Home वैभव ओरायन, आर्क्टिक होम : टिळक यांची बौद्धिक झेप (Orion And Arctic Home...

ओरायन, आर्क्टिक होम : टिळक यांची बौद्धिक झेप (Orion And Arctic Home in The Vedas By Tilak)

स्वातंत्र्यपूर्व भारताच्या खदखदणाऱ्या राजकारणात आत्यंतिक महत्त्वाची भूमिका बजावत असतानाही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे  द ओरायन’ आणि ‘द आर्क्टिक होम इन वेदाज्’ या ग्रंथांसाठीचे संशोधन करत होते! ते संशोधन म्हणजे त्यांच्या बुद्धिकौशल्याची चुणूक आहे.

लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या ‘द ओरायन‘ आणि ‘द आर्क्टिक होम इन द वेदाज‘ या दोन ग्रंथांद्वारे त्यांचे संशोधनत्यांचे विचार जगाच्या समोर मांडले. द ओरायन‘ 1893 साली प्रसिद्ध झाले. त्या संशोधनामुळे मॅक्समुल्लर यांच्यासारख्या ऋषितुल्य विद्वानाची व टिळक यांची ओळख व जवळीक निर्माण झाली. वेदवाङ्मय हे मानवी ज्ञात इतिहासातील सर्वात प्राचीन वाङ्मय आहे आणि मानवाचा, विशेषत: आर्यवंशाचा अभ्यास करण्यासही वेदांइतके दुसरे महत्त्वाचे असे साधनसाहित्य काहीच नाही हे प्रकर्षाने जगासमोर आले. मॅक्समुल्लर यांनी ‘भारतापासून इंग्लंडने काय शिकावे?’ या विषयावर 1882 साली केंब्रिज विद्यापीठात व्याख्यानमाला गुंफली होती. ते म्हणाले, प्राचीन आर्यवंशाचा विस्तार ग्रीक, रोमन, जर्मन, स्लाव्ह अशा नाना रूपरंगांत झाला आहे. संस्कृत साहित्याच्या माध्यमातून आर्यवंशाचा व त्यांच्या चालीरीतींचा व संस्कृतीचा परिचय होऊ शकतो. ऋग्वेदातील काही सूक्तांत आर्यजनांच्या पूर्वीच्या अवस्थेचे दर्शन होते.

टिळक यांनी वैदिक साहित्याचे संशोधन चिकित्सकपणे केले. त्या संशोधनाची फलश्रुती म्हणजेच टिळक यांचे ते दोन ग्रंथ! पाश्चात्त्य विद्वान इजिप्तची संस्कृती सर्वात प्राचीन आहे असे मानत होते. त्यांचे मत आर्य संस्कृती इसवी सनपूर्व 2400 पेक्षा जास्त जुनी नाही असे होते. टिळक यांनी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाकी आर्य संस्कृती अतिप्राचीन आहे व वेदातील, विशेषत: ऋग्वेदातील आर्यांच्या धार्मिक चालीरीती ख्रिस्तपूर्व चार हजार वर्षांपूर्वीच्या आहेत.  त्यांनी वैदिक आर्यांच्या चालीरीती व पुराणकथा यांचा इराण व ग्रीस यांच्या चालीरीती आणि पुराणकथा यांमध्ये साम्य असल्याचे दाखवून दिले. टिळक यांचे संशोधनाचे महत्त्व असे, की त्यांनी त्यांचे मत सिद्ध करण्यासाठी वैदिक साहित्यातील विश्वसनीय पुरावे वापरले. त्यांनी पुराणकथांचा उपयोग केवळ मतपुष्टीसाठी केला.

टिळक यांनी वेदकाळाचा वेध घेत असतानाचआर्यांच्या मूळ वसतिस्थानाचा शोध घेतला. त्यांच्या मते, आर्यजन शेवटच्या हिमयुगापूर्वीच्या काळात उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते. परंतु आर्यांनी त्यांचे मूळ वसतिस्थान नंतर झालेल्या हिमयुगामुळे सोडले. त्यांच्यातील टोळ्या नवीन वसतिस्थानाच्या शोधात युरोपात विखुरल्याकाही आशियात आल्या. ज्या आशियात आल्या त्यांतील काही गट इराणमार्गे भारतात पोचले. वेदांची बुहतांश रचना ही उत्तर ध्रुव प्रदेश किंवा आर्यांनी त्यांचे मूळ वसतिस्थान सोडल्यानंतर झालेली आहे असे त्यांचे मत होते. उत्तर ध्रुवावरील आर्यांनी त्यांच्या मातृभूमीच्या आठवणी वेदांमध्ये आणि पारशी लोकांचा धर्मग्रंथ झेंद अवेस्तांमध्ये जतन करून ठेवलेल्या आहेत. अवेस्तामध्ये आर्यांच्या आनंदी निवासस्थानाचे ‘अैर्यानाम वेजो’ असे वर्णन आहे. तेथे अनेक महिने कडक थंडी व काही महिने उन्हाळा असे. त्या बाबतीत वैदिक व इराणी परंपरा यांतील वर्णन जवळजवळ सारखे दिसते. वेदांतही दीर्घकालीन दिवस व रात्री यांचा उल्लेख आहे.

