भारताच्या वैभवशाली राजवटींतील नाण्यांचा अभ्यास करून ती संशोधनात्मक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न औरंगाबादच्या ‘देवगिरी महाविद्यालया’तील विद्यार्थी आशुतोष पाटील करत आहे. आशुतोष सध्या बारावीला असून विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. त्याचे वय सतरा वर्षांचे आहे. तो शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती (दुर्गराज रायगड)चा सदस्य आहे. तसेच, तो कोहिनूर ऑक्शन्स या नावाने ऐतिहासिक साधनांचा विक्रीव्यवहार चालतो तेथे मराठाकालीन नाण्यांसाठी तज्ज्ञ सल्ला देतो.
आशुतोषकडे इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन 2017 पर्यंतचा अशा अडीच हजार वर्षांच्या काळातील नाण्यांचा संग्रह आहे. त्यांतील काही नाणी अतिदुर्मीळ आहेत. त्याचे गाव बुलढाणा जिल्ह्यामधील मोताळा तालुक्यातील पानेराखेडी हे आहे. तो गावी दिवाळीमध्ये जायचा. त्यावेळी एकदा त्याला त्याच्या जुन्या घरात ब्रिटिशकालीन काही नाणी सापडली. ती त्याने गावातील मित्रांना दिली. पुढील वेळी गावी गेल्यावर त्याला त्याच्या घरी पुन्हा ब्रिटिशकालीन पाच-सहा नाणी सापडली. त्यावेळी त्याला नाण्यांबद्दल कुतूहल वाटले. त्याला तो शाळेत नववीत असताना त्या नाण्यांचा छानसा संग्रह करून त्यावर अभ्यास करू शकतो ही कल्पना सुचली. आशुतोषने महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. तो उर्दू, ब्राह्मी, खरोष्टी, मोडी या लिपी शिकत असून पाली व संस्कृत भाषा शिकण्याची त्याची इच्छा आहे.
आशुतोषकडे असलेल्या नाण्यांच्या संग्रहात गुप्त, सातवाहन, कुशाण, मोगल, ब्रिटिश व मराठा यांच्या कालखंडांतील नाण्यांचा समावेश आहे. त्यांचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन पुराव्यांचा आधार घ्यावा लागतो. नाणे अभ्यासायचे असेल तर त्या नाण्यावर दोन्ही बाजूंनी जे लिहिलेले असेल त्याचा आणि संदर्भित शिलालेखाचा सूक्ष्म विचार करून नाणे कोणत्या काळातील आहे ते ठरवावे लागते. नाण्यांची माहिती देणारी मराठी पुस्तके बाजारात कमी प्रमाणात उपलब्ध आहेत आणि जी आहेत ती सर्वसामान्य व्यक्तीच्या खिशाला परवडणारी नाहीत. आशुतोष नाण्यांबद्दल माहिती सांगणाऱ्या शिबिरांना आवर्जून उपस्थित राहतो. आशुतोष सांगतो, की आजकाल खोटी ‘दुर्मीळ’ नाणी खूप बनवली जातात. त्यातून खरे नाणे ओळखणे जरा कठीणच जाते. नाण्यांचा खरेखोटेपणा ओळखण्यासाठी नाण्याच्या बाजूची कट पाहिली जाते. खरे नाणे कास्टिंग टेक्निकने, कॅलिग्राफी-नाण्यावरील चिन्हे पाहून, मेटल अॅनेलिसिस करून ओळखता येते.
आशुतोषचे वडील प्लॉटिंगचा व्यवसाय करतात. आशुतोषची आई शिक्षिका आहे. त्यांचा आशुतोषला पूर्ण पाठिंबा असतो. तो नाण्यांबाबतच्या शंका ऑक्सफर्ड म्युझियमचे संबंधित क्युरेटर शैलेश भंडारे यांच्याकडून फेसबुकद्वारा व नाशिकचे चेतन राजापूरकर यांच्याकडून फोन-प्रत्यक्ष भेटी व इमेलद्वारा सोडवून घेतो.
आशुतोषचे दोन हजार वर्षांपूर्वी सत्ताधीश असलेल्या क्षत्रप राजवटीतील नाण्यांवर ‘पश्चिमी क्षत्रपांची नाणी’ हे पुस्तक प्रसिद्ध होत आहे. भारतातील सद्यकालातील एक, दोन, पाच आणि दहा या नाण्यांवर डेटिंग सिस्टम असते तशा प्रकारची डेटिंग सिस्टम पश्चिमी क्षत्रपांच्या नाण्यांवर आहे. ‘पश्चिमी क्षत्रपांची नाणी’ या पुस्तकात पश्चिमी क्षत्रपांच्या राजवटीतील अडतीस राजांची आणि त्या राजांनी त्यांच्या राजवटीत तयार केलेल्या नाण्यांची माहिती देण्यात आली आहे. तसेच, पश्चिमी क्षत्रप कोण होते? ते कोठून आले? त्यांच्या नाण्यांवरील चिन्हे कशी होती? नाण्यांवर लेख कसा आढळतो? वाचक ते वाचू कसे शकतो? हे सविस्तर लिहिले आहे. आशुतोषने पश्चिमी क्षत्रप राजवटीतील एका नाण्यावरील लेखाचे उदाहरण सांगितले. ‘राज्ञ महाक्षत्रप विरदामन पुत्र महाक्षत्रप रुद्रसेन’ यातील ‘राज्ञ’ या शब्दाचा अर्थ होतो ‘राजा. ‘राजा क्षत्रप विरदामन याचा पुत्र राजा महाक्षत्रप रुद्रसेन’ असा त्या लेखाचा अर्थ होतो. त्याचे ब्राह्मी लिपीवर देखील लिखाण चालू आहे.
