उपेक्षित जेऊरकुंभारी हवामान केंद्र

0
47
carasole

अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगांव तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावर जेऊरकुंभारी या गांवी पाटबंधारे विभागाच्या नाशिक येथील जलविज्ञान प्रकल्पांतर्गत हवामान केंद्र आहे. त्या केंद्राचे वर्गीकरण टी-२ असे करण्यांत आले आहे. ते ब वर्ग सरितामापन केंद्र आहे. भूपृष्ठावरील जलगुणवत्ता पर्यवेक्षण कार्यप्रणाली असे तिचे नाव आहे. त्या कार्यालयाची स्थापना पंचवीस वर्षांपूर्वी, १९८९ मध्ये करण्यात आली.

शासनाने लाखो रुपयांची यंत्रणा त्या ठिकाणी कार्यान्वित केलेली आहे. त्यांच्या देखभालीसाठी व निगराणीसाठी सध्या खलाशी म्हणून नानासाहेब पारवे यांना तेथे नेमण्यांत आलेले आहे. केंद्रामार्फत कोपरगांव तालुक्यातील हवामानविषयक नोंदी दररोज सकाळी व संध्याकाळी घेण्यात येतात. केंद्रावर बाष्पीभवन, स्वयंचलित पर्जन्यमान, साधे पर्जन्यमान, तापमान, आर्द्रतादर्शक, वायुवेग मापन, वायू दिशादर्शक, सूर्यप्रखरता मापक, तापमान मोजमाप करणारी अशी विविध यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. केंद्रामार्फत हवामानविषयक अहवाल दर महिन्याला नाशिक येथे जलसंपदा विभागाला कळवला जातो.

केंद्राजवळ गोदावरी नदीकाठी पाण्याची घनता व पूर प्रवाहाचा वेग मोजण्यासाठी डिझेल इंजिनवर चालणांरा रोप-वे च्या धर्तीवर पाळणा उभारण्यात आलेला आहे. गोदावरी नदीला जेव्हा पाणी येते तेव्हा नदीतील पाण्याची उंची, प्रवाहाचा वेग आदी मोजमापे तेथील यंत्रणेद्वारे घेतली जातात. केंद्रावर विसर्गमापन (हंगामी), तसेच हवामानविषयक नोंदी बारमाही घेतल्या जातात.

ते हवामान केंद्र १९.४७ अक्षांश, ७४.३० रेखांक्ष, पाणलोट क्षेत्र ६ हजार ६५७ चौरस किलोमीटर असून समुद्रसपाटीपासून उंची ४३४ मीटर इतकी आहे. पूर पातळी ४३१ मीटर पासून, गोदावरी नदीवरील खोरे; तसेच, उपखोरे त्या अंतर्गत येतात. पुणे विभागात कृष्णा खोऱ्यासाठी अठ्ठावन सरिता मापन केंद्रं असून, औरंगाबाद येथे सत्तेचाळीस, अमरावती (गोदावरी) येथे त्रेसष्ट, अमरावती (तापी) त्रेचाळीस तर ठाणे येथे अठ्ठावन सरितामापन केंद्रे आहेत. नाशिक उपविभागात नाशिक, निफाड, मुखेड, सामनगांव, पिंपळगांव, वडांगळी, कोपरगांव, आढळा, वाघापूर, पाडळी येथे ब वर्गाची सरिता मापन केंद्रे आहेत.

कोपरगांव तालुक्यातील जेऊरकुंभारी येथे अशा प्रकारचे हवामान केंद्र कार्यरत असताना देखील त्या परिसरातील नागरिकांना त्याची फारशी माहिती नाही. हवामान केंद्राची सर्व यंत्रणा तेथील एकमेव कर्मचारी नानासाहेब पारवे हे पाहतात. कार्यालयात संपर्क यंत्रणा नाही. बरीचशी यंत्रणा व टॉवर गंजले गेले आहेत. कोपरगांव संगमनेर रस्त्यावर असलेल्या हवामान खात्याच्या फलकाची दुरवस्था झालेली आहे.

या परिसरातील पाणी, हवामान यांचा अभ्यास झाल्यास त्याच्या अनेक गोष्टींचा येथील शेतक-यांना फायदा होऊ शकतो. शाळा-महाविद्यालयांनी तेथे भेटी देऊन माहिती घेतल्यास त्यांच्या ज्ञानात भर पडेल. तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. त्याची माहिती अवगत करण्यासाठी कौशल्य पणाला लावावे लागते. सन २००६ च्या ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान जो महापूर आला त्याची व्यापकता या हवामान केंद्राने अनुभवली आहे. तालुक्यातील हवामान, वा-याची दिशा, वेग आदि येथे तंतोतंत समजत असले तरी दुर्लक्षामुळे हवामान केंद्राच्या पदरी उपेक्षाच पडली आहे.

– महेश जोशी

(‘असे होते कोपरगांव’मधून उद्धृत)

About Post Author

Previous articleवावीचे वारकरी संत – रामगिरी महाराज
Next articleसाडीचा पदर – एक शोध!
महेश जोशी हे अहमदनगरचे राहणारे. त्‍यांनी एम. कॉम. पर्यंत शिक्षण घेतले. ते 1999 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. ते दैनिक 'लोकसत्‍ता' आणि दैनिक 'पुढारी' या वृत्‍तपत्रांचे कोपरगांव तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. ते विविध वृत्‍तपत्रांत राजकीय, सामाजिक विषयावर लिखाण करत असतात. ते हवामान केंद्र जेऊरकुंभारी प्रश्‍नांसंदर्भात व महापुर आपत्‍ती व्यवस्थापन कार्यालय कोपरगांव जागेसंदर्भात शासनस्तरावर पंधरा वर्षांपासून प्रयत्‍नशील आहेत. 'असे होते कोपरगांव' या पुस्तकाच्‍या निर्मितीत त्‍यांचा सहभाग होेता. त्‍यांनी शासनाच्या तंटामुक्‍त गाव समितीवर पत्रकार प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. त्‍यासंदर्भात त्‍यांनी अकोले, जळगाव, रावेर, धुळे आदि गावांत जाऊन तंटामुक्‍ती संदर्भात जनजागृती व मार्गदर्शन केले आहे. लेखकाचा दूरध्वनी भ्रमणध्वनी-94 23 16 71 77 लॅन्डलाईन टेलि फॅक्स-02423-223874