आपल्यातलेच अतिरेकी?

4
35
FOR CARASOLE

डॉ. नरेंद्र दाभोलकर (छायाचित्रः 'प्रहार' वृत्‍तपत्रातून साभार)डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या ही कोणाही सुसंस्कृत माणसाला सुन्न करणारी घटना आहे. टीव्हीवर व वृत्तपत्रांत ‘खून’ हा शब्द वापरून मिडियाने मराठीचे ज्ञानही प्रदर्शित केले आहे! बातमी सनसनाटी असल्याने गेले दोन दिवस माध्यमांना दुसरा विषय नाही.

मारेक-यांनी हे कृत्य पैशांसाठी केले म्हणावे, तर पेशाने डॉक्टर असूनही फकिराचे जिणे ज्याने आपणहून स्वीकारले, त्याच्याजवळ काय असणार? कौटुंबिक वैमनस्यातून काही घडले असावे, हेही शक्य नाही. इतका निर्मळ व पारदर्शी माणूस शोधूनही सापडणार नाही! डॉ. दाभोलकरांच्या विचारसरणीला प्रखर विरोध असणार्यांेचेच हे कृत्य असावे हे तर्कसंगत वाटते. ते लोक कोणत्याही पंथाचे असोत, ते अत्यंत भ्याड आहेत. नथुराम गोडसे स्वत: गांधीजींच्या हत्येनंतर पोलिसांच्या स्वाधीन झाले असे म्हणतात. मुस्लिम दहशतवादी संघटनासुद्धा घातपात केल्यावर दुस-या दिवशी त्याची जाहीर जबाबदारी घेतात. दाभोलकरांच्या मारेक-यांना नि:शस्त्र माणसावर गोळ्या झाडायचा कमकुवतपणा आहे. तो कुठल्याही धर्म / पंथाच्या शिकवणुकीतून येऊ शकत नाही. पण केल्या कृत्याची जबाबदारी घेण्याचे धैर्य अजिबात नाही.

माझ्या कुटुंबाचे डॉ. दाभोळकर यांच्याशी दूरचे नाते आहे. त्यांच्या आमच्याकडील मोजक्याच वास्तव्यात मला त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. मी स्वत: धार्मिक आहे, ईश्वराला मानते, विधी व प्रथा थोड्याफार पाळते, पण त्यांना नवीन स्वरूप  देण्याचा प्रयत्न करते. सत्यनारायण घरी करणे व मेहूण न बोलावता गरीब कुटुंबात चार माणसांचा स्वयंपाक करून पाठवणे, असे काहीबाही!
देव न मानणा-या व संपूर्ण बुद्धिप्रामाण्यवादी माणसास मोठे मनोधैर्य असावे लागते. प्रत्येक गोष्ट तर्काच्या व विज्ञानाच्या कसोटीवर घासून पाहणारा मनुष्य हा निर्भीड वृत्तीचा असतो. आम्ही सर्वसामान्य माणसे भित्री असतो. देव व दैवाच्या आधारावर आयुष्यातील बरेवाईट पचवण्याचा प्रयत्न करतो.

मी डॉ. शैला दाभोलकर यांना भेटण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी साता-याला पोचले. बाई खंबीर व धीरोदात्त वृत्तीच्या आहेत. म्हणूनच त्या दाभोलकरांसारख्या माणसास इतकी वर्षे सांभाळू शकल्या आणि त्यांना समाजकार्य व अंधश्रद्धा निर्मुलन समितीची कामे करण्यास मुक्त ठेवू शकल्या. त्यामुळे त्यांच्यामध्ये एका हतबल, रडणा-या बाईचे स्वरूप अपेक्षित नव्हतेच.

