एका किटलीची गोष्ट

0
61
स्ट्रासबर्गमध्ये विदुर महाजन
स्ट्रासबर्गमध्ये विदुर महाजन

स्ट्रासबर्गमध्ये विदुर महाजन पॅरिसमधल्या मुख्य कालव्यातल्या एका बोटीत माझा सतारीचा कार्यक्रम  झाला…

पॅरिसच्या त्या दौर्यावच्या माझ्या आठवणी अनेक आहेत, पण एक कधीतरी वेड्यासारखं पाहिलेलं स्वप्न, प्रत्यक्षात आणलं गेल्याची आठवण म्हणजे ‘साक्रेकर’च्या बाहेर रस्त्यात बसून सतार वाजवणं … खरं तर, मी त्यासाठीच पॅरिसला गेलो होतो!

गायत्रीनं मला जाण्यापूर्वी (मी तिथं येण्यापूर्वी) सांगितलं होतं, की ‘मी तुला अशा जागा दाखवीन, की तिथं तुला सतार वाजवावीशीच वाटेल’… अन् मी तशी ती वाजवलीही आणि टोपीत युरो मिळाले… गायत्री म्हणजे गायत्री कोटबागी, पुण्याची. माझ्या आदित्य जोशी नावाच्या विद्यार्थ्याची मैत्रीण. ती पॅरिसमध्ये क्रीडा मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ती पुण्यात कथ्थक नृत्य शिकलेली आहे. त्यामुळे तिला संगीतादी कार्यक्रमांत आस्था वाटते. मी आदित्य जोशीची ओळख घेऊन गायत्रीला भेटलो, तर ती माझीही घट्ट मैत्रीण बनून गेली! पॅरिसच्या अशा छान मुक्कामानंतर झोरा या माझ्या फ्रेंच मैत्रिणीकडे स्ट्रासबर्गला गेलो, तिथंही दोन कार्यक्रम झाले – एक तिच्या घरी आणि दुसरा एका आर्ट गॅलरीत. झोरा मला प्रथम भेटली ती लोणावळ्याच्या ‘कैवल्यधाम’ मध्ये. मी तेथे ‘सतारीतून ध्यानधारणा’ हा कार्यक्रम दर आठवड्याला सादर करत असे, त्या कार्यक्रमात. मग ओळख, मैत्री होत गेली. ती आमच्या तळेगावच्या घरी येऊ लागली. मी तिला एकदा पुणे-दर्शनही घडवले आणि ती वर्षभरापूर्वी मायदेशी परतली. त्यानंतर ती इ मेल्सवर संपर्कात असे.

मैत्रीण जोरासोबत विदुर महाजनट्रिपमधला एकच कार्यक्रम राहिला होता… जिनिव्हाजवळ.. ‘रोल’ या गावी! स्ट्रासबर्ग ते जिनिव्हा हा चारशे मैलांचा प्रवास मी झोराबरोबर करत होतो, तोही तिच्या मर्सिडिझमधून, प्रतितास एकशे चाळीस-एकशे साठ किलोमीटर या वेगानं.. तरीही पोटातलं पाणी न हलता… शांतपणे.. गप्पा मारत… ‘नोरा जोन्स’ ऐकत … खूपच अविस्मरणीय प्रवास! स्वित्झर्लंडमध्ये शिरल्यावर तर अप्रतिम निसर्ग आणि माणसानं निर्माण केलेली सुंदर घरं आणि कमालीची नेटकी शेती…

इतका सुंदर देश – एका फ्रेंच मैत्रिणीच्या सहवासात प्रवास… मी हरवून, हरखून गेलो होतो!

जिनिव्हापासून अलिकडे सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या त्या गावात आम्ही पोचलो, डावीकडे विस्तीर्ण जलाशय.. उजवीकडे अप्रतिम सुंदर डोंगर, घरं , शेतं…

आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो ते एक घर होतं- पण अक्षरश: म्युझियमसारखं. कुठले जुन्या काळातले फोटो, फर्निचर आणि असंख्य वस्तू! –  मी माझ्या खोलीत सामान टाकलं. आम्ही दहा-पंधरा मिनिटांतच फिरायला जायचं ठरलं होतं… प्रवासाचा शीण वगैरे प्रश्नच नव्हता.

