ईप्रसारण – मराठी रेडियो देशोदेशी ! (First Marathi Internet Radio)

3
199
अतुल आणि विद्या वैद्य व मिलिंद आणि मधुरा गोखले

अमेरिकेतीलवैद्य आणि गोखले नावाच्या दोन मराठी दाम्पत्यांनी ईप्रसारण हा इंटरनेट रेडिओ 2006 साली सुरू केला. तो भारतीय गाणी आणि भारतीय भाषांतील कार्यक्रम जगभर पोचवणारा जगातील पहिला मराठी इंटरनेट रेडिओ ठरला. त्यानंतर तसे अनेक हौशी, धंदेवाइक रेडिओ जगभर जुळून आले, बंद पडले, परंतु ईप्रसारण पंधरा वर्षे दिमाखात चालू आहे; नव्हे, तो रेडिओ व्हिडिओ रूपात अवतरू पाहत आहे. ईप्रसारण हौसेने सुरू झाले. त्या काळात परदेशात राहणाऱ्या मराठी माणसांना हिंदी-मराठी गीते, मान्यवरांच्या मुलाखती अशा कार्यक्रमांचे नावीन्य होते. त्यांची ती हुरहुर ईप्रसारणने दूर केली. स्वाभाविकच, त्या रेडिओला एकशेतीस देशांमधील जवळजवळ वीस लाखांच्यावर श्रोते लाभले आहेत ! अमेरिकेत सुरू झालेला तो रेडिओ नाशिकमधून चालवला जात आहे. वैद्य-गोखले यांच्यामधील गोखले दूर झाले आहेत आणि अतुल व विद्या वैद्य हे जोडपे अमेरिका सोडून, भारतात येऊन नाशिकला स्थिरावले आहे.

स्वरसंध्याआणि आपली आवडहे दोन कार्यक्रम ईप्रसारणवर गेली पंधरा वर्षे सुरू आहेत. जगभरातील श्रोत्यांची आवड लक्षात घेऊन, ती ऐकून हा रेडिओ त्यांची फर्माईश लावतो. मी व माझ्या काही मैत्रिणींनी ई-मेलवर गाण्यांची फर्माइश केली तर आम्हा प्रत्येकीचे गाणे कधी, किती वाजता, कोणत्या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे याबद्दल मेल आला आणि खरोखरीच, आम्हा प्रत्येकीला कळवलेल्या त्या त्या वेळी ती ती गाणी ऐकण्यास मिळाली ! आम्ही सगळ्या जणी ईप्रसारण इंटरनेट रेडिओशी जोडल्या गेलो. गप्पागोष्टींतून, मान्यवरांच्या मुलाखती आणिआपकी पसंदमधून श्रोत्यांच्या आवडीची हिंदी गीते, तर बॉलिवूड रागाया कार्यक्रमात रागांवर आधारित हिंदी गीते असे कार्यक्रम ईप्रसारणवर होत असतात. कार्यक्रमाचे मेनुकार्ड वाचल्यावर प्रत्येक व्यक्तीच्या आवडीचे काही ना काही तेथे मिळणार हे कळते.

अतुल आणि मिलिंद

ज्या काळात इंटरनेटचे तंत्रज्ञान सर्वसाधारण उपलब्ध नव्हते अशा काळात रेडिओची संकल्पना आखून ती मूर्त स्वरूपात साकार करणारी दोन जोडपी आहेत – अतुल आणि विद्या वैद्य व मिलिंद आणि मधुरा गोखले. ती सिलिकॉन व्हॅलीमध्ये नोकरीच्या निमित्ताने राहत होती. त्यांची ओळख बे एरिया महाराष्ट्र मंडळातील कार्यक्रमात झाली. आकाशवाणी आणि विविध भारती हा भारतीय जीवनाचा 1950 ते 1970 पर्यंत एक भाग होता. तशी हिंदी-मराठी गाणी अमेरिकेत कानावर पडत नाहीत ही रुखरुख त्या चौघांनीही एकमेकांना बोलून दाखवली. अमेरिकेत तेव्हा स्थिरावत असलेल्या सर्व मराठी माणसांचे दु:ख होते ते. गाणी ही आयुष्यात भावनांचे आदानप्रदान करत असतात; तसेच, संगीत उत्साह वाढवते. ते स्वसंस्कृतीचे असेल तर व्यक्ती त्याच्याशी जास्तच जोडली जाते. तेव्हा एका क्लिकवर युट्युबवर किंवा गुगलवर गाणी ऐकता येत नव्हती, मोबाईल फोनदेखील नव्हते. हिंदी, मराठी गाणी-कार्यक्रम ऐकवणारे रेडिओ स्टेशन असावे असे परदेशस्थ अनेकांना वाटत होते. पण ती यंत्रणा तयार करणे खर्चिक होते. अतुल वैद्य आणि मिलिंद गोखले हे मित्र एकत्र आले आणि त्यांनी इंटरनेट रेडिओची कल्पना राबवली.

