते! किरण जोशी हा तसा झपाटलेला तरुण आहे.

किरण शालांत परीक्षेच्या टप्यापर्यंत पोचला. तेथे त्याने असा निर्णय घेतला, की घराण्यात असलेली याज्ञिकाची वृत्ती स्वीकारायची! त्यासाठी पाठशाळेत जाऊन वेदविद्या घ्यावी असे त्याला वाटले. पाठशाळेत प्रवेश मिळाला नाही. वेदमूर्ती देवीदास सांगवीकर यांनी मात्र किरणला पौरोहित्यासाठी लागणारे आवश्यक त्या विधींचे पाठ दिले. ते विद्यादान चार-पाच वर्षे चालू होते. त्याने यजुर्वेद संहितेचीही संथा घेतली. त्या ओघात किरणच्या हाती त्याच्या घराण्यात परंपरेने आलेली यजुर्वेदाची पोथी आली. ती पाहताना किरणच्या अंगावर रोमांच उठले. त्याच्या अंतर्मनात अशी प्रेरणा निर्माण झाली, की त्याने अशा अनेक पोथ्या मिळवाव्यात! त्याने त्याच्या मनातील तो विचार सांगवीकर गुरुजींजवळ व्यक्त केला. गुरुजींनी आशीर्वाद दिला. म्हणाले, हे मोठेच पुण्यकर्म होय!

उत्तर सोलापूरमध्ये जुने विठ्ठल मंदिर प्रसिद्ध आहे. ते साडेतीनशे वर्षांपूर्वीचे आहे. किरण जोशी हा त्या मंदिराचा पुजारी. ख्यातकीर्त शाहीर रामजोशी हे किरणचे पूर्वज! पौरोहित्य कर्म करणारा ब्रम्हवृंद रोज संध्याकाळी सोलापूरच्या सिद्धेश्वर तलावाजवळच्या गणपतीघाटावर जमत असतो. किरणच्या छंदाची माहिती त्या सर्वांना झाली, त्यामुळे ज्यांच्या घरी जुन्या पोथ्या आहेत त्या व्यक्तींची माहिती किरणला होत गेली. किरणने त्या, व्यक्तींशी संपर्क साधला. तो सर्वांना या पोथ्या म्हणजे मोठा ठेवा आहे व तो आपण सर्वांनी जतन केला पाहिजे असे कळकळीने व आवर्जून सांगे. किरण त्यांना सांगे, की त्या पोथ्या त्याच्याकडे द्या, तो त्या जतन करील! किरणला गणपती घाटावर पोथ्यांचे विसर्जन करण्यासाठी आलेल्या व्यक्तीे काही वेळा भेटत. किरण त्यांच्याकडील पोथ्या मिळवी. त्यातील फाटक्या, कसरीने खाऊन जाळी झालेला भाग विसर्जन करून बाकीचा भाग घरी घेऊन येई.

किरणने सोलापूरमध्ये व आसपासच्या गावांत जाऊन अनेक हस्तलिखिते मिळवली. त्याने अशा प्रकारे उस्मानाबाद, बसवकल्याण, भंडारकवठे, पंढरपूर इत्यादी गावांतूनही पोथ्या मिळवल्या. तो तेथील अनेक कुटुंबांकडे गेला. त्याने त्यांच्या माळ्यांवर, कुठेतरी अडगळीत पडलेली पोथ्यांची गाठोडी मिळवून सोडली व त्यातील ज्ञान समाजासमोर येण्याचा मार्ग मोकळा केला, ती किरणला देताना कोणी त्याच्याकडून पैसे घेतले तर कोणी ‘रद्दी नेताय् खुशाल न्या!’ असे म्हटले.

