उपेक्षित नाट्यछटाकार दिवाकर

_UpekshitNatychatakar_Diwakar_1.jpg

दिवाकर हे नाव आठवते का? ‘दिवाकरांची नाट्यछटा’ शालेय पाठ्यपुस्तकात वाचनात आली असेल तर ते अंधुकसे आठवतील. नाट्यछटा लिहिणारे शंकर काशिनाथ गर्गे ऊर्फ दिवाकर (जन्म- 18 जानेवारी 1889, मृत्यू- 1 ऑक्टोबर 1931) हे त्यांच्याही काळात दुर्लक्षित राहिलेले लेखक होते.

दिवाकर हे नाट्यछटाकार म्हणून जास्त प्रसिद्धी पावले होते. दिवाकरांना जाणवलेले वास्तव, त्यांच्या विचारांची घालमेल, त्यांना समजलेला जीवनाचा अर्थ छोट्या-छोट्याशा अनुभवांतून सांगायचा होता. त्यांच्या वाचनात रॉबर्ट ब्राउनिंगचे ड्रॅमॅटिक मोनोलॉग्ज आले. ब्राउनिंगने स्वत:च्या दृष्टिकोनासह विविध व्यक्तिरेखांचे भिन्न भिन्न स्तरांवरील जीवनानुभव एकपात्री नाट्यकाव्याच्या माध्यमातून सूचकतेने आणि दमदारपणे व्यक्त केले आहेत. दिवाकरांनी त्यांच्या साहित्यप्रकृतीला मानवतील असे बदल ‘ड्रॅमटिक मोनोलॉग्ज’च्या प्रकारात केले व तो आकृतिबंध वापरला. त्यांनी तसे लेखन मुळातील काव्यात्मकथन बाजूला सारून गद्यस्वरूपात केले. जीवनातील साधेसुधे अनुभव नाट्यात्म प्रसंग म्हणून त्यांच्या लेखनात मोजक्या शब्दांत उतरू लागले. दिवाकर संबंधित व्यक्तींचे शब्द अभिनय करण्यासारखे, त्यांच्या बोलण्यातील चढउतार आणि त्यांचा सूर लेखनातील सूचित अर्थाचा नेमका प्रत्यय यावा अशा पद्धतीने योजू लागले. त्यासाठी त्यांनी विरामचिन्हांचा भरपूर वापर केला. त्यांनी गद्यलेखनालाही वाकवले. दिवाकरांनी त्या लेखनप्रकाराला मनात उमटणारी एखाद्या नाट्यात्म अनुभवाची सावली म्हणजेच ‘नाट्यछटा’ असे समर्पक नाव दिले.

नाट्यछटा तिचा आकार एखाद्या व्यक्तीला किंवा अनेक व्यक्तींना उद्देशून बोलताना होणाऱ्या संवादांच्या आभासातून धारण करते. त्याद्वारे बोलणाऱ्या व्यक्तीचे रेखाचित्र तिच्या अंतरंगातील अंतर्विरोधासह वाचक/प्रेक्षकांसमोर स्पष्ट उभे राहते. नाट्यछटेतील व्यक्तिरेखा पूर्णाकृती नसतात; त्या भरीवही नसतात, पण दिवाकर नाट्यछटेपुरते त्यांचे व्यक्तिविशेष ठाशीवपणे मांडतात. त्या व्यक्तीचे समाजाबद्दल असलेले मत व वर्तन आणि दिवाकरांना त्यातून मांडावासा वाटणारा विचार असे एक वेगळेच रसायन नाट्यछटेत वाचकाला भावत राहते. दिवाकर यांना ते सर्व घाटदार व आटोपशीर करायचे आहे. त्यामुळे नाट्यछटेचा विस्तार कवितेइतका छोटा असतो. तो साहित्याविष्कार नाटकाशी जसे नाते सांगतो तशीच जवळीक कवितेशीही दाखवतो, कारण तो मोजक्या शब्दांत भरपूर आशय मांडत असतो. दिवाकर यांच्या कितीतरी नाट्यछटा वाचताना गद्यकाव्यासारख्या वाटतात. त्यांचे विषयही मर्मभेदी आहेत- –

विषारी सर्प मनाने कोमल आहे. सौंदर्यासक्त आहे. तो बागेत येऊन गुलाबाचे सुंदर फूल खुडू पाहणाऱ्याला जरब दाखवत आहे. तू बागेतच ये व सौंदर्याचा आस्वाद घे, हे सौंदर्य खुडून नेऊ नकोस, असे तो सांगत आहे. “मी अतिशय रागीट आहे खरा, पण प्रेमाने मला कोणी जवळ घेतले तर मी कधी कोणावर रागावेन का?” असे म्हणणारा सर्प आपल्याला ‘महासर्प’ या नाट्यछटेत दिसतो.