झोरा मला मुख्य रस्त्यावरच एका दुकानात घेऊन गेली. ‘आधी आपण माझ्या मैत्रिणीला भेटू, इथं आले की मी, तिला आणि आल्फ्रेड, या दोघांना भेटते. आम्ही एकत्र जेवतो, ते आमचं फॅमिली फ्रेंड कपल आहे’.

आम्ही दुकानात शिरलो, ते चहाचं दुकान होतं.  तिथं जगभरातले अनेक देशांमधले अनेक स्वादांचे महागडे (कॉस्टली) असे चहाचे कितीतरी प्रकारचे डबे भरून ठेवले होते. मस्त वास होता त्या दुकानाला! त्याची मालकीण ही झोराची मैत्रीण. झोरानं आमची ओळख करून दिली. त्या दोघी गप्पा मारत होत्या. मी ‘दुकानात जरा हिंडू का?’ असं विचारून दुकान पाहू लागलो. इतक्या प्रकारचे चहा तिथं होते!–त्यातलाच कुठलासा एक चहा (दूध + साखरे शिवायचा) त्या मैत्रिणीच्या सहकारी स्त्रीनं मला एका सुंदर मगात आणून दिला. चहाचे घुटके घेत, मी दुकान पाहत हिंडत होतो.

हेच ते चहाचे आकर्षक दुकानचहासंबंधातल्या सगळ्या वस्तू तिथं होत्या. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे टी सेटस्, गाळणी, टी कोझी, मग्ज, कप, चहापावडर ठेवायचे डबे, कितीतरी वस्तू… शिवाय हस्तकलेच्या वस्तू होत्या. अरेबियन वाटावं असं संगीत त्या दुकानात बॅकग्राऊंडला लावलेलं होतं. सरोदसारखं वाद्य असावं. मी हिंडता हिंडता एका किटलीवर माझी नजर गेली.

लोखंडी, गोलाकार पण चपटी अशी चहाची किटली एका गोलाकार लोखंडी तबकडीवर ठेवली होती. मी ती किटली उचलून पाहिली. आकाराच्या मानानं खूपच जड होती. मला ती किटली इतकी आवडली, की मी ठरवलं, की ती घ्यायचीच विकत. ती मला पुन्हा जागेवरही ठेववेना. तिचं झाकण उघडलं तर आत छोट्या ग्लासच्या आकाराचं गाळणं होतं. ‘किती सुंदर आहे!’ मी उद्गारलो. सहज, किटलीखालची झाकणी–तबकडी उचलली. त्यामध्ये किमतीचं स्टिकर होतं- चाळीस फ्रॅंक्स. स्वित्झर्लंडमध्ये युरो देऊन खरेदी करता येते, पण दुकानदार शिल्लक पैसे फ्रॅंक्समध्ये परत देतात. मी हिशेब केला. साधारण वीस युरो म्हणजे बाराशे रुपये. ते मला परवडणारे होते. मी खूश झालो. ‘माझ्या तळेगावच्या मैत्रवना’त त्या किटलीत चहा ठेवलाय. मी रियाज करतोय… मधून मधून चहा पीत… वा!  मस्त.’ माझ्या मनाचा खेळ सुरू झाला. तेवढ्यात मालकीण माझ्याजवळ आली. मला म्हणाली, “किती सुंदर आहे नं?  जपानी किटली आहे, आवडली तुला ?”  क्षणभर मला असं वाटलं, ती मला किटली भेट म्हणून देते की काय! मी म्हणालो, “खूपच!  मला घ्यावीशी वाटत आहे, विकत. चाळीस फ्रॅंक्स म्हणजे वीस युरो नं ?  मला हवी.” तर ती म्हणाली, “नाही नाही, चाळीस फ्रॅंक्स ही तबकडीची किंमत आहे. किटली दोनशेचाळीस फ्रॅंक्सची आहे.”

महाजन यांना भावलेली जपानी किटलीमाझं गणितच कोलमडलं. मी खट्टू झालो, कारण एकशेवीस  फ्रॅंक म्हणजे सात-आठ हजार रुपयांची किटली घेणं मला मानसिक दृष्ट्या परवडत नव्हतं… “जाऊ दे… मला नको, फारच महाग आहे,” मी म्हणालो… आणि विषय बदलायचा प्रयत्न केला… एकीकडे वाटत होतं, की घासाघीस करावी का? पण झोराला ते आवडणार नाही. त्यापेक्षा गप्प बसू… ती म्हणाली, “घे की, आवडली आहे तर, अशा वस्तू घरात पिढ्यान् पिढ्या ठेवायच्या असतात, तू तुझ्या मुलीला दे. ती तिच्या मुलीला देईल.. स्वित्झर्लंडहून आणलेली जपानी किटली. तुझ्या घरात राहील वर्षानुवर्षं. अशी खरेदी एकदाच होते आयुष्यात,”  मी म्हणालो, “अगं, रुपयांत किंमत फार आहे, एवढ्या पैशांत मी खूप जणांसाठी खूप काय काय घेऊन जाईन.. जाऊ दे, पण किटली खरंच छान आहे…”

