रंगनाथ पठारे यांचे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यात मोलाचे योगदान आहे. ते मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 2013 साली स्थापन झालेल्या अभ्यास समितीचे अध्यक्ष होते. ते मूलत: कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक आहेत. ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही त्यांची महाकादंबरी आहे, जी मराठा समाजाच्या सात पिढ्यांचा इतिहास मांडते. त्यांनी संगमनेर महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सदतीस वर्षे अध्यापन केल. पठारे म्हणजे विचार, संवेदना आणि शैली यांचा त्रिवेणी संगम. शासनाने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र…
प्रति,
माननीय मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
सप्रेम नमस्कार.
हे पत्र मी आपणास शालेय शिक्षणात पहिल्या इयत्तेपासून हिंदी शिकण्याच्या संदर्भात लिहित आहे. अशा प्रस्तावाला एक नागरिक म्हणून माझा विरोध आहे. का ते सांगतो. कोणत्याही शिक्षणासाठी मातृभाषा हे माध्यम असणे हे सर्वात योग्य असते, हे जगभर मान्य झालेले तत्व आहे. यात मातृभाषेच्या प्रेमाचे समजा बाजूला ठेवले तरी ती भाषा आपल्याला सहज आपली आई, कुटुंबीय आणि आपले भोवताल यातून मिळालेली असते. भाषा म्हणजे काही शब्दांचा फक्त समुच्चय नव्हे. ती हजारो वर्षांच्या सांस्कृतिक आणि ज्ञानात्मक ठेव्याचा समुच्चय असतो. आईच्या मुखातून तो आयता आपल्यापर्यंत येत असतो. ती नवे ज्ञान मिळविण्याची एक आयती भूमी असते. ती सोडून शिक्षणासाठी इंग्रजी माध्यम वापरण्याची जी मूर्ख रीत आपल्या लोकांत सध्या फोफावली आहे, ती अत्यंत धोकादायक आहे असे माझे स्पष्ट मत आहे. जी भाषा आपल्याला माहीतच नाही, ती ज्ञानाचे वहन करण्यासाठी कशी वापरता येईल? ते हास्यास्पद आहे. या आपल्या अशा इंग्रजीच्या माध्यम म्हणून स्वीकारामुळे कागदावर शिक्षित आणि प्रत्यक्षात अशिक्षित अशा तरुण आणि तरुणींची मोठी संख्या नजीकच्या भविष्यात आपल्यासमोर उभी राहून त्यातून फार मोठा सामाजिक प्रश्न उपस्थित होईल याविषयी माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही. इंग्रजी भाषेतून शिकविणारे शिक्षक; त्यांनाच मुळात ती भाषा पुरेशी अवगत नाही, तर त्या भाषेतून ते ज्ञानाचे वहन कसे करणार, असा माझा प्रश्न आहे. विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोघांनाही असे भाषेचे ओझे का असावे, तो अडसर का असावा, हे समजण्याच्या पलीकडचे आहे. ज्ञान घेताना संकल्पना महत्त्वाच्या असतात. त्या सांस्कृतिक आणि उपलब्ध भाषिक भूमीत- म्हणजे मातृभाषेत- सुलभपणे आत्मसात करता येतात. इंग्रजीसारख्या भाषेची भूमीच जिथे अपरिचित असते, तिच्यातून संकल्पना कशा शिकणार? इंग्रजी भाषेला माझा विरोध नाही. ती आता जगाची भाषा आहे. ती शिकली पाहिजे. पण तिच्यातूनच शिक्षण हे हास्यस्पद आहे. एक विषय म्हणून ती अवश्य शिकावी. तीही काही एका टप्प्यानंतर. उदाहरणार्थ, पाचव्या इयत्तेपासून आणि तिथेही तिचा दाब असू नये. आता हिंदी किंवा कोणतीही अन्य भारतीय भाषा… समजा आधी हिंदी. ती पहिलीपासून का शिकावी? असे कोणते मौलिक ज्ञान हिंदी भाषेत आहे; जे मराठीत नाहीय? अधिकचे काही मिळविण्यासाठी हिंदी? भाषेच्या विकासाच्या निकषात त्या भाषेत किती प्रकारचे कोश आहेत हा एक निकष असतो. मराठी भाषेत जितके कोश आहेत तितके हिंदी सकट कोणत्याही भारतीय भाषेत नाहीत. मराठी ही स्वतः अत्यंत प्रगल्भ भाषा आहे. बडोद्याचे एक जोशी नावाचे लेखक होते; त्यांनी छंदशास्त्र या विषयावर एक ग्रंथ मराठीत लिहिला होता. या ग्रंथाचा हिंदी भाषेत अनुवाद झाल्यावर हा विषय हिंदी भाषकांना माहित झाला. हे केवळ उदाहरण म्हणून. हिंदी ही एक भारतीय भाषा आहे. तिच्याविषयी आपल्याला आस्था आहे. पण इतरही भाषा; तमिळ, तेलगु, कन्नड, असामी, ओडिया, बंगाली याही भारतीय भाषा आहेत. त्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हिंदीच का, असा प्रश्न कायम राहतो. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे असे घटनेत नाही. आपल्या सगळ्या भाषा या आपल्या राष्ट्रभाषाच आहेत. हिंदी भाषी लोक तिच्या खेरीज आणखी कोणती भाषा शिकतात ? त्यांनी मराठी, गुजराती, कन्नड, तमिळ का शिकू नये? ते तसे का करत नाहीत? हिंदी भाषा ही सगळ्यात जास्ती भारतीय बोलतात, हे सुद्धा एक मिथ आहे. ते समजा असो. हिंदीला विरोध करण्याचे कारण नाही. किंवा कोणत्याच भारतीय भाषेला विरोध करण्याचे कारण नाही. त्या फक्त आपल्या भारतीय भाषा म्हणून अवश्य शिकल्या पाहिजेत. पण त्याही ऐच्छिक म्हणून. तेरा कोटी लोक जी भाषा बोलतात, ती मराठी ही एक प्रगल्भ भाषा आहे. ती आणखी प्रगल्भ करणे हा आपला अजेंडा असला पाहिजे. बाकी भारतीय भाषा भ्रातृभाव म्हणून अवश्य आत्मसात कराव्यात. पण ते काही एका टप्प्यानंतर. पहिलीपासून नव्हे. हिंदी ही एक महत्त्वाची भारतीय भाषा आहे. पण बाकी भाषाही महत्त्वाच्याच आहेत. हिंदीची सक्ती का? हिंदी भाषी आणखी कोणती भारतीय भाषा पहिलीपासून शिकतात? मुलांवर अधिक भाषा शिकण्याची सक्ती लहान वयात असू नये. मराठीतल्या अहिराणी, मालवणी, वऱ्हाडी अशा अनेक प्रगल्भ बोली आहेत. त्या घेऊन मराठीच्या अंगणात उतरणे आधीच मुश्कील. त्यात हिंदी, इंग्रजी असे ओझे पहिल्या इयत्तेपासून? ते लहान मुलांवर फार अन्याय करणारे होईल.
– रंगनाथ पठारे 9850121515 rangnathpathare@gmail.com