त्या काळची बाळंतीणीची खोली पाहता अर्भकाची काळजी घेण्याच्या नावाखाली बाळाची होणारी प्रचंड हेळसांड, यापेक्षा त्या अर्भकाचा मृत्यू बरा हा विचार दिवाकरांनी ‘आनंद! कोठे आहे येथे?’ या नाट्यछटेत मांडला आहे.

“… याच दिवशी सकाळी नुकते अकरावे वर्ष लागले होते मला. कोवळ्या उन्हामध्ये वाऱ्याने भुरभुर उडणाऱ्या या भट्टीतील विस्तवाच्या कुरळ्या केसांवर हात फिरवत मोठ्या मजेमध्ये बसलो होतो मी!” कुंभाराचे हे काव्यात्म वर्णन ‘अहो कुंभारदादा, असे का बरे रडता?’ या नाट्यछटेत येते. सर्वसामान्य माणसाच्या मनातील भेसूर निराशेचे चित्र कुंभाराचे निमित्त करून या नाट्यछटेत उभे राहते.

विधवा स्त्रीचा मृत्यू झाल्यावर समाजात कोणालाच दु:ख होत नाही. स्त्रीचे समाजातील व कुटुंबातील स्थान किती नगण्य आहे हे ‘कोण मेलं म्हणजे रडू येत नाही?’ या नाट्यछटेमध्ये बोचरेपणाने येते. “खरंच तर काय! बायकांचे जगणे आणि मरणे सारखेच! जगल्यास जगा! मेल्यास मरा!…” अशा नेमक्या शब्दांतील वाक्ये समाजवास्तव उघड करतात.

पुनर्जन्म, आत्मा हे सारे खोटे आहे हे मांडणारी त्यांची ‘झूट आहे सब!’ ही नाट्यछटा त्या काळी धीट वाटलीच, पण ती आजच्या काळातही धीट वाटते.

दिवाकर यांनी एकावन्न नाट्यछटा लिहिल्या. त्या नाट्यछटा वाचताना जाणवते, की अनुभवायला, सादर करण्यासाठी, पाठ करण्यासाठी त्या सोप्या असल्या तरी नाट्यछटा लिहिणे हे काम आव्हानात्मक आहे. दिवाकरांनी लिहिल्या तशा पद्धतीच्या नाट्यछटा त्यांच्यानंतर लिहिल्या गेल्या नाहीत. त्यांच्या नाट्यछटा शाळेच्या स्नेहसंमेलनांमध्ये सातत्याने सादर केल्या गेल्यामुळे नाट्यछटा हा बालसाहित्याचा प्रकार आहे असा गैरसमज पसरला. त्यामुळे त्यांच्यानंतर बालनाट्यछटांचे पीक भरपूर आले, त्या कधीच ‘प्रौढ’ झाल्या नाहीत. त्यामुळे दिवाकर त्यांच्या काळातही दुर्लक्षित राहिले.

लेखक-समीक्षक सरोजिनी वैद्य यांनी दिवाकर यांच्यावर पीएचडी केली आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘समग्र दिवाकर’ या ग्रंथातून दिवाकर यांची कारकीर्द स्पष्ट होते. वैद्य म्हणतात, “दिवाकर–साहित्याला पाऊणशे वर्षें उलटून गेली असली तरी अनेक कारणांनी ते आजचेच वाटते. दिवाकर त्यांच्या काळाच्या फार पुढे होते असे केवळ औपचारिकपणे जाणकारांकडून म्हटले गेलेले नाही, ह्याची प्रचीती तर वारंवार येते. संवेदनशीलता आणि कला–जाणीव या दोहोंच्या संदर्भात ते आजच्या काळातीलच आहे.”