किरणने जतन करून ठेवलेल्या जुन्या हस्तलिखित-पोथ्यांमध्ये शंभर ते दीडशे वर्षे जुनी असलेली पाचशेहून अधिक पुस्तके आहेत. त्याच्याकडील जुन्या पोथ्यांची संख्या साडेसातशे ते आठशेच्या घरात आहे. त्यापैकी सहाशे पोथ्यांची विषयवार नोंद झालेली असून इतर दीडशे-पावणे दोनशे पोथ्यांची नोंद होणे बाकी आहे. किरणकडील संग्रहात शंकराचार्यांनी तीनशेऐंशी वर्षांपूर्वी लिहिलेला ‘विद्यासरस्वती’ हा ग्रंथ आहे. रघुनाथ थत्ते यांनी 1864 साली लिहिलेले ‘हिंदू विषयक कायदे’ हे दिवाणी कायद्याचे पुस्तक आहे. त्याच्या ठेव्यामध्ये 1898 मधील ‘गणपती भजन’ हे पुस्तक पाहता येते. त्याची छपाई अजूनही चांगली आहे. दोनशे वर्षांपूर्वीचे ‘मुहूर्तचिंतामणी’ हे हस्तलिखित, दीडशे वर्षापूर्वीचे ‘गणेश अथर्वशीर्ष’, 1904 सालचे ‘गणपती मेळ्यांची पदे’, 1905 साली छापलेले ‘अनंतपूजा’, गौरीपूजनाची महती सांगणारे ‘ज्येष्ठा लक्ष्मी कथा’ हे दीडशे वर्षांपूर्वीचे हस्तलिखित अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण कागदपत्रे किरणच्या संग्रहात पाहता येतात. भास्काराचार्यांनी लिहिलेल्या ‘सिद्धांतशिरोमणी’ या ग्रंथाची तीनशे वर्षांपूर्वीची हस्तलिखित संहिता त्याच्याकडे उपलब्ध आहे. किरणच्या घटे नावाच्या मित्राच्या पूर्वजांना राजेरजवाड्यांकडून गावे इनाम मिळाली होती. त्याची दानपत्रे किरणने सांभाळून ठेवली आहेत. त्या एकेका दानपत्राची लांबी आठ ते दहा फूट आहे. किरणकडील सर्वात जुने हस्तलिखित म्हणजे तुळजापूरच्या देवीसंदर्भातील ‘तुळजामहात्म्य हा चारशेपस्तीस वर्षांपूर्वी लिहिलेला ग्रंथ होय!

किरणकडील पोथ्यांच्या प्रकारात विविधता आहे. प्रामुख्याने, धार्मिक संहिता, पुरणादि ग्रंथ यांबरोबरच ज्योतिष व आयुर्वेद यासंबंधी पोथ्याही आहेत. किरण स्वत: फार शिकलेला नाही, पण माहिती मिळवून त्यातील पुष्कळशी जाण त्याला आलेली आहे. ते करताना त्याला अनेक प्रकारचे अनुभव आले. त्याच्या समोर प्रलोभने आली, पण त्याने हाती घेतलेल्या छंदावर व त्यातून जमा झालेल्या जुन्या हस्तलिखित ग्रंथांवर त्याची प्रगाढ निष्ठा असल्याने तो कशास बळी पडलेला नाही.

किरणने त्याच्या तो खजिना ठेवण्‍यासाठी 30 ×20 फूट आकाराची तीन मजली वास्तू उभी केली आहे. त्या वास्तूत केवळ ग्रंथ राहतात! माणसांनी तेथे राहयाचे नाही, कोणत्याही अन्य प्रकारे त्या वास्तूचा उपयोग करायचा नाही असा किरणचा कटाक्ष आहे. ‘माँ भारती मंदिर’ असेच त्या वास्तूचे नाव आहे. किरणने सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या सरस्वती, लक्ष्मी यांच्या आठ फुटी सुबक मूर्ती मिळवल्या व त्या मंदिरात दर्शनी भागात ठेवल्या आहेत.

