ऐसा ज्योती पुन:पुन्हा व्हावा!

0
69
अतुल पेठेंनी पुनरुज्जीवित केलेले नाटक ‘सत्यशोधक’
अतुल पेठेंनी पुनरुज्जीवित केलेले नाटक ‘सत्यशोधक’

अतुल पेठेंनी पुनरुज्जीवित केलेले नाटक ‘सत्यशोधक’ गो.पु. देशपांडे लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ हे मराठी रंगभूमीवरचे अलिकडच्या काळातले सर्वांत जास्त उत्कंठा असलेले नाटक आहे. जाणकार लोकांच्या मनात त्या नाटकाविषयी जबरदस्त कुतूहल आहे आणि कामगार व बुध्दिवंत यांचा नाटकात एकत्र योग जुळून आल्याने, त्याबाबत कामगारवर्गालाही औत्सुक्य वाटत आहे. नाटकाचे पंचाहत्तर प्रयोग सहा-सात महिन्यांत महाराष्ट्रभरात व महाराष्ट्राबाहेर झाले आहेत. हे नाटक पाहिलेल्या प्रेक्षकांचा अधिकृत आकडा साठ हजार एवढा आहे.

शनिवारवाड्यावर पुणे महापालिका कर्मचारी युनियन निर्मित ‘सत्यशोधक’ या नाटकाचा विनामूल्य् प्रयोग सादर करण्यात आला होतामहात्मा फुले यांचे जीवनचरित्र आणि कर्तृत्व यांचा वेध नाटकातून घेणे हीच अवघड गोष्ट आहे. यापूर्वीही ज्योतिराव फुले यांच्यावर नाटके लिहिली गेली होती. ज्योतिरावांवर पहिले नाटक, १९५० साली शंकरराव मोरे यांनी लिहिले. त्यानंतर अरुण मिरजकरांनी लिहीपर्यंत फुल्यांवर बारा नाटके लिहिली गेली. श्याम बेनेगल यांनी पं. नेहरू यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकावर आधारित ‘भारत – एक खोज’ ही जी मालिका बनवली होती, त्यात एक एपिसोड हा ज्योतिरावांवर बेतलेला होता. त्याचे लेखन गो.पु. देशपांडे यांनीच केले होते. गो.पुं.नी पुढे, १९९२ मध्ये ‘सत्यशोधक’ हे नाटक लिहिले. कोल्हापूर च्या ‘प्रत्यय’ या संस्थेने त्याचे प्रयोगही १९९३ मध्ये केले. पण त्यावेळी नाटकाबद्दल विशेष औत्सुक्य निर्माण झाले नाही. गो.पु. देशपांडे हे भारतीय रंगभूमीवरचे महत्त्वाचे नाटककार. त्यांच्या ‘सत्यशोधक’ नाटकाने अतुल पेठे यांचे लक्ष वेधून घेतले होते. नाटक जुने, १९९२ चे. त्यावेळी सफदर हाश्मींनी दिल्लीत जन नाट्यमंचाच्या वतीने त्याचे काही प्रयोग हिंदीत केले. त्याचे हिंदी रूपांतर चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

अतुल पेठे यांनी ‘सत्यशोधक’चे सद्यकालीन महत्त्व जाणून नाटकाचे पुनरुज्जीवन केले, तेही रंगभूमीचे जवळून दर्शन घेण्याची संधी लाभण्याची कधी शक्यता नसलेल्या कामगारवर्गातील कलावंत मंडळींचा सहभाग घेऊन. त्यांची ही पहिली किमयाच अद्भुत, कल्पकतापूर्ण आणि तर्कशुध्द ठरली. पुण्याच्या महानगरपालिकेतील सफाई कर्मचार्‍यांनी नाटकातील विविध भूमिका वठवल्या आहेत. एवढेच नव्हे तर नाटकाची निर्मितीही कॉ. मुक्ता मनोहरयांच्या पुढाकारामुळे ‘पुणे म्युनिसिपल वर्कर्स ऑर्गनायझेशन’ने केली आहे. अतुल पेठे यांनी नाटक दिग्दर्शित केले आहे.

