गिरगावातील चाळीत एकत्र कुटुंबात राहणं- घरचं वातावरणही रुढीप्रिय-परंपरानिष्ठ, रूइया कॉलेज मधील मराठी वातावरणातील शिक्षण….. पण नंतरच्या दहा वर्षांत ऋजुता दिवेकर नामवंत पोषक आहारतज्ञ बनून गेली. तिची ख्याती देशभर पसरली. एवढंच नव्हे तर सीएनएन या अमेरिकन वाहिनीच्या ‘हॉट लिस्ट’मधील आशियातील तिघींपैकी एक म्हणून तिला लौकिक मिळाला.
ती एकदम प्रकाशझोतात येण्याचं कारण म्हणजे, तिचं ‘डोण्ट लूज युवर माइंड, लूज युवर वेट ’ हे पुस्तक साक्षात करिना कपूरच्या प्रमुख उपस्थितीत, सेलिब्रेटी वातावरणात प्रसिद्ध झालं! करिनानं स्वत: तिथं तिच्या पोषक आहारमंत्राचं कौतुक केलं. ती म्हणाली, “ऋजुतामुळेच मी ‘साईज झिरो’ गाठू शकले.” त्यावेळी करिनाचं वजन फक्त अठ्ठेचाळीस किलो झालं होतं. ती सडपातळ झाली होती आणि तरी तिची ऊर्जा ठणठणीत होती. त्या आधी तिचं वजन अडसष्ट किलो होतं आणि ‘टशन’ नावाच्या सिनेमासाठी तिला बारीक व्हायचं होतं. शायरा नावाच्या तिच्या मैत्रिणीनं तिला ऋजुताचा नंबर दिला आणि ती ऋजुताची ‘क्लायंट’ बनली.
ऋजुतानं करिनाला तिचे आवडते पराठे, पोहे, चीज, पनीर हे पदार्थ खाण्यास मुभा दिल्यामुळे करिना खूश होती. ही वर्षा-दीड वर्षापूर्वीची गोष्ट. तेव्हापासून ऋजुता दिवेकर हे चर्चेत असणारं आणि प्रसिध्दीचं वलय लाभलेलं नाव बनलं. त्या नावाला न ओळखणारे सुशिक्षित अपवादात्मक असतील! तिला मिळालेल्या प्रसिध्दीचं कोणाला अप्रूप आहे तर कोणी तिच्या कर्तृत्वानं दिपून गेला आहे. तिची पुस्तकं वाचलेला त्यांचं गुणगान गातो, तर न वाचलेला ती मिळवून वाचण्यासाठी धडपडतो.
ऋजुता ही ‘योगशिरोमणी’ हे एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएण्टरॉलॉजी तर्फे मानाचं न्यूट्रिशन अॅवॉर्ड मिळवणारी आहारतज्ञ म्हणून मान्यता पावलेली व्यक्ती, करिना कपूरच नव्हे तर प्रीटी झिंटा, अनिल अंबानी, सैफ अली खान, कोंकणा सेन-शर्मा यांच्यासारख्या स्टार्सची पर्सनल आहारतज्ञ; तरीही रुईया कॉलेजमध्ये महिन्याच्या महिन्याला येऊन व्याख्यानं देणारी. तिच्या इंग्रजी व मराठी पुस्तकांच्या आवृत्तीवर आवृत्ती प्रसिध्द होत आहेत. नव्या ‘क्लायंट’ला तिची ‘अॅपाइंटमेंट’ दोन महिन्यांनंतरची मिळू शकते असा गवगवा पसरलेला आहे. तिचं खारला एस.व्ही.रोडवरील ‘ऑफिस कम जिम’ पाहिलं की तिच्या कर्तृत्वाची खात्री पटते. पण तिची स्वत:ची राहणी व वर्तनशैली मात्र योग्यासारखी साधी वाटली.
तिच्या दुसर्या पुस्तकानं तर विक्रमच केला. त्याचं नाव ‘women and the weightloss Tamasha’. पुस्तकाच्या मुद्रित प्रतीबरोबर ध्वनिमुद्रित प्रतदेखील तयार करण्यात आली. पुस्तकाच्या प्रसिद्धीनंतर त्याच्या आठवडाभरात एक लाख प्रती संपल्या. त्यांतील चाळीस हजार प्रतींची मागणी प्रसिद्धीपूर्व नोंदण्यात आली होती. तिची पुस्तके हिंदी, गुजराती, मराठी भाषांमध्ये उपलब्ध आहेत.