किरणकडे जमा झालेले चार-पाचशे वर्षांपूर्वीच्या पोथ्यांचे कागद अतिजीर्ण अवस्थेत आहेत. त्यांना कसर लागण्याचे भय ही किरणसमोर समस्या मोठी होती, पण उपाय आपोआप मिळाला! नाशिक येथील अनिता दत्तात्रय जोशी नावाची मुलगी ‘प्राच्य विद्या संशोधन संस्थे’चे काम करते. ती किरणकडे आली व त्याचा तो अशा प्रकारचा खजिना पाहून चकित झाली. तिने किरणला जुन्या कागदपत्रांचे रक्षण कसे करायचे त्याची रीत दाखवली. कोणत्याही व्यक्तीकडे ऐतिहासिक अथवा प्रागैतिहासिक काळातील दस्तावेज असतील तर केंद्र सरकारकडे त्याची नोंद केली जाते. जेणे करून त्याबाबत संशोधन करणा-यांस गरज लागल्यास त्या व्यक्तीकडे जाऊन त्याचा लाभ घेता येईल. अनिता जोशीने किरणला पोथ्यांची विषयवार-संगतवार मांडणी करून त्यांची सरकारकडे नोंद करण्यास मदत केली. किरण तिच्या त्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.

प्रत्येक पोथीसाठी विशिष्ट प्रकारचे, विशिष्ट आकाराचे वेष्टन असते व त्यावर त्या कागदपत्रांचे शीर्षक व अनुक्रमांक लिहिलेला असतो. हजारो पृष्ठे होतील एवढ्या पोथ्या किरणकडे आहेत. त्यांची व्यवस्था लावणे कष्टाचे, चिकाटीचे व वेळखाऊ काम आहे. कुटुंबासाठी व याज्ञिकी यांच्यासाठी द्यावा लागणारा वेळ वगळता किरण अक्षरश: रात्रंदिवस त्या कागदाच्या पसा-यातच असतो. त्याने याज्ञिकी कमी केली आहे.

किरणचे पणजोबा एचएमव्ही कंपनीचे चार जिल्ह्यांचे डिलर म्हणून काम करत. त्यांनी फिरतीच्या काळात अनेक वस्तू संग्रहीत केल्या होत्या. किरण म्हणतो, त्यांचा तो गुण माझ्या रक्तात उतरला असावा. किरणकडे पणजोबांकडून परंपरेने आलेल्या इतरही अनेक गोष्टी आहेत. बेल्जिअममध्ये‍ तयार केलेले काच आणि पितळ यांपासून घडवलेले हंडे, विविध आकारांचे अडकित्ते-टाळे आणि जुनी नाणी! किरणकडे दीड ते दोन हजार जुनी नाणी आहेत. त्यामध्ये शिवकालिन मुद्रा, अकबर आणि औरंगजेबाच्या राजवटीतील नाणी, होळकर, आदिलशाह, निजामशाह यांच्याकडील नाणी असा मोठा संग्रह आहे. त्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या नाण्यांची संख्या‍ जास्त असल्याचे किरण सांगतो.

सहाशे वर्षे जुन्या विठ्ठल मंदिराची मालकी किरणच्या कुटुंबाकडे आहे. जोश्यांची आता सोळा घरे झाली आहेत. त्यामुळे आळीपाळीने विठ्ठलाची पूजा केली जाते. किरणकडे पूजेसाठी दीड वर्षांच्या काळात एकदा तीन महिने आणि एकदा दीड महिना असे एकूण साडेचार महिने असतात. त्याच्या याज्ञिकीच्या आणि पोथ्यांच्या कामात त्याची पत्नी रेणुका मदत करते. त्‍यांना रिद्धी आणि चिन्मय ही दोन मुले आहेत. किरण दोन वाड्यांनी तयार झालेल्या घरात एकत्र कुटुंब पद्धतीत राहतो. त्याचे मोठे भाऊ, त्यांचे कुटुंब, आई असा त्याचा चौदा व्‍यक्‍तींचा एकत्र परिवार आहे.

