राकेश भडंग हा अमेरिकेत सॅन होजेला असतो. मूळ नाशिक-पुण्याचा. मी त्याच्या पंचवीस वर्षांपूर्वीच्या कथांमधील अमूर्त संकल्पनांनी मोहून गेलो होतो. तो अमेरिकेत वेबडेव्हलपर-प्रोग्रामर म्हणून केव्हा निघून गेला ते कळले नाही. त्याने तिकडे स्थिरावल्यावर कादंबरीलेखन सुरू केले. स्वतःचे पुस्तक इंग्रजीत लिहून ॲमेझॉनवर व्यक्तिगत रीत्या प्रकाशित करणाऱ्या पहिल्या काही लेखकांपैकी तो. त्याच्या कादंबऱ्या म्हणजे भक्कम कथावस्तू आणि संवेदनांशी खेळ असा रिझवणारा मामला असतो. त्यांत त्याच्या तरुणपणच्या अमूर्त संकल्पनांची झलकही दिसते. त्याने कला आणि तांत्रिक क्षेत्रातील कल्पनाशक्ती वापरून सध्याच्या व्यस्त आणि त्रस्त तरुणवर्गासाठी मेडिटेशन अॅपही बनवले आहे.
मी मधल्या काळात लेखन-वाचनापासून इंटरनेट कम्युनिकेशनपर्यंत पोचल्यामुळे आमच्या टेलिफोन संभाषणाचे विषय काळाबरोबर बदलले. साहित्याबरोबर आम्ही तंत्रज्ञान बोलू लागलो. राकेश नुसता तंत्राचा जादूगार नाही, तर त्या पाठीमागील मनोव्यवहार त्याला अवगत आहेत. त्याला इंटरनेटने जगाला का पकडून ठेवले आहे ते कळते.
लॉकडाऊनमुळेप्रत्येक व्यक्ती ‘हाऊस अरेस्ट‘मध्ये आहे. नैराश्य, हतबलता तर सर्वांनाच जाणवत आहे पण तरी आपल्या जगातल्या धीराच्या गोष्टी बऱ्याच चालू आहेत. त्या नोंदण्याचा हा धावता प्रयत्न. असेच काही सांगण्याची इच्छा असेल तर जरूर कळवा.
ई-मेल – info@thinkmaharashtra.com
तो म्हणतो, की अनुभव इंटरनेटवर माणसाला संकल्पनात्मक पातळीवरच भिडतो. तेथे अनुभव कोणतेही रूप घेऊन वाचक-प्रेक्षकांसमोर प्रकटतो आणि तत्क्षणी त्याचा प्रतिसाद मिळतो. ते रूप म्हणजे ‘प्रॉडक्ट’ असतो. त्याचा संदर्भ, त्याचे प्रकटणे आणि त्यावरील प्रतिसाद हा सततचा प्रवास असतो. ते नाते सभेतील वक्ता-श्रोता अशा स्वरूपाचे आहे. श्रोता चालत आला-त्याने वक्त्याचे भाषण ऐकले -जे समजले ते घेऊन गेला. ‘प्रॉडक्ट’ हाच प्रवास तेथेही असतो. परंतु, तेथेच त्याचा आरंभ आणि शेवट होतो. मग राहतो तो श्रोत्याच्या मनातील खेळ. वक्त्यासमोर माईक असतो, तंत्रजगात वेबसाईट. त्यावर आपली संकल्पना रेखायची, तिचे नाते ‘ग्राहकांशी’ जोडून द्यायचे. आपली संकल्पना व्यक्तिनिष्ठ असते, ती क्षणात वस्तुनिष्ठ होऊन जाते. जो हे जाणतो तो इंटरनेटवरील उपक्रम यशस्वीपणे चालवू शकतो.
राकेशची कल्पनाशक्ती अफाट आहे. त्याची पहिली कादंबरी नक्षलवादाचा शोध घेते, दुसरी अमेरिकेतील वंशवादाचा (स्नायपर), तिसरी कादंबरी अजून लेखनाच्या पातळीवर आहे. पण ती वेध घेते माणसामाणसांच्या जीवशास्त्रीय युद्धाचा. ती ‘स्टारवॉर’ धर्तीच्या कलाकृतींच्या पुढील असल्याचे जाणवते. राकेश ‘कोरोना’च्या काळात ती कादंबरी पुढे लिहीत आहे. ‘कोरोना’च्या निमित्ताने, ‘लोकसत्ते’ने जयंत नारळीकर यांची ‘अथेन्सचा प्लेग’ ही जुनी कथा पुनर्मुद्रित केली. ती कथा विषाणूचा वेध समर्पक रीत्या घेते, पण तरी बाळबोध वाटते. मधल्या काळात विज्ञान तंत्रज्ञान खूप खूप पुढे गेले आहे. सर्वसामान्य वाचकांची/लेखकांची समजूत गेल्या पंधरा-वीस वर्षांत किती प्रगल्भ होऊन गेली आहे! मात्र साहित्यिक-कलाकार यांना सध्याच्या तंत्रज्ञानानेच निर्माण केलेल्या सध्याच्या झगमगाटी दुनियेत लौकिक मर्यादितच मिळतो!
राकेश भडंग (+1 (408) 757-7688) usrakesh@yahoo.com
– दिनकर गांगल
(दिनकर गांगलहे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम‘ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत.)
————————————————————————————————————– राकेश भडंग यांची पुस्तके
सुंदर लेख.'प्राॅडक्ट ची अभिनव संक्लपना आवडली.
खूप माहितीपूर्ण लेख .