मला शिक्षक म्हणून रुजू होण्याची ऑर्डर आली तेव्हा माझा मुलगा सव्वा महिन्याचा होता आणि मुलगी सव्वा वर्षांची होती. माझे मिस्टर डॉक्टर होते. शिक्षकी पेशा हा आमच्या घराण्याचा वारसा आहे. माझे वडील हे बावीस वर्षें मुख्याध्यापक होते. माझे आजोबा हे सातारा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी होते. त्यामुळे आमच्या घरामध्ये शैक्षणिक वातावरण होते. परंतु मला ही जबाबदारी मुलांमुळे झेपेल की नाही असा प्रश्न पडला होता. पण माझ्या मिस्टरांनी मला पाठिंबा दिला. मी ‘रयत शिक्षण संस्थे’च्या शाळांमधून छत्तीस वर्षें अध्यापनाचे काम केले.
मी शिक्षिका मुख्याध्यापिका म्हणून छत्तीस वर्षांत काही उपक्रम राबवले. मुलांविषयी मनातून असणारा आंतरिक जिव्हाळा व त्यांच्या परिस्थितीविषयी असलेली जाणीव ही त्या उपक्रमामागील धारणा आहे.
पुस्तक दहीहंडी : शाळेत झोपडवस्तीत राहणाऱ्या मुली यायच्या. त्यांना वाचनाची सवय नव्हती. वडील दारू पिण्यासाठी पुस्तके विकत. मी म्हटले, आम्ही ‘पुस्तक दहीहंडी’ साजरी करायचो. मी दहीहंडीचा प्रसाद म्हणून मुलींना पुस्तक वाटत असे. त्यादेखील कृष्ण जन्माचा प्रसाद स्वीकारावा तशी पुस्तके घेत वाचत.
‘स्वावलंबी शिक्षण’ हे ‘रयत शिक्षण संस्थे’चे ब्रीदवाक्य आहे. आम्ही आमच्या शाळेतील मुलींना राखीचे सामान आणून द्यायचो. त्या राख्या बनवायच्या. त्या सुंदर रंगाने रंगवायच्या. आम्ही त्याची विक्री करायचो. मी मुलींना त्या सगळ्याचा हिशोब ठेवायला सांगत असे. त्यामुळे त्यांनी सामान किती रुपयाला विकत घेतले, तयार राख्या किती रुपयांना विकल्या हे सर्व व्यवहारज्ञान त्यांना समजत असे. त्यांना त्यातून किती फायदा झाला तेही कळत असे. झालेल्या त्या फायद्यातून त्यांच्याच वर्गातील एखादी मुलगी जी गरीब असेल, तिच्या शिक्षणाचा खर्च केला जाई. मुलींना त्या स्वत: कमावतात या गोष्टीचा अभिमान वाटायचा. त्या सगळी कामे उत्साहाने करायच्या, पण त्याबरोबर सर्वजणी मिळून कोणत्या मुलीची फी भरायची या विषयीसुद्धा ठरवत असत. खरोखरच, गरजू मुलीला मदत केली जाई.
विज्ञान प्रदर्शन : मी सायन्सची शिक्षिका. मी माझ्या शाळेतील मुलांकडून विज्ञानातील उपकरणे बनवून घ्यायची. आम्ही विज्ञान प्रदर्शनात भाग घ्यायचो. आम्हाला राज्यस्तरीय बक्षिसे मिळाली आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे प्रदर्शनांमुळे ग्रामीण भागातील मुलांना विज्ञानातील मूलभूत संकल्पना समजत. त्यांची विज्ञानाशी मैत्री जोडली जाई.
विषयाविषयी : शिक्षकांनी मुलात मूल होऊन शिकवले पाहिजे. मी विषयव्याख्या हावभाव करून मुलांना समजेल अशा प्रकारे समजावत असे. व्याख्या सोपी सरळ करून सांगत असे. आम्ही मुलींना प्रयोगशाळेत घेऊन जायचो. त्यांना वेगवेगळी केमिकल्स, अॅसिडस् हाताळायला द्यायचो. त्यामुळे मुलांच्या मनात जबाबदारीची जाणीव निर्माण झाली व विषयाबद्दल आपुलकी वाटू लागली.
आम्ही मुलांना लैंगिक शिक्षणदेखील पुण्यातील ‘ज्ञान प्रबोधिनी’ या संस्थेमार्फत देत असू. मुलींना मासिक पाळी सातवी-आठवीच्या वयात येते. आम्ही ‘कळी उमलताना’ हा उपक्रम घ्यायचो. डॉक्टर येऊन संबंधित सर्व माहिती देत.