नाटककार – लेखक - दिग्दर्शक अतुल पेठेअतुल पेठे हे वेगळ्या मार्गाने जाणारे रंगकर्मी आहेत. साहित्य, समाज आणि संस्कृती यांच्यातील परस्पर संबंध जाणतेपणाने समजून घेऊन विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रश्न नाटकांमधून मांडण्याचा ध्यास त्यांच्या कृतींतून जाणवतो. बेकेटचे ‘वेटिंग फॉर गोदो’ ; श्याम मनोहरांचे ‘शीतयुध्द सदानंद; दिवाकर कृष्ण यांच्या नाट्यछटांवरचे ‘मी माझ्याशी’; माहितीच्या अधिकारावर आधारित ‘दलपतसिंग येती घरा ’, ‘ऐसपैस सोयीने बैस’; ‘प्रेमाची गोष्ट’, सदानंद मोरे यांचे ‘उजळल्या दिशा’; मकरंद साठे यांची ‘सूर्य पाहिलेला माणूस’ , ‘आनंद ओवरी’, ‘चौक’, ‘गोळायुग’, ‘चारशे कोटी विसरभोळे’ ही नाटके; तसेच, ‘हिंसा-काल आणि आज’ ,  ‘एस इ झेड’ आणि सतीश आळेकर, अशोक केळकर यांच्यावरील लघुपट असा लेखक, दिग्दर्शक, फिल्ममेकर म्हणून झालेला अतुल पेठे यांचा प्रवास आहे. तो वर्तमान वास्तवाने अस्वस्थ होणारा कलावंत आहे. वर्तमान जगण्यात त्याच्या मनाला, जाणिवेला जे खुपते, जे सलते, जे प्रश्न त्याला छळतात त्या विविध प्रश्नांविषयीचे भान नाटकांच्या माध्यमातून आणून देणे, समाजापर्यंत ते प्रश्न पोचवणं आणि समाजातली त्यांविषयीची संवेदनशीलता जागी करणे, लोकांना विचारप्रवृत्त करणे हे कामच त्याने स्वत:साठी स्वीकारले आहे. अतुल पेठे लोकांना स्वत:च्या कोशातून बाहेर काढून, आजुबाजूला डोळे उघडून बघायला लावणारी नाटके करतात.

‘सत्यशोधक’ नाटकातील एक दृश्यअतुल पेठे जेव्हा ‘कचराकोंडी’ नावाच्या लघुपटावर काम करत होते, त्या निमित्ताने त्यांना सफाई कर्मचार्‍यांचे जगणे जवळून बघता आले, पुणे महानगरपालिका कर्मचार्‍यांच्या युनियनशी, तिथल्या कर्मचार्‍यांशी त्यांचे भावबंध जुळले. त्या कर्मचार्‍यांनी सफाई कर्मचारी म्हणून काम करत असताना, आख्ख्या शहराने निर्माण केलेल्या घाणीच्या दलदलीत जगत असतानाही जपलेले माणूसपण आणि कलावंतपण अतुल पेठे यांना स्पर्श करून गेले. त्यांनी त्यांच्या कलापथकाचे सहा महिन्यांचे अभिनयाचे वर्कशॉप घेतले. त्या कलावंतांच्या सान्निध्यात नाटक काय व कसे करायचे याची रूपरेषा त्यांच्या डोळ्यांसमोर स्पष्ट होत गेली आणि त्यांनी तालमी सुरू केल्या.

