कविश्रेष्ठ मोरोपंत बारामतीचे

0
127
_baramati_moropanta

मोरोपंत पराडकर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध जुने कवी. त्यांचा जन्म 1729 साली पन्हाळगडावर झाला. पराडकर हे मूळचे रत्नागिरीतील राजापूर प्रांतांतील सौंदल घराणे. पराडकरांचे वास्तव्य तेथे अनेक वर्षें होते. पुढे कित्येक घराणी कोकणातून 1700 ते 1715 या पंधरा वर्षांच्या कालावधीत देशावर आली. त्यामध्ये मोरोपंतांचे वडील रामाजीपंत आणि गोळवलीकर पाध्ये यांच्यापैकी केशव व गणेश पाध्ये यांचाही समावेश होता. ते पन्हाळगड येथे येऊन शाहू महाराज यांच्याकडे देशकार्यात दाखल झाले. त्यामुळे मोरोपंत यांचा जन्म पन्हाळगड येथे झाला. रामाजीपंत यांना तीन मुले आणि एक मुलगी. मोरोपंत त्या तीन मुलांमधील तिसरे. मोरोपंतांच्या वडिलांनी तत्कालीन वैदिक शिक्षणपद्धतीप्रमाणे मोरोपंत यांच्याकडून लिहिणे, वाचणे, स्तोत्रपठण, पुराणांचे वाचन करवून घेतले. मोरोपंत यांनी संस्कृत, काव्य, नाटक व अलंकारशास्त्र यांचे अध्ययन केशव पाध्ये आणि गणेश पाध्ये यांच्याकडून आठ वर्षें करून घेतले. मोरोपंत यांनी चाळीस संस्कृत ग्रंथ त्या कालावधीत लिहिले. पुढे, त्यांचे वडील श्रीमंत बाबूजी नाईक बारामतीकर यांच्या आश्रयास बारामतीला आले. बाबूजी नाईक यांनी मोरोपंत यांच्या अंगी असलेले विद्वत्तेचे गुण पाहून वाड्यात पुराणाचे कथन करण्यास ठेवले. आनंदी आणि लक्ष्मीबाई या त्यांच्या दोन पत्नी होत्या. नाईक यांनी त्यांच्या वाड्याशेजारीच दक्षिणेलाएक वाडा मोरोपंत यांना राहण्यास दिला. नाईक यांच्या प्रेमाबद्दल मोरोपंत यांनी लिहिले आहे –

श्रीमत्सदाशिवात्मज बाबूजी नायक प्रभू ज्ञानी।
धन्य म्हणावें ज्याला शुद्धगुणश्रवणतृप्त सुज्ञांनी।।
श्रीबाबूराय प्रभु माझा अत्यंत सदय अन्नद हा।
अर्थिजना न म्हणो दें जैसा तप्तास जेवीं सन्नद हा।।

मोरोपंत बारामती येथे चाळीस वर्षें राहिले. ते त्यांच्या आर्यांत बारामतीबाबत म्हणतात; की –  

आर्या! तरूच्या पक्षा त्यागा बारामती तमोराशी।
आर्यातरूच्या पक्षा त्या गा बारामतीत मोराशी।।

मोरोपंतांनी पाऊण लाख (पंचाहत्तर हजार) कवितांची निर्मिती केली. त्यांपैकी सहा हजार कविता उपलब्ध आहेत. त्यांनी ज्या स्वरूपात लिहिले त्यांपैकी ‘आर्या’ आणि ‘केकावली’ ही नवी काव्यशैली होती. त्यांनी एकूण एक लक्ष आर्या रचल्या. त्यांनी महाभारत, रामायणे, हरिवंश, कृष्णविजय ऊर्फ बृहद्दशम, मंत्रभागवत, ब्रह्मोत्तरखंड, आर्याभारत, मंत्रभागवत, कृष्णविजय, हरिविजय, सतिगीत, संशय रत्नमाला, केकावली, आर्याकेकावली ही काव्ये रचली. त्यांना यमक अलंकारात जास्त रस. त्यांनी यमक जुळवताना अनेकदा अवघड शब्दप्रयोग केले आहेत. त्यांच्या शब्दांत चातुर्य होते. पण त्यांच्या साहित्यात मूळ उद्देशाला ठेच कोठेही पोचलेली नाही. तशी खबरदारीही त्यांनी लिखाणात घेतली. त्यांची शब्दरचना ही सर्वसामान्य वाचकांना वाचण्यास आणि पचनी पडण्यास जड आहे, पण त्यांचे शब्दसौंदर्य प्रभावी आहे; ते त्यांच्या महाभारतावरील काव्यातून उमगते. 

मोरोपंत भगवद्गभक्त होते. ते रामप्रेमी होते. त्यांनी ज्या ज्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या त्या सर्वांवर काव्य रचले. त्यांनी एकूण एकशेआठ काव्यात्मक रामायणे रचण्याचा संकल्प सोडला होता. त्यामध्ये त्यांनी एक निरोष्ठय रामायण रचले. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या रामायणात प, फ, ब, भ आणि म ही ओष्ठ्य अक्षरे येत नाहीत. त्या काव्यात ‘राम’ हा शब्दच नाही. त्यांनी काही रामायण काव्ये अशी रचली, की त्यात फक्त तेरा ओळी आहेत. त्यात काही ओळींचे प्रत्येकी पहिले अक्षर घेतले तर ते ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असे होते; काही ओळींचे प्रत्येकी शेवटचे अक्षर घेतले तर ते ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असे होते. उदाहरणार्थ, _moropanat_smarakश्रीमान राज शिरोमणी दशरथ, निजयशें बरा महीत। द्विज सेवक, यज्ञनिरत, जनभय हर्ता, धरानिकामहित।।

त्यांच्या साहित्याचा प्रचार विविध माध्यमांतून झाल्यावर, लोक त्यांना ‘कविवर्य’, ‘मयूर पंडित’ अशा नावांनी ओळखू लागले. त्यांनी ‘केकावली’ ही शेवटची रचना 1793-94  मध्ये  केली. मोरोपंत त्या काव्याच्या मांडणीत त्यांना रामाला जवळ घेण्यास सांगतात. मोरोपंत यांना त्यानंतरच्या चैत्र महिन्यात रामनवमीचा नऊ दिवसांचा कार्यक्रम आटोपल्यावर एकादशीला ताप आला. तो दिवसेंदिवस वाढत गेला. त्यांना त्यांचे कार्य संपल्याची जाणीव झाली. त्यांनी सर्व आप्तेष्टांना बोलावून अखेरचा निरोप सांगितला. त्यांनी चतुर्दशीला ‘प्रांतप्रार्थना’ नावाचे सतरा आर्यांचे शेवटचे काव्य रचले. त्यांनी त्यात सर्वांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि ‘माझ्या मृत्यूनंतर देहाजवळ कोणीही रडारड करू नये, फक्त रामनामाचा गजर करावा. माझ्या देहावर अग्निसंस्कार करून माझ्या अस्थी गंगेत सोडाव्यात’ इत्यादी सूचना दिल्या आहेत. त्यांनी त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच हनुमान जयंतीला बारामती येथे त्यांच्या वाड्यात चैत्र शुद्ध पौर्णिमा शके 1716 रोजी (इसवी सन 1794) सर्वांचा निरोप घेतला. 

– संकलित

About Post Author