टिळक यांच्या मतेवेदांतील व अवेस्तांतील परंपरांचा विचार करता आर्यांच्या उत्तर ध्रुव प्रदेशातील मूळ वसतिस्थानाचे अक्षांश साधारणत: बरोबर ठरवता येतात. परंतु त्या वसतिस्थानाचे रेखांश किंवा ही आर्यभूमी उत्तर ध्रुव प्रदेशात कोठपर्यंत पसरलेली होती हे ठरवणे मात्र कठीण आहे. आर्यांचे ते वसतिस्थान युरोपच्या उत्तरेला होते, की आशियाच्या उत्तरेला हे ठरवणे शक्य नाहीते सायबेरियाच्या उत्तरेला असणेही अशक्य नाही. परंतु त्याबद्दल अधिक संशोधनाची गरज आहे असे त्यांचे म्हणणे होते.

पृथ्वीवरील शेवटचे हिमयुग इसवी सनपूर्व दहा हजार वर्षे इतके आधी झाले असावे. टिळक यांनी हिमयुगोत्तर काळाच्या सुरुवातीपासून ते बुद्धपूर्वकाळातील आर्याच्या स्थित्यंतराची विभागणी पाच कालखंडांत केली – इसवी सनपूर्व दहा हजार ते आठ हजार – या कालखंडात आर्यलोक उत्तर ध्रुव प्रदेशात राहत असावेत. आर्यांना मूळ वसतिस्थान दीर्घकालीन हिमप्रलयामुळे सोडावे लागले.

हिमयुगोत्तर काळाची सुरुवात : इसवी सनपूर्व आठ हजार ते पाच हजार – आर्यांचे नवीन वसतिस्थानाच्या शोधात स्थलांतरआर्यांची युरोप व आशिया यांच्या उत्तरेला भटकंती. त्या कालखंडाला ‘अदिती काल’ असे नाव आहे.

इसवी सनपूर्व पाच हजार ते तीन हजार – ‘ओरायन कालखंड. आर्याच्या स्थित्यंतरातील सर्वात महत्त्वाचा कालखंड. आर्यानी त्यांचे पंचांग व धार्मिक चालीरीती यांत सुधारणा साधण्याचा प्रयत्न केला.

इसवी सनपूर्व तीन हजार ते चौदाशे – ‘कृतिका काळ. तैतरीय संहिताब्राह्मणे वगैरेंची रचना त्याच कालखंडातील आहे. आर्यानी उत्तर ध्रुव प्रदेश सोडून बराच काळ लोटलेला आहे. ‘वेदांग ज्योतिषाची रचना त्याच काळातील.

इसवी सनपूर्व चौदाशे ते पाचशे – ‘गौतम बुद्ध पूर्वकाळ’ सूत्र आणि तत्त्वज्ञानाच्या (उपनिषदे वगैरे) विविध पद्धतींची सुरुवात.

टिळक इंग्लंडला 1918 साली गेले होते. त्या वेळी विशेष खटला व इतर राजकीय कामकाज यांत व्यग्र असतानाहीटिळक ‘इंडिया ऑफिस लायब्ररीत जाऊन खाल्डियन व असीरियन संस्कृती यांवर प्रकाश टाकणारे इष्टिका लेख लिहून घेत. असीरियन संस्कृतीचे अभ्यासक डॉ.थॉमस यांच्याबरोबर लोकमान्य यांची चर्चा होत असे. तेव्हा दादासाहेब खापर्डे लोकमान्य यांना म्हणाले, ‘इतक्या कामानंतर तुम्हाला शीण न येता तुम्ही अशा गहन विषयाकडे कसे वळता?’ त्यावर टिळक म्हणाले, ‘राजकीय कामाचा शीण जावा म्हणून तर मी माझ्या आवडीच्या विषयावर चर्चा करण्यास जातो. राधाकृष्णन टिळक यांचा गौरव करताना म्हणाले होतेकी ही वॉज बाय नेचर अ स्कॉलर; अ‍ॅण्ड ओन्ली बाय नेसेसिटी अ पोलिटिशन.

टिळक यांनी वैदिक साहित्यातील अनाकलनीय सूक्तांचा व ऋचांचा अर्थ लावून वेदकाल इसवी सनपूर्व चार हजार ते साडेचार हजार वर्षे इतका मागे नेला आणि पृथ्वीवरील शेवटच्या दोन हिमयुगांमधील (Interglacier) काळात आर्य लोक उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते हे सिद्ध केले. टिळक यांनी ज्योतिर्गणिताच्या साहाय्याने ते संशोधन केले. टिळक यांची धारणा मात्र अशीच होती, की वैदिक वाङ्मयातील सूक्तांचा अर्थ लावण्याचे काम हे संस्कृत भाषातज्ज्ञांचे आहे आणि एकदा का त्यांनी लावलेला तो अर्थ बरोबर आहे हे मान्य झाले तर खगोलशास्त्राच्याआधारे वेदवाङ्मयाचा काल व आर्याच्या मूळ वसतिस्थानाचे गूढ उकलणे सहज शक्य आहे! टिळक यांनी त्यांचे दोन्ही ग्रंथ इंग्रजीत लिहिले हे महत्त्वाचे होय.

संकलित

———————————————————————————————————

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version