ती आपणहून काही किंमत कमी करेना.. मी विषय सोडून दिला, पण मनातून किटली जाईना, पुन:पुन्हा हिशेब केला. घ्यावी असं वाटत होतं, हिय्या करून. पण धाडस होत नव्हतं. खूपच अस्वस्थ झालो होतो. पण वरकरणी दाखवत मात्र नव्हतो. मग विचार केला, बघू उद्या. इतर खरेदी काय काय होते? कार्यक्रमाचे पैसे किती मिळतात? सीडीज विकून काही पैसे मिळतात का? मग ठरवू.. तूर्त नको.. तरीही वाटत होतं, घ्यावी. शेवटी, उद्या बघू असा निर्णय घेऊन टाकला.. मन मात्र किटलीत अडकलं होतं…

आम्ही बाहेरच्या कौंटरवर आलो. ‘पुन्हा एकेक कप चहा?’  झोरानं विचारलं. ‘घेऊ की’, मी म्हणालो, असं दुकान मी कधीच पाहिलं नव्हतं – केवढ्या प्रकारचा चहा आहे इथं! आपल्या दार्जिलिंगचा पण होता. झोरा म्हणाली, ‘ही माझी मैत्रीण आणि तिचा नवरा जगभर प्रवास करतात. त्यांनी खूप सप्लायर्सही जोडले आहेत’… मग तिला म्हणाली, “हा माझा विदूर खूप छान सतार वाजवतो. आज संध्याकाळी त्याचा कार्यक्रम आहे. कालच माझ्या घरी त्याचा कार्यक्रम झाला. तुम्ही या कार्यक्रमाला, अमुक अमुक ठिकाणी आहे..”

मी पटकन यमनची एक सी.डी. काढली आणि त्या मैत्रिणीस दिली, म्हणालो, ‘ही माझी सी.डी., तुझ्यासाठी, माझी आठवण.’ तिनं सी.डी. हातात घेतली, पाहिली, म्हणाली, “सुंदर!” मी  म्हटलं, “ती ऐकण्यासाठी आहे, पाहण्यासाठी नाही.” ती हसून लगेच तिच्या सहकारी बाईला बोलावून म्हणाली, “लाव गं ही सी.डी. आपल्या दुकानात. प्रत्यक्ष कलाकार आलाय, लाव, लाव…”

आत एक छोटीशी पॅंट्री होती, तिथं ती सी.डी. घेऊन गेली. झोराची मैत्रीण पण मागोमाग. म्हणून मीही गेलो. आम्ही माझी सी.डी. लावली.. आधीचं वाद्यसंगीत बंद करून.

सुरुवातीला क्षणभर तंबोरा, सतारीची छेड आणि यमन सुरू झाला… मी किंचित आवाज वाढवला… काही क्षणांत, त्या दोघी एकमेकींकडे विस्फारित नजरेनं पाहू लागल्या.. त्यांनी हा आवाज आयुष्यात कधीच ऐकला नव्हता. त्यांचे चेहरेच बदलले. ‘वा! किती अद्भुत! सुंदर! कोणतं वाद्य आहे हे? हे तू वाजवलं आहेस?’ ती एकदम उत्साहानं उद्गारली, मी सुखावलो, म्हणालो, “हो ह्याला सतार म्हणतात. मला बरं वाटलं की तुला सतार आवडली”.. ती घाईनं बाहेर आली, झोराला म्हणाली, “काय, सुंदर आवाज आहे! असं संगीत मी कधीच ऐकलं नव्हतं… फारच छान.. मला या दहा सीडीज मिळतील का? दुकानात ठेवायला?”

