अर्देशीर इराणी यांच्याकडे ‘युनिव्हर्सल पिक्चर्स कॉर्पोरेशन’ या विदेशी सिनेवितरण कंपनीची एजन्सी होती. तेथे ते विदेशी चित्रपट प्रदर्शित करत. तेथे लागणारे बहुतेक इंग्रजी चित्रपट हे हाणामारीने भरलेले देमारपट, युद्धपट, स्टंट किंवा कामुक हावभावाचे असत. शेजारीच कामाठीपुरा, उत्तरेस नागपाडा तर दक्षिणेस पिला हाऊस… असा परिसर त्या चित्रपटांसाठी योग्यच! इंग्रजी चित्रपट फोर्टमधील थिएटरमध्येही प्रदर्शित होत, परंतु ‘अलेक्झांड्रा’ने त्यांचे एक वेगळे अस्तित्व जपून ठेवले होते. ते म्हणजे इंग्रजी सिनेमाचे उत्तेजित करणारे पोस्टर व त्याखाली ठळक अक्षरांत त्या सिनेमाचा अस्सल बंबय्या भाषेत केलेला चटपटीत अनुवाद…
रायडर ऑन द रेन – ‘बरसात में ताक धिना धिन’
नेवाडा स्मिथ – ‘सस्ता खून महंगा पानी’
ब्लो हॉट ब्लो कोल्ड – ‘कुछ नरम, कुछ गरम गरम’
सुपर मॅन – ‘उपर से लटका निचेसे फटका’
पासष्ट नंबरच्या बसने कामाठीपु-याच्या नाक्यावर उतरायचे, समोरच्या राज ऑईल शेजारी मिळणारा ‘फालसा’ नावाचा काला खट्टा प्यायचा व सोड्याच्या ढेकरा देत, सिगारेट शिलगावून तिकिटाच्या लाईनीत उभे राहायचे. एक तर शालेय वयात सिगारेट ओढताना आपण पुरुष झाल्यासारखे (मॅनली) वाटायचे आणि दुसरे म्हणजे तो त्या बदनाम, बकाल वस्तीत आपण नवखे नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न असायचा. बुकिंग ऑफिसच्या आजुबाजूची भिंत तंबाखूच्या पिचका-यांनी लाल झालेली, बॉक्स ऑफिसची फळी पैसे व तिकिटे घेऊन-देऊन गुळगुळीत, पातळ झालेली. बाजूच्या जाळीच्या दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच्या खांबांवर वहीच्या पानावर खास बंबय्या हिंदी/गुजरातीमध्ये लिहिलेली चित्रपटाची अर्धवट कथा वाचायची. त्यातील काही नमूने –
‘वा म-या तो ख-याच पण छाती उपरनी बूट लेवानून म-या’ (दे डाईड विथ देअर बूट्स ऑन)
‘हसीनों की टोलियां बरसा एक गोलियां’ – ‘कॅलिफोर्निया गर्ल्स’.
या स्टोरीकथनातील वर्षानुवर्षांचे हमखास भरतवाक्य म्हणजे ‘आगे, परदेपर देखिए’. जगात त्या एकमेव थिएटरमध्ये सिनेमाची रुपरेषा लिहून ती बोर्डावर नोटिशीप्रमाणे लावत असावेत. तेथे आलेला प्रेक्षक ब-याच वेळा दुकटा, पान खाऊन तोंड रंगवलेला ‘नववधू’बरोबर खिदळत असणारा, इंग्रजीचा गंध नसणारा, पण प्रत्येक हिरोला चेह-याने ओळखणारा असे.
‘अरनॉल्ड’ या बलदंड नटाला त्या थिएटरात पब्लिक चक्क ‘आनंद’ या नावाने ओळखे. ‘नाव कसे सुटसुटीत सहज तोंडात बसणारे असावे’ हे जाहिरातीच्या जगातील पहिले तत्त्व त्या थिएटरमध्ये जाणा-या प्रेक्षकाला अनुभवातून समजलेले असते. त्या सुलभीकरणामुळे सिनेकलाकारांची सुटसुटीत टोपणनावे चांगली लक्षात राहत.
दिलीपकुमारला दिलीप कुंभार आणि हेमा मालिनीला हेमा माळीण म्हणून मिश्कीलपणे हाक मारणारे अवलियाही त्या परिसरात भेटत. भल्या भल्यांनी मान झुकवावी अशी तेथील लोकांची विनोदबुद्धी. थिएटरबाहेरच्या नागपाड्याच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंला ‘कठपुतली’ सिनेमाचे बोर्ड लावलेली हातगाडी फिरत होती. तिच्याकडे पाहून जाणारे-येणारे लोक फिदीफिदी हसत होते. कोणी चावट इसमाने बोर्डावरचे कठपुतलीचे ‘कुठंमुतली’ असे नामकरण केले होते! बिचारा निरक्षर हातगाडीवाला निर्विकारपणे विडी फुंकत हातगाडी ढकलत होता.