अतुल वैद्य हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयर होते. त्यांना एस्क्वायर (Esquire) कंपनीत ऑडिओ व्हिडिओ इंजिनीयरिंग कामाचा अनुभव होता, तर मिलिंद गोखले हे सॉफ्टवेअर इंजिनीयर आणि प्रोग्रामिंगमधील जाणकार. सातत्याने कार्यक्रम देण्याची जबाबदारी विद्या आणि मधुरा यांनी घेतली. दोघी महाराष्ट्र मंडळात विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करत, नाटकांत भाग घेत. मधुराने त्यांच्या रेडिओसाठी स्वरसंध्याकार्यक्रमाची निर्मिती केली तर विद्याने आपली आवडहा कार्यक्रम तयार केला. डेट्रॉईटमधील सुभाष केळकर यांच्याकडून आणखी एक कार्यक्रम मिळाला, तो म्हणजे गीतांजली‘. कॅलिफोर्नियात राहणारे वैद्य आणि गोखले यांचे मित्र आनंद घाणेकर यांनी रेडिओसाठी ईप्रसारण हे नाव सुचवले आणि विश्वास गोडबोले यांनी मोठ्या हौसेने सिग्नेचर ट्युन करून दिली. त्या ट्यूनची हकिगत वैद्य सांगतात. गोडबोले हौशी संगीत दिग्दर्शक. त्यांनी काही तासांत संगीत आखून दिले व विद्याने काही मिनिटांत मराठी शब्द रचले. नवे घडवण्याच्या उत्साहात असे अपूर्व काही होऊन जाते !

विद्या आणि मधुरा

रेडिओ सुरू झाला ते साल होते 2006. तेव्हा तीन कार्यक्रम होते. अतुल आणि मिलिंद यांची टेक्निकल बाजू मजबूत होती. त्यांनी कार्यक्रमाचे प्रोग्रामिंग करून ते सर्व अपलोड केले आणि ठरावीक वेळी तो आपोआप सुरू होईल अशी व्यवस्था केली. गंमत अशी, की विविध गीतांसाठी लोकांच्या मागण्या येऊ लागल्या. तेव्हा त्या गीतांचे कवी, संगीतकार वगैरे संशोधन आवश्यक झाले. ती माहिती गोळा करावी लागली. काही कार्यक्रम सादर करण्यासाठी संहिता लिहावी लागली. विद्या आणि मधुरा यांनी ती मेहनत घेतली. मधुरा आणि विद्या यांच्या निवेदनामुळे अनेक लोक त्यांचे फॅन बनले. मधुराला देशादेशांतून फोन येऊ लागले. त्यांना त्यांचा रेडिओ अनेक देशांत ऐकला जातो आणि फर्माईशचे मेल येतातहा विचार अधिक प्रगतीकडे नेणारा ठरला. हौशी लोक स्वतःहून मदत करू लागले. सुभाष केळकर हे लोकल रेडिओवर वीस मिनिटांचा कार्यक्रम सादर करत असत. त्यांनी तो कार्यक्रम एक तासाचा करून ईप्रसारणला दिला. बळ असे वाढत होते. गाण्यांचा खजिना अतुल वैद्य यांच्याकडे होता. ते सतरा वर्षे हॉंगकॉंग येथे नोकरी करत होते. त्यांनी तो तेथे पैदा केला होता.

मामबो कट्टाही ईप्रसारणाची खास निर्मिती, ईप्रसारणवरील मामबो कार्यक्रम म्हणजे माझा मराठीचा बोल !त्यात मराठी माणसांना कथा, कविता असे साहित्य सादर करण्यासाठी खास वेळ दिली जाते. विविध प्रकारचे कार्यक्रम ऑडिओ स्वरूपात तेथे अपलोड होतात. लवकरच ते व्हिडिओ स्वरूपातही होणार आहेत. मामबो कट्टा चालवणारी निवेदिका सायली मोकाटे-जोग ही लोकप्रिय आहे. अतुल सांगत होते, “आम्ही प्रत्येक रेडिओ कार्यक्रमात वेगळेपण आणण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, सुधीर गाडगीळ यांची निवेदने आणि त्यांनी घेतलेल्या मुलाखती यांवर अनेक लेख वर्तमानपत्रांत आले आहेत. पण त्यांनी पंचवीस पुस्तकांचे लेखन केले ही माहिती आम्ही ठळक करून लोकांपर्यंत पोचवली. सुधीर गाडगीळ यांची लेखक म्हणून मुलाखत घेतल्यामुळे गप्पागोष्टीकार्यक्रम वेगळा ठरला. संगीत सुधाहा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम कॅलिफोर्नियाचे विवेक दातार सादर करतात. कॅलिफोर्नियाचे मंदार कुलकर्णी यांचा विश्वसंवादनावाचा आणखी एक कार्यक्रम ईप्रसारणने सुरू केला आहे. त्या कार्यक्रमात काही आगळेवेगळे करणाऱ्या जगातील अनेक व्यक्तींच्या मुलाखती प्रसारित होतात. आता व्हिडिओसुद्धा त्या कार्यक्रमात समाविष्ट होत आहेत.

