कं चे भा गु बे व – आयुष्याचे गणित

मी माझ्या आयुष्यातील जवळपास एकोणचाळीस वर्षे गणित ह्या विषयाचे अध्यापन केले. तो प्रवास जुने पारंपरिक गणित ते आधुनिक गणित असा आहे. गणित हा मला एके काळी घाबरवणारा, परंतु नंतरच्या काळात माझा अत्यंत आवडता विषय झाला. माझ्या आयुष्याची अनेक गणिते, प्रॉब्लेम्स, रायडर्स सोडवण्यास मला गणिताने शिकवले !

माध्यमिक शाळेत असताना पदावली (पॉलिनॉमीयल्) सोडवण्याची उदाहरणे असत. त्यासाठी सूत्र होते ‘कं चे भा गु बे व’ ! तेच आयुष्याचेही सूत्र आहे. संकटाच्या आणि सुखाच्या अनेक पदांनी गुंफलेली पदावली म्हणजे आयुष्य. आपल्या भोवतीचे अहंकाराचे कंस प्रथम सोडवावे लागतात. कोण कोणा‘चे’ आणि कोण‘चे’ आपले हे ‘चे’, अहंकाराचा कंस काढल्याशिवाय कळत नाही. ते कळले, की चांगल्या-वाईटाचा भागाकार करून नंतर सद्गुणांचा गुणाकार करावा लागतो. हाती आलेल्या सद्गुणांची बेरीज करताना, हलकेच चुकून, अंगाशी आलेल्या दुर्गुणांची वजाबाकी केली, की जीवनाचा मार्ग सुकर होतो. परंतु हे सगळे हाती येण्यास आयुष्याचे गणित सोडवण्याची खूप प्रॅक्टिस करावी लागते. कठोर परिश्रम, डोळस निरीक्षण आणि सतत प्रयोगशील वृत्ती हे गणिताचे अधिष्ठान आहे. राष्ट्रीय गणित दिवस (22 डिसेंबर) आहे. तो जगप्रसिद्ध भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मरणार्थ दरवर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस 22 डिसेंबर 1887 !

भारत देशात गणित विषयाचे संशोधन करून त्यात नवनवीन तथ्ये आणि माहिती यांची भर घालणारे दिग्गज गणिती होऊन गेले. आर्यभट्टापासून लीलावतीकार भास्कराचार्य यांच्यापर्यंत आणि श्रीनिवास रामानुजन यांच्यापासून लोकमान्य टिळक यांच्यापर्यंत !

गणिताची शिस्त आणि गणितातील काव्य यांचे ज्याला आकलन झाले तो कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतो. महाराष्ट्राच्या एस.एस.सी. बोर्डाने 1972 सालापासून नवीन गणिताचा सूत्रपात केला. त्यापूर्वी आम्ही पारंपरिक अंकगणित, बीजगणित व भूमिती शिकलो आणि ते विषय शिकवलेही. नवीन गणिताचे अध्यापन आणि अध्ययन 1972 साली सुरू झाले. नवीन गणिताची, दहाव्या वर्गाची पहिली बॅच 1975 साली मॅट्रिकला बसली. त्यापूर्वी आम्हा गणित अध्यापकांसाठी नवीन गणिताचे अनेक ‘इन सर्विस ट्रेनिंग सेमिनार्स’ झाले.

आमचा असाच एक सेमिनार 1972 सालच्या उन्हाळ्यात नागपूरच्या मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालयात झाला होता. मोहता विज्ञान महाविद्यालयाचा गणित विभाग हा त्या काळात नागपूर विद्यापीठात सर्वश्रेष्ठ होता. निष्णात प्राध्यापक- मुटाटकर/ दप्तरी/इंदूरकर/मंगळगिरी/व्यवहारे असे गणिताचे एकापेक्षा एक- त्या महाविद्यालयात होते. आम्हाला तेच प्राध्यापक त्या सेमिनारमध्ये शिकवण्यास होते. अभ्यासक्रमात नवीन गणित सुरू करावे ही संकल्पना, नागपूर विद्यापीठाचे गणित विभाग प्रमुख डॉ. भास्कर सदाशिव फडणीस यांची होती. ते आमच्या सेमिनारच्या उद्घाटनाला आले होते. अत्यंत विद्वान व्यक्ती. त्यांनी त्यांच्या सानुनासिक आवाजात अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. त्यांनी समारोप करताना जे सांगितले ते मी मनात कोरून ठेवलेले आहे. कारण नंतरच्या काळात साहित्य, नाटक, लेखन, वक्तृत्व, सूत्रसंचालन, कार्यक्रमाचे आयोजन अशा सर्व क्षेत्रांत वावरताना गणिताच्या सर्वश्रेष्ठतेचे आकलन होत गेले. फडणीस म्हणाले होते, “मित्रांनो, तुम्ही गणिताचे विद्यार्थी आहात. शिक्षकही आहात. एक गोष्ट मनात पक्की कोरून ठेवा. गणित हा सर्व शास्त्रांमध्ये सर्वश्रेष्ठ विषय आहे. आयुष्याला गणिताशिवाय अर्थ नाही आणि गणिताला पर्याय नाही”

असे म्हणून त्यांनी एक श्लोक सांगितला होता… “यथा शिखा मयूराणां नागानां मणयो यथा । तद्वेदांग शास्त्राणां गणितं मूर्धनि स्थितं ।।

ज्या प्रमाणे मोराच्या डोक्यावर त्याचा सुंदर तुरा शोभून दिसतो, नागाच्या मस्तकावर त्याचा तेजस्वी मणी शोभून दिसतो त्याचप्रमाणे सर्व शास्त्रांच्या मूर्धास्थानावर गणित शोभून दिसते.”

प्रकाश एदलाबादकर, 9822222115 / 9049778668 edlabadkar.p@gmail.com

———————————————————————————————————

About Post Author