‘अंग्रेजी पिक्चर है तो क्या हुआ? स्टोरी हिंदी मे लिखो. परदेपर क्या चल रहा है यहा समझना मंगता है, यार’ माझ्या शेजारी थिएटरमध्ये बसलेला स्थानिक तरुण मला फिलॉसॉफी शिकवत होता. ‘इधर मेन पिक्चर देखने का क्या? इंडियन न्यूज, सिगरेट विरोध का फिल्म, सब बकवास है साला. किचड में जाएगा तो गमबूट पहना या ना पहना क्या फरक पडता है यार?’ म्हणत पुढच्या सिटखाली त्याने जोरदार लाल पिचकारी मारली.
अस्सल बेवड्याला कोठल्याही अड्ड्यावरची दारू किंवा अट्टल चहाबाजाला कोठल्याही रेल्वेस्टेशनवरचा चहा वर्ज्य नसतो. मी स्वत: अनेक उत्तम चित्रपट त्या थिएटरमध्ये पाहिले आहेत. त्या थिएटरच्या वरच्या गॅलरीला खालून टेकू देण्यासाठी दिव्याच्या खांबासारखे ओतीव लोखंडाचे खांब होते. त्या खांबामागच्या एक-दोन खुर्च्या नेहमी रिकाम्या ठेवल्या जात. कारण तेथून सिनेमाचा पडदा नीट दिसत नसे. बाल्कनीच्या दोन्ही दरवाज्यांवर मोठ्या रिंगात काळे-मळकट, जाडेभरडे पडदे अडकावलेले होते. मेन सिनेमा चालू झाल्यावरही थिएटरमध्ये उशिरा येणारे प्रेक्षक खसकन् तो पडदा बाजूला सारत आणि आत प्रवेश करत. अंगावर सरकन् काटा आणणारा लोखंडी रिंगांचा तो करकरणारा आवाज व त्यासरशी आतील काळोखात बाहेरून येणारी उन्हाची तिरीप प्रेक्षकांची तल्लिनता भंग करत असे. उशिरा पडदा उघडून धाडकन कोणी आत आले तर प्रेक्षक त्याच्या मायबहिणीचा उद्धार करत.
कसलाच बुरखा नसणे ही त्या थिएटरची खासियत. तेथे येणारी जोडपी कशासाठी आली आहेत हे डोअरकिपरपासून, जोडप्याच्या बाजूला बसलेल्या इतर प्रेक्षकांपर्यंत सर्वांना ठाऊक असते. पब्लिकमधील एखादा हिरो, ‘भोसडी के, खाली फोकट इधर बॅटरी मारना नही, क्या!’, असा डोअरकिपरला सरळ सरळ दम देऊनच त्याच्या ‘हिरोईन’ला घेऊन स्थानापन्न होतो.
नेहमीची नसणारी आणि केवळ शांतपणे बघण्यासाठी आलेली भोळीभाबडी माणसे कपड्या-बोलण्यावरून लक्षात आली, की तोच डोअरकिपर स्वत:हून तुम्हाला तिकिट चेंज करून पंख्याखालची, पुढे-मागे खुर्च्या मोकळ्या असलेली जागा शोधून देई. ‘क्या करना साब, बदनाम बस्ती है ना, शरीफ लोगोंका खयाल करना पडता है’ असे बोलून पुन्हा सिनेमाला येण्याचा आग्रह त्याच थिएटरमध्ये होऊ शकतो.
मग आपल्याला आठवते, इंग्रजी सिनेमांची नावे चमचमीत बंबय्या भाषेत वाचूनच आपण प्रथम या थिएटरला आलो होतो. कोण असावा तो तल्लख बुद्धीचा अनुवादक? पण त्याचा शोध घेण्यास जाण्यात अर्थ नाही. कारण त्या वस्तीमध्ये प्रत्येकीचे पाळण्यातील नाव बदलून चंपा, सलमा किंवा डॉली झालेले असते. शेवटी, लक्षात येते, तेथे नाव बदलणारी कोणी व्यक्ती नसते, तर व्यक्तींची, सिनेमांची नावे बदलणारी, स्वत:च्या मस्तीत जगणारी एक वेगळी वस्ती असते.
– अरुण पुराणिक
(छायाचित्रे – अरुण पुराणिक आणि मोमाद)
खूप छान माहिती, लेखनशैलीही
खूप छान माहिती, लेखनशैलीही उत्तम.
माझ्या वडीलांच्या तोंडून
माझ्या वडीलांच्या तोंडून अनेकदा अलेक्झांड्राविषयी तुरळक माहिती ऐकून एकदा ते बाहेरून पाहिलं होतं. आज सविस्तर समजल्याने बरं वाटलं , धन्यवाद.
Comments are closed.