Home वैभव इतिहास उपेक्षित टकारी समाज

उपेक्षित टकारी समाज

caeasole

टकारी समाज स्वराज्य निमिर्तीसाठी लागणारी धनदौलत इंग्रजांच्या तिजो-या फोडून आणण्याचे काम करत असे. टकारी समाज मुळचा आंध्र प्रदेशातील. त्या समाजाची तेलगू ही बोलीभाषा. तो समाज आंध्रात गोदावरी खो-यात पिढ्यान् पिढ्या राहत होता. त्या समाजाला त्या भागात भुमेनोरू म्हणजे भाड्याने जमिनी घेऊन कसणारा समाज म्हणून ओळखले जात होते. गोदावरी काठावर मासेमारी करायची, शेतीची कामे करायची व त्यातून उद्योग-उपजीविका करायची असा जीवनक्रम तो समाज पिढ्यान् पिढ्या करत आलेला आहे.

इतिहासात बाजीराव पेशवे आणि मस्‍तानी यांच्‍या प्रेमप्रकरणात टकारी समाजाचा उल्‍लेख येतो. बाजीराव पेशव्‍यांचे मन मस्‍तानीवर जडले. ते तिला स्‍वतःच्‍या राज्‍यात घेऊन आले. तिच्‍या रक्षणासाठी त्‍यांनी विश्‍वासू, प्रामाणिक आणि लढाऊ असणाऱ्या उचल्या, टकारी समाजावर तिच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली. त्यानुसार बाजीरावांनी पुण्याजवळ असलेल्या पाबळ या गावी मस्तानीसाठी स्वतंत्र महाल बांधला. त्याभोवती टकारी समाजातील तरुणांना चोवीस तास पहा-यावर ठेवण्‍यात आले. त्यासाठी त्यांना तनखे देण्यात आले. त्या समाजाने मस्तानीचे चोख रक्षण केले. मस्तानी कधी कधी घोड्यावर बसून जवळच्याच तलावात अंघोळीसाठी निघाल्यावर तिच्या आजूबाजूला पहारा देण्यासाठी उचल्या समाजाचे हत्यारबंद रक्षक असायचे.

एकोणीसाव्‍या शतकाच्‍या उत्तरार्धात समाजात स्वराज्यनिर्मितीचे वारे वाहू लागले. स्वदेशीच्या भावनेने समाज भारावून गेला. इंग्रजांविरुद्ध दोन हात करायचे तर धन पाहिजे आणि ते धन मिळवण्यासाठी टकारी समाजाने इंग्रजांच्या तिजो-या फोडण्यास; तसेच, श्रीमंतांची घरे लुटण्यास सुरुवात केली. स्वराज्यासाठी लढणारे किंवा स्वराज्याचा ध्यास घेतलेले त्या काळचे जे राजे महाराजे होते त्यांना मदत करण्याचे काम टकारी समाजाने केल्याची नोंद इतिहासात आहे.

टकारी समाजासह इतर भटक्या विमुक्त समाजाचे या प्रकारचे बंड मोडून काढण्यासाठी इंग्रजांनी १८७१ मध्ये खास गुन्हेगारी कायदा करून त्या समाजातील म्होरक्यांना अटक केली. तेव्हापासून टकारी समाजासह पारधी, मांगगारूडी, रामोशी, वडार, कैकाडी, पामलोर, राजपूत भामटा, कंजारभाट या जमाती गुन्हेगार जमाती म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. ब्रिटिशांच्या गॅझेटमध्ये पारधी, टाकणकर आणि टकारी ही एकच जात असल्‍याची नोंद केलेली आहे. पारधी आणि टाकणकर हे आदिवासींना मिळणाऱ्या सवलतींना पात्र झाले. उचले, टकारी मात्र महाराष्ट्रात चोर, गुन्हेगार, बदमाश म्हणून अगतिकतेने जगत राहिले.

टकारी समाजात गरोदर बाईला कष्टाची कामे देण्‍याची प्रथा आहे. त्‍यामध्ये स्वयंपाक, कपडे धुणे, भांडी घासणे आदी कामांचा समावेश असतो. गरोदर बाईला पाचवा महिना लागल्यानंतर माहेरच्‍या मंडळींकडून लपून चोळी, बांगड्या दिली जाते. त्या प्रकाराला ‘चोरचोळी’ असे म्हटले जाते. मावशी किंवा नणंद सर्व प्रकारच्या भाज्या घेऊन येत असते. सातव्या महिन्यात डोहाळे जेवण असते. बाईचे पहिले बाळंतपण माहेरी होते. मुलगी झाली, तर कोंबडी आणि मुलगा झाला तर कोंबडा कापला जातो. पाळणा वाढू दे, कुटुंबाला सुख-समाधानाने ठेव, यासाठी न्हाणीघराची पूजा केली जाते. बाळाची पाचवी पुजण्यासाठी सासरकडील मंडळी येतात.

टकारी समाजात हुंड्याची पद्धत नाही. मुलाकडच्या मंडळींकडून मुलीच्या मामाला मानपान अर्थात ऐपतीप्रमाणे 21, 51 रुपये द्यायचे असतात. त्‍यास ‘सुल्‍ला’ असे म्‍हणतात. सुल्लातील रकमेत मामा स्वत:चे काही रुपये टाकतो आणि त्‍यातून तो मुलीला विवाहात आहेर करतो. विवाहात मुलीकडील मंडळी सोयरे मंडळींना प्रत्येकी सव्वा किलो गूळ, डाळ, ज्वारी, गहू, तांदूळ देतात. त्यांना पिठले-भाकरी देण्याचा मान असतो. विवाहातील गोड जेवणानंतर पाहुण्यांना तिखट जेवण म्हणून बोकडाच्या मटणाची मेजवानी दिली जाते.