तिची आई म्हणते त्याप्रमाणे ती लहानपणापासूनच निर्भय आहे. तिची आई सौ. रेखा दिवेकर या प्रोफेसर. त्यांनी ऋजुताच्या ‘विमेन अॅण्ड वेटलॉस तमाशा’चं भाषांतर करून मुलीच्या पुस्तकाचं भाषांतर करणारी मराठीतील पहिली आई असा लौकिक मिळवला आहे. ऋजुताला तिच्या प्रोफेसर आईकडून ट्रेकिंग, योग, सकस जेवण यांचं बाळकडू मिळालेलं आहे.
ऋजुता जुन्या चाळीतल्या जीवनाविषयी आस्थेनं बोलते; त्या आठवणींमध्ये रमून जाते. आपल्या ज्ञानाचा फायदा सर्वसामान्य जनांना व्हावा म्हणून ती सार्वजनिक ठिकाणी व्याख्यानं देण्यास तयार असते. तिचे ‘ओपन डे’ तर ‘रुईया’सारख्या मध्यवर्ती ठिकाणी होतात.
ऋजुता आहे खरी ‘इंडस्ट्रियल केमिस्ट्री’ची विद्यार्थिनी, पण कॉलेजवयातच ‘अॅरोबिक्स’ आणि ‘एस.एन.डी.टी.’मधून स्पोर्टस-सायन्स अॅण्ड न्यूट्रिशियनचा कोर्स केल्यावर, तीच आपली आवड आहे हे तिनं ओळखलं आणि मग स्वत:ला आहारशास्त्राच्या क्षेत्रात पूर्ण ताकदीनिशी झोकून दिलं.
तिनं तिच्या धाडसी विधानांनी खाण्याच्या संदर्भातील अनेक फॅडं, रूढ कल्पना आणि भीती यांना फाटा दिला व लोकांच्या मनातील त्या बाबतची अढी दूर केली. ती काय ‘खाऊ नको’पेक्षा ‘सर्व काही खा’ असं सांगत असते. ऋजुतानं पाश्चात्याचं अनुकरण न करता भारतीय परंपरेतून चालत आलेली आणि प्रत्येक व्यक्तीचा वेगळेपणा जपणारी अशी खाण्याची पध्दत विकसित करण्यावर भर दिला. ‘आपल्या परंपरांचा आणि प्रांतागणिक बदलणार्या खाद्यसंस्कृतीचा आदर करा आणि आपल्या शरीराचं मागणं ऐका’ अशा साध्या शब्दांत तिनं आपला खाद्यमंत्र पसरवला. दहा वर्षांच्या व्यावसायिक अनुभवातून तिनं शहरी भागातील भारतीयांच्या गरजा व अडचणी समजून घेऊन त्यानुसार तिच्या कामाची पध्दत वेळोवेळी नव्यानं घडवली आहे.
तिनं पोषणाविषयक अभ्यासक्रम प्रथम एस.एन.डी.टी.विद्यापीठातून आणि त्याविषयीचं प्रशिक्षण ऑस्ट्रेलियामधून घेतलेलं आहे. परंतु तिची खरी प्रेरणा आहे ती उत्तर काशीची ‘शिवानंद योग वेदांत अॅकॅडमी’. ती म्हणते, की मला स्फूर्ती मिळाली ती आपल्या पारंपरिक आहार- पद्धतीतून. एवढ्या मोठ्या भारतात प्रदेशवार, त्या त्या प्रदेशाच्या परिस्थितीनुसार आहारशैली आढळून येतात. त्या जुन्या पद्धती सांभाळत त्यामध्ये नवीन आधुनिक घटक टाकले गेले पाहिजेत. तिचा कोणत्याही पद्धतीच्या आहाराला आक्षेप नाही. मात्र ती बजावते, की तुम्ही तीन वेळा खात असाल तर आठ वेळा खा, पण नियमन करून खा.