मी लोणार येथील शाळेत असताना, आम्ही डॉ. राणी बंग आणि तुलसी ट्रस्ट यांच्या सहकार्याने ‘तारुण्यभान’ हा उपक्रम घेतला. डॉ. शिवदे या डॉक्टर दांपत्याची त्यावेळी मला मदत झाली. ते त्या शिबिरासाठी प्रयत्न दोन वर्षें करत होते. ग्रामीण भागातील शाळांनी त्यांना प्रतिसाद दिला नव्हता. आमच्या शाळेने त्यात सहभाग घेतला. शिबिरासाठी अकरावी-बारावीची मुले एकत्र आली. शिबिर तीन दिवस चालले. मुलांमुलीची संख्या दर दिवशी वाढतच गेली. आम्ही पहिल्या दिवशी प्रत्येकीच्या हातात मेणबत्त्या दिल्या होत्या. एका मेणबत्तीने दुसरी ते तिसरी अशा प्रकारे सर्व मुलांच्या हातातील मेणबत्त्या प्रज्वलित केल्या. ज्ञानाचा प्रसार सर्वत्र व्हावा हा हेतू सफल झाला. पहिल्या दिवशी पंच्याऐंशी मुले-मुली उपस्थित होती. राणी बंग यांनी मुलांशी संवाद साधला. त्या मुलांशी लैंगिक प्रश्नांवर मोकळेपणाने बोलल्या. मुलांनीदेखील त्यांना त्यांच्या मनातील प्रश्न विचारले. मॅडमनी मुलांच्या मनातील शंका दूर केल्या, त्यांना समजावून सांगितले. ते मुलांना पटले. लैंगिक शिक्षणाची गरज मुलांना आहे. आम्ही अभ्यासक्रमाचा भाग म्हणून तसे उपक्रम घेतो. मुलामुलींनी त्यांच्या स्वत:कडे, स्वत:च्या शरीराकडे कशा प्रकारे बघावे, त्याचा आदर कसा करावा. नवरा-बायकोच्या नात्यात मोकळेपणा कसा असावा हे मॅडमनी छान शब्दांत समजावले. आम्ही शिबिराविषयी मुलांकडून लेख लिहून घेतले. त्यांनी त्यांना या शिबिरातून काय मिळाले, याविषयी अनुभव लिहून दिले.
आर्थिक रेषेखालील मुलांची मुख्य समस्या म्हणजे त्यांच्या घराचे वातावरण शिक्षणाला पूरक नसते. मी पर्यवेक्षक झाले, तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात येऊ लागली, की या पालकांना त्यांच्या मुलींना शिकवणे म्हणजे पैसे वाया घालवणे वाटते. ते लग्नांसाठी कर्ज काढतील पण शिक्षणासाठी खर्च करणार नाहीत. मी ‘दिप कट्टा’ या महिला मंडळाशी संपर्क साधला. त्यांना मी सांगितले, आपण नवरात्रात कुमारिका पूजतो, देवीची ओटी भरतो. ती ओटी लगेच देवीकडून बाजूला केली जाते. ते पैसे जमवून जर आपण एखाद्या गरजू मुलीची फी भरण्यासाठी वापरले, तर मी अशा प्रकारे मुलगी देवीचे स्वरूप आहे हे म्हणणे पालकांमध्ये रुजवण्यात यशस्वी झाले.
श्रीपाद शिंदे म्हणून गृहस्थ अमेरिकेहून आमची शाळा बघण्यासाठी आले होते. मी त्यांना शाळेतील मुलींची अवस्था समजावून सांगितली. त्यांनी ‘सॅन होजे फाउंडेशन’कडून शाळेतील मुलींच्या शिक्षणाची सोय करून दिली. काही कंपन्यानीपण आमच्या मुली दत्तक घेतल्या. स्टेट बँकेने काही मुली दत्तक घेतल्या. मी स्वत: मुली राहत त्या वस्त्यांमधून फिरायचे व गरजू मुलींची यादी बनवायचे. लोक मदत करतात, पण त्यांचा विश्वास संपादन करावा लागतो.
मी स्वत: पालकांशी बोलायचे. ती सवय मुख्याध्यापक झाले तरीदेखील कायम ठेवली. पालकांचे स्वत:चेपण काही प्रॉब्लेम असतात. माझे त्यांच्याशी मैत्रीचे नाते झाले. त्यामुळे ते मुलांच्या शिक्षणामध्ये आपोआप इंटरेस्ट घेत.
पण मी मुलींशीदेखील मोकळेपणाने वागायचे. माझी एक विद्यार्थिनी आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे दहावीत डिस्टर्ब झाली होती. मी तिचे समुपदेशन केले. तिने त्या परिस्थितीतसुद्धा छान अभ्यास केला. ती आमच्या शाळेतून दहावीत दुसरी आली.