कर्नाटक, सौंदत्ती आणि सोलापूर जिल्ह्यातील को-हाळी येथील यल्लमा देवी टकारी समाजाचे कुलदैवत आहे. गुलबर्गा, अडलिंगी येथील यल्लमा देवीच्या यात्रेला कैकाडी, पामलोर आदी जातींसह टकारी समाज मोठ्या प्रमाणात जमतो. या समाजात जात पंचायत आहे. या समाजात अद्यापही अनेक अंधश्रद्धा पाळलया जातात. खरे-खोटे करण्यासाठी ‘तेलकढई’ पद्धत आहे. त्यानुसार, खोटे बोलण्‍याचा आळ असलेल्‍या व्‍यक्‍तीला उकळत्या तेलात हात टाकून नाणे बाहेर काढण्यास सांगितले जाते. खरे-खोटे करण्यासाठी ‘बोकी’ परीक्षासुद्धा द्यावी लागते. त्यामध्‍ये स्मशानातून मडके आणून त्‍याची बारीक पूड केली जाते. ती पूड परीक्षा देणा-याच्या हातावर देऊन थुंकीने त्या पुडीची गोळी करण्यास सांगितली जाते. थुंकी न पडल्यास किंवा गोळी न झाल्यास व्यक्ती खोटे बोलते, असे समजले जाते.

टकारी समाज हा गायकवाड आणि जाधव अशा दोन आडनावांत तसेच कसकनोरू, पपनोरू, भुमेनोरू, मिनगलोरू या गोत्रांमध्ये विभागला गेला आहे. समाजाची लोकवस्ती आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये आहे. समाज महाराष्ट्रात विशेष करून सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांमध्ये विखुरला गेला आहे. पूर्वी स्वातंत्र्यासाठी चो-या करणारा हा समाज स्वातंत्र्यानंतर मात्र उपेक्षित राहिला आणि त्यामुळे चोरी करणे, भामटेगिरी करणे हा त्या समाजाचा मुख्य व्यवसाय बनून गेला, कारण ते कौशल्य समाजातील तरुणांच्या हाती होतेच!

भारतात या गुन्हेगारी जमातींसाठी बावन्न सेटलमेंट (खुले कारागृह) बांधण्यात आली. त्यामधील सोलापूरचे खुले कारागृह हे देशातील सर्वांत मोठे कारागृह म्हणून ओळखले जाते. त्या कारागृहातील जमातींना आठवड्यातून दोन, तीन वेळा पोलिसांकडे हजेरी द्यावी लागत होती. परंतु एक चांगली गोष्ट घडून आली, ती म्हणजे कारागृहात राहणा-या मुलांना सक्तीचे शिक्षण देण्यात येत होते आणि प्रौढांच्या हाताला रोजगार दिला जात होता. त्यामध्ये गवंडीकाम, शिलाईकाम, सुतारकाम; तसेच, शेतातील मजुरीची कामे दिली जात होती.

सोलापूरचे माजी महापौर भिमराव जाधव यांनी भटक्या विमुक्त समाजासाठी देशातील पहिली आश्रमशाळा ३१ डिसेंबर १९५३ रोजी लांबोटी (जि. सोलापूर) येथे सुरू केली. ते टकारी समाजाचे जुनेजाणते नेते. ते नव्वद वर्षांचे आहेत. त्यांनी स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची भटक्या विमुक्त समाजातील इतर कार्यकर्त्यांबरोबर मुंबई येथे भेट घेतली व त्या समाजाला सेटलमेंटच्या तारेच्या कुंपणातून व गुन्हेगारीतून मुक्त करावे अशी विनंती केली. त्यानंतर ११ एप्रिल १९६० मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः सोलापूरला भेट दिली व सर्व समाजबांधवांना मुक्त केले.

बारामतीचे अविनाश गायकवाड, ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड आदींनीही त्या समाजासाठी मोठे कार्य उभे केले आहे. स्वातंत्र्यानंतर राज्यकर्त्यांनी त्या समाजाला संरक्षण, हाताला काम, राहायला घर, मुलांना शिक्षण दिले असते तर जो या समाजावर गुन्हेगारीचा शिक्का बसला आहे तो बसला नसता. स्वराज्यासाठी लढलेला टकारी समाज गुन्हेगार ठरला तो नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळेच! १९३६ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भटक्या विमुक्त समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु त्यानंतरच्या चौसष्ट वर्षांत त्या समाजाला गावकुसात सामावून घेण्याचा व त्यांना आरक्षण देण्याचा राज्यकर्त्यांकडून प्रयत्न झालेला नाही. ही त्या समाजाची शोकांतिकाच! समाजाला गुन्हेगारीच्या पाशातून मुक्त करणे व त्यांना आरक्षण मिळवून देणे ही दोन कामे अगत्याने होणे गरजेचे आहे!

– सूर्यकांत भगवान भिसे

(प्रस्‍तुत लेख सूर्यकांत भिसे यांच्‍या ‘भटक्‍यांची भटकंती’ या आगामी पुस्‍तकातून घेण्‍यात आलेला आहे. या लेखास दिलीप कु-हाडे यांनी ‘दैनिक सकाळ’मध्‍ये लिहिलेल्‍या टकारी समाजाबद्दलच्‍या लेखाचा आधार आहे.)

About Post Author

Exit mobile version