तिचं क्रीडाविज्ञान विषयातही प्रशिक्षण झालं आहे. त्यामुळे ती अनिल अंबानींच्या संपर्कात आली. मुंबईत मॅरेथॉन शर्यती होतात, त्यासाठी तयारी करण्याकरता तिनं ‘प्रोग्राम’ तयार केला आणि चार वर्षांत वेगवेगळ्या वयोगटांतले पाचशे लोक शिकून तयार झाले. तिचा अभ्यासक्रम चौदा आठवड्यांचा आहे. तिच्या ‘जिम’चं नाव आहे ‘ऊर्जा’. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम चाललेले असतातच.
ऋजुता मध्यमवर्गातून आलेली असल्यामुळे, तिनं सर्वसामान्य जनांना पोषक आहार व शरीरप्रकृती या विषयाची माहिती देण्याकरता दर महिन्याला ‘ओपन डे’ ठेवलेला आहे. त्या दिवशी तिच्या ‘प्रोग्राम’ला कोणीही येऊ शकतं. अर्थात त्यासाठी आधी नाव नोंदवणं गरजेचं आहे. ते (022) 2414 8111 या नंबरवर सांगता येतं. ऋजुताला अनेक पुरस्कार लाभलेले आहेत. त्यांपैकी ‘इंडिया टुडे’चा ‘अंडर थर्टीफाइव्ह अचिव्हर्स’ आणि ‘व्हर्व्ह’ मासिकानं तिचा पन्नास ‘पॉवर वुमेन’मध्ये केलेला समावेश तिला अधिक महत्त्वाचे वाटतात.
ऋजुताचा आग्रह शिळं किंवा पॅकेज केलेले पदार्थ खाऊ नका, नेहमी ताजेच पदार्थ खा असा असतो. तरीसुद्धा कधीतरी भजी, ‘फास्ट फूड’ खायलासुद्धा ती मुभा देते. पोषक आहार, उचित व्यायाम, निर्घोर झोप आणि स्वच्छ मन यामुळे आयुष्यभर निरोगी, ताकदवान व तंदुरुस्त राहणं सहज शक्य आहे असं ती म्हणते.
ऋजुता तिच्या बहुतांशी स्त्रिया असणार्या क्लायंटचं निरीक्षण बारकाईनं करते. तो तिचा कटाक्ष आहे. त्यांच्या तक्रारी, प्रॉब्लेम्स, लाईफस्टाईल या सगळ्यांतून तिला कुठेतरी जाणवत होतं, की प्रत्येक स्त्रीलाआधार देईल (मग ती आठ वर्षांची असो की ऐंशी वर्षांची) आणि शारीरिक पातळीवर हळव्या असणार्या स्त्रियांच्या प्रश्नांना उतरं देईल असा ‘गाईड’ सोबत असण्याची गरज आहे, स्त्रीचा प्रवास पौगंडावस्था, गर्भारपण, बाळंतपण आणि रजोनिवृत्ती अशा आव्हानात्मक टप्प्यांमधून होतो. आरोग्याची गुरूकिल्ली असणारा घरातील आहारविभाग स्त्रीच्याच हातात असतो, पण तरीही ती स्वत:साठी त्याचा योग्य उपयोग करू शकत नाही. ऋजुताच्या त्याच कळकळीचं फलित म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या थोड्याफार फरकानं सारख्या असणार्या आयुष्याला आधार देणारं आणि त्याचबरोबर तिला खंबीर बनवणारं ‘विमेन अॅण्ड द वेटलॉस तमाशा’ हे पुस्तक. तिच्या दहा वर्षांच्या व्यावसायिक जीवनानुभवाचा परिपाक म्हणजे तिचं ‘डोण्ट लूझ युअर माइण्ड लूझ युअर वेट’हे पुस्तक म्हणता येईल. त्यातील चतु:सूत्री:
- उठल्या उठल्या दहा मिनिटांच्या आत काहीतरी खावं.
- दर दोन तासांनी खावं.
- खूप जास्त काम असल्यास जास्त व कमी काम असल्यास कमी खावं.
- दिवसातलं शेवटचं खाणं झोपण्यापूर्वी दोन तास आधी घ्यावं,
- ·इतक्या सहजसोप्या शब्दांत तिनं सुखी शरीराचा मूलमंत्र सांगितला आहे!
