कमळ – मानाचं पान!

3
403
carasole

कमळ - मानाचं पानभारतीय संस्कृतीतील लाडकं फूल म्हणजे कमळ. साहित्य, शिल्प, धर्म… सगळीकडे कमळाला मानाचं पान आहे. 'कमल नमन कर' अशा जोडक्षरविरहित, अगदी साध्या वाक्यातून लिहिण्या-वाचण्याचा श्रीगणेशा केला जातो. कमळ, कुमुद, कुमदिनी, कृष्णकमळ आणि अगदी गेल्या काही वर्षांत प्रसिध्दीच्या झोतात आलेलं ब्रह्मकमळ या सर्वांचा मागोवा घेण्यासाठी हे कमळपुराण.

कमळ या नावाखाली ज्या प्रजाती येतात त्यांत नेलम्बो, निम्फया, व्हिक्टोरिया यांचा समावेश आहे. जाणकारांच्या मते, यांतील सर्वाधिक गौरवली जाणारी प्रजाती म्हणजे नेलम्बो . संपूर्ण नाव- नेलम्बो न्युसिफेस. पत्ता अर्थात सरोवरे, तळी, तडाग आणि संथ नद्याही. या कमळाशी भारतीय तज्ञांचा अतिशय परिचय पूर्वापार आहेच, पण सामान्यांनी ओळखण्याची खूण म्हणजे त्यांची पाने आणि फुले पाण्याला स्पर्श करत नाहीत, तर पाण्याच्या पृष्ठभागापासून वीतभर किंवा अधिक उंच अंतरावर वाढतात.

कमळाला अनेक नावं आहेत. प्रत्येक नाव समर्पक आणि अर्थवाही. उत्पल सरसीरूह, पंकेरूह, पंकज हे सर्व संबोध त्याच्या जन्मस्थळाशी निगडित आहेत. पाण्यात वाढणारं म्हणून उत्पल आणि सरसीरुह, पंकेरूह, पंकज म्हणजे चिखलात जन्मणारं. पद्म म्हणजे मनोहारी, नलिनी म्हणजे सुगंधित आणि अरविंद याचा अर्थ चक्राकार पानं धारण करणारं. फुलाच्या रंगावरूनही कमळाला नावं आहेत. पद्म म्हणजे जसं मनोहारी, तसंच किंचित पांढरं, तर पुंडरिक म्हणजे धवल, अतिशय शुभ्र; कुवलय म्हणजे लाल आणि कोकनादही लाल, रक्तवर्णी. इंदिवरचा वर्ण निळा-नीलोफर. हे पर्शियन नाव नीलोत्पल या शब्दाचाच अपभ्रंश असावा. अर्थात निळं कमळ. मात्र नीलोत्पल म्हणजे आपल्याकडे जे मिळतं ते नीलकमळ नाही. पिवळं कमळ काश्मीर आणि लगतच्या अफगाणिस्तानच्या आसपास आढळतं.

फुलाच्या उमलण्यावरूनही कमळाचे दोन प्रकार आहेत, चंद्रविकासी आणि सूर्यविकासी. नेलम्बो मात्र सूर्यविकासी आहे.

कमळ - मानाचं पान

नेलम्बो कमळाचा अभ्यास इतका झालेला आहे, की त्याच्या अंगप्रत्यंगाला स्वतंत्र नाव आहे. या कमळाचं आडवं वाढणारं खोड चिखलात राहतं. या कंदाला म्हणतात शालूक. यापासून फुटलेली पानळ पाण्याकडे धावतात. कोवळ्या पानांची गुंडाळी म्हणजे संवर्तिका. पाण्याबाहेर आल्यावर ही गुंडाळी पसरते. पूर्ण वाढलेले गोल गरगरीत पान एखाद्या छत्रीसारखे. त्याचा दांडा पात्याच्या मध्यावर चिकटलेला. हा दांडा लांबलचक असल्यानं पान पाण्याबाहेर डोकावतं. या देठावर बारीक आणि मऊ काटे असतात. यात थोडा चीकही असतो आणि धागेही. पानाच्या दांड्याचळ आणि फुलाच्या देठाचं एकूण स्वरूप सारखंच. हा देठ म्हणजेच मृणाल. त्यात असलेले तंतू म्हणजे मृणालतंतू. कमळकलिका म्हणजे पौनार. कमळाचं फूल पंधरा-वीस सेंटिमीटर व्यासाचं असतं. फुलाचं निदल पाकळ्यांसारखेच, पण त्यावर किंचित हिरवट झाक पसरलेली. पाकळ्यांची अनेक आवर्तनं आणि त्यातील बाहेरच्या पाकळ्या मोठया तर आतल्या लहान आकारमानाच्या. नंतर पाकळ्यात झाकलेले असतात अनेक पुंकेसर. त्यांना नुसतंच 'केशर' असंही म्हणतात. त्याच्या परागकोशातून असंख्य परागकण तयार होतात. संस्कृत कवी भारवी एके ठिकाणी असं वर्णन करतो, की या परागकणांमुळे टाळ्यावर एक छत्रच निर्माण झालं. यामुळेच भारवीला 'छत्र भारवी' अशी ख्याती मिळाली.

पुंकेसराच्या आत पुष्पथाली गुरफटलेली असते. भोव-याच्या आकाराची ही पुष्पथाली अनेक छोटे-छोटे कप्पे धारण करते आणि प्रत्येकात असतो एक रगीकेसर. पुष्पथालीला सुध्दा अनेक नावं आहेत. पद्मकर्कटी उर्फ कमळकाकडी, तसंच कमलगट्टा अथवा कमळकाकडी. कमळकाकडीच्या प्रत्येक कप्यात कालांतरानं एक बी तयार होतं.

कमळाच्या बियांचं वैशिष्टय म्हणजे त्या दीर्घकाळ सुप्तावस्थेत राहू शकतात. तीच परिस्थिती त्याच्या कंदाची. उन्हाळ्यात तळी, तलाव कोरडे होतात. कमलबीजं आणि कमलकंद ग्रीष्मनिद्रा अनुभवतात. नवा पाऊस, नवं पाणी आलं की, या बियांना आणि कंदांना नवजीवन प्राप्त होतं. कांद्यांना धुमारे फुटतात, बिया रुजतात आणि बघता बघता, कमळताटवे बहरतात. मग सहज उद्गार निघतात 'पयसा कमलेन विभाति सर:।'

हेमा साने, पुणे

Last Updated On – 31st August 2016

About Post Author

3 COMMENTS

Comments are closed.