आरोग्यपूर्ण समाजासाठी – समवेदना

6
43
carasole

दुसऱ्याची वेदना स्वत:ची समजून ती दूर करण्यासाठी एकत्रितपणे केलेले प्रयत्न म्हणजे ‘समवेदना’! आवश्यक वैद्यकीय सेवा वंचितांपर्यंत सहानुभूतीपूर्वक पोचवणे हे ‘समवेदने’चे ध्येय. प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चारूदत्त आपटे व त्यांचे सहकारी यांनी १ एप्रिल २००३ रोजी पुणे येथे ‘समवेदने’ची सुरूवात केली. न्युरोसायन्सेस ट्रस्ट व रिसर्च सोसायटीतर्फे ‘समवेदना’ उपक्रम चालतो. ‘समवेदना’चे कार्य उपचार, प्रतिबंध व जनजागृती या, आरोग्यक्षेत्रातील तीन स्तंभांवर आधारित आहे.

‘समवेदना’ गरीब व गरजू रुग्णांना सह्याद्री हॉस्पिटलच्या शाखांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत करते. हॉस्पिटलच्या डॉक्टरांची सेवा ‘समवेदने’मार्फत येणाऱ्या रुग्णांना विनामूल्य मिळते. शिवाय, त्यांना हॉस्पिटलकडून बिलांत मोठ्या प्रमाणावर सवलत मिळते. अधिक म्हणजे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना विनामूल्य मानसिक आधार दिला जातो. ‘समवेदना’ गुंतागुंतीच्या शस्त्रकिया व उपचार यांसाठी आर्थिक मदत देऊन असहाय्य व आर्थिक दृष्ट्या कमकुवत रुग्णांना मृत्यू वा गंभीर आजार यांतून वाचवण्याचे महत्त्वाचे काम करते. संस्थेतर्फे रुग्णांना आर्थिक मदत देण्यापूर्वी त्यांच्या घरच्या परिस्थितीची; तसेच, वैद्यकीय बाबींची शहानिशा केली जाते. संस्थेच्या वतीने एक हजार एकशेबावीस गरजू रुग्णांना आठ कोटी रुपये मदत दिली गेली आहे. म्हणजे त्या रुग्णांचे पुनर्वसनच झाले आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.

निम्न आर्थिक स्तरामधील स्त्रिया त्यांच्या आजारांकडे, स्वास्थ्याकडे सहसा दुर्लक्ष करतात. त्यांना औषधांचा, डॉक्टरांचा खर्च परवडत नाही व आजारपणासाठी सुट्टी घेतल्यास रोजगार बुडतो. यामुळे त्यांचा कल दुखणे अंगावर काढण्याकडे असतो. म्हणूनच ‘समवेदना’ गेल्या सात वर्षांपासून निम्न आर्थिक स्तरातील चाळीस ते साठ वयोगटातील स्त्रियांसाठी ‘कर्करोग पूर्वनिदान तपासणी उपक्रम’ राबवत आहे. पुणे व कराड येथे विनामूल्य तपासणीचा लाभ जवळपास दहा हजारांहून अधिक स्त्रियांनी घेतला आहे.

फॅमिली डॉक्टरांची व्यवस्था शहरांमधून नाहीशी झालेली दिसते. वैद्यकीय सेवाही महागडी झाली आहे. त्यामुळे गरीब घरांतील माणसे दवाखान्यात जाण्याची टाळाटाळ करतात. शहरी गरीब वस्तीत वाजवी दरात योग्य वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी पहिले ‘समवेदना क्लिनिक’ पुण्यात अप्पर इंदिरानगर येथे १२ फेबुवारी २०१६ रोजी सुरू करण्यात आले. तेथे फक्त पन्नास रुपयांमध्ये अनुभवी डॉक्टरांकडून तपासणी करून दोन दिवसांचे औषध (शक्यतो जेनेरिक) दिले जाते. तसेच पॅथॉलॉजी, क्ष-किरण तपासणी व इ.सी.जी. तपासण्या बाहेरील किंमतीच्या पन्नास टक्के दरांमध्ये करता येतात. सातशे रुग्णांनी तेथे आरोग्यसेवेचा लाभ घेतला आहे. तेथे दर महिन्याला साधारण दोनशे रुग्ण तपासणी/पुनर्तपासणीसाठी येत असतात.

