ऊर्जाप्रबोधक – पुरुषोत्तम कऱ्हाडे

4
36
carasole

आयुष्यात काही अनवट वाटा धुंडाळताना स्वत:चे संस्कार व बौद्धिक शक्ती यांचे संमीलन करून त्याचा उत्कृष्ट परिपोष करणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे पुरुषोत्तम कऱ्हाडे होय! कऱ्हाडे इलेक्ट्रिकल इंजिनीयर असून त्यांना ‘ऊर्जा’ या विषयामध्ये विशेष आस्था आहे. त्यांनी सौर ऊर्जा व ऊर्जासंवर्धन यांवर बराच अभ्यास केला असून ते ऊर्जाप्रबोधनाचे कार्य करत असतात. पुरुषोत्तम कऱ्हाडे मूळ अंबाजोगाईचे, त्यांचे बालपण तेथेच गेले व माध्यमिक शिक्षणही तेथेच झाले. त्यामुळे त्यांना अंबाजोगाई गावाचा आध्यात्मिक, धार्मिक व शैक्षणिक वारसा लाभला आहे. ती शांतता व ते समाधान त्यांना जीवनकार्यात जाणवतात.

पुरुषोत्तम कऱ्हाडे यांनी ऊर्जाप्रबोधनाच्या कार्याला २००६ मध्ये सुरुवात केली. कऱ्हाडे यांचे वर्गमित्र रवींद्र महाजन यांनी त्यापूर्वी ‘ऊर्जा पबोधन’ नावाचा ग्रुप सुरू केला होता. त्‍या ग्रुपमध्‍ये सध्‍या बारा इंजिनीयर्स सहभागी आहेत. ते सर्व ‘उत्कर्ष मंडळ (विलेपार्ले)’ येथे भेटून महाराष्ट्रातील विजेच्या सद्यस्थितीबद्दल चर्चा करतात. त्यातील महत्त्वपूर्ण गोष्टींवर आवश्यक त्या कार्यालयांना-अधिकाऱ्यांना पत्रे लिहितात. तेथे व अन्यत्र विद्युत ग्राहकांपर्यंत पोचून वीजसंवर्धनावर परिसंवाद भरवले जातात. तसेच वीजनियामक आयोगासमोर होणा-या जनसुनावणीमध्‍ये भाग घेऊन वीज ग्राहकांचे प्रश्‍न मांडतात. क-हाडे यांनी महाराष्‍ट्रातील वीजेची परिस्थिती व वीज वापर या विषयांवर वांद्रे, सांताक्रूझ, भांडूप, विलेपार्ले, गोरगाव आणि वसई या ठिकाणच्‍या नागरिकांशी संवाद साधून त्‍यांना माहिती दिली आहे. देशाचे ऊर्जाधोरण कसे असावे या विषयावर अंधेरी येथील ‘एस.ची.जे.आय.एम.आर. इन्‍स्‍टीट्यूट’मध्‍ये परिसंवाद भरवण्‍यात आला होता. या प्रकारे ‘ऊर्जा प्रबोधन’ ग्रुपचे कार्य चालते.

पुरुषोत्तम कऱ्हाडे वीजनिर्मितीतील क्लिष्ट विषय सोप्या पद्धतीने विशद करून सांगतात. ते वीजनिर्मितीच्या वेगवेगळ्या पद्धती, विजेची आकडेवारी, प्रकल्पांतील फायदे-तोटे, ग्राहकांच्या समस्या, ऊर्जानिर्मितीतील घटकांची उपलब्धता यावर भरभरून बोलतात. आण्विक पद्धतीत उष्णता निर्माण करून टर्बाइनच्या साहाय्याने वीजनिर्मिती होते. त्यासाठी पंधरा कोटी किंवा त्यापेक्षा जास्‍त प्रतिमेगावॉट एवढी प्रचंड किंमत मोजावी लागते. ही आकडेवारी पाहता, सरकारने जैतापूरला १६०० मेगावॉटचा एक, असे सहा प्रकल्प हाती घेतले. त्‍यावर, प्रत्‍येक प्रकल्‍पासाठी अंदाजे तीस हजार कोटींच्‍या घरात जाणारा तो प्रकल्‍प सरकार कशासाठी करतेय, असा प्रश्न ते उपस्थित करतात. कऱ्हाडे यांनी तारापूरला होणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पाचे समन्वयक म्हणून सात-आठ वर्षें काम पाहिले आहे.

