मकरसंक्रातीचा सण फलटण आणि माण तालुक्यांच्या सीमेवरील सीतेच्या मंदिरात साजरा करण्याची पद्धत न्यारीच आहे ! महिला सीतेची आरती करून, मकर संक्रांतीचे सुगड तिच्या पायाशी अर्पण करून मकर संक्रातीचा सण साजरा करतात. महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो महिला सीतेला सौभाग्याचे वाण देण्यासाठी तेथे येतात. ते सीतामाई देवस्थान सह्याद्रीच्या निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये आहे. तो डोंगर सीतामाईचा डोंगर म्हणूनच ओळखला जातो.
ते मंदिर त्या डोंगरावर असण्यामागे एक आख्यायिका आहे. श्रीरामाने सीतेस गर्भार अवस्थेत असताना, त्या डोंगरावर आणून सोडले होते. त्या वेळेस सीतेला तहान लागली असता, लक्ष्मणाने डोंगरावर बाण मारून पाणी काढले ! त्यातून बाणगंगा (शरगंगा) आणि माणगंगा या नद्यांचा उगम झाला. माणगंगा माण तालुक्यातून आणि बाणगंगा फलटण तालुक्यातून वाहते. त्याच ठिकाणी लव-कुशाचा जन्म झाला. त्या डोंगरावर सीतेचे छोटे, पण आकर्षक मंदिर वसवण्यात आले आहे. मंदिराची व्यवस्था घाडगे नावाचे गृहस्थ पाहत होते. त्यांचे निधन कोरोना कालावधीत झाले. त्यानंतर व्यवस्था पाहणारे खास कोणी नाही. ते काम भक्त मंडळीमार्फत होते असे सांगितले जाते.
श्रीक्षेत्र सीतामाई येथे दरवर्षी चैत्र वद्य सप्तमीला लव-कुश जन्मोत्सव; तसेच ज्येष्ठ अमावास्या, आषाढी अमावास्या, नारळी पौर्णिमा व मकर संक्रांत या दिवशी उत्सव साजरे होतात. प्रत्येक अमावास्येला त्या ठिकाणी भजन, कीर्तन, भंडारा आदी कार्यक्रम नियमितपणे होत असतात. मार्गशीर्ष वद्य द्वितीयेला सत्पुरुष बालब्रह्मचारी महाराज सारंगदास गुरु हरिनामदास महाराज यांची पुण्यतिथी त्या ठिकाणी परंपरेने साजरी केली जाते.
सत्यनारायण महापूजा व अन्नदान यांची परंपरा अखंडपणे चालावी यासाठी बारा गावांनी बारा महिन्यांच्या पूजा ठरवून घेतल्या आहेत. फलटण तालुक्यातील साठे, टाकळवाडे, वडले, कांबळेश्वर, तावडी व माळवाडी, बारामती तालुक्यातील कांबळेश्वर आणि माण तालुक्यातील श्री पालवण, कळसकरवाडी, गाडेवाडी, खोकडे व कुळकजाई या गावांचा त्यामध्ये सहभाग आहे. ज्या महिन्यात ज्या गावाची पूजा असते तेथील ग्रामस्थ अन्नदानाचे साहित्य घेऊन येतात व जेवण बनवतात. संध्याकाळी अन्नदान, रात्री कीर्तन व भजन असा कार्यक्रम दरमहा असतो.
निसर्गरम्य असलेले हे स्थान उपेक्षित आहे. पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था डोंगरमाथ्यावर नसल्याने भाविकांना स्वत:बरोबर पाणी घेऊनच सीतामाईचे दर्शन घेण्यासाठी यावे लागते. पाण्याचे टँकर त्या ठिकाणी यात्रेच्या कालावधीमध्ये येतात. परंतु लोक यात्रेसाठी इतक्या मोठ्या संख्येने येत असतात, की पाणी कमी पडते. सीतामाईच्या डोंगरावर जाण्यासाठी डांबरी रस्ता तयार होत आहे. फलटणहून देवस्थानपर्यंत जाण्यासाठी ताथवडा (तालुका फलटण), राजापूर (तालुका माण) मार्गे अठ्ठावन्न किलोमीटर अंतर पार करावे लागते. मात्र ते अंतर वेळोशी (तालुका फलटण) मार्गे नव्या घाट रस्त्याने गेल्यास केवळ अठ्ठावीस किलोमीटर आहे. तो रस्ता कच्चा आहे. घाटाचे काम अपूर्णावस्थेत आहे. डांबरीकरण आणि संरक्षक कठडे आदी कामे झाल्यानंतर घाट रस्ता प्रवासासाठी सुरक्षित होईल. सीतामाई घाट रस्त्याच्या पायथ्याशी लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखाना आहे.
एस. टी. महामंडळाच्या वतीने यात्रा कालावधीमध्ये सीतामाईच्या मंदिरापर्यंत येण्या-जाण्यासाठी जवळपासच्या गावांतून, तालुक्यांतून, जिल्ह्यांतून व परराज्यांतून जादा बस गाड्या सोडल्या जातात. खाजगी वाहनांतूनही बर्याच महिला तेथे येतात. मात्र त्या ठिकाणी प्रवासासाठी नियमितपणे एस. टी. बसची सुविधा नाही.
सीतामाई देवस्थानला उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. तेथे येणाऱ्या भाविकांनी दिलेल्या देणग्या हेच देवस्थानचे उत्पन्न होय. देवस्थानला उत्पन्न नसल्याने देवस्थानच्या जागेला साधे तार कंपाऊंडही नाही. सीतामाई देवस्थानचे महत्त्व व निसर्गरम्य सौंदर्य लक्षात घेऊन पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्र असा एकत्रित योग्य विकास आराखडा तयार करून नियोजनबद्ध विकास कार्यक्रम राबवला जाणे आवश्यक आहे.
– इंदुमती अरविंद मेहता 9822266691 arvindmehtaphaltan@gmail.com
——————————————————————————————————————