कारिट हे भारतात सर्वत्र आढळणारे रानवेलीचे फळ आहे. या फळास कारिंटे, कार्टे, चिरट, चिरटे, कोर्टी, चिर्डी, चिड्डी अशी अनेक नावे आहेत. खेडेगावात या फळाला चिभडं, शेरनी किंवा कर्टुलं या नावाने ओळखतात. कारिटाची चव कडवट असते. दिवाळीत नरक चतुर्दशीच्या पहाटे अभ्यंगस्नानापूर्वी ते फळ फोडण्याची परंपरा आहे. ते फळ नरकासूर या राक्षसाचे प्रतिक मानले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान कृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला. म्हणून या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नानाच्या पूर्वी घराबाहेर किंवा तुळशी वृदांवनाजवळ डाव्या पायाच्या अंगठ्याने कारिट ठेचले जाते. त्यातून बाहेर पडणारा रस हे नरकासुराच्या रक्ताचे रुपक आहे. कारिट फोडल्यानंतर त्याचा रस जिभेला तर त्याची बी कपाळाला लावण्याची पद्धत आहे. अभ्यंगस्नानाच्या आधी कारिट फोडून नरकासुराचा प्रतिकात्मक वध करत त्याच्या रुपात असलेली सारी कटुता, दुष्टता नाहीशी करावी आणि त्यानंतर मंगल स्नानाने पवित्र होऊन दिवाळीचा सण साजरा करावा अशी कारिट फोडण्यामागची कल्पना आहे. काही ठिकाणी कारिट अभ्यंगस्नानानंतर फोडले जाते.
कोकणामध्ये नरक चतुर्दशीच्या पहाटे कारिट फोडताना ‘गोविंदाऽऽऽ गोविंदा’ अशी आरोळी दिली जाते. तेथे पूर्वी अभ्यंगस्नानासाठी पाणी तापवण्याच्या हंड्याला कारिटाच्या माळा घातल्या जात. पाडव्याच्या दिवशी शेणाचा गौळवाडा करून त्यात लहान मोठी कारिटे गाई-वासरे म्हणून ठेवली जात. त्यावेळी एखादे कारिटे मधोमध कापून त्यातील गर काढून टाकला जाई. त्याचा हाती आलेला अर्धा भाग दही घुसळण्याचा डेरा म्हणून गौळवाड्यात ठेवला जात असे.
कारिट हे भारतात सर्वत्र आढळणारे रानवेलीचे फळ आहे. या वेलीस इंग्रजीत cucumis trigonus असे म्हणतात. ती वेल अनेक वर्षे जगते. कारिट हे आकाराने मोठ्या बोराएवढे किंवा अंड्याच्या आकाराएवढे उभट असते. त्यावर फिकट पिवळ्या रंगाच्या उभ्या रेषा असतात. त्या फळाचे रुप काकडीशी मेळ खाणारे आहे. त्याची वेलही काकडीच्या वेलीप्रमाणे दिसते. त्या वेलीला जून ते सप्टेंबर या कालावधीत पिवळ्या रंगाची फुले येतात. कारिटाच्या गाभ्यात लहान, पांढ-या रंगाच्या लंबवर्तुळाकृती अनेक बिया असतात. कारिट लहान असताना त्याच्याभोवती लहान काटे असतात. ते फळ आकाराने वाढत गेल्यानंतर ते काटे गळून पडतात. या फळाचा गर कडू असतो. कारिटाच्या बियांमध्ये पित्तशामक गुणधर्म असतो. त्यांच्यापासून तयार केलेले तेल जळणासाठी उत्तम असते.
किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्यानंतर वृत्तसंस्था, दैनिक ‘मुंबई चौफेर’ आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्यानंतर ‘थिंक महाराष्ट्र’सोबत 2010 साली जोडले गेले. त्यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्यांचा ‘डिपार्टमेन्ट’, ‘अब तक छप्पन – 2’, ‘अॅटॅकस् ऑफ 26/11’, ‘क्विन’, ‘पोस्टर बॉईज’ अाणि ‘शेण्टीमेन्टल’ अशा व्यावसायिक चित्रपटांच्या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते ‘बुकशेल्फ’ नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात.
लेखकाचा दूरध्वनी
9029557767
आपले वनौषधी सदर वाचून बहुमोल
आपले वनौषधी सदर वाचून बहुमोल माहीती मिळाली धन्यवाद
आपले वनौषधी सदर वाचून बहुमोल
आपले वनौषधी सदर वाचून बहुमोल माहीती मिळाली धन्यवाद
Comments are closed.