सटाणा शहराचा पाणी प्रश्न तीस-चाळीस वर्षांपासून टांगणीला पडला आहे. सटाण्याचे ‘तहान लागल्यावर विहीर खोदणे’ या वाक्प्रचारासारखे झाले आहे. शहरवासीयांनी पाणीटंचाई झाली की बोलायचे; नदीला आवर्तन सुटले, की शहरापुढे पाण्याचा प्रश्नच नाही असेच वागायचे.
शहरातील जो तो ज्याचा त्याचा पाणी प्रश्न जमिनीत बोरवेल करून सोडवू पाहतो. बरेच लोक प्रमाणापेक्षा जास्त पाणी वापरतात. पाण्याची भरमसाठ नासधूस करतात. गावातील लोकांना पिण्यास पाणी नाही हे माहीत असूनही बंगलेवाले भरदुपारी नळीने बंगल्यांच्या आजुबाजूला पावसाळा वाटावा इतके पाणी सांडतात; मोठ्या इमारतींवरील टाक्या ओसंडून छताच्या पन्हळीतून पाणी वाहत राहते. वाहने रोज नळी लावून धुतली जातात. नदीला पाण्याचे आवर्तन आले, की शहरांच्या रस्त्यांतून- गटारांतून पिण्याचे पाणी वाहते, पण नळ कोणी बंद करत नाही. पाणी पिण्यासाठी म्हणून नदीत धरणांतून सोडले की नदीकाठचे शेतकरी वीजमोटर लावून नदीचे पाणी शेतात खेचून घेतात. नदीकाठी विहिरी खोदून, पाईपलाईन करून दूरवरून पाणी शेतात घेऊन येतात. ‘पाण्यासारखा पैसा खर्च करणे’ असा वाक्प्रचार मराठी भाषेत आहे. तो उलटा करावा लागेल. आता, पाणी पैशांसारखे काटकसरीने वापरावे लागेल.
केळझर योजना बारगळली. बागलाण तालुक्याच्या पंचवीस किलोमीटर पश्चिमेला तालुक्यात केळझर नावाचे गाव आहे. तेथे आरम नदीवर धरण आहे. काही वर्षांपूर्वी त्या धरणातून सटाण्याला पिण्यासाठी पाणी मिळणार होते. मात्र अल्पसाठा आणि शेतीसाठी पाणी राखीव केल्याने योजना पूर्ण झाली नाही. सटाणा शहर चणकापूरच्या पाणी आवर्तनांवर तग धरून आहे. सटाणा तालुक्याला लागून पश्चिमेला कळवण तालुक्यात चणकापूर गावाजवळ गिरणा नदीवर ते मोठे धरण आहे. ते इंग्रजांनी बांधले आहे. हे आवर्तन फक्त सटाण्यासाठी नाही. मालेगावला त्याच गिरणा नदीतून पाणी पुढे वाहते. चणकापूर हे धरण गिरणा नावाच्या नदीवर आहे. आणि सटाण्यापासून दक्षिणेकडे दहा मैलाच्या अंतरावरून ती मालेगावकडे वाहते. मालेगाव सटाण्याच्या पस्तीस किलोमीटर पुढे असूनही पाणी मालेगावला पुढील आवर्तनापर्यंत पुरते. मालेगावची लोकसंख्याही सटाण्यापेक्षा जास्त आहे. मालेगावला पाण्याचे कोणतेच स्रोत नाहीत. तरीही तेथे पाणीटंचाई नाही. कारण आधीपासून दूरदृष्टीने तयार करून ठेवलेले तलाव तेथे आहेत. सटाण्याच्या आसपास पाणी स्रोत आहेत. ते शहरवासीयांनी आतापर्यंत अडवले नाहीत; मुक्तपणे वाहून जाऊ दिले. त्याचाच अर्थ सटाण्यात पाण्याची कृत्रिम टंचाई आहे; नैसर्गिक नाही.
सटाणा शहर पुनंद जलवाहिनी योजनेच्या आशेवर जगत आहे. कळवण तालुक्यात पुनंद हे दुसरे धरण अलिकडे बांधण्यात आले. त्या धरणातून जलवाहिनी टाकून सटाण्याला पिण्याच्या पाण्याची योजना महाराष्ट्र शासनाने नुकतीच मंजूर केली आहे. ती योजना पूर्ण झाली पाहिजे. कोणत्याही शहराला- गावाला सनदशीर मार्गाने पाणी मिळावे. कळवणवासी म्हणतात ‘सटाणा तालुक्यातील थोडेफार पाणी पुनंद धरणात येते. त्याचा अर्थ सटाण्याला पाण्यावर हक्क सांगता येत नाही’. कळवण हे तालुक्याचे गाव आणि तालुका आहे. तेथील स्थानिक रहिवासी आणि शेतकरी त्या जलवाहिनीतून पाणी नेण्याच्या योजनेला विरोध करत आहेत. त्यांच्या शेतीला पाणी मिळावे असे त्यांचे म्हणणे आहे. समजा, तसे असले तरी पिण्यासाठी पाणी मिळणे हा सटाणावासीयांचा हक्क आहेच.