सरिता मानवतकर नावाची मुलगी आमच्या शाळेत होती. तिचे आई-वडील वारले होते. ती आजीबरोबर राहायची. तिच्या आजीने तिचे लग्न तिच्या आत्याच्या मुलाबरोबर ठरवले. तो भाजी विकायचा. मुलगी खूप हुशार होती. मी आजीला समजावले, पण तिचाही नाईलाज होता. ती मुलगी माझ्याकडे येऊन खूप रडली होती. पण तो त्यांचा घराचा प्रश्न असल्यामुळे मला जास्त काही करता आले नाही. मी मुलीला अभ्यासासाठी प्रोत्साहन देत राहिले. ती लग्नानंतर त्या स्ट्रेसने आजारी पडली होती. तेव्हा मी फळ वगैरे घेऊन तिच्या घरी गेले व तिला धीर दिला. मॅडम तिच्या पाठीशी आहे असे तिला वाटले. तिने जोमाने अभ्यास केला ती दहावीत पहिली आली. त्या मुलानेदेखील तिला सपोर्ट केले. त्यांनी तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत मूल होऊ दिले नाही. ती एम.एस्सी झाली आहे. ती नोकरी करून तिचे घर सांभाळत आहे.
शोभा धोत्रे नावाची माझी एक विद्यार्थिनी होती. ती आठवीत असताना, माझ्या लक्षात आले, की ती काही दिवस शाळेतच येत नाही. मी तिच्या वर्गशिक्षकांना तिच्या घरी चौकशी करण्यासाठी पाठवले. तेव्हा तिची आई त्यांच्याशी भांडली. आईला तिच्या नवऱ्याने सोडलेले होते व दुसरी बायको केली होती. ती शिवणकाम करून पोट भरायची. तिला शोभाची गरज घरी लहान बाळाला सांभाळायला होती. मग मी स्वत: त्यांच्या घरी गेले. तिच्या आईला आणि तिला समजावले. तिला म्हटले, वाटले तर बाळाला पण तिच्या सोबत शाळेत पाठवा. आमच्या शिक्षकांना एकेक तास ऑफ असतो ते बाळावर लक्ष ठेवतील. आम्ही सर्व बघू, बारा वाजेपर्यंत वेळ कसाही निघून जाईल. मग ती बघेल बाळाला. आई शोभाला शाळेत पाठवू लागली. शोभा चांगल्या मार्कांनी दहावी पास झाली व नंतर तिने नर्सिंग केले. मी तिला ‘सॅन होजे फाउंडेशन’ची स्कॉलरशिप मिळवून दिली. आम्ही पालकांना पालकांच्या सभेत बोलायला सांगायचो. शोभाची आई अशिक्षित असून सर्वांसमोर उभी राहून बोलली. म्हणाली, मी सकाळी उठल्यानंतर देवाला नमस्कार करण्याऐवजी वाघमारे मॅडमना नमस्कार करते. त्यांच्यामुळे माझे घर बदलले. शोभा आता नर्स होऊन स्वतःचे घर चालवते.
मला तुकाराम महाराजांच्या देहू येथील पवित्र भूमीत ज्ञानमंदिर बांधण्याची संधी २००९ मध्ये मिळाली. तेथील शाळेला चांगली इमारत नव्हती. आम्ही तेथे पंधरा खोल्यांची तीन मजली इमारत बांधली. तेथे येणारे वारकरी त्यांच्या जवळचे आम्हाला दहा-दहा रुपये देणगी म्हणून द्यायचे. पिंपरी-चिंचवडच्या महापौरांनी पंचवीस लाख रुपये देण्याचे मंजूर केले. तेथील रोटरी क्लबने वॉटर प्युरीफायर दिले.
मी आयुष्यभर तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे “ जेजे आपणासी ठावे, तेते इतरांसी शिकवावे | शहाणे करून सोडावे, सकाळ जन ||” असे करण्याचा प्रयत्न केला.
– माणिकताई वाघमारे
फारच छान
असेच लिहीत राहा
फारच छान
असेच लिहीत राहा
Great
Great
Chan. Maniktainchya…
Chan. Maniktainchya dhyeyaparyant Pochu te purna karnyachi kshamata ahe. Icchahi ahe. Tyanche abhinandan.
Atishay sundar ani niswarthi…
Atishay sundar ani niswarthi kaam. Tyanche abhinandan.
नमस्कार, कर्मवीर भाऊराव…
नमस्कार, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या रयत शिक्षण संस्थेत आपण केलेले काम छान आहे, तसेच ते इतरांना स्फूर्तिदायक आहे.
चंद्रकांत जाधव.
विभागीय अधिकारी, रयत शिक्षण संस्था प.वि.औधगाव
पुणे.
9423863217 मो.नं
Great we are proud of you…
Great we are proud of you maushi
Comments are closed.