क-हाडे ऊर्जानिर्मितीच्या विविध कार्यपद्धतींचे विश्लेषण करताना सांगतात की, औष्णिक ऊर्जानिर्मितीत कोळशाचा वापर होतो. एका मेगावॉटला पाच कोटी अशी औष्णिक वीज प्रकल्पाची किंमत आहे. कोळसा भारताला ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया यांसारख्या देशांतून आयात करावा लागतो. त्यामुळे कोळशाची किंमत वाढली, की त्याचा वीजनिर्मितीवर परिणाम होतो. जलविद्युत प्रकल्पात टर्बाइन्स पाण्याच्या साहाय्याने फिरवले जातात. मुंबईमध्ये खोपोली-भिरा येथे जलविद्युत केंद्रे आहेत. टाटांनी ती केंद्रे सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी निर्माण केली. डिझेलवरील विद्युत प्रकल्‍पाची किंमत, ते इंधन बाहेरून आयात करावे लागत असल्‍यामुळे वाढते. त्यामुळे अठरा रुपये प्रत्येक युनिटमागे मोजावे लागतात. सूर्याची ऊर्जा निसर्गातून, उघड्या आकाशातून सरळ उपलब्ध होते. त्यामुळे सौर ऊर्जेचा जास्त उपयोग करून घेतला पाहिजे, असे क-हाडे सुचवतात.

पुरूषोत्‍तम कऱ्हाडे यांनी सौर ऊर्जेचे मुंबईतीलच सुंदर उदाहरण दिले आहे. मुंबईच्या आयआयटीतील डॉ. चेतन सिंघ सोळंकी यांनी एक मेगावॉटची वीजनिर्मिती ‘सोलार’ने करून एकूण तीन मेगावॉट विजेची गरज असेल तर तेहेतीस टक्के वीज ‘सोलार’मधून निर्माण करण्याचे ठरवले. इतर संस्‍थांनी तयातून स्‍फूर्ती घेऊन सोलार वीजनिर्मिती करणे गरजेचे आहे. सोळंकी यांनी ग्रामीण भागातील मुलांसाठी दहा लाख सोलार कंदील बनवण्‍याचा महत्‍त्‍वाकांक्षी प्रकल्‍प हाती घेतला आहे. सोळंकी यांनी विद्यार्थ्यांना नुसतेच पुस्तकी ज्ञान न देता त्यांना प्रत्यक्ष काम करून दाखवले. भारत सरकारचे ‘सोलार मिशन’ वीस हजार मेगावॉट सौर ऊर्जेमधून निर्माण करावेत असे होते. आता नवीन सरकारने ती मर्यादा वाढवून एक लाख मेगावॉट एवढी केली आहे. सध्‍या गुजरातमध्ये ‘सोलार’मधून अकराशे वीस मेगावॉट, राजस्थान बाराशे पंच्‍याऐंशी, आंध्रप्रदेशमध्‍ये आठशेसाठ मेेगावॉट, मध्‍यप्रदेशमध्‍ये सातशेऐंशी मेगावॉट, तर महाराष्ट्रात तीनशेऐंशी मेगावॉट अशी सोलार ऊर्जेची स्थिती आहे. महाराष्ट्र यात खूपच पिछाडीवर आहे. महाराष्ट्राचे सौर ऊर्जेबाबत कोणतेही धोरण नाही, ते तयार करण्याचे काम सध्या सरकारकडून सुरू आहे. तशा कामांवर लक्ष ठेवून योग्य दिशेने सरकारचे पाऊल उचलले जाण्यासाठी सरकारवर दबाव आणणे हा क-हाडे यांच्या ‘ऊर्जा प्रबोधन ग्रुप’चा उद्देश आहे.