नद्या, धरणे, भूगोल, खगोल ही मालमत्ता राष्ट्रीय असते. खाजगी नव्हे. मुंबईची तहान नाशिक जिल्ह्यांतील धरणांमुळे भागते. मराठवाड्यासाठी पाणी गंगापूर धरणातून सोडले जाते. कर्नाटकातून तामिळनाडूला पाणी सुटते. इतकेच काय चीनचे पाणी भारतात आणि भारताचे पाणी पाकिस्तानात जाते. मात्र कळवणचे पाणी सटाण्याला मिळू नये असे कळवणवासी म्हणतात! त्या योजनेतून पाणी मिळेलच अशी खात्री असली तरी सटाण्याने पर्यायी व्यवस्था राबवली पाहिजे. एकाच कोठल्यातरी योजनेवर विसंबून राहता कामा नये.
ठेंगोड्याजवळील (गिरणा नदीत) विहिरीजवळ (मातीचा का होईना) बांध घालण्यास हवा. तसेच, आरम नदीत विशिष्ट अंतरावर चार बांध घालून ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ योजना श्रमदानातून स्वयंस्फूर्तीने राबवू या. नदीकाठी दोन विहिरी खोदाव्या लागतील (आरमकाठी कोणी विधींना जाणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल). झाडे दोन्ही थड्यांवर लावून देवराई निर्माण करू या. देवराईमुळे पर्यावरणाचे रक्षण होईल, नदीतील पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही आणि देवमामलेदारांच्या मंदिराची शोभा वाढेल (संदर्भ: ‘माणूस जेव्हा देव होतो’ ग्रंथ). (सटाण्याला यशवंतराव भोसे या इंग्रजांच्या काळी होऊन गेलेल्या मामलेदारांचे मंदिर आहे. त्यांना देवमामलेदार या नावानेही ओळखतात. लोकांनी त्यांना त्यांचे समाजकार्य आणि धार्मिक वृत्ती यांमुळे देवपण दिले.) सटाण्याच्या आसपास सरकारी जमीन ताब्यात घेऊन पाण्याचा साठा करण्यासाठी तलाव उभारला पाहिजे (जुन्या अमरधामजवळ आसपासच्या गावांतील वा सटाण्यातील नागरिकांनी विहिरींसाठी जमिनी घेऊन शेतीसाठी जलवाहिन्या टाकल्या असतील; त्या पाणीटंचाई असतानाच्या काळात सक्तीने बंद करून पाणी पिण्यासाठी राखीव ठेवता येईल. पाणी विकणार्या वाहनांनाही तेथून पाणी घेण्यास मनाई असावी). पावसाळ्यातील पाणी वाहून जाऊ न देता साठवले गेले पाहिजे. नदी नुसती नांगरली तरी पाणी खूप मुरते आणि गावाजवळची पाणी पातळी उंचावते. बांध घातले तर त्यांचा परिणाम लगेच दिसून येईल. रेन हार्वेस्ट योजना शहरांत राबवली जाण्यास हवी.
सामाजिक बांधिलकी पाळणार्या सटाण्याच्या सर्व तटस्थ नागरिकांनी एक निर्णय घेतला आहे. तो निर्णय पाणीप्रश्न सुटला नाही तर लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा आहे. ते हत्यार खूप प्रभावी ठरू शकते. त्यात कोणतेही राजकारण नसून ती स्वयंस्फूर्त लोकचळवळ आहे. ते हत्यार सर्वसामान्य लोकांना उपसावे लागावे हे दुर्दैव आहे. पण तो निर्णय नागरिकांना पाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी नाईलाजाने घ्यावा लागला आहे. पाणी आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही, कोणाविरूद्ध नाही आणि कोणाच्या बाजूनेही नाही. ते आंदोलन फक्त पाणीटंचाईच्या विरूद्ध आहे आणि हक्काचे पाणी मिळण्याच्या बाजूनेही आहे. सटाण्यातील सर्व नागरिकांनी श्रमदान करून त्यांची तहान भागवावी, त्याला इलाज नाही.
सटाण्याची समस्या उदाहरणार्थ म्हणून येथे मांडली आहे. सर्वदूर, जेथे जेथे पाणीटंचाई आहे, त्या त्या गावा-शहरांतील नागरिकांनी अशा पद्धतीने श्रमदानातून ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ ही लोक चळवळ उभी करावी.
– सुधीर रा. देवरे 9422270837, 7588618857,sudhirdeore29@rediffmail.com
खूप खूप आभारी आहे
खूप खूप आभारी आहे
Comments are closed.