नंदन सखाराम कालेकर या जेमतेम तिसऱ्या इयत्तेपर्यंत शिकलेल्या गृहस्थाने 1930 च्या काळात मोठी झेप घेतली. त्याने इंग्लंडला जाऊन केशकर्तन कलेचे आधुनिक शिक्षण घेतले आणि परत मुंबईला येऊन केस कापण्याचे दुकान थाटले ! नंदन कालेकर यांचे आईवडील लहानपणीच निवर्तले. त्यांना उदरनिर्वाहासाठी एका केशकर्तनालयात महिना दोन रुपये पगारावर नोकरी करावी लागली. योग असा, की तेथेच त्यांना वाचनाची आवड लागली ! ते ‘किर्लोस्कर’ मासिकाचे वर्गणीदार 1931 साली झाले. त्या सुमारास त्यांचे मामा श्रीधरपंत देवजी माठे हे इंग्लंडला जाऊन आले होते. माठे हे कालेकर यांना त्यांच्या नाभिकव्यवसायासंबंधी कल्पना व सूचना देत असत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नंदन यांनाही इंग्लंडला जावेसे वाटू लागले...