आटगावचे पुरातन शिवमंदिर

_AathgavchePuratan_Shivmandir_1.jpg

आटगावला एक प्राचीन मंदिर आहे याची माहिती त्याच्या छायाचित्रांसह इतिहास अभ्यासक सदाशिवराव टेटविलकर यांच्या ‘विखुरल्या इतिहास खुणा’ व ‘ठाण्याची दुर्गसंपदा’ या पुस्तकांत आहे, पण पुस्तकात ते आटगाव नेमके कोठे आहे याची स्पष्ट माहिती नाही. ठाण्याच्या गॅझेटियरमध्ये मात्र मंदिराबद्दल बरीच माहिती मिळाली. त्यात गावाच्या कोणत्या दिशेला मंदिर आहे; तसेच, मंदिराचे वर्णनही वाचण्यास मिळते. पंडित भगवानलाल इंद्रजी यांची मंदिराचे अवशेष आणि आजूबाजूच्या स्मृतिशिळा यासंबंधीची बारीक निरीक्षणे त्यात आहेत. मंदिराचा शोध गुगलच्या नकाशावर आटगाव परिसरात गॅझेटियरमधील नोंदीप्रमाणे सुरू केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. पुरातन मंदिरसदृश्य काही गुगल नकाशावर दिसत नव्हते.

मी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’साठी माहिती संकलनाचे काम करणारे मित्र शैलेश पाटील यांच्यासोबत थेट आटगावातच पोचलो. मंदिर शहापूर तालुक्यातील आटगाव रेल्वेस्टेशनपासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे. गावाच्या पश्चिमेला गेलो. गावातील लोकांनी मंदिराकडे कसे जावे ते सांगितले. स्थानिक लोक भारतात सर्वत्र आढळते त्याप्रमाणे त्याला पांडवकालीन मंदिर म्हणतात. मंदिर गावाच्या नैऋत्य दिशेला असणाऱ्या टेकडीच्या रांगेत आहे. तेथे पोचण्यासाठी नवीन शिवमंदिर आणि पोद्दार गृहसंकुल यांकडे जाणारा रस्ता या खुणा शोधल्या होत्या. त्यांच्या आधारे, मंदिरापर्यंत गेलो. नवीन शिवमंदिराजवळून डावीकडे शेतातून वाट आहे. शोधाशोध जास्त करावी लागली नाही. दुसरी एक वाट पलीकडील ‘पुंढे’ गावातून आहे.

मंदिराचे शिखर, सभामंडप हे काही अस्तित्वात नाही. मंदिराचे अधिष्ठान म्हणजे ओटा – जोते आणि गर्भगृह एवढे दिमाखात उभे आहेत. मात्र, त्यासाठी घडवलेल्या शिळा आणि त्यावरील कलाकुसर नजरेला खिळून ठेवते. मंदिर पूर्वाभिमुख आहे. ते शिवमंदिर म्हणून नमूद असले तरी मंदिरात शिवलिंग नाही, देवीचा तांदळा आहे.

_AathgavchePuratan_Shivmandir_2.jpgपंडित भगवानलाल इंद्रजी यांच्या मते, गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील गणपतीचे शिल्प हे ते मंदिर शिवाचे असल्याची स्पष्ट खूण आहे. स्कंद पुराणातील एका कथेनुसार कीर्तिमुख या शिल्पाचा संबंध शंकराशी आहे आणि कीर्तिमुख अनेक शिवमंदिरांत गर्भगृहाच्या पायाशी असते. तसेच, एक खंडित कीर्तिमुख तेथे गर्भगृहाच्या उजव्या बाजूच्या भिंतीच्या तळाशी दृष्टीस पडले. त्याचबरोबर, खांबांवर व मंदिराच्या अधिष्ठानावरील ग्रासपट्टीकेवरही कीर्तिमुख कोरलेले दिसते. मंदिराच्या गर्भगृहाच्या छताच्या आतील बाजूस सुबक असे कमलपुष्प घडवले आहे.

छताला आधार देणारे, अखंड शिळेत घडवलेले चार सुंदर नक्षीयुक्त स्तंभ स्वतःच आधार शोधत येथेतेथे पडले आहेत. त्यांतील दोघांना सिमेंटच्या कोब्याचा आधार दिला गेला आहे. मात्र, एकाचे दोन तुकडे झाले आहेत. बांधकामाचे अवशेष मोठ्या संख्येने मंदिराच्या आजूबाजूला पडलेले आहेत. मंदिरापासून वीस-पंचवीस मीटरच्या घेऱ्यात असणारा प्रत्येक दगड हा सर्वसामान्य नाही असेच वाटले. कारण प्रत्येक दगड नक्षीने मढवलेला किंवा ठरावीक आकाराचाच दिसला. त्यात शोध घेतल्यास नंदीचे खंडित शिल्पही सापडू शकते. कल्याणजवळील लोणाडचे लोणादित्य मंदिर, चावंडजवळील कुकडