ओळगावचे वयोवृद्ध आजोबा लक्ष्मण मांजरेकर खूष आहेत, कारण ते सांगतात की गावात दारूबंदी गेली चाळीसेक वर्षे आहे. त्यामुळे तक्रारींचे आणि भांडणांचे प्रमाण जवळपास नाहीसे झाले आहे. गावात कमालीची शांतता आहे. दारूबंदीने आणि ग्रामस्थांच्या एकीने ओळगावात मोठी क्रांती घडवली आहे. दापोली तालुक्यातील ओळगाव दाभोळ रस्त्यापासून थोडे आत झाडीत लपलेले आहे.
दारूचे परिणाम गावात चार बुके शिकलेले तरूण जाणू लागले आणि त्यांनी वेळीच शहाणे होऊन गावाची व्यसनातून सुटका केली. गावाने सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला तो दारूबंदीचा ! दारू तयार करण्यास मिळत नाही म्हणून काही मंडळींनी बाहेरगावांचा रस्ता धरला. पण बाजूच्या गावांनाही जाग आल्याने त्यांनीही दारूबंदी जाहीर केली आणि साऱ्यांचाच नाईलाज झाला. लोक त्यांच्या संसारात, गावाच्या विकासात लक्ष घालू लागले. स्वतःच्या गावाचा विकास स्वतः स्वतःपासून सुरू करायचा, असेच जणू सर्वांनी मनोमन ठरवले. त्यांचे चांगले परिणाम घडून आले.
ओळगावाचे ऐक्य अभंग आहे. गावाचा विकास हा सर्वांपुढील महत्त्वाचा मुद्दा आहे. गावकरीच सांगतात, की “वीर हनुमंतानं प्रत्येक मोती फोडून त्यात राम दिसतो का ते पाहिले, तसे ग्रामस्थ प्रत्येक बाबतीत यातून गावाचा विकास होणार का याचा विचार करतात”. त्यांच्या कथनातून गोष्टी उलगडतात – बाहेरगावच्या फेरीवाल्यांना या गावात धंदा करण्यास बंदी आहे. कारण त्यामुळे या गावातील पैसा बाहेर जातो. त्याऐवजी गावातल्याच कोणी एखाद्याने तो धंदा करावा असे ठरले. गावातल्याच माणसाला चार पैसे मिळून जातील असे त्यामागील तर्कशास्त्र ! निर्णय घेतला खरा, पण प्रत्यक्षात फिरून धंदा करण्यास कोणी पुढे येईना. लोकांना लाज वाटू लागली. पोलिसपाटील मांजरेकर यांनी ते आव्हान स्वीकारले आणि ते स्वतः टोस्ट-बटरची टोपली घेऊन फिरू लागले. आणखी एकाने भंगार गोळा केले आणि एक नवा आदर्श घालून दिला.
पाण्याची वणवण ओळगावलाही चुकलेली नाही. पण ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने गावात पाणी आणले. दोन विहिरी खोदून ठिकठिकाणी सार्वजनिक नळ उभे केले आहेत. पण सगळ्यांचे लक्ष असते ते पाण्याच्या कार्यक्षम वापरावर ! आणि म्हणूनच, भर उन्हाळ्यातही गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत नाही.
गावाच्या इतिहासात थोडे डोकावले तर रंजक माहिती मिळाली. ऊसाचे पीक कोकणात कोठेही घेतले जात नाही. ते या गावात एके काळी मोठ्या प्रमाणावर घेतले जाई. ऊसासाठी प्रगत ज्ञान किंवा पाणी-नियोजन त्या काळी नव्हते. साखर-कारखाना तर फारच लांब ! ऊसाचे पीक ही तेथील अजब गोष्ट ठरली. मोठ्या चुली पेटवून, त्यावर भलीमोठी कढई ठेवून ऊसाचा गूळ तयार केला जाई. गुळाची खमंग चव आणि त्याचा मोहक रंग सगळ्यांना भुरळ पाडत असे ! ऋषी पंचमीच्या उपासासाठी आणि इतर स्वयंपाकासाठी ओळगावच्या गुळाच्या ढेपी आजुबाजूच्या गावांत रवाना होत. गूळ करण्याच्या मोठ्या कढया काही ग्रामस्थांकडे अजून आहेत. पण तो धंदा परवडेनासा झाला व बंद पडला ! त्याखेरीज बैल लावून ऊसाचा रस काढला जाई. अनेकजण येऊन रसपान करून जात. बक्कळ धंदा होई. गावकऱ्यांची ती चैन ऊसाअभावी बंद पडली.
गावातून एक छोटीशी नदी झुळझुळते. तिच्या काठी भोलेनाथाचे मंदिर ग्रामस्थांनी बांधले आहे. त्याचीही दंतकथा प्रसिद्ध आहे. भोलेनाथांनी ‘याच जागेवर माझे मंदिर बांधा’ असे एका गावकऱ्याच्या स्वप्नात येऊन सांगितले म्हणे ! सगळ्यांना ते कळल्यावर कामाला सुरुवात झाली आणि बघता बघता, मंदिर उभे राहिले. भोलेनाथाचा उत्सव शिवरात्रीला मोठा होतो. मुंबईकर-ग्रामस्थ येतात. एकीचे सुंदर दर्शन त्यावेळी घडते.
गावातील वस्तीची रचना छान आहे. सगळी घरे एकाच वाडीवर एकाच ठिकाणी आहेत. बाकी कोठेही गावात घर नाही. फक्त दोन घरे थोडी लांब आहेत, तोच काय तो अपवाद ! ज्यावेळी ग्रामस्थांची सभा असते, त्यावेळी केवळ दोन ठिकाणी उभे राहून ‘अमूक वेळेला चव्हाट्यावर जमायचं हो’ असा पुकारा करून सभा निमंत्रण दिले जाते. फक्त पुरूषांची सभा असेल तर ती रात्री नऊ वाजता आणि महिला-पुरुषांची एकत्र सभा असेल तर रात्री दहा वाजता भरते.
जवळच्या डोंगरावर कातळशिल्प सापडले आहे. एक ताम्रपट पाहण्यास मिळाला. त्यावर सुंदर अक्षरांत मराठी मजकूर कोरलेला असून देवळासाठी चारशे रूपये खर्च झाल्याचे त्यात म्हटले आहे. एका दगडावर घोड्याचे पदचिन्ह आहे. घोडबावही आहे. ग्रामस्थ सुधारणावादी आहेत. गावात डिजीटल स्कूल आहे. गावाची दौड स्वावलंबनाच्या दिशेने चालू आहे. दारूबंदी आणि अभंग एकी यामुळे लोक सुखी-समाधानी आहेत. गावात येणारी सासुरवाशीण कधीही अश्रू ढाळत नाही तर हसतमुखानेच नांदते अशी ओळगावची ख्याती परिसरात आहे, कारण संसार उद्ध्वस्त करणाऱ्या दारूचा लवलेशही तेथे नाही !
– विनायक नारायण बाळ 9423296082 vinayak.bal62@gmail.com
—————————————————————————————————————————–