Home अवांतर टिपण कामाठीपु-यातल्‍या कथा

कामाठीपु-यातल्‍या कथा

प्रतिमा जोशी यांना लेखक-पत्रकार अनिल अवचट यांच्या हस्ते केशवराव कोठावळे पुरस्का्र प्रदान करण्यात आला. डावीकडून व्यासपिठावर उपस्थित असलेले मॅजेस्टीकचे अशोक कोठावळे आणि चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल.

प्रतिभा जोशी यांचा धाडसी लेखनाबद्दल गौरव..

     'जहन्नम-निवडक प्रतिमा जोशी' या प्रा. पुष्पा भावे संपादित पुस्तकाला 2010 सालचा केशवराव कोठावळे पुरस्कार घोषित झाला. त्याचा पारितोषिक समारंभ पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघात झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अनिल अवचट व प्रमुख वक्ते म्हणून डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते.

परीक्षक मीना गोखले यांनी, सकस कथा, त्यांचा तसाच आविष्कार आणि साहित्यिक वैशिष्ट्यांनी युक्त असे हे पुस्तक असल्याने 'जहन्नम'ची पुरस्कारासाठी एकमताने निवड केल्याचे सांगितले.

     समाजकार्याच्या नावाखाली बाजारपेठी मूल्यव्यवस्थेची भलामण करणा-या संस्थांचे पीक एकीकडे अमाप आलेले असताना शरीरविक्रय करणा-या महिलांचे प्रश्न स्त्रीमुक्तीच्या अजेंड्यावर घ्यावेत अशी मानसिकता आजही दिसत नाही. स्त्रियांचे आणि जातिव्यवस्थेचे भारतीय संदर्भ यांना सर्वांगांनी भिडले जात नाही याबद्दल प्रतिमा जोशी यांनी खंत व्यक्त केली. या कथा आपल्याला सामाजिक कार्यात आलेल्या अनुभवावरील आहेत असे त्या म्हणाल्या.

     आणीबाणी, चळवळींचा काळ यामध्ये या कथांची बीजे आहेत असे प्रतिमा जोशींनी आवर्जून सांगितले. आपल्या जीवनात आगळीवेगळी माणसे आली. जीवनकार्यातील सहका-यांचा सहभाग महत्त्वाचा वाटतो असेही त्या म्हणाल्या. हा कथासंग्रह म्हणजे हिमनगाचे फक्त वरचे टोक आहे. 'पाऊस कधीचा पडतो….' ही आपली पहिली कथा आहे. तसेच ती आपली सर्वात आवडती कथा आहे असे त्यांनी त्यांचे मत प्रकट केले.

     प्रतिमा जोशी कॉलेजात असताना त्यांनी राष्ट्र सेवा दलाच्या विद्यार्थी विभागात काम केलेले आहे. पुढे त्यांचा युवक क्रांती दल, एफ.एस.आय., संघर्षवाहिनी आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ इत्यादींशी संपर्क आलेला आहे. त्यांनी नामांतराच्या लढ्यात तर सक्रिय भाग घेतला. त्यांना त्यात पंधरा दिवसांचा तुरुंगवासही झाला होता.

     प्रतिमा जोशी सामाजिक प्रवृत्तीच्या कशा घडत गेल्या हे मजजवळ सांगताना, नंतर त्यांनी काही माहिती दिली. त्यांचा समाविचारी मित्रांचा गट होता. त्यांच्या गिरगावातील सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी येथे बैठका होत. त्यामध्ये महम्मद युसुफ नावाचा हॉकर्स युनियनचा कार्यकर्ता होता. महम्मद युसुफमुळे प्रतिमा जोशी यांच्या जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली. त्याच्या सततच्या 'हमारे यहाँ आके देखो' या पालुपदामुळे, प्रतिमा जोशी एके दिवशी एका मैत्रिणीसोबत तो राहत असलेल्या कामाठीपु-यात गेल्या. त्याआधी प्रतिमा जोशींनी 'बेस्ट'च्या ६५, ६९ नंबरांच्या बसने प्रवास करताना तेथील चित्र, माहोल पाहिला होता. पण त्यांना त्या मित्राच्या आग्रहावरून तो भाग अधिक जवळून पाहता येणार होता आणि तो त्यांच्या अनुभवाचा भाग बनणार होता.

