आपणही हे करु शकतो

6
97
carasole

निसर्गाच्या कणाकणांत ईश्वर असतो असे मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. तरीसुद्धा मी देव देव करत बसण्यापेक्षा मंदिरात फक्त पाच रुपये वाहावे व गरजूंना दर महिन्याला घरखर्चातील एक हजार रुपये द्यावे असे ठरवले. मी माझ्या तिन्ही मुलांची उच्च शिक्षणे पुरी झाली तेव्हापासून, गेली नऊ वर्षे हा नियम पाळत आहे.

मी स्वत: एम.ए. असून पत्रकारितेचा एक वर्षाचा डिप्लोमा केला आहे. पत्रकारितेच्या शिक्षणामुळे माझा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन रुंदावला. मी प्रथम वर्तमानपत्रे, टी.व्ही.कार्यक्रम, मासिके यांतून अनेक संस्थांचे पत्ते व फोन नंबर मिळवले. तेव्हा प्रत्येक संस्थेच्या गरजा वेगवेगळ्या असतात हे माझ्या लक्षात आले. मला समाजाचे अनेक थर, पैलू, आजची परिस्थिती व त्यातून निर्माण झालेल्या गरजा समजल्या. गरजू मुलांना व्यवहारी व बोधपूर्ण शिक्षण व संस्कार यांची गरज आहे हे जाणले. त्‍या सुमारास सुधा मूर्ती यांची पुस्‍तके वाचनात आली. त्‍यांनी कर्नाटकात अकरा हजार वाचनालये सुरू केली. मी मनाशी निश्चिय करून त्याप्रमाणे एक कार्यक्रमच तयार केला.

मी पंचतंत्र , इसापनीती , परीकथा ही पारंपरिक व देशभक्ती, संस्कार, शास्त्रीय माहिती, विज्ञानशास्त्र, शिवणकाम, बागकाम, पशुपालन, दुग्धव्यवसाय या विषयांची पुस्तके विकत घेतली. प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावार ‘मुलांनो, पाणी गाळून व उकळून घ्या’, ‘शिळे व उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका’ ‘’रोज थोडा वेळ व्यायाम करा.’ ‘गुरुजनांचा मान राखा’. ‘निरक्षरांना पुस्तके वाचून दाखवा’ असे संदेश लिहिले. असे प्रत्येकी पंधरा पुस्तकांचे संच गावांना व संस्थांना दिले.

त्याखेरीज मी लिहिलेले लेख – ‘माझा हिंदुधर्म’, ‘छोटे उद्योग,’ ‘ग्रामीण भागात करण्याजोगे व्यवसाय’, ‘आदर्श गाव-आदर्श शाळा’, ‘साठीनंतर’ यांच्‍या झेरॉक्स करून त्याच्या प्रती वाटल्या.

खोकल्याचे औषध, बर्नाल, मेटॅसिन, जुलाबावरच्या गोळ्या, सोफ्रामायसिन, बॅडेड अशा औषधांचा शंभर रुपयांचा संच तयार केला. तसेच बॅट-बॉल, दोरीवरच्या उड्या, सापशिडी, बाहुली, भातुकलीचा खेळ यांचाही शंभर रुपये किंमतीचा संच केला. ते संच ‘बांधिलकी’, ‘सोशल डेव्हलपमेंट सेंटर’, ‘आभास’, ‘श्रमिक नारी संघटना’ अशा संस्थांना दिले. प्रवासानिमित्त हर्णे ते दापोली अशा अनेक गावांत गेले असता तेथे ते संच दिले. काश्मिर सहलीत जम्मू, श्रीनगर, कतरा, अमृतसर येथे स्थानिक लोकांना प्रत्येकी साठ असे हिंदी-इंग्लिश पुस्तकांचे संच दिले. ते सर्व माझ्याविषयी आदर दाखवतात आणि त्‍या भावनेतून मला माझ्या कामाची पोचपावती मिळते. मी माझ्या मैत्रिणी व नातेवाईक यांच्याकडे असे संच वाटायला देते. यामुळे तारा, सावरसई, कळमट (शहापूर), वळवंडा (जव्‍हार) वानस्ते (इंदापूरजवळ) इत्यादी लहान गावांत मदत पोचली आहे.

माझ्या मनात अंध विद्यार्थ्यांसाठी गोष्‍टींची कॅसेट तयार करण्‍याचा विचार आला. मग मी नातवाला गोष्‍टी सांगताना त्‍या रेकॉर्ड केल्‍या. सोबत हिंदू धर्माची माहिती, समाजासुधारणा या विषयीचीही माहिती रेकॉर्ड केली. त्‍यांचा चार सीडींचा संच तयार केला. ते संच अनेक संस्थांना भेट दिले. त्यांना ते फार आवडले.

मी गणेशोत्सव मंडळाला वर्गणी न देता तेथील एखाद्या स्पर्धेस बक्षीस जाहीर करते. सार्वजनिक स्वच्छतेसाठी मोलकरणी, चिकन सेंटर, मासळी बाजारातील कोकणी यांना फिनेल बाटल्या देते. मी देवळात खण ठेवण्याऐवजी आदिवासी पाड्यातील बायकांना शंभर ब्लाऊज पीस देण्‍याचा उपक्रम राबवला.