नाटककार गो. पु. देशपांडे अतुल पेठे यांनी नाटक पुनरुज्जीवित केल्‍यानंतर गो.पु. म्हणाले होते, “या नाटकाचं कधी कुणी पुनरुज्‍जीवन करील, असं मला वाटलं नव्‍हतं. महाराष्‍ट्रातील समाजक्रांतीचे उद्गाते आणि नेते ज्‍योतीराव फुले यांचे चरित्रनाट्य करण्‍यासाठी श्रमिकवर्ग पुढे झाला, हे राजकियीकरण एकविसाव्‍या शतकातील आधुनिक प्रेक्षकाला, कदाचित एकंदरीनं भारतातही नवीन आहे. सफाई कर्मचारी आणि अतुल पेठे यंनी पुढाकार घेतला म्‍हणून मराठीतील पहिला ‘didactic’ नाटकाचा प्रयोग करता आला. कामगारांना जोडीला घेऊन, त्‍यांच्‍यातले लोक घेऊन एका क्रांतिकारक आणि भारतातल्‍या पहिल्‍या परिवर्तनवाद्याची कहाणी सांगावी यापरते सुख ते काय?.” गो.पुं.च्या प्रत्येक कृतीतून त्यांची प्रगल्भ राजकीय जाण आणि सामाजिक, राजकीय प्रश्नांविषयी त्यांना असणारी आस्था व तळमळ स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. त्यांनी ‘सत्यशोधक’ नाटकात महात्मा ज्योतीराव फुले यांच्या – महाराष्ट्राच्या आद्य परिवर्तनवाद्याच्या जडणघडणीचा आणि विचारसरणीचा नेमका अन्वयार्थ लावला आहे. त्‍यांनी ज्‍योतीरावांच्‍या जीवनातील काही निवडक प्रसंग, घटना घेतल्या आहेत.

अतुल पेठे हे नाटक करण्‍यामागे तीन कारणं आहेत. पहिलं कारण म्‍हणजे महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांच्‍याविषयीची कमालीची उत्‍सुकता. दुसरं म्‍हणजे गो. पु. देशपांडे लिखित वर्तमानातील राजकारण आणि समाजकारण उलगडणारं अतिशय वेगळ्या प्रकारचं हे ऐतिहासिक नाटक. तिसरं कारण म्‍हणजे हे नाटक जे कलाकार करत आहेत, त्‍यांतील बहुतेक सफाई कर्मचारी आहेत… अर्थाचे अनर्थ झालेल्‍या या काळात ज्‍योतिबांसारख्‍या लोकोत्‍तर महापुरुषाच्‍या विचारांचे अर्थ परत नीट समजावून घेणं मला गरजेचं वाटलं… माझ्यासाठी नाटक महत्‍त्‍वाचं नाही, तर माणूसपण जागवणं महत्‍त्‍वाचं आहे. हा आम्‍हां सर्वांकरता सर्जनशील व समृद्ध करणारा अनुभव आहे. – अतुल पेठे

‘सत्यशोधक’ नाटकातील एक दृश्यनाटकाची सुरुवातच ज्योतीराव फुले यांच्या पूर्वजांपासून होते. कटगुण नावाच्या गावातला कुणी गोर्‍हे गावाला सतत त्रास देणार्‍या कुलकर्णी ब्राम्हणाचा खून करतो आणि परागंदा होतो. त्या घटनेपासून प्रयोग सुरू होतो. ज्योतिरावांच्या व्यक्तिमत्त्वात असणारी अन्यायाची चीड आणि बंडखोर कृतिशीलता यांचे मूळ असे त्यांच्या पूर्वजांपर्यंत मागे जाऊन शोधता येते. नंतरही ज्योतिरावांनी बंडखोरीचा तो प्रवाह आपल्या जीवनात सातत्याने जपला. त्यांनी स्वत:च्या राजकीय, सामाजिक, वैचारिक भूमिकेशी तडजोड करण्याची वृत्ती कधीच दाखवली नाही. फुले यांनी सावित्रीबाईं च्या साथीने सुरू केलेली स्त्रिया आणि शूद्रातिशूद्र यांच्यासाठीची शिक्षण चळवळ, त्यांनी जातिव्यवस्थेशी दिलेला लढा, धर्माचा लावलेला नवा अर्थ, ब्राम्हण आणि ब्राम्हण्य यांतील फरक, शेतकरी, कामगार लढ्याची सुरूवात आणि त्यांनी मराठी भाषेसाठी घेतलेली भूमिका, न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या दुटप्पी आचाराच्या संदर्भात त्यांनी काढलेले स्पष्ट उद्गार… विष्णुशास्त्री चिपळूणकरां ना मृत्यूचा दाखला देण्यासंबंधी डॉ. विश्राम घोले यांना घातलेली गळ, स्त्रियांसाठी सुरू केलेली सुतिकागृहे, न्हाव्यांचा संप आणि नंतर सत्यशोधक समाजाची स्थापना इथपर्यंत अनेक प्रकारे कृतिशीलतेने भरलेला महात्मा ज्योतिराव फुले यांचा जीवनप्रवास डोळ्यांसमोर प्रभावीपणे उलगडत जातो आणि ज्योतिबा फुले यांच्या कामाचे महत्त्व मनावर ठसत जाते. नाटक ‘सत्यशोधकी जलसा’ या स्ज्योतिबा फुले यांची भूमिका करणारा ओंकार गोवर्धन आणि सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत पर्ण पेठेवरूपात नृत्य, गाणी आणि संवाद यांच्या माध्यमातून पुढे सरकत जाते. हे नाटक चरित्र नाटकच म्हणता येईल, परंतु ज्योतिराव फुले यांचे विचार, विविध राजकीय, सामाजिक, भाषिक प्रश्नांबाबत त्यांनी घेतलेली स्पष्ट, निर्भीड आणि न्यायवादी भूमिका; तसेच, कुठलीही तडजोड न करता स्वत:च्या वैचारिक भूमिकेमागे कृतीचे, बंडखोरीचे बळ उभे करण्याची निर्भय वृत्ती या गोष्टी नाटकाच्या केंद्रस्थानी आहेत. विशेषत:, ज्योतिराव फुले यांचे विचार हा या नाटकाचा गाभा आहे आणि तो ज्योतिराव फुले यांची भूमिका करणार्‍या ओंकार गोवर्धन याने चांगल्या रीतीने व्‍यक्‍त केला आहे. पर्ण पेठे ही एवढीशी मुलगी, कॉलेजात जाणारी. तिची सावित्रीबाईही प्रगल्भ अभिनयाने प्रभाव पाडते. शाहीर भिसे यांनी गाण्याची बाजू सांभाळली आहे. शेखर जाधव, भीमराव बनसोडे, ब्रम्हानंद देशमुख आणि संतोष पवार यांनी संगीत श्रवणीय केले, तर प्रदीप वैद्य यांची प्रकाश योजना लक्षवेधक न होता नाटकाशी एकरूप झाली आहे.

मनपा कर्मचा-यांची तालिम घेत असताना अतुल पेठेअतुल पेठे यांनी चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांकडून ज्या पध्दतीने कष्ट घेऊन, सफाईदार, काटेकोर, बांधेसूद आणि देखणा प्रयोग सादर केला, त्याला केवळ अपूर्व असेच म्हणता येईल. नाटकाच्या संहितेत विभूतिपूजा नाही. अतुल पेठे यांनीही दिग्दर्शनात ती आणली नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतुल पेठे यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा वर्तमानाशी लावलेला अन्वय, घेतलेला शोध. नाटकात ज्या विषयांना स्पर्श झालेला आहे, ते शंभर वर्षांनंतरही तसेच अस्तित्वात आहेत, ही खेदाची बाब अतुल पेठे अधोरेखित करतात. नाटक अंतर्मुख करते. जात, वर्ग, वर्ण, लिंग यांत कायम विभागला गेलेला भारतीय समाज जातिव्यवस्थेला, विषमतेला पुसून टाकायला तयार नाही. उलट, समाजातली कप्पेबंदपणाची मानसिकता अधिक जोर धरू लागली आहे, टोळीयुध्दसदृश मानसिकता मूळ धरू लागली आहे. अशा परिस्थितीत ज्योतिराव फुले यांनी केलेली शुद्रातिशुद्राची व्याख्या, ब्राम्हण आणि ब्राम्ह्ण्य यांत केलेला फरक आणि स्त्रिया, शेतकरी, कामगार यांच्या गुलामगिरीसंबंधीचा विचार यांचे महत्त्व अबाधित आहे. या प्रश्नांवर उपाय शोधायचे तर आपल्या बुध्दीची, मनाची चौकट मोडली पाहिजे असे ज्योतिरावांनी प्रतिपादन केले होते. ते सांगत असत, “वाडवडिलांनी घालून दिलेली असो वा धर्माने, माणुसकीला सोडून असलेली नियम, रीत मोडूनच काढली पाहिजे. नियम देवानं नाही तर माणसांनी केलेले असतात, धर्मग्रंथ माणसांनी लिहिलेले असतात, हे जेव्हा आपल्या लोकांना कळेल तेव्हाच हा देश मोठा होईल!”