अतुल वैद्य स्वत: निवेदकदेखील बनले आहेत. ते आपकी पसंदहा हिंदी गीतांचा कार्यक्रम तसेच बॉलिवूड रागाहा रागदारीवर आधारित चित्रपटगीतांचा कार्यक्रम सादर करतात. ते म्हणाले, की तांत्रिक प्रगती खूप झालेली आहे. झूम मीटिंग, एडिटिंग अशा तंत्रांमुळे माणूस कोणत्याही देशात असला तरी त्याची मुलाखत घेता येते आणि व्हिडिओही बनवता येतो. अतुल वैद्य यांचा स्वतःचा स्टुडिओ नाशिकमध्येअसल्यामुळे आणि ते तंत्रज्ञान त्यांना अवगत असल्यामुळे हळूहळू ईप्रसारण रेडिओ ऑडिओकडून व्हिडिओकडे जात आहे.

वेगवेगळ्या देशांतील लोकांनी रेडिओ ऐकावा म्हणून वेळेचे नियोजन महत्त्वाचे होते. अतुल वैद्य म्हणाले, की भारतात दिवस असतो तेव्हा अमेरिकेत रात्र असते किंवा काही देश चार ते पाच तास मागे किंवा पुढे असतात. मग सगळ्यांना कार्यक्रम कसा ऐकता येईल यावर विचार करून एक तोडगा काढला. सर्वच्या सर्व कार्यक्रम सोमवारी ईप्रसारण.कॉम (www.eprasaran.com) या वेबसाईटवर अपलोड करून ठेवले जातात. ते आठवडाभर तेथेच राहतात. त्यामुळे लिंकवर जाऊन कोणीही- केव्हाही कार्यक्रम ऐकू शकतात. ती सोय झाल्याने ईप्रसारणवर एकशेतीस देशांतील हिंदी-मराठी माणसे जोडली गेली आहेत.

अतुल आणि विद्या वैद्य हे 2015 साली परदेशातून भारतात परत आले व तेथेच स्थिर झाले. ते रेडिओचे संचालन नाशिक येथून स्वतःच्या स्टुडिओतून करतात.

वैद्य अडुसष्ट वर्षांचे आहेत. त्यांच्याकडे गाणी, मुलाखती, संवाद-संभाषणे व इतर कार्यक्रम यांचा मोठा डेटा जमलेला आहे. त्याचे जतन व्यवस्थित केले गेले आहे. मात्र संदर्भसूची तयार नाही. अतुल यांच्या खजिन्यात रत्ने लपलेली असणार. त्यांतील बहुतेक रेकॉर्डिंग मोठ्या मराठी माणसांचे अमेरिकेत केले गेले आहे. स्वाभाविकच, त्यात अनमोल अनौपचारिक माहिती असणार आहे. वैद्य म्हणाले, की हा रेडिओ हौशीने सुरू झाला. त्याचे स्वरूप तसेच ठेवायचे आहे. त्यात व्हिडिओचा घटक आला तरी त्याचे स्वरूप व्यावसायिक होणार नाही.

अतुल वैद्य eprasaran@yahoo.com

मेघना साने 98695 63710 meghanasane@gmail.com

मेघना साने मुंबई विद्यापीठाच्या एम ए, एम फिल पदवीधारक आहेत. त्या ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’च्या ठाणे शहर शाखेच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी मराठी रंगभूमीवर नाट्यसंपदाच्या तो मी नव्हेचसुयोगच्या लेकुरे उदंड झाली या नाटकांमधून पाच वर्षे भूमिका केल्यानंतर एकपात्री प्रयोगाची स्वतंत्र वाट चोखाळली आहे. त्यांनी कोवळी उन्हेया स्वलिखित एकपात्री प्रयोगाचे देशविदेशांत दौरे केले आहेत.

————————————————————————————————————————————————————————————-

About Post Author

3 COMMENTS

  1. अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.����

  2. सुंदर आणि दुर्मिळ माहिती.साने मॅडमचे शब्द,मांडण्याची पद्धतअप्रतिम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here