देशभरातील अनेक विद्वानांनी किरण जोशी याचा पोथ्यांचा, जुन्यां कागदपत्रांचा संग्रह पाहिलेला आहे, त्याला मार्गदर्शनही केलेले आहे. मात्र त्याच्याकडील संग्रह पाहून कोणी त्यावर संशोधन केले, असे अद्याप घडले नसल्याचे किरण सांगतो. कुणा जाणकाराने त्याच्याकडील पोथ्या-कागदपत्रांचा उपयोग करून जुने ज्ञान प्रकाशात आणावे, त्या‍वर संशोधन करावे अशी किरणची फार इच्छा आहे.

देशाचा इतिहास व संस्कृती यांच्याशी ज्या गोष्टींचा संबंध असतो, त्यांपैकी अशा कागदपत्रांचा ठेवा हा अनमोलच! देशभर विखुरलेल्या एक प्रकारे अनियंत्रित व्यवस्थेत ते सारे आहे. ते योग्य व्यक्तीच्या हाती आले तर सोने, नाहीतर माती अशी त्यांची स्थिती असते.

किरण जोशी, 9766055058

– अविनाश बर्वे

About Post Author

9 COMMENTS

  1. मी सुनिल कुलकर्णी, ही कौस्तुभ
    मी सुनिल कुलकर्णी, ही कौस्तुभ जोशी कडून मिळाली वाचून फार फार आनंद झाला. मस्त छंद आहे. खुप खुप हार्दिक शुभेच्छा.

  2. atishay sundar karya aapan
    atishay sundar karya aapan kart aahat aplya karyasathi hardik shubhkamna aaplyakadun ashich sarswati deshachi va swadharmach seva satat ghdo hich prabhu charni prarthna ekda avshya aaply granth mandiras bhet dyavyachi echaa aahe far chan vatle dhnyavad aa. avdhoot prasade
    krushnamurti jyotish karyalay rajgurunagar jilha pune 410505 mo.nr.9890112253

  3. आपला उपक्रम छानच आहे. या
    आपला उपक्रम छानच आहे. या कामात खारीचा वाटा म्हणून आर्थिक मदत केली तर चालते का? असेल तर बॅंक खात्याची माहिती मिळाल्यास गोवव्यात खात्यात जमा करता येईल.

  4. Very nice information &
    Very nice information & useful to so many people who are studying about ancient literature. Nice writing also avinash sir.

  5. पुढील कार्यासाठी देव आप नास
    पुढील कार्यासाठी देव आप नास शक्ति देवे।

  6. Very nice hobby. Keep it up.
    Very nice hobby. Keep it up. Kindly give it to new genration. They also get some inspirment from that. We have Shri Gajanan Maharaj Vijay, Lots of Vaibhav Laxmi Ph0thi and Arti Sangrha, .which gets in Margshrish month. It cannot be thrown in to sea or river. If you are willing to keep in your custody, I will thankful.
    Shri.R.L.Awati.Kalyan.-Thane.My mobile no.is 9769265372.

  7. आपला उपक्रम फारच उत्तम आहे
    आपला उपक्रम फारच उत्तम आहे आपले साथीदार श्री शैलेंद्र जोशी यांच्या कडून आपली लहानपणा पासून ची आत्ता पर्यंतच्या छंदा ची माहिती मिळाली
    आपणास पुढील कार्यास माँ भारती आशीर्वाद देवो

  8. माननीय श्री राजेंद्र गानू या
    माननीय श्री राजेंद्र गानू या दुर्मिळ कार्यास आपणा सारख्या दानशूर व्यक्तींची गरज आहे
    आपणस किरण जोशी व त्यांचे सहकारी शैलेंद्र व कौस्तुभ यांचा सपंर्क क्रमांक देतो
    ०९७६६०५५०५८ किरण
    ०९९२१६९८३७४ शैलेंद्र
    ८०८७७२६६०५ कौस्तुभ

Comments are closed.