तिनं निरामय आरोग्यासाठी चार धोरणं सुचवलेली आहेत. ती स्त्रीचा आहार, व्यायाम, निद्रा व नातेसंबंध यांविषयी आहेत. नुसतंच खाणं आणि बारीक होणं-न होणं या न संपणार्या चक्राच्या पलीकडे जात संपूर्ण आयुष्य सुखी कसं जगावं याचं विवेचन तिच्या आहारविषयक तत्त्वसूत्रांत आहे.
हिमालयात जाऊन प्राणायाम, योग केल्यामुळे किंवा भारतभर फिरून अनेक लोकांना भेटल्यामुळे ऋजुता ‘थर्ड पर्सन’ म्हणून जीवनाकडे पाहते आणि तिला दिसणार्या विसंगत गोष्टी, मजेदार किस्से सर्वांबरोबर शेअर करते. तिनं पुस्तकातही अशा चौकटी घातल्या आहेत. त्या वाचकाला अवघड गोष्टी सोप्या करून सांगतात.
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात शरीराला फटकारून, दमवून न घेता आणि बुध्दीच्या ताब्यात नसणार्या जिभेला दोष न देता, शरीराला विश्वासात घेऊन येणार्या सणांची, कार्यक्रमांची, समारंभांची आगाऊ सूचना देऊन, चीज-ड्रायफ्रुट्स-गोड पदार्थांना शत्रू न मानता, उलट त्यांचा अंतर्भाव खाण्यात करून आपल्या वर्षानुवर्षं चालत आलेल्या परंपरांचा आदर करायला शिकवणारी आणि सामान्यातील सामान्य माणसाला पोषणतत्त्व समजावणारी ऋजुता आपल्याला आपल्या- जवळची वाटते. ती असामान्य तर आहेच. मिताहाराची आणि योगाची पुरस्कर्ती, आघाडीची आहारतज्ञ आणि एक लेखिका… या सर्व आघाड्यांवर यशस्वी असणारी ऋजुता उत्तरोत्तर अशीच प्रगती करो!
ऋजुतानं एका बंगाली पत्रकार मुलीला सुचवलेला दिवसभराचा आहार:
सकाळी सात-साडेसातला उठल्यानंतर -एक केळं आणि दूध व चुरमुरे गुळाबरोबर (साखर नको)
सकाळी साडेनऊ वाजता -अंड्याचा पांढरा बलक आणि टोस्ट
सकाळी साडेअकरा वाजता -शेंगदाणे किंवा फळे (ऋजुताला ज्यूस पिणं पसंत नाही.)
दुपारी एक-दीड वाजता -जेवण, त्यात तांदूळ, डाळ, परतलेली भाजी, मासे.
दुपारी साडेतीन वाजता – पुन्हा शेंगदाणे
सायंकाळी साडेपाच वाजता – फोडणीचे चुरमुरे (पॉपकॉर्न नकोच असे ती बजावते)
सायंकाळी सात-साडेसात वाजता – भात, भाजी आणि मासे (शक्य तो थोड्या प्रमाणात)
ऋजुतानं सांगितलेलं कुपथ्य
वजनाच्या काट्याकडे लक्ष देऊ नका. (‘वजन कमी व्हायला थोडा वेळ तरी द्याल की नाही?’ तिचं भाष्य.)
रात्रीचं जेवण उशिरा घेऊ नका
दोन जेवणांमध्ये जास्त वेळ ठेवू नका.
अवेळी खाऊ नका. उदाहरणार्थ संध्याकाळी सातनंतर पिझ्झा टाळा. – (‘टेलिग्राफ’वरून)
ऋजुता दिवेकर
www.rujutadiwekar.com
www.rujutadiwekar.blogspot.com
ऋचा शेंडे – तुळसकर
9819511794
ruchashende@yahoo.com
good n informative articel
good n informative articel
Very interesting. One is
Very interesting. One is inspired to buy the book and follow the diet and exercise suggested.
आपण खुप छान डायट सुचवतात पण
आपण खुप छान डायट सुचवतात पण माझ वजन कमी होण्या साठी काय करु माझ वजन ८७कीलो आहे उंची ५फुट plz mam.मला वजनाच खूप टेन्शन येते
Comments are closed.