आकाशवाणीच्या मुंबई अस्मिता केंद्रावर ‘जगुया आनंदी’ नावाचा कार्यक्रम सकाळी साडेसहा वाजता प्रसृत होतो. केंद्राच्या निवेदकांवर ती जबाबदारी असते. त्यांनीच तो लिहायचा व सादर करायचा. त्या वेळी पूर्वी ‘चिंतन’ नावाखाली पाच मिनिटांचे पाहुण्या विचारवंतांचे ध्वनिक्षेपित भाषण होत असे. त्याला पर्याय म्हणून निवेदकांमार्फत तयार झालेला हा हलकाफुलका ‘गुड मॉर्निंग’ म्हणावे असा कार्यक्रम आहे. तो त्या त्या दिवसाचे निवेदक त्यांच्या प्रकृतीप्रमाणे निभावून नेतात, पण कधी कधी, त्यावर प्रासंगिक निमित्ताने पण स्थायी स्वरूपांचे निवेदन कानी पडते. तसाच प्रकार दिनेश अडावदकर यांच्याकडून एका सकाळी घडून आला. येथे तो उद्धृत करत आहोत. ते त्यांचे निवेदन आणि त्यानिमित्ताने दिनेश अडावदकर यांचे कार्यकर्तृत्वही नोंद करून ठेवत आहोत.
– संपादक
आपली प्रिय माय मराठी…
आपली मातृभाषा असते आपल्या समृद्ध आनंदी जगण्याचा एक दुवा ! ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातून विश्वात्मक ईश्वराची आळवणी करणारी, तुकोबांच्या अभंगातून भक्तिमार्ग दाखवणारी, एकनाथांच्या भारुडांतून दांभिकतेवर कोरडे ओढणारी, जनाबाईंच्या ओव्यांमधून भक्त-ईश्वरामधील हृद्बंध दृढ करणारी, सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांतून शिवछत्रपतींचा जयजयकार करणारी, कृष्णा-गोदा-कावेरी-चंद्रभागेच्या लहरींवर अवखळपणे खळाळणारी, कोकणच्या सागरी किनाऱ्यावर मुक्तपणे विहरणारी, शाहिरांच्या डफातून कडाडणारी, स्वातंत्र्यवीरांच्या महाकाव्यातून स्वातंत्र्यदेवतेला वंदन करणारी, बालकवी-तांबे यांच्या गीती काव्यातून, कुसुमाग्रज-बोरकर यांच्या कवितांतून, पाडगावकर- सुरेश भट यांच्या भावगीतांमधून, किर्लोस्कर-खाडिलकर यांच्या नाट्यपदांमधून काळजाचा ठाव घेणारी, खांडेकर-नाथ माधव यांच्या कादंबऱ्यांतून आत्मभान देणारी; गडकरी-अत्रे-पुलं यांच्या विनोदातून हसणारी-हसवणारी, साने गुरुजींच्या गोष्टींमधून भावुक होणारी, लता- किशोरी-कुमार-भीमसेनांच्या कंठांतून गाणारी, गावस्कर- तेंडुलकर यांच्या चेंडूफळीतून मैदानात तळपणारी, गदिमा-बाबूजी यांच्या प्रतिभेतून रुपेरी पडद्यावर झळकणारी, नारळीकर-गोवारीकर यांच्या प्रज्ञेतून ज्ञानविज्ञानाची उकल करणारी,
…थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक क्षेत्रात एक पाऊल पुढेच असणारी, अशी आपली माय मराठी !मराठी बोलूया-मराठी वाचूया-मराठी लिहू या ! आपल्या माय मराठीचे वैभव वाढवू या !!
– दिनेश अडावदकर 9869533983 dinesh16pa@gmail.com
मराठीच्या विविध पैलूंचा सुरेख आढावा घेतला आहे! धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा!