हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेता आमिरखान यांनी कुरुंदवाडच्या घाटावरील स्मशानभूमीत विश्रांती घेतली होती, असे जर कुणी सांगितले तर ते पटेल का? पण अपार थकल्यामुळे, त्यांनी तेथे तास-दीड तास विश्रांती घेतली होती अशी आठवण कुरुंदवाडच्या नागरिकांनी जपली आहे, आमिरखान यांचा ‘द रायझिंग सन – मंगल पांडे’ हा चित्रपट २००५ साली पडद्यावर आला, केतन मेहतांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. आमिरखानबरोबर राणी मुखर्जी, अमिषा पटेल आणि ओमपुरी यांच्या त्यात प्रमुख भूमिका आहेत. त्यावेळची ही गोष्ट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण देशाच्या विविध भागांत झाले. मात्र मंगल पांडे यांच्या जीवनातील उत्तर प्रदेशातील मेरठ भागात घडलेल्या काही प्रसंगांसाठी नदीकाठचा घाट हवा होता. आमिरखान आणि त्यांची टीम असे घाट पाहत हिंडत होते. टीममध्ये कोल्हापूरचा तरुण होता. त्याने बालपणी कुरुंदवाडचा कृष्णा घाट पाहिला होता. त्याने या घाटाची माहिती आमिरखान यांना दिली. टीम नाशिकचा गोदाघाट पाहून निघाली ती तडक कुरुंदवाडला पोचली. आमिरखान कुरुंदवाडच्या कृष्णा घाटावर आले. त्यांनी घाट चारी बाजूंना फिरून पाहिला. त्यांना व त्यांच्या टीमला घाट पसंत पडला. त्यांनी ‘मंगल पांडे’चे महत्त्वपूर्ण चित्रिकरण तिथे करण्याचा निर्णय घेतला.
मात्र आधीच्या प्रवासाने आमिरखान थकले होते. ते कुणाला काही न बोलता एका सहकार्यासह शेजारच्या स्मशानभूमीत गेले. तिथल्या झोपडीतील खाटल्यावर जाऊन पडले आणि क्षणार्धात झोपी गेले! चित्रपटसृष्टीतील आघाडीचा नायक आपल्या गावात आला आहे. तो चक्क गावच्या स्मशानभूमीतील खाटल्यावर दीड-दोन तास झोपी गेला आहे याची कुणकुण कुरुंदवाडवासीय नागरिकांना त्यावेळी लागली नाही. मात्र आमिरखान यांच्या या चित्रपटाने ‘मंगल मंगल हो’ हे गीत व कुरुंदवाडचा कृष्णेचा घाट देश-विदेशात जाऊन पोचले.
कुरूंदवाड सांगलीच्या दक्षिणेस तासाभराच्या प्रवास अंतरावर नृसिंहवाडीजवळ आहे. कृष्णाघाट हा नृसिंहवाडी आणि कुरुंदवाड यांच्यामध्ये येतो.
कुरुंदवाडच्या कृष्णा घाटाने कलावंतांना, समाजसेवकांना, राज्यकर्त्यांना आणि समाजाला गेली कित्येक वर्षे भुरळ घातली आहे. अनेक हिंदी-मराठी चित्रपट, टी.व्ही. मालिकांचे चित्रीकरण या घाटावर करण्यात आले आहे. त्यात माधवराव पेशव्यांच्या जीवनावर चित्रित झालेल्या ‘स्वामी’ या मालिकेचाही समावेश आहे. या घाटाला सर्वांत प्रथम चित्रित केले ते निर्माते, दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी. त्यांनी १९३२ साली प्रभात फिल्म कंपनीतर्फे ‘अयोध्येचा राजा’ या चित्रपटाची मराठीत व हिंदीत निर्मिती केली. या चित्रपटाचे कथानक राजा हरिश्चंद्राच्या जीवनावर आधारित आहे. राजा हरिश्चंद्राच्या स्वप्नात विश्वामित्र ऋषी राज्याची दक्षिणा मागतात. हरिश्चंद्र स्वत:चे राज्य विश्वामित्रांना खरोखरी देतात आणि पत्नी तारामतीसह जंगलात निघून जातात. हे निरोपाचे, बिदाईचे दृश्य कुरुंदवाडच्या कृष्णा घाटावर चित्रित करण्यात आले होते. यातील हरिश्चंद्राची भूमिका गायक-नट गोविंदराव टेंबे व तारामतीची भूमिका दुर्गा खोटे यांनी केली होती. राजा व राणी आणि त्यांचे प्रजाजन घाटावरील कमानी दरवाजातून पायर्या उतरून नदीकाठावर येतात. तिथे प्रजाजनांचा निरोप घेऊन राजा, राणी व नावाडी हे तिघे नावेतून नदीच्या पलीकडच्या काठावर जातात. तिथल्या पेरूच्या बागेतून ते जंगलात जातात. आज ज्या शेतांमध्ये ऊसाची शेती आहे, तिथे त्याकाळी पेरूच्या बागा होत्या. या चित्रीकरणात राजाला निरोप देणारी प्रजा म्हणून कुरुंदवाडच्या सहाशे नागरिकांनी भाग घेतला होता. त्या कामाबद्दल त्यांना प्रत्येकी पाच आणे बिदागी देण्यात आली होती.