     त्या रेडलाईट एरियात जाऊन पोचल्या. महम्मद युसुफने जोशींना पानाच्या टपरीपाशी भेटण्यास सांगितले होते, परंतु त्याला तेथे पोचण्यास उशीर झाला. दरम्यान, प्रतिमा जोशींनी तेथे राडा झालेला पाहिला. तो प्रसंग त्यांच्या काळजाचा थरकाप उडवणारा होता. तिथल्या त्वेषाने अंगावर धावून जाणा-या बायका, आक्रमक पुरुष, त्यांची बोलण्याची-आविर्भावाची पध्दत, त्यांच्या व्यक्त होण्याच्या पध्दती हे सारे पाहून हादरून गेल्या. त्यांनी हा अनुभव अंगावर घ्यायचे ठरवले. त्यांनी त्यांच्या तोवरच्या जीवनजाणिवेतून उभ्या राहिलेल्या प्रतिमांना, चिन्हांना आणि अवघ्या माणूसपणाला धक्का देणा-या या विश्वाच्या आत शिरण्याचा निर्णय घेतला. पुढे वीस वर्षे, त्यांनी कामाठीपु-यातल्या स्त्रियांसाठी, त्यांच्या मुलांसाठी काम केले. हे काम धाडसी व त्रासदायक होते, कारण शोषणाची गडद छाया त्यावर होती.

     प्रतिमा जोशींनी आपल्या बाबांना (अनंत जोशी) ज्यांनी त्यांना विषमतेने फेकून दिलेल्या माणसांचे समांतर जग दाखवले व आपल्या जीवनसाथीस (मनोहर कदम) ज्याने त्या माणसांच्या दुःखाचा अर्थ व त्याची कारणे उलगडून दाखवली… या दोघांस पुस्तक अर्पण केले आहे.

     प्रतिमा जोशी यांचे वडील अनंत जोशी हे आधुनिक विचारसरणीचे होते. ते सुधारणावादी होते. त्यांच्याकडे कर्मठ ब्राह्मणी कर्मकांड चालत नसे. ते समाजसेवी व्यक्तित्वाचेही होते. त्यांनी आणीबाणीविरोधी कार्यात सक्रिय भाग घेतला होता. त्यांचा प्रतिमा जोशींवर प्रभाव होता. त्यांनी प्रतिमा जोशी यांना क्रियाशील व धाडसी होण्यात मदत केली. प्रतिमा जोशी या एकुलत्या एक कन्या होत्या, त्यामुळे साहजिकच आई-वडिलांच्या लाडक्या होत्या. घरातील वातावरण खुले होते.

     त्यांनी गरिबीमुळे चिडचिड होणारे नाते जवळून पाहिले होते. प्रतिमा जोशी यांच्या मनावर आर्थिक विषमता, स्त्री-पुरुष विषमता आणि सामाजिक भेद यांचे ठसे उमटत होतेच. त्यातून त्यांच्या संवेदना व जाणिवा जाग्या होत गेल्या व त्या लिहिण्यास प्रवृत्त झाल्या.

     नामांतराच्या वेळेस मराठवाडा पेटला होता. तेव्हा 'पोचिराम कांबळेला लाकडासारखा फोडला' असे वाचून त्या थिजून गेल्या होत्या आणि त्या सांगतात, मी निष्क्रियपणे 'कपिलदेव काय क्यूट दिसतो नै' या स्त्रियांच्या गप्पा ऐकत राहिले. असे सांगून त्या म्हणाल्या की स्त्री-पुरुष संबंधांमधल्या गुंतावळ्यात वेगळे व्यक्तिमत्त्व घेऊन उभी राहणारी पोरगी अनेकांचा चर्चेचा विषय बनते. माझे तसेच झाले, पण जसे दिवस उलगडत जातात तसा हा असमंजसपणा आपोआप लोपत जातो. ते वातावरण फार काळ टिकत नाही.