शैलाताई बरेच काही बोलत होत्या. त्यांना भेटायला येणा-यांची रीघ लागली होती. घरासमोरील मोकळ्या मैदानात डॉ. दाभोलकरांचे पार्थिव ठेवले होते व प्रचंड जनसमुदाय शोकाकूल होऊन पण शिस्तीने दर्शन घेत होता. तेवढ्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यमंत्री आर.आर. पाटील आणि इतर काही मंत्री व त्यांचा लवाजमा आत आला. दोघांनी शैलाताईंचे सांत्वन केले. त्यावर शैलातार्इंनी त्यांना परखड शब्दांत उत्तर दिले; ते असे –

“तुम्ही माझे सांत्वन करायला आलात याबद्दल धन्यवाद. परंतु दाभोलकर या बिलाबाबत तुमच्याशी चर्चा करण्यासाठी तुम्हाला भेटायला अनेकदा आले, तासन् तास थांबले, तुम्ही त्यांची साधी भेटही घेतली नाही. तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. तुमचे हस्तक उठण्यासाठी खुणा करत आहेत. पण मला जे सांगायचे आहे, ते मी सांगीनच. तुम्हाला खरोखर दु:ख झाले असेल व दाभोलकरांना श्रद्धांजली वाहायची असेल तर त्यांचे हे (जादुटोणा, अघोरी विद्या व नरबळीरोधक) बिल पास करा.”

मुक्ता, डॉक्टरांची मुलगी म्हणाली,

“अशी असुरक्षितता असेल व सरकार काहीच करत नसेल तर सर्वसामान्य कार्यकर्ता सामाजिक काम पुढे कसे चालू ठेवेल? समाजकारण करणारे सर्व लोक वैयक्तिक आयुष्याची तमा न बाळगता नि:स्वार्थीपणे कार्य करतात. ते त्यांनी कोणाच्या भरवशावर करावे? उत्तर आहे तुमच्याकडे? आमचं माणूस तर गेलंच. असे आणखी किती गेल्यावर तुम्ही जागे होणार? ”

मग एकेक करत अनेक स्त्रिया, कार्यकर्ते बोलले. सर्वांचा मुद्दा हाच, की सरकार निष्क्रिय आहे, आश्वासने पोकळ आहेत, आमचा तुमच्यावर विश्वास कसा बसावा? तुमच्या राज्यात सर्वसामान्य, कायद्याने चालणा-या माणसांचे भवितव्य काय?
मलाही राहवले नाही. मी म्हटले, “एक सर्वसामान्य नागरिक या नात्याने मला अत्यंत काळजी वाटते, की अभिव्यक्ती  स्वातंत्र्य व विचारस्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया आहे, तोच आज पायदळी तुडवला गेला आहे. आपले भवितव्य काय? दुसरे म्हणजे धर्माच्या नावाखाली चालणारा हा दहशतवाद आहे. तो अत्यंत घातक आहे. त्याबाबत आपण त्वरित पावले उचलावीत अशी विनंती आहे.”

एका घरात राज्यप्रमुख व मंत्री जातात. त्यांना स्पष्ट शब्दांत जाब विचारला जातो, सर्वसामान्य माणसे धीटपणे बोलतात व राज्यातील दोन ज्येष्ठतम मंत्री खाली मान घालून सारे ऐकतात, हे दृश्य खूप काही सांगून गेले!
या घटनेची मी साक्षीदार होते हे माझे भाग्य की दुर्भाग्य?

त्यानंतरही जमाव बाहेर सरकारच्या धि:काराच्या घोषणा देत होता. मंत्र्यांना बाहेर पडण्यास बराच विलंब लागला.

पृथ्वीराज चव्हाण हे सच्चे व प्रामाणिक नेते आहेत. आर.आर. पाटील हेही त्यांचे खाते संयत व तोल सांभाळत चालवतात. मला ते दोघे इतक्या दूरवर भेटायला आले याचे आश्चर्य वाटले. असेही वाटले, की हे पृथ्वीराज चव्हाणच करू शकले! पण मग हे चांगले नेतेही असे हतबल का? त्यांनी ताबडतोब सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले व त्या बिलाचा मसुदा राज्यपालांकडे मंजुरीसाठी त्याच दिवशी गेला देखील. लोकांचा प्रक्षोभ लक्षात घेता ते विधेयक हिवाळी अधिवेशनात मंजूर होईलही. पण त्यासाठी एका सोन्यासारख्या सामाजिक नेत्याची आहुती गेली हे आपले दुर्दैव!