वीजनिर्मितीत अडथळे अनेक असतात. त्यामध्ये मुख्यत्वे कोळशाचा अपुरा पुरवठा, गॅसची व पाण्याची कमतरता, ग्राहकांकडील वीज बिलांची थकबाकी, कमी उत्पन्न गटासाठी कमी केलेले विजेचे दर यांसारखी बरीच कारणे आहेत. वीजनिर्मितीच्या पद्धतींची तुलना केल्यास कोळशापासून ५७.२९, जल विद्युतमधून १८.६४, अक्षय ऊर्जेतून १२.२५, गॅसमधून ८.९६, आण्विक उर्जेतून २.२६, तर तेलाच्या माध्यमातून ०.५६ टक्के वीजनिर्मिती होते. तरीही, भारतातील तीस कोटी लोकांना अजूनही वीज काय असते हे माहीत नाही. पुरुषोत्तम कऱ्हाडे यांचे काम निवृत्तीनंतरही लोकांना पुरेशी व स्वस्त वीज मिळावी, हे मिशन घेऊनच ‘ऊर्जा प्रबोधन ग्रुप’च्या सहकार्याने सुरू आहे.

पुरुषोत्तम कऱ्हाडे दहावी पास १९५९ मध्ये झाले. त्या वेळी त्यांचा आत्तेभाऊ इलेक्ट्रिकल इंजिनीयर होता. त्यामुळे कऱ्हाडे यांनीदेखील इेलेक्ट्रिकल इंजिनियर होण्याचे ठरवले. ते ‘इंजिनीयरिंग कॉलेज औरंगाबाद’ येथून १९६५ साली पदवी घेऊन बाहेर पडले; त्यांना सर्वप्रथम ‘महाराष्ट्र राज्य वीजमहामंडळा’त (मरावीमं) नोकरी लागली. त्‍यांचा नोकरीचा प्रवास लातूर, उस्मानाबाद आणि तेथून पुणे असा झाला. त्यांना ‘मरावीमं’मध्ये प्रथम पुणे येथे महत्‍तवाच्‍या टेस्टिंग विभागामध्‍ये काम करता आले. नवीन सबस्टेशन सुरू करण्याच्या आधी त्याची तपासणी करणे व ज्या ग्राहकांची बिले लाखोंमध्ये येतात अशा मोठ्या ग्राहकांच्या मीटरची तंतोतंत तपासणी करण्याचे काम टेस्टिंग डिपार्टमेंटकडे होते. कऱ्हाडे त्यांना त्यातून खूप काही शिकता आल्याचे सांगतात. त्यावेळी पुण्‍यासारख्‍या ठिकाणी छोटा ट्रान्‍सफॉर्मर होता. चिंचवड हे उपकेंद्र निर्माण होत होते. पिंपरी भागात कंपन्‍या स्‍थापन होत होत्‍या. त्‍यातूच ‘मरावीमं’ने ‘पुणे इलेक्ट्रिक सप्‍लाय कंपनी’ स्‍वतःच्‍या अधिपत्‍याखाली घेतली. त्‍या काळात भारतात औद्योगिक प्रगती बरीच होत असल्यामुळे कऱ्हाडे यांना पाच वर्षांच्या नोकरीत मोठा अनुभव मिळाला. त्यांचे केडगाव-बाबळेश्वर यांसारख्या सबस्टेशनच्या कामानिमित्त नगरला येणे-जाणे होत होते. ते म्हणतात, की तेव्हाचे इंजिनीयर स्वत:, स्वत:च्या हाताने टेस्टिंगची कामे करत. त्यामुळे अनुभवातून खूप शिकता येई. काम करण्याची जिद्द-हुरूपही असे.

‘मरावीमं’ने पुरुषोत्तम कऱ्हाडे यांना पुणे येथून मुंबईत ऊर्जा नियोजन विभागात १९७१ मध्ये पाठवले. नियोजन विभागाकडून त्या वेळी संपूर्ण महाराष्ट्राचे काम होई. तसेच महाराष्‍ट्र, गुजरात आणि मध्‍यप्रदेश या राज्‍यांची वीज क्षेत्रात एकत्रिात प्रगती कशी साधता येईल याचेही नियोजन होत होते. त्याचबरोबर विविध राज्‍यांमध्‍ये एकमेकांकडून वीज घेण्या-देण्यासंदर्भातील अभ्यास पश्चिम, उत्तर व दक्षिण या प्रादेशिक ग्रीड्समधून होत असे. किती ट्रान्समिशन लाइन्स कराव्या लागतील, मागणी किती, त्याचा विचार करून महाराष्ट्राला किती वीज प्रकल्प उभारावे लागतील अशी ऊर्जेसंदर्भातील पुढील दहा वर्षांची रूपरेषा आखली जाई.