शिवाजी महाराजांच्या राजवटीतील ‘अडीच हजार शिवराई’ नाणीही त्याच्या संग्रहात आहेत. त्याचे ‘शिवराई’ नाण्यांवर पुस्तक लिहिण्याचे काम सुरू आहे. ती सर्व नाणी जमवण्यासाठी त्याला खूप किंमत मोजावी लागली आहे. तो नाणी सुरक्षित राहवी म्हणून प्लास्टिक फोल्डरचा वापर करतो. प्राचीन नाणी, ब्रिटिशकालीन नाणी यांचा संग्रह करणाऱ्या व्यक्तीची नाशिकला सोसायटी आहे. आशुतोष ‘कलेक्टर सोसायटी ऑफ न्यूमिस्मॅटिक्स अँड रिअर आयटम्स’ या सोसायटीचा सदस्य असल्यामुळे संग्रहाच्या नोंदीसाठी त्याला दुसरीकडे धावपळ करावी लागत नाही.
त्याने तुघलक काळातील दगडी आणि लोखंडी तोफगोळे, तलवारी (मराठा धोप, निजामकालीन वर्क), जंबिया, कट्यार, दस्तऐवज, 1927 सालची ज्ञानेश्वरी, मुघलकालीन सुरई, शिवाजी महाराजांची वंशावळ, इतिहासकालीन पाचशे पुस्तके, पंचवीस फुटी कुंडली, दोन हजार वर्षांपूर्वीच्या ‘टेराकोटा’ मातीच्या बाहुल्या आदींचा संग्रह केला आहे. ‘टेराकोटा’ या बाहुलीचे वैशिष्ट्य म्हणजे त्या काळातील स्त्रियांची केशरचना, त्यांचे राहणीमान आणि शरीरसौष्ठव कशा पद्धतीचे होते त्याची माहिती त्या अभ्यासातून मिळते. सुंदर आणि रेखीव काम केलेल्या अशा त्या बाहुल्या आहेत. त्याच्याकडे असलेल्या पंचवीस फुटी कुंडलीचा संशोधनात्मक अभ्यास सुरू असून ती कुंडली जनतेसमोर मांडण्याचा त्याचा मानस आहे. ती 1630 सालची आहे. ती संस्कृत भाषेत असून त्यात बारा राशींचे ग्रह दर्शवण्यात आले आहेत. अखंड असलेल्या त्या कुंडलीत वापरण्यात आलेले रंग पानाफुलांपासून तयार करण्यात आले आहेत. त्याच्या संग्रहात असलेले शिवकालीन दस्तऐवज राजस्थानी भाषेतील आहेत आणि काही पत्रेसुद्धा आहेत. त्यांतील एका पत्रामधून ‘अंकाई किल्ल्यावर नाणी पाडण्याचे आदेश जिजाऊ यांनी चंद्रसेन भोसले यांना दिल्याचे’ स्पष्ट होते. ते पत्र 1665 सालचे आहे. तेवढेच नव्हे तर त्याच्याकडे शिवाजी महाराजांच्या वंशावळीची प्रतही आहे. त्यावर नागाचे चित्र असून ती 1689 साली बनवण्यात आली. आशुतोषला त्याच्या मित्रांनी संग्रह करताना साथ दिली.
‘असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड रिसर्च फाउंडेशन’ने आशुतोषच्या कामाची दखल घेतली आहे. त्याला ‘इंदूर मुद्रा परिषदे’ने ‘मुद्रा मित्र’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. तो नागरिकांना इतिहासकालीन जीवनशैलीची माहिती देण्यासाठी प्रदर्शने भरवत असतो. आशुतोष म्हणतो, “मला स्पर्धक म्हणून काम करायचे नाही, तर मला ती माहिती जाणून घ्यायची आहे आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवायची आहे.
आशुतोष सुनील पाटील 08698825074
ashutoshp1010@gmail.com
– शैलेश पाटील
आशूतोष पाटील एवढ्या लहान…
आशूतोष पाटील एवढ्या लहान वयात आपण चांगले कार्य करत आहात आपण आजच्या तरूण पिढीकरता आदर्श आहात,आपले पुढील कार्याकरता शुभेच्छा
मनःपुर्वक आभार !
मनःपुर्वक आभार !
Varry good job…
Varry good job congratulations Aashutosh beta
congrats Aashutosh Rahane…
congrats Aashutosh Rahane Patil
my wishes is always with you
I hope you still working good
Good jon
Good jon
Comments are closed.