घरचा कर्ता पुरुष नादान असला, तर कुटुंबातील सर्वांचाच आत्मविश्वास खच्ची होतो. तेच आपल्या देशाबाबत घडत आहे. वर दिल्लीत जो राजकीय धोरणात्मक पक्षाघात (political / policy paralysis) झाला आहे, त्यामुळे राज्यस्तरावरही जोरदारपणे काम होत नाही; ठोस पावले उचलल्यास वरून पाठिंबा मिळेल, अशी शाश्वती नाही. उलट, येणा-या निवडणुका व जातिधर्माचे राजकारण लक्षात घेता चपराक बसण्याचीच शक्यता जास्त. या परिस्थितीत आपण काय करावे? माझ्यासारखेच अनेकजण आज या संभ्रमात आहेत.
देवाने जयंतराव साळगावकर व नरेंद्र दाभोळकर या दोन माणसांना एकाच दिवशी उचलून नेले. एक धर्माचे अधिष्ठान घेऊन घराघरांच्या भिंतीवर व जनमानसात पोचले, तर दुसरे निर्भय व कणखरपणे विज्ञानाधिष्ठित जीवनशैलीचा पुरस्कार करत राहिले व त्यातच विलिन झाले. देवाच्या दरबारात दोघेही सारखेच!

डॉ. श्रीराम लागू, पु.ल. देशपांडे हेही देव न मानणारे. महाराष्ट्राला पुरोगामी विचारवंतांची कमी नाही. नवीन विचार सुरुवातीला धक्कादायक वाटतात. ते लोकांच्या पचनी कालांतराने, धीम्या गतीनेच पडतात.

आपण सुशिक्षित व सुसंस्कृत लोक एक वाट चोखाळू शकतो. आसपासच्या लोकांच्यात अंधश्रद्धेबाबत जागरुकता निर्माण करणे, बाबा-बापूंच्या भजनी लागलेल्या अनेक सुशिक्षितांना त्यातील पोकळपणा पटवण्याचा प्रयत्न करणे, मित्रमैत्रिणींच्या वर्तुळात त्या विषयाचा उहापोह करणे, घरी काम करणाऱ्या लोकांना उपासतापास न करण्याचे महत्त्व पटवणे, गणपतीच्या नावाखाली मोठा धंदा करणाऱ्या मंडळांत जाऊन दर्शन घेऊन भरपूर पैसे, फुले, नारळ वाहण्याचे काम न करणे अशी सुरुवात तर आपण करू शकतो. चला मग, आपापला खारीचा वाटा उचलुया!

अनुराधा ठाकूर
इमेल – anuradha333@gmail.com

About Post Author

4 COMMENTS

  1. I fail to understand why
    I fail to understand why someone should be afraid of such a diluted law. Of course I came to know about the proposed law only after watching the debate on IBN Lokmat. Had this debate happened a few days sooner it would have helped people to know its harmless nature and who knows Dr. Dabholkar could still be alive. I feel our CM is a perfect gentleman and alleging that it was the delay on his part that was responsible for Dr. Dabholkar’s murder is too much. Also people who are lashing the Home-minister and police department should realize that once some lead is available they will crack the case in hours. But if it is a near perfect murder it could take some time till the culprits are nabbed. We should have some patience and let the investigation take place properly. If we keep on criticizing excessively the police may frame some innocent to get respite as happened in cases like Malegaon blasts.

  2. lekh chagla ahe,

    lekh chagla ahe,
    dukh bajula theun sattadhari mukhya mantryna char shabd sunvanrya bai va muliche kautuk vatate …
    sj

Comments are closed.