सध्या शुद्ध आणि अशुद्ध या संकल्पना बादच झाल्या आहेत. भाषा अशुद्ध नसतेच, पण हे तत्त्व फक्त मराठी भाषे च्या बाबतीत मोठ्या आदराने पाळले जात आहे. बोलणे, समजणे, संज्ञापन महत्त्वाचे. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी बहुजन समाजासाठी ‘जसे बोलायचे तसे लिहायचे’ असे उदार धोरण अवलंबले गेले. शुद्धलेखनाचे साधे-सोपे नियम आले. आता काहीच नियम नाहीत. कसेही बोला-कसेही लिहा. शंभरातल्या एकशेपाच जणांना प्रमाण मराठीत बोलता येत नाही! शिकवणार्यांनाही नाही. ठीक आहे. कोणती प्रमाण मराठी? कोणाची प्रमाण मराठी? आम्हाला ती बोलायचीच नाही. आम्ही आमच्या भाषेत बोलणार. आमच्या भाषेत शिकवणार. तुम्ही ज्या ‘शुद्ध’ मराठीची गोष्ट सांगताय, ती मुळी आम्ही नाकारतच आहोत. ‘शुद्ध’ ‘शुद्ध’ म्हणतात ती मराठी आहे कुठे? काही वर्तमानपत्रवाले ती वापरतात. आम्ही ती वाचतो, म्हणजे तिच्यावरून नजर फिरवतो. अर्थबोध झाला की झाले! आता, भाषा ही मुळी लिहिण्यासाठी नाही. ती एकाचे बोलणे दुसर्याला कळणे एवढ्यापुरती शिल्लक आहे आणि तेवढे पुरे आहे. शिवाय इथे लिहायचे आहे कोणाला? आणि मराठी? ते तर नाहीच नाही.
प्रभा गणोरकर (दैनिक सकाळ, 31-05-09)
ठार मारणे – एक अनुचित वापर
दूरचित्रवाणी वर आणि वृत्तपत्रांत आपण ‘अपघातात अमुक इतकी माणसे ठार झाली’ अशी बातमी बघतो. माझ्या मते, ‘ठार मारणे’ हा शब्दप्रयोग युद्धात करतात. युद्धाच्या वेळी शत्रुपक्षातील सैनिक मेले तर ‘हे सैनिक ठार झाले’ असे म्हणणे योग्य होईल. अपघाताच्या वेळी जर माणसे मेली तर ‘अमुक इतकी माणसे दगावली’ असे म्हणावयास हवे. अपघातात कोणी कोणाला ठार मारत नाही. स्कूटरच्या अपघातात एखादा मेला तर लगेच आपण ‘स्कूटर अपघातात ठार झाला’ असे म्हणतो. ते मला अनुचित वाटते.
प्र.चिं,शेजवलकर – एसएम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन 47/16 एरंडवणे, कर्वे रस्ता, पुणे 411 004.
दूरध्वनी (022) 2544 9743/2543 0327 (‘भाषा आणि जीवन’मधून)
मराठी भाषेसंबंधातील प्रभा गणोरकर यांचे सर्वसाधारण स्वरूपाचे आणि प्र.चिं.शेजवलकर यांचे विशिष्ट शब्दप्रयोगाबाबतचे अशी पत्रे येथे पुन:प्रसिद्ध केली आहेत. भाषेच्या वापराबाबतची अशी पत्रे अधूनमधून प्रसिद्ध होत असतात. त्यांमधून सर्व संवेदनाशील मराठी भाषिक मंडळींना मराठी भाषेच्या वापरामधील अराजक गेल्या काही वर्षांत अधिकच जाणवत गेले आहे.
दुसर्या बाजूला काही विधायक घटनाही घडत आहेत. ‘भाषा आणि जीवन’ या मराठी अभ्यास परिषदेच्या नियतकालिकात शब्दांची व्युत्पत्ती, शब्दांचा वापर यासंबंधात चर्चा घडत असतात. ‘सकाळ’ दैनिकाच्या साप्ताहिक आवृत्तीत यु.म.पठाण एकेक शब्दप्रयोग घेऊन त्याचे विकसन कसे झाले याची चर्चा झकासपणे मांडत असतात. प्रा. ब्रम्हानंद देशपांडे यांचे शब्दांच्या व्युत्पत्ती व त्यांचा वापर याबाबतचे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
या सर्व परिस्थितीत मराठी भाषेच्या उपयोगासंदर्भातील काही मजकूर दर बुधवारी ‘थिंकमहाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलवर अपलोड केला जाईल त्याबाबत वाचकांकडून खुली चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे.
दिनकर गांगल- संपादक, ‘थिंकमहाराष्ट्र डॉट कॉम’इमेल : thinkm2010@gmail.com
Last Updated On – 16th Nov 2016