     त्यांचे पती मनोहर कदम ह्यांना आयुष्य कमी लाभले. ते खूप अस्वस्थ असत, त्यांच्या मनात असंतोष खदखदत असे. प्रतिमा जोशी म्हणतात, की त्यांनी मला विषमतेचे जग हे उघड्या डोळयांनी तसेच जाणीवपूर्वक दाखवले. त्यांनी 'ययाती' कादंबरीतील जातिव्यवस्थेचा एक वेगळाच पैलू माझ्यासमोर उलगडून दाखवला.

     प्रतिमा जोशी म्हणाल्या, “‘जहन्नम’ मधल्या कथा आपोआप लिहिल्या गेल्या. त्या ठरवून वगैरे रचता आल्या नाहीत. मला ढोंगीपणाचा प्रचंड तिटकारा आहे. म्हणून कल्पना वगैरेंचा आधार घेऊन अशा कथा गुंफाव्यात असे वाटले नाही. माझा स्वभाव हा पहिल्यापासून बंडखोर असल्यामुळे विचार रोखठोक, स्पष्ट असत. शिवाय, हाती घेतलेल्या कामात पूर्ण झोकून द्यायची वृत्ती, त्यामुळे असे हातून लिहिले गेले असावे.''

     समारंभाचे प्रमुख वक्ते डॉ. जब्बार पटेल हे पुस्तक वाचून गलबलून गेलेले जाणवत होते. या कथांतील पात्रे, भाषा हा संशोधनाचा विषय ठरेल वा ठरावा असे ते म्हणाले, यात रेखाटलेली परिस्थिती, त्यांतील पात्रे-त्यांच्या तोंडी असलेली भाषा, चित्रमयता यावर एक ग्रंथ होईल. नामदेव ढसाळांच्या 'गोलपीठा'ने जशी समाजाला जबरदस्त अशी चपराक दिली तशीच चपराक दिल्यासारखे हे लेखन आहे. या कथांमध्ये पुरुषाचा शोध घेण्याचा (वेगळा) प्रयत्न केलेला आढळतो असेही त्यांनी नमूद केले.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अनिल अवचट यांनी, आपण प्रतिमा जोशी यांचे मित्र होतो/आहोत असे सांगितले स्नेहाच्या त्या पातळीवर रेंगाळत त्यांचे भाषण झाले. ते म्हणाले, की मीसुध्दा पुण्यातील रेडलाईट एरियातून भटकंती केली. तेथील जीवनाचा आढावा घेतला, अभ्यास केला, सामाजिक कार्य केले. प्रतिमाने इकडे मुंबईला केले. पण तिच्या या सामाजिक कार्याचा कथांमध्ये असा आविष्कार होईल असे वाटले नव्हते. फारच मनस्ताप होतो हे लिहिताना असे ते म्हणाले.

     प्रतिमा जोशी यांनी कलात्मकतेचा आधार न घेता निर्भीड व वास्तववादी लेखन केले आहे. पुस्तकाची भाषा धाडसी असून शरीरविक्रय करणा-या महिलांच्या जीवनातील वास्तव या निमित्ताने मराठी साहित्यात आले आहे. पुस्तक वाचताना आपण त्या वातावरणात जातो. या पुस्तकातून समोर आलेल्या परिस्थितीत काही बदल करता येईल का याचा विचार मनात सुरू होतो असे त्यांनी नमूद केले. या पुस्तकाच्या निमित्ताने आपली बंद असलेली कवाडे उघडली जावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अनिल अवचट यांची मुलाखत या लिंकवर वाचता येईल

संपर्क – प्रतिमा जोशी – भ्रमणध्वनी- 9821263002

राजेंद्र शिंदे – इमेल –  thinkm2010@gmail.com

About Post Author

Exit mobile version