दिवाकर यांच्या हयातीत त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले नाही. ‘किरण’ या रविकिरण मंडळाच्या प्रकाशनात अनेक कवींच्या काव्याच्या जोडीला दिवाकर यांच्या दोन नाट्यछटा प्रसिद्ध झाल्या होत्या. ‘साहित्य- सोपान’ या मुंबई विद्यापीठासाठी तयार झालेल्या एका गद्य पाठ्यपुस्तकात त्यांच्या दोन नाट्यछटा छापून आल्या होत्या. दिवाकर यांनी स्वत: निरनिराळ्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या नाट्यछटांचे एक चिकटबुक हौसेने तयार करून ठेवलेले होते;  पण ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून किंवा इतर कोणाकडून दिवाकर यांच्या हयातीत फारसे झाले नाहीत; स्वत:चे पुस्तक केव्हा निघावे यासंबंधीचे एक गंमतीदार स्वप्नचित्र दिवाकर यांच्या डोळ्यांपुढे असे. ते त्यांचे स्नेही श्री. बा. रानडे यांना म्हणत… आपल्या पुस्तक विक्रेत्याच्या दुकानासमोर पहाटेपासून मुंग्यांसारखी रीघ लागली आहे… सर्व मोठी आवृत्ती तासा-दोन तासांतच खलास झाली… अशी काही स्थिती असेल तरच माझे पुस्तक प्रसिद्ध करण्यात मजा!

…..विजय तेंडुलकर यांनी दिवाकरांच्या एकावन्न नाट्यछटांचे रसग्रहण केले आहे. ते पुस्तकरूपाने फार पूर्वीच प्रकाशित झाले आहे. तेंडुलकर नोंदवतात, “नाट्यछटा हा नाट्याचा एक प्रकार आज आपल्या वाचनात येत नाही. त्याअर्थी तो लिहिला जात नसावा; निदान कोठे प्रसिद्ध व्हावा इतक्या चांगल्या स्वरूपात तरी तो लिहिला जात नसावा हे नक्की. मराठी साहित्यातील हा आजचा एक जवळपास मृतप्रकार.”

तेंडुलकर आणखी नोंदवतात, “दिवाकरांनंतर कित्येक लेखकांनी पुढे, काही काळ पुष्कळ प्रमाणात हाताळला. परंतु दिवाकरांच्या एकावन्न नाट्यछटांनंतर बावन्नावी नाट्यछटा कोणाचीही टिकली नाही. त्या अर्थाने दिवाकरांच्या ‘एकावन्न नाट्यछटा’ या विशिष्ट साहित्य आणि नाट्यप्रकाराची मराठीतील कमीजास्त प्रमाणात ‘प्रमाण’ मानली जाण्याला हरकत नाही.”

अमोल पालेकरांनी साधारण 1970 च्या दशकात दिवाकरांच्या नाट्यछटा मंचावर केल्या होत्या. त्यानंतर 2009 सालात कणकवली येथील ‘वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान’ने निर्मिलेले व अतुल पेठे यांनी रचलेले व दिग्दर्शित केलेले ‘मी…माझ्याशी’ हे नाटक दिवाकरांच्या नाट्यछटांवरच आधारित होते.

– विद्यालंकार घारपुरे

About Post Author

Previous articleयोगेश रायते – खडक माळेगावचा गौरव
Next articleविंदा – दा ऽ दीड दा ऽ (Vinda Karandikar)
विद्यालंकार घारपुरे यांचा जन्म 26 सप्टेंबर 1960 मध्ये झाला. त्यांचे शिक्षण बी. कॉम. झाले आहे. त्यांनी भारतीय स्टेट बँकेतून उपप्रबंधक (डेप्युटी मॅनेजर) या पदावरून स्वेच्छानिवृत्ती 2007 साली घेतली. ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'चे सक्रिय कार्यकर्ता म्हणून 1986 ते 1997 या काळात काम करत होते. त्यांना बालसाहित्यात विशेष रुची आहे. त्यांचे 'बबडूच्या गोष्टी' 'वनशाहीच्या कथा' व 'बेटू आणि इतर कथा' हे बालकथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. तसेच 'छोटा डॉन' आणि 'लिंबू तिंबू' हे बालकविता संग्रह आणि 'बदल' ही बालकादंबरीही प्रकाशित झाली आहे. त्यांना 'चालनाकार अरविंद राऊत पुरस्कार' 2015 सालासाठी मिळाला आहे. सध्या त्यांनी त्यांचा पूर्ण वेळ हा लेखन व सामाजिक कामासाठी दिलेला आहे. लेखकाचा दूरध्वनी 9420850360

1 COMMENT

  1. बोधपर,वाचनीय साहित्य.
    बोधपर,वाचनीय साहित्य.

Comments are closed.