मी ही सर्व धडपड का करते? माझ्या व्‍यक्‍तीमत्‍त्‍वात इतरांना मदत करण्‍याचा गुण कुठून आला? असा माझ्या मनात जेव्‍हा विचार येतो त्‍यावेळी मला माझे बालपण आठवते. माझ्या लहानपणी घरची आर्थिक परिस्थिती व्‍यवस्थित होती. माझे वडील पन्नास घरगड्यांची नावे ‘रात्रशाळेत’ घालत व त्यांचा खर्च करत. आई घरातील कपडे बोहारणीला न देता मोलकरणीला देई. ते सर्व मी पाहात होते. त्‍यांच्‍या विचारांचे, कृतींचे संस्‍कार माझ्यावर होत असावेत, कारण मी गरजू नातेवाईकांना आमची पुस्तके देई ते आठवते. शाळेत असताना स्काऊटमध्‍ये होते. तेथे ‘रोज एक तरी सत्कृत्य करेन’ ही घेतलेली शपथ, घरकाम करून मिळवलेली ‘खरी कमाई’ असे संस्कार मनात रूजले गेले.

माझ्या कुटुंबाने या समाजकार्यात माझी चांगली साथ दिली आहे. माझे पती माझ्या प्रत्‍येक उपक्रमात उत्‍साहाने भाग घेतात. आमच्‍या कृतींचा संस्‍कार मुलांवरही होऊ लागला. मी गरजू मुलांना खेळणी वाटप करत असे. माझ्या मुलांची खेळणी खेळून झाली, की ते मला ती खेळणी गरजू मुलांना देण्‍यास सुचवत.

मी आदिवासी पाडे, बहुविकलांग मुलांच्या संस्था, अंधशाळा, वृद्धाश्रम यांना भेटी दिल्या. सध्या मी अनेक संस्थांत, गावांत प्रथमोपचाराची माहिती, आरोग्य, सुजाण पालकत्व या विषयांवर भाषणे देते.

असे प्रयत्‍न अनेक जण करू शकतील. अंधांसाठी काम करणाऱ्या संस्थांत अभ्यासाची पुस्तके वाचून दाखवणे, टेप्स तयार करणे, ब्रेल साहित्य देणे आवश्यक आहे. वृद्धाश्रमात भजने, कथाकथन, काव्यवाचन असे कार्यक्रम करावे. विद्यार्थी वसतिगृहांत डाळ-तांदूळ, चहा, साखर, चादरी, फळे, टोस्ट द्यावेत. बहिऱ्या-मुक्यांच्या शाळेत खेळांच्या स्पर्धा घ्याव्यात. त्‍यांना बुकबाईंडिंग, टेराकोटा वस्तू, पेंटिंग, पदार्थ करणे शिकवावे. बहुविकलांग मुलांना गाणी, गोष्टी सांगाव्या. रंगीत चित्र काढणे, ग्रिटिंग्ज तयार करणे, तोरणे-माळा-उटणे- टेराकोटा वस्तू, पणती पेंटिंग शिकवावे, आदिवासी पाड्यांत रोपवाटिका तयार करायला शिकवणे, बचत गट तयार करणे. गांडूळ खत प्रकल्प, बोअरवेल, संडास बांधणे, छोट्या नाल्यांवर सिमेंट पोत्यांचा बांध घालणे अशा अनेक गोष्‍टी करता येऊ शकतील. त्या खेरीज आरोग्य तपासणी, चित्रस्पर्धा, स्त्रियांसाठी विविध स्पर्धा घ्याव्या. कुपोषित मुलांना चिक्की, खजुर, टोस्ट, राजगिरा लाडू, ताजी इडली-डोसे द्यावे. स्टेशनवरची बेघर, अनाथाश्रमातील मुले यांना श्‍लोक शिकवणे, स्वच्छता-प्रथमोपचाराची माहिती, नशाबंदी, रामायण-महाभारतातील गोष्टी असे कौन्सिलिंग अत्यावश्यक आहे.

माझी काळे नावाची मैत्रीण ज्‍युवीनील कोर्टात कामास आहे. तिने मला एका बालगुन्‍हेगाराची माहिती दिली. त्‍याने गुन्‍हा केला त्‍यावेळी तो लहान होता. त्‍याची मुक्‍तता करताना महिला न्‍यायाधिशांनी म्‍हटले, की या मुलास चांगला रोजगार उपलब्‍ध करून दिल्‍यास तो योग्‍य मार्गास लागेल. मैत्रीणीने मला संपर्क करून मी त्‍यास मदत करू शकेन का, याची विचारणा केली. मी त्‍या मुलास एक शिवणयंत्र दिले. आज तो मुलगा भिवंडीमध्‍ये आपला उदरनिर्वाह करत आहे. अशाप्रकारे मी आतापर्यंत विविध व्‍यक्‍तींना चौदा शिवणयंत्रे दिली आहेत.
मला महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळातर्फे ‘जनसेवा पुरस्कार’ २००६ साली ‘जागतिक महिला दिनी’ मिळाला. मी सुमारे एकशेपंचवीस गावे व साठ संस्था यांना पाच हजार पुस्तके, अंगणवाड्यांना खेळ व प्रथमोपचाराचे संच, चादरी, कंदील, चट्या, धान्य इत्यादी सामान स्वखर्चाने वाटले आहे.