‘समवेदना’ ग्रामीण व शहरी गरीब वर्गांतील स्त्रियांसाठी आणि शाळेतील मुलांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीरे यांचेही आयोजन करते. किशोरवयीन मुली व स्त्रिया यांना आरोग्यविषयक माहिती देऊन त्यांच्याशी चर्चाही करण्यात येते. तशी सदुसष्ट शिबिरे पुणे व कराड यांमध्ये विविध ठिकाणी घेतली गेली. अंदाजे सात हजार स्त्रियांनी व मुलांनी त्यांचा लाभ घेतला. त्यामुळे रोगनिदान वेळेवर होते. तसेच, आजाराचे निदान झाल्यास पुढील उपचारांसाठी अर्थसहाय्य केले जाते.

अवयवदान व त्वचादान यांसंबंधी जनजागृती उपक्रमांतर्गत विविध संस्था व महाविद्यालये यांमध्ये व्याख्याने आयोजित केली जातात. ‘समवेदना’ त्यांचे महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

आरोग्यपूर्ण समाज निर्माण करायचा तर केवळ आजारी व्यक्तींवर उपचार करून किंवा विशिष्ट आजार लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाय करणे पुरेसे नाही. त्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली जोपासली पाहिजे आणि त्याची सुरुवात बालपणी होणे अधिक योग्य. त्या दृष्टीने संस्थेने नोव्हेंबर २०१६ पासून ‘शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी उपक्रम’ सुरू केला आहे. दहावी उत्तीर्ण होणारा प्रत्येक विद्यार्थी हा ‘सशक्त आणि स्वत:च्या व सामाजिक आरोग्याबाबत जागरुक’ असला पाहिजे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांची सर्वसामान्य तपासणी, दात-डोळे यांची तपासणी केली जाते. तसेच आठवी ते दहावीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांची रक्त व लघवी यांची तपासणी केली जाते. सध्या सुरू असलेल्या उपक्रमाच्या पथदर्शी प्रकल्पात ग्रामीण भागातील दोन व शहरातील एक अशा तीन शाळांमधील दोन हजार सातशे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. तो उपक्रम पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांतील शाळांमध्ये जून २०१७ पासून राबवण्यात येईल.

संस्था मुळशी तालुक्यातील ग्रामीण वैद्यकीय दृष्ट्या दुर्लक्षित व गरजू भागासाठी शासनाच्या आरोग्य विभागाच्या मदतीने फिरता दवाखाना चालू करत आहे. त्या भागातील जनतेसाठी आरोग्य प्रशिक्षणाचे कार्यक्रमही राबवले जातील.

‘समवेदना’च्या कार्याचा लाभ दहा हजार व्यक्तींना दरवर्षी प्रत्यक्ष होतो. भाजण्यासारख्या गंभीर दुखण्यातून बऱ्या झालेल्या प्रवीणचा अनुभव ‘समवेदना’च्या कार्याची पावती देतो.

अहमदनगर तालुक्यातील श्रीगोंदा येथे राहणाऱ्या तेरा वर्षीय प्रवीणला ‘समवेदना’ने साडेतीन लाख रुपयांचे  सहाय्य केले आहे.