‘सत्यशोधक’ नाटकातील कलाकारांच्या चमूसह अतुल पेठेमहात्मा फुले यांनी या देशाच्या प्रश्नांची नस बरोबर ओळखली होती. दुखणे कुठे आहे हे त्यांना बरोबर कळले होते आणि त्यावर करायचे उपायही. त्यांनी ते परोपरीने, तळमळीने समाजासमोर मांडलेही. काही प्रमाणात समाजात बदल झालेही. परंतु आपल्या आचारविचारांनी समाजासमोर उदाहरण घालून देणार्‍या फुले यांच्या विचारसरणीचा समाजाला सारखा विसर पडत आहे. धर्म – जातपातविरहीत, वैचारिक दृष्ट्या विकसित समाजाच्या घडणीचे स्वप्न पाहणार्‍या ज्योतिराव फुले यांचे चरित्र आणि विचार असे पुन्हा पुन्हा समाजासमोर आणणे आवश्यक बनले आहे.

फुले हे बहुधा आधुनिक काळातील आद्य समाजसुधारक, जेवढे विचाराने पक्के तेवढे कृतीने खंबीर व सार्थही. फुले, रानडे , आगरकर , आंबेडकर , गांधी , शाहुमहाराज, सयाजीराव गायकवाड असे मोठमोठे कृतिवीर विचारवंत गेल्या दीडशे वर्षांत होऊन गेले. त्यांचा स्वातंत्र्योत्तर समाजसंस्कृतीवर सघन परिणाम झाला. प्रत्येकाचे अनुयायी होत गेले व त्यांनी हिरिरीने आपापल्या ध्येयपुरुषाची आंदोलने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. साठ वर्षांनंतर विचार करता असे वाटते, की फुले यांच्या विचारातील आधुनिकता, कालातीतता, नि:संदिग्धता तेवढ्या प्रमाणात इतरांच्यात नव्हती का? फुले जगण्याला वास्तव असा मंत्र देतात का? गो.पुं.च्या नाट्यसंहितेत आणि पेठे यांच्या दिग्दर्शनात हा मंत्र अचूक टिपला गेला आहे. त्यामुळे नाटक विचारवंतांना आवडते, फुले यांच्या अनुयायांना रुचते व सर्वसामान्य जनांना भावते, असे तर नाही?

अंजली कुलकर्णी
मोबाईल ९९२२०७२१५८
ईमेल – anjalikulkarni1810@gmail.com

सर्व फोटो सौजन्‍य – सिद्धार्थ प्रभूणे आणि कुमार गोखले

सत्‍यशोधक नाटकाच्‍या संकेतस्‍थळासाठी येथे क्लिक करावे.

 

टिप –

मुक्ता मनोहर– डाव्या चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्ती. शिक्षण – एम.ए (समाजशास्त्र) व बी. कॉम. १९७५पासून प्रत्यक्ष चळवळीत सहभाग. स्त्रियांना, कामगारांना, असंघटीत कष्टकर्‍यांना दिल्या जाणार्‍या दुय्यम स्थानाविरोधातील, त्यांच्यावरील अन्यायाविरोधातील विविध चळवळींत सहभाग. महाराष्ट्रातील बिडी कामगार, कापड कामगार, गिरणी कामगार, महिला कामगार, नर्सेस, बालवाडी शिक्षिका इत्यादी विविध स्तरांतील श्रमिकांच्या आंदोलनांत सहभाग.

एस. एम. जोशी कार्यकर्ता पुरस्कार (२००६), श्रीमहालक्ष्मी ट्रस्ट आदिशक्ती पुरस्कार (२००६), डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्कार, गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीचा बा-बापूंच्या नावाचा कार्यकर्ता पुरस्कार (२००३) इत्यादी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

About Post Author