कुरुंदवाडच्या याच कृष्णा घाटावर १९३३ साली यजुर्वेदा प्रमाणे यज्ञ करण्यात आला होता. यज्ञात भाग घेण्यासाठी वृंदावन, मथुरा, काशीसह देशाच्या विविध भागांतून ब्राह्मण आले होते. त्यांतील काही ब्राह्मण पुजार्यांनी मांसाहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्याच काळात केडगाव येथे अंधश्रद्धा निर्मूलन समिती ने भरवलेल्या अधिवेशनात उद्योगपती शंकरराव किर्लोस्कर व पंडित महादेवशास्त्री दिवेकर यांनी यज्ञाच्या कार्यक्रमावर जाहीर टीका केली होती.
महात्मा गांधींची ३० जानेवारी १९४८ रोजी दिल्लीत हत्या झाली. कोल्हापूरचे समाजसेवक माधवराव बागल यांनी १२ फेब्रुवारी रोजी त्यांच्या अस्थी व रक्षा कृष्णा घाटावर आणून, कृष्णा व पंचगंगा यांच्या संगमावर विसर्जित केल्या. त्यावेळी तिथे स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतलेले हजारो कार्यकर्ते उपस्थित होते, तेव्हापासून १२ फेब्रुवारी रोजी दरवर्षी घाटावर सूतकताई, प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केले जातात.
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले व्हावे म्हणून साने गुरुजींनी महाराष्ट्रात १९४८-४९ साली सत्याग्रह केला होता. या लढ्याची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी म्हणून ते प्रचार करत महाराष्ट्रभर फिरत होते. पंढऱपूरच्या सत्याग्रहाच्या आदल्या दिवशी, त्यांच्या उपस्थितीत कुरुंदवाड येथील कृष्णा घाटावर मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या या मुक्तिलढ्याला तत्कालीन ब्राह्मण समाजाचा विरोध होता. जेव्हा ते मेळाव्यासाठी कुरुंदवाड गावी आले तेव्हा कुरुंदवाड ते नृसिंहवाडी येथील ब्राह्मण समाजाने आपापल्या घरांची दारे बंद करून त्यांचा निषेध केला होता. कुरुंदवाडच्या कृष्णा घाटावरील मेळाव्यात, साने गुरुजींनी पंढरपूरचा विठ्ठल दलितांसाठी मुक्त झाला की महाराष्ट्रातील सर्व मंदिरे दलितांना खुली होतील असे वक्त्तव्य केले होते.
कृष्णा घाट हा कुरुंदवाड संस्थानचे संस्थानिक रघुनाथऱाव पटवर्धन यांच्या काळी, १७९६ साली बांधण्यात आला. रघुनाथराव पटवर्धन हे बुद्धिमान, शूर व धाडसी होते. कुरुंदवाड, सांगली, मिरज, बुधगाव आणि तासगाव ही पाच संस्थाने पटवर्धन वंशजांकडे होती, कुरुंदवाड येथे घाटाचे व गावात विष्णूच्या मंदिराचे बांधकाम एकाच वेळी सुरू असताना हे पाचही संस्थानिक रघुनाथरावांच्या नेतृत्वाखाली टिपू सुलतान यांच्याशी युध्द करण्यास गेले होते. या मोहिमेवेळी त्यांनी शिमोग्याहून पाठवलेल्या पत्रात ‘घाट व मंदिर दणकट बांधा’ असा उल्लेख केलेला आढळतो. रघुनाथराव यांचे अकाली निधन झाले आणि या घाटाचे काम अर्धवट राहिले. कृष्णा घाटाला त्याकाळी सहा हजार रुपये खर्च आला होता.
पंचगंगा व कृष्णा नदीच्या संगमावर बांधण्यात आलेल्या या घाटासाठी मोठमोठ्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. त्याचे बांधकाम चुन्यात केले गेले आहे. घाटाभोवती हिरवीगार वनराई, वर अथांग निळे आकाश व समोर दोन नद्यांचा नेत्रदिपक संगम यांमुळे घाटाच्या सौंदर्यात भर पडली आहे. घाटाचे बांधकाम होऊन दोनशे वर्षे उलटली आहेत. या घाटाने आजपर्यंत अनेक महापूर पाहिले पण त्यांचा घाटाला कधी धोका पोचला नाही. २००५ मध्ये आलेल्या महापुराने मात्र या परिसरात हाहा:कार झाला होता, ज्या कुरुंदवाड शहराला इथून पाणी पुरवले जाते ते शहर पाण्यात होते, मात्र घाटावर पाणी पोचू शकले नाही!
इतिहासकार दत्तो वामन पोतदार यांनी ‘महाराष्ट्रात कुठेही असा भव्यदिव्य घाट नाही’ असा उल्लेख केलेला आहे. कृष्णा घाटावर महादेव, गणपती, दत्त अशी मंदिरे हेमांडपती शैलीत आहेत. प्राचीन ऐतिहासिक वारसा जपणार्या दहा खोल्या आहेत. घाटाच्या उत्तर दिशेला घाटावरील तीन बुरूज व दक्षिणेला एक बुरूज आहे. घाटावरच नरवीर संताजी घोरपडे यांची समाधी आहे. इथे गेल्या पंचाहत्तर वर्षांपासून महाशिवरात्रीच्या काळात पाच दिवस यात्रा भरते. यात्रेसाठी महाराष्ट्र व कर्नाटकातून तीन लाखांवर अधिक भाविक येतात.
संस्थानकाळापासून कुरुंदवाड शहराला घाटावरून पाणीपुरवठा केला जातो. संस्थानकाळात १९३७ पासून इंजिनने नदीतील पाणी उचलून शहराला पुरवण्यात येत असे. १९७२ साली इथली पाणीपुरवठ्याची व्यवस्था राज्य शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपवली. प्राधिकरणाने दहा लाख शहाऐंशी हजार रूपये खर्च करून फिल्टरेशन प्लॅण्ट व पाण्याच्या तीन टाक्या बांधल्या. हे काम १९७६ साली पूर्ण झाले. नंतर नव्या पद्धतीने पाणीपुरवठा सुरू झाला. पाणी शुद्धिकरणासाठी ब्लिचिंग पावडरऐवजी लिक्विड क्लोरिन गॅस १ जानेवारी १९९९ पासून वापरण्यात येऊ लागला.
कुरुंदवाडच्या कृष्णा घाटवास्तूच्या देखभालीचे काम राज्य शासनाचा पुरातत्त्व विभाग व कुरुंदवाड नगरपालिका हे पाहतात. घाटाचा प्रश्न मांडून अनेकदा अनेक उमेदवारांनी निवडणुका लढवल्या, मात्र राजकीय नेते, सरकारी अधिकारी यांनी फारशी रूची न दाखवल्याने घाट उपेक्षितच राहिला आहे.
कुरुंदवाड नगरपालिकेने घाटाचे विस्तारीकरण व पर्यटनस्थळ बनवण्यासाठी सहा कोटी रुपये खर्चाची योजना राज्य सरकारकडे पाठवली आहे. योजनेत पुढील तीस वर्षांत कुरुंदवाड शहराची होणारी वाढ लक्षात घेऊन पाणी पुरवठा, योजनेचे विस्तारीकरण; तसेच घाटावरील खोल्यांची अंतर्गत दुरुस्ती, गिलावा, रंगकाम, विद्युतीकरण, पार्किंग व्यवस्था, शौचालय, तटबंदी, बगीचा सुशोभिकरण इत्यादी बाबींचा समावेश आहे. योजनेत कृष्णेच्या विस्तीर्ण पात्रात नौकानयनाद्वारे नृसिंहवाडी, कृष्णा घाट, औखाड येथील अमरेश्वर मंदिर व खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर असा जलविहार प्रस्तावित आहे.
– अशोक मेहता
9881658353
कुरुंदवाड शहराची माहीती वाचुन
कुरुंदवाड शहराची माहीती वाचुन खुप आनंद वाटला धन्यवाद।
कुरुंदवाड शहरा बद्दल इतकी
कुरुंदवाड शहराबद्दल इतकी चांगली माहिती वाचण्यास मिळाली. धन्यवाद!
माहिती खूप वाचनीय आहे .
माहिती खूप वाचनीय आहे . माहिती वाचून आनंद झाला …………………………
Comments are closed.