प्रवीण त्याच्या घरात संध्याकाळी टेंभा लावत असताना पंचवीस-तीस टक्के भाजला. मान, हात, छाती व पोटावर जखमा झाल्या. त्याच्यावर प्राथमिक उपचार गावाकडे झाले. तो पुण्यात ‘सूर्य हॉस्पिटल’ला दाखल झाला. त्याच्या घरी, आई, वडील, आजी, आजोबा, काका व मामा, सर्वजण शेतमजूर. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सव्वीस हजार रुपये फक्त. प्रवीणच्या भाजल्याच्या काही जखमा खोलवर होत्या. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दीड-दोन महिने राहणे आवश्यक होते. उपचाराचा खर्च आठ लाखांपर्यंत गेला. मुलाबरोबर आई व आजीही पुण्यात आल्या. त्या दोघी अक्षरश: रस्त्यावर भीक मागून त्यांची पोटापाण्याची सोय करत. प्रवीणचा जेवणाचा खर्चही ‘समवेदना’च्या काही कार्यकर्त्यांनी उचलला. त्यामुळे प्रवीण पूर्णपणे बरा होऊन त्याच्या घरी गेला.

विविध उपक्रमांच्या माध्यमातून हजारो वंचितांपर्यंत आवश्यक वैद्यकीय सेवा पोचवण्याच्या ‘समवेदना’च्या चळवळीमध्ये पंधरा पूर्ण वेळ कार्यकर्ते व तीस स्वयंसेवक यांची फळी कार्यरत आहे. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीती दामले यांच्या नेतृत्वाखाली व नितीनभाई देसाई, चारुदत्त आपटे, प्रकाश तुळपुळे आदी विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज चालते. स्वयंसेवी संस्था म्हटले की त्यांच्या कार्याकडे बघून कारभार दक्ष असला पाहिजे, असा कटाक्ष सहसा ठेवला जात नाही. परंतु ‘समवेदना’मध्ये सर्व उपक्रम व प्रशासन या विषयीच्या लिखित कार्यपद्धती (sop) आहेत.

संस्थेला दीड-दोन हजार रुपयांपासून मदत करणारे अनेक देणगीदार लाभले आहेत. संस्थेला दरवर्षी हजारो वंचितांपर्यंत पोचण्यासाठी दोन कोटींचा खर्च आहे. तो उभा करण्यासाठी संस्थेला समाजातून मिळणाऱ्या देणग्यांवर अवलंबून राहवे लागते. देणग्या आयकराच्या कलम ८० जी (80 G) नुसार कर सवलतीस पात्र आहेत. ‘समवेदना’चा डोलारा समाजातील दानशूर व्यक्तींच्या पाठिंब्यावर उभा आहे.

‘समवेदना’
सह्याद्री कॉर्पोरेट ऑफिस, प्‍लॉट क्र. 54,
लोकमान्‍य कॉलनी, वनाज कॉर्नरजवळ,
जीत ग्राउंडच्‍या समोर, कोथरूड, पुणे – 411038​
संपर्क क्र. – 02067215000
www.samavedana.org

– रोहिणी आठवले

About Post Author

6 COMMENTS

  1. Excellent informative,
    Excellent informative, inspirational article.
    Congratulations to the entire team

  2. माननीय,महोदय
    मी गणेश पवार…

    माननीय,महोदय
    मी गणेश पवार राहणार मुंबई
    माझ्या बायको ची आज spaine sargary आहे तर मला या संधी चा लाभ घेता येईल का

  3. गरिबांसाठी या मदतीची खूप गरज…
    गरिबांसाठी या मदतीची खूप गरज आहे आणि ती मिळत आहे..!

    खूप छान आणि अभिमानास्पद उपक्रम आहे..!

  4. गरिबांसाठी या मदतीची खूप गरज…
    गरिबांसाठी या मदतीची खूप गरज आहे आणि ती मिळत आहे..!

    खूप छान आणि अभिमानास्पद उपक्रम आहे..!

  5. गरिबांसाठी या मदतीची खूप गरज…
    गरिबांसाठी या मदतीची खूप गरज आहे आणि ती मिळत आहे..!

    खूप छान आणि अभिमानास्पद उपक्रम आहे..!

Comments are closed.