माझी मुले परदेशात असल्यामुळे तेथे मी अनेक महिने राहिले आहे. मला तेथील समाजकार्याचा परिचय झाला. आपण तेथील चर्चमध्ये भेटण्याची वेळ ठरवून जायचे. तेथे जुने कपडे, वस्तू, खेळ, जॅम इत्यादी द्यायचे. तेथील स्वयंसेवक त्या वस्तू गरिब, बेकार लोक, कुमारी मातेची मुले इत्यादी गरजूंना वाटतात. भारतीय लोक देऊळ, गुरुद्वार, मॉल या ठिकाणी ‘ड्रॉप बॉक्स’ ठेवतात. त्यात तुम्ही कपडे, खेळणी, इतर वस्तू टाकू शकता. त्या वस्तू जहाजांमधून भारतात आणून त्‍याचे वाटप करण्याचे काम चालू आहे. भूकंप-सुनामीत असे मदतीचे वाटप झाले. ‘ख्रिश्चन एड’ इत्यादी संस्थांतर्फे एखाद्या मुलाचे पालकत्व घेता येते. तुम्हाला एक कार्ड दिले जाते, त्यावर त्या मुलाचा फोटो असतो.

अमेरिकेतही बेकार, बेघर लोक हिंडत असतात, पण त्यांची सोय रात्री अनाथाश्रमात केली जाते. तेथे ट्रेनमधल्या स्लीपर्सप्रमाणे चार थरांचे पलंग व सामायिक बाथरूम असते. असे पलंग आपल्या येथे स्टेशनवर ‘चॅरिटी वर्क’ म्हणून ठेवण्यात यावेत. तेथे गृहिणी स्वत: जॅम बनवून चर्चमध्ये नेऊन देतात. बहुविकलांगांसाठी अनेक एकर जागा असते. त्यात ते रोपवाटिका तयार करणे, फुलांचे गुच्छ करणे अशी कामे आनंदाने करताना दिसतात.

महात्मा गांधी म्हणत – ‘महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे’. हे किती सार्थ आहे हे महाराष्ट्रातील अनेकविध संस्था व कार्यकर्ते पाहून वाटते. मधमाशा दूरवरून मोहोळात मध अथक आणतात. तसे अनेक जण आपापल्या संस्थेत वस्तू, पैसे गोळा करतात. माझ्या या समाजकार्याच्या प्रवासात माझे अनेक समाज कार्यकर्त्यांनी कौतुक केले. उल्का महाजन यांना औषधे घेण्यासाठी दोन हजार रुपयांचा चेक पाठवला. त्यांनी औषधाचे संच गावांना वाटले.

‘देश माझा- मी देशाचा’ ही भावना असेल तर तुमच्याही हातून अशी सेवा सहज घडेल!

भावना अरविंद प्रधान,
९८६९६५५७७६, ०२२ २१६३०५८४
bapradhan@yahoo.co.in

Last Updated On 9th Nov 2017

About Post Author

6 COMMENTS

  1. Susanskrut Kutumba apalya
    Susanskrut Kutumbana apalya pasun khoop shikanya sarkhe ahe. Apan tar samajaroopi vatavrukshachya adhar denarya samool fandyach ahat. Aplaya sarkhaya ashya anek helping hands chi samajala garaj ahe. Kevadha ha Anand apan upabhogat ahat. Pranam!

  2. आपला उपक्रम खूपच आवडला अशीच
    आपला उपक्रम खूपच आवडला. अशीच तुमच्याकडून प्रेरणा मिळो हीच सदिच्छा!

  3. फारच छान विचार आणि कृति.देश
    फारच छान विचार आणि कृति. देश माझा मी देशाचा हा विचार स्तुत्य.

  4. आपले कार्य खुप प्रामाणिक व
    आपले कार्य खुप प्रामाणिक व प्रेरणादायी असे आहे,आपला आदर्श घेऊन आम्ही देखील अजुन काही तरी प्रामाणिक समाजकार्य करू, आपल्या कार्यास मना पासून सलाम.. जय हिंद,जय माणुसकी…!

  5. भावनाशून्य होत चाललेल्या…
    भावनाशून्य होत चाललेल्या युगात देश माझा मी देशाची हि भावना घेऊन गेली काही दशके काम करणाऱ्या भावना ताई ( ता – आई म्हणणे जास्त उचित ठरेल) प्रधान याना कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा मानाचा मुजरा.

    दयानंद कुबल, मुंबई

Comments are closed.