Home गावगाथा करावेगावाचे झाले सीवूड

करावेगावाचे झाले सीवूड

करावेगाव हे ठाणे जिल्हा आणि ठाणे तालुका यांच्या दक्षिण टोकाला आहे. गावाच्या पश्चिमेस ठाणे खाडी तर दक्षिणेस पनवेल खाडी येते. करावेगाव हा संपूर्ण आगरी समाजाचा गाव होता. ते लोक खाडीत मासेमारी करत असत. तेथे कोलंबी, बोईस, चिंबोरी, जिताडा, कोत, पाला असे चवदार मासे आणि खेकडे मिळत. गावकरी कष्टकरी होते. ते चारपाच मैल अंतर सहज कशासाठीही चालत जात असत. करावेगावाच्या पाठीमागून ‘पाम बीच’ हायवे गेला आहे. सिडको प्रशासनाने बेलापूर आणि करावेगाव यांच्यामधील खाडीकिनारी आधुनिक जेटी तयार केली आहे. तेथून खाडीमार्गे जलवाहतूक होईल असे अपेक्षित आहे. करावेगावाच्या ईशान्य भागात ‘सीवूड’ रेल्वेस्थानक आहे. ते मुंबई-पनवेल-ठाणे या शहरांशी जोडले गेले आहे. गावाची लोकसंख्या सात हजार असावी, पण तेथे बाहेरून आलेले भाड्याने राहत असलेले जवळपास तेरा हजार लोक आहेत. त्यामुळे गावाची लोकसंख्या वाढली आहे.

 

सागराने वेढलेल्या त्या गावी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. गावचा तलाव एप्रिल महिन्यात आटत असे, विहिरी कोरड्या पडत. असे असले तरी करावेगावाभोवती भातशेती आणि मिठागरे होती. शेतीत कोलम, राता, पटणी, जया, रत्ना, घोसाळे या जातींचा तांदूळ पिकत होता. गावाभोवती तळणाचा, वडाचा, मानीचा, कोलजीचा, कृष्णाखार या नावांची मीठागरे मीठ पिकवत. मीठागरात खारवे मीठ पिकवत आणि महिला कामगार डोक्यावर मीठाच्या टोपल्या घेऊन मीठ वाहत असत. गावाच्या दक्षिणेस गावबंदर होते. तेथे पन्नास एक होडकी, बल्याव, मचवे असत. त्यातून मुंबई, ठाणे, पनवेल येथे मीठाचा व्यापार होत असे. प्रत्येक होडक्यावर पाच-सहा खलाशी काम करत असत. माळरानावर पावसाळी भाजीचे मळे पिकवले जात. तेथे भेंडी, कार्ली, दुधी, भोपळा, चवळी, शिराळी, दोडकी, झेंडूची फुले तयार होत असत. गावात काही लोक दुधासाठी गायी-म्हशी पाळत. शेतीसाठी बैल, टोणगे असत. काही लोकांकडे बकऱ्या, कोंबड्या असत.

करावेगावात एक मोठा आणि एक लहान असे दोन तलाव होते. ते दोन्ही तलाव महापालिकेने एकत्र केले आहेत. पूर्वी संपूर्ण गाव तलावावर कपडे-भांडी धुत असे. करावेगाव ग्रामपंचायत या तलावांचा मासळी पालनासाठी लिलाव करत असे. आता लिलाव होत नाही. तलावाच्या ईशान्य दिशेस ‘बकुळ बाग’ होती. तेथे जुने बकुळीचे एक झाड आहे. तेथे गणपतीचे स्थान पूर्वीपासून आहे. म्हणून तेथे माघी गणेशोत्सव साजरा होतो. तिला आता गणपतीची बागही म्हटले जाते. गावाच्या उत्तर भागात नागदेवीचे मंदिर आहे. तेथे नवरात्री उत्सव साजरा होतो. गावात मरूआईचे मंदिर आहे तेथेही नवरात्री उत्सव साजरा होतो. गावात विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. तेथे विठ्ठलाचा पालखी उत्सव साजरा होतो. त्याच मंदिरात हनुमंताचे स्थान आहे. तेथे हनुमान जयंती उत्सव साजरा होतो. मरूआईच्या मंदिराच्या पूर्वेस ‘वेशीवरची देवी’चे स्थान आहे. तेथे गावजत्रेत पारंपरिक पूजन होते. गावाच्या उत्तर दिशेस गावदेवी मंदिर आहे. तेथे चैत्र शुद्ध सप्तमीस गावजत्रा भरते. देवीची पालखी गावाभोवती फिरवतात. गावाच्या पश्चिमेस मीठागरात ‘तळणाचा देव’ नावाचे स्थान आहे. तो देव लाकडाच्या खांब रूपात आहे. गावजत्रेत त्या देवास मानपान दिला जातो. तिकडेच मीठागराच्या वरील भातशेती भागात ‘बामण देव’ स्थान आहे. पूर्वी भाताची पेरणी, कापणी करताना तो देव पूजला जाई. आता गावात भातशेती होत नाही. महाराष्ट्र सरकारने भातशेती, मिठागरे, गावबंदर संपादन करून ‘नवी मुंबई’ शहरासाठी 1980 साली शहर वसवले आहे. त्यामुळेच त्या गावाची कृषी संस्कृती, मीठागर व्यवसाय नामशेष झाले आहेत. गावाच्या पूर्वेस ‘कॉलनी’ झाली आहे. काही देव नवी मुंबईतील शहरीकरणामुळे आणि औद्योगिकीकरणामुळे गायब झाले आहेत. करावेगावात पूर्वी ‘गायमुख देव’ होता. माळरानावरचा तो देव परागंदा झाला आहे. मात्र त्याला गायमुख चौक म्हणतात. गावात भजनी मंडळे अजून टिकून आहेत. करावेगाव भजन मंडळ, गजानन प्रासादिक भजन मंडळ, गजेंद्र बुवा तांडेल, विठ्ठल रखुमाई भजन मंडळ, देविदासबुवा म्हात्रे, ज्ञानाई भजन मंडळ, पंढरीबुवा भोईर ही प्रसिद्ध नावे.