कऱ्हाडे यांनी ‘मरावीमं’ येथील काम सोडून ‘टाटा कन्सल्टिंग इंजिनीयर्स कंपनी’मध्ये नाेव्‍हेंबर १९७५ला प्रवेश केला. त्यांनी टाटामधून उत्तर प्रादेशिक वीज बोर्डाची व दिल्लीतील कामे केली. पुरुषोत्तम कऱ्हाडे यांना इराणला १९७८ मध्ये पाठवण्यात आले. क-हाडे त्‍यांच्‍या आयुष्‍याचा फार मोठा अनुभव इराणमध्‍ये मिळाल्‍याचे सांगतात. त्या वेळी इराणमध्ये क्रांतीला सुरुवात झाली होती. पुरुषोत्तम कऱ्हाडे हे, मोहम्मद रझा शाह पहलवींचे सरकार १९७९ मध्ये उलथवून पूर्ण इस्लामिक सरकार स्थापन होईपर्यंतच्या इस्लामिक क्रांतीचे प्रत्यक्ष साक्षीदार होते.

पुरुषोत्तम कऱ्हाडे यांनी १९८१ मध्ये मायदेशी परतल्यावर, ‘टाटा उद्योगसमूहा’च्या स्थानिक प्रकल्पासाठी समन्वयक म्हणून काम पाहिले. त्यांना लाओसला जाण्याची १९८४-८५ च्या दरम्यान संधी मिळाली. त्यांनी तेथे ग्रामीण विद्युतीकरणाची कामे केली. त्‍यानंतर क-हाडे यांच्‍या कंपनीला जपानच्‍या ‘हिताची’ कंपनीने सौदी अरेबिया येथे जी.आय.एस. सबस्‍टेशनच्‍या चाचणीची कामे दिली. कऱ्हाडे यांच्यावर जपानच्या इंजिनीयर्सशी करार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. क-हाडे व्यावसायिक बोलणी करण्याकरता जपानला गेले. त्‍या भेटीत त्‍यांच्‍या कंपनीला पासष्ट महिन्यांचे काम मिळाले! ते काम १९८६ च्‍या सुमारास पूर्ण झाले. क-हाडे त्‍यानंरही २००२ ते २००६ या काळात सौदी अरेबियामध्‍ये कामानिमित्‍त वास्‍तव्‍यास होते. ते सौदीतील आठवणीचा एक क्षण सांगतात. क-हाडे चार वर्षांचा कार्यकाळ संपवून मायदेशी परतताना इजिप्तच्या मुस्लिम इंजिनियर मित्रांनी कऱ्हाडे यांच्यासाठी निरोप समारंभ करण्याचे ठरवले. त्या वेळी त्‍या प्रकल्‍पातील सौदी, इजिप्त, पाकिस्तान व फिलिपाइन्स या देशांमधील मुस्लिम इंजिनियर सहकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. कऱ्हाडे यांनी मुस्लिमांमधील प्रार्थनेचे महत्त्व जाणून त्यांना विश्वबंधुत्वाची भारतीय प्रार्थना ‘पसायदान’ त्‍या कार्यक्रमात अर्थासहित स्पष्ट करून सांगितली. तेथे उपस्थित असलेले त्‍यांचे सहकारी क-हाडे यांनी अखिल विश्वाविषयी मराठी संतांना किती कळकळ आहे, हे समजावून सांगितल्यावर प्रभावित झाले. क-हाडे यांच्‍यासाठी मुस्लिम देशात भारतीय प्रार्थना त्यांच्या मनावर ठसवणे, हा खरेच एक चिरंतन भाविकतेचा क्षण होता.