झोरा म्हणाली, “हो, एकाची किंमत पंधरा युरो आहे. तू पंचवीस युरोला विकू शकतेस..” मी पटकन म्हणालो, “थांब थांब, तुला दहा हव्यात नं? मी तुला दहा सी.डी.ज देतो, तू मला ती किटली दे. चालेल?” ती म्हणाली, “आनंदानं… घे ती किटली..” मी पटकन दहा सी.डी.ज दिल्या आणि तिनं मला ती किटली आणून दिली. मी खूष झालो, मला हवी ती वस्तू मिळाली होती.. माझी इच्छा माझ्या सतारीनं पूर्ण केली होती!

ती मैत्रीण नवऱ्यासह संध्याकाळी माझ्या कार्यक्रमाला आली. एक संगीतकार आपला मित्र झाला, दुकानात येऊन गेला ह्याचा आनंद तिला झाला होता… तिनं कार्यक्रमानंतर रात्री तिच्या घरी जेवायला बोलावलं. तिला कार्यक्रमही खूपच आवडला. दुस-या दिवशी सकाळी पुन्हा त्याच दुकानात ब्रेकफास्टचंही निमंत्रण मिळालं!

मी पुन्हा तिथं गेलो. गेल्या गेल्या तिनं एक सुंदर पार्सल मला प्रेझेंट दिलं. मी आभार मानले. झोरा म्हणाली, “उघड नं… काय आहे बघू.. मी उघडलं, त्यात ती किटलीखालची तबकडी होती. मला म्हणाली, ‘काल तुला फक्त किटली दिली, ही तबकडी पण घे. खाली मेणबत्ती लावून वर किटली ठेवली की चहा गरम राहतो.”

तेवढ्यात त्याच किटलीच्या मटेरियलचे दोन लोखंडी, जड कप होते – झोरानं ते आणले, म्हणाली, ‘विदूर परतेल तेव्हा त्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हे दोन कप माझ्यातर्फे’ – असं म्हणून झोरानं मला प्रत्येकी वीस ते पंचवीस फ्रॅंकचे ते दोन कप गिफ्ट दिले.

एक अप्रतिम सुंदर जपानी टी-सेट मला अशा त-हेनं मिळाला. मी तो वजनाला जड असूनही आणला.

अनेक वेळा, चहा पिताना हे सारं आठवतं.. जिनिव्हात प्रचंड थंडीमुळे आम्ही गेलो होतो त्या लेकचा गोठून बर्फ झालाय आणि रस्त्यावर सगळीकडे गाड्यांवरही बर्फ साचलाय  असे फोटो तळेगावातल्या, पुण्यातल्या पेपरांत येतात. मला मात्र अशा प्रत्येक वेळी  चहाच्या किटलीची उबदार आठवण जागी होते – सतारीविषयी कृतज्ञता वाटते आणि माझा रियाझ चालू होतो…

विदुर महाजन,

मोबाईल – 9822559775, दूरध्वनी – (02114)222175/325741,
पत्ता  – हार्मोनी, 49, वनश्री नगर, तळेगाव दाभाडे, पुणे, 410507,
इमेल –
vidurmahajan@gmail.com

About Post Author

Previous articleरिपोर्टर अवचट – सुहास कुलकर्णी
Next articleआनंदयात्री चकोर
Member for 12 years विदुर महाजन यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून तत्त्वज्ञान या विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. ते एम ए ला विद्यापीठात प्रथम आले. त्यानंतर त्यांनी स्लिंग फ्लेक्सी कार्टन प्रायव्हेट लिमिटेड या घरच्या व्यवसायात पंचवीस वर्षे व्यवसाय केला. भ्रष्टाचाराच्या विरोधात केलेल्या त्यांच्या कृतीला "Red and White Bravery award' मिळाले. त्यांनी 2008 पासून पूर्णवेळ सतार असा मार्ग स्वीकारला. त्यांनी स्वतःचे स्वतंत्र कार्यक्रम आणि खेडोपाडी सतार, सतारीच्या माध्यमातून ध्यानधारणा, व्यसनापासून व्यासंगाकडे, सतार आणि 'टकमन'चे नेतृत्व बा प्रणालीवर आधारित विविध प्रकल्पांसाठी देशात आणि देशाबाहेर सुमारे आठशे कार्यक्रम केले. ते लेखक असून त्यांची 'मैत्र जीवाचे', 'शोधयात्रा', 'आनंदयात्रा', ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना नामांकित राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांचे 'ग्रीष्म', 'र' ('स्व'च्या शोधात), गांधार पंचम असे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी हार्मनी स्कूल ऑफ सितार या नावाने सतारीची शाळा 2006 मध्ये सुरू केली.