करावेगावात म्हात्रे, तांडेल, पाटील, भोईर, नाईक, मढवी, कडू आडनावांचे लोक राहतात. ते आगरी समाजाचे. ते लोक पूर्वी भातशेती, मिठागरे, मासेमारी, भाजीचे मळे असे व्यवसाय करत. तेथे सातवीपर्यंतची कौलारू शाळा होती. त्या समाजांतील नवी पिढी शिकली असून ती विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. करावेगावाच्या पश्चिमेस ‘टी.एस. चाणक्य’ ही केंद्रशासनाची शिक्षण संस्था कार्यरत आहे. मात्र तेथे स्थानिक आगरी कोळी भूमिपुत्रांच्या मुलांना शिक्षण आरक्षण नाही ! गावात ‘ज्ञानदीप शिक्षण संस्था’ असून तेथे कॉलेजपर्यंत शिक्षण उपलब्ध आहे. ‘टी.एस. चाणक्य’ संकुलापुढे भारतीय नौदलाची जागा आहे. तेथे युद्धजन्य परिस्थितीत सैनिकी छावणी लागलेली गावकऱ्यांनी पाहिली आहे व त्यांना अशी संस्था त्यांच्या गावाजवळ असल्याचा अभिमान वाटतो. करावेगावाच्या हद्दीत ‘गणपत शेठ मैदान’ असून तेथे नवी मुंबईचे मोठमोठे कार्यक्रम साजरे होतात.

– गज आनन म्हात्रे 9323172614

About Post Author

Previous articleहृदय सजल करणारा- राग हंसध्वनी
गज आनन म्हात्रे हे करावेगावाचे रहिवासी. त्यांची कथा, कादंबरी, काव्यसंग्रह अशी दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच, त्यांनी तीन आगरी नाटके लिहिली आहेत. ते नवी मुंबईची – संतपरंपरा-इतिहास-ग्रामदेवता-ज्ञानेश्वरीतील आगरी भाषासौंदर्य या विषयांवर व्याख्याने देतात. त्यांचे सहाशेहून अधिक लेख वर्तमानपत्रे/मासिके यांत प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचा अनेक सामाजिक चळवळींत सहभाग असतो. त्यामुळे त्यांना विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. ते नवरंग साहित्य मंडळ, भुमिपुत्र सामाजिक प्रतिष्ठान, रंगधनु प्रकाशन/नाट्यसंस्था अशा अनेक संस्थांचे अध्यक्ष आहेत.

4 COMMENTS

  1. आपला लेख छान आहे. करावे गावाला सिवुड नाव कसे पडले ह्याचा उल्लेख लेखात यायला हवा होता.
    नवी मुंबईतील इतर गावांचा इतिहासही अशाच त्रोटक स्वरूपात येणे आवश्यक आहे.
    आपण तो लिहावा ही विनंती.
    धन्यवाद !
    आपला भ्रमणध्वनी क्रमांक मिळाला तर आभारी राहीन
    माझा ९३२३२९४५३०

  2. माहितीपूर्ण, ओघवत्या भाषेतील लेख आहे. विषय आणि शैली, अशा लेखांची मालिका वाचायला आवडेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version