पुरुषोत्तम कऱ्हाडे आध्यात्मिक वृत्तीचे आहेत. ते त्यांच्या त्या आवडीचे अनुभव सांगताना म्हणतात, की त्‍यांना हैदराबाद, इराण व सौदी येथील एकटेपणाने व्यतीत कराव्या लागलेल्या कार्यकाळात मोकळ्या वेळात आध्यात्मिक पुस्तके वाचण्याची सवय लागली. त्यांनी हैदराबादमधील वास्तव्यात योगासने सुरू केली व ‘प्रजापती ब्रम्हकुमारी आध्यात्मिक सेंटर’चे सदस्यत्व स्वीकारले. त्यातच त्‍यांना शंकर अभ्यंकर यांच्यासारख्या विद्यावाचस्पतींच्या अध्यात्मिक विवेचनाच्या सीडींच्या श्रवणातून अध्यात्माची आवड निर्माण झाली. त्‍यांचे विनोबांचे ‘गीता प्रवचने’ हे सर्वांत आवडते पुस्तक. माणसाच्या मनामध्ये असंख्य विचार थैमान घालत असतात. त्यांना नियंत्रित करून दिशा देण्याचे काम ध्यान करते. त्यामुळे प्रत्येकाने रोज किमान पंधरा मिनिटे तरी ध्यान करावे असे ते आवर्जून सांगतात. कऱ्हाडे यांनी ‘योगेश्वरी देवी’वरील तीस संस्कृत अध्यायांचे, अंबाजोगाई येथील रामभाऊ पांडे यांनी केलेले मराठी भाषंतर पुस्‍तक रुपात संपादीत केले आहे. तो देवीभक्तांसाठी व अंबाजोगाईच्या ग्रामस्थांसाठी अनमोल ठेवा आहे. क-हाडे सांगतात, की त्याकडे पुराणकथा म्हणून न पाहता, ते त्या काळच्या समाजजीवनाच्या दृष्टीने वाचावे. ज्याच्‍या मनात श्रद्धा आहे त्‍यालाच देवाची जाणिव होऊ शकते असे ते बजावतात.

क-हाडे यांना त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीत त्‍यांच्‍या पत्नी पद्मा क-हाडे यांनी सावलीसारखी साथ दिली आहे. पद्मा शिक्षिका होत्या. त्यांनी उत्तरकाळात विविध लेखन केले. पुरुषोत्तम व पद्मा समाजातील सर्व तऱ्हेच्या विधायक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभागी होऊन अभिरुचिसंपन्न जीवन जगत असतात. ते दोघे ‘थिंक महाराष्‍ट्र’च्‍या ‘सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध’ आणि ‘नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध’ अशा दोन मोहिमांमध्‍ये उत्‍साहाने सहभागी झाले होते. त्या दोघांच्या वागण्याबोलण्यातून रसिकता व संस्कारसंपन्नता प्रकट होत असते. त्यांचे दोन मुलगे प्रशांत व प्रसन्न हेदेखील उच्चशिक्षित व कर्तबगार आहेत. पद्मा कऱ्हाडे यांनी त्यांचे अनुभव ‘इराणची क्रांती आणि संक्रमणाचा काळ’, ‘सौदीचे अंतरंग’, ‘स्‍वान्‍तसुखाय’, ‘भटकंतीची साद’ आणि -हॉंगकॉंग सफारी’ यांसारख्या पुस्तकांद्वारे शब्दबद्ध केले आहेत. कऱ्हाडे आयुष्याच्या उत्तरार्धात एक परिपूर्ण आयुष्य जगल्याची पूर्णत्वाची भावना व्यक्त करतात.

पुरूषोत्‍तम क-हाडे
9987041510, purusho1508@hotmail.com

– वृंदा राकेश परब

Last Updated On 16th FEB 2017

About Post Author

4 COMMENTS

  1. अतिशप छान माहीतीपूर्ण लेख
    अतिशप छान माहीतीपूर्ण लेख.माझी आणि काकाकाकूंची ओळख आहे पण एवढी माहीती मलाही नव्हती.खूपच छान संकलन आणि मांडणी.
    वृंदाताई व काका काकूंना माझ्या अनंत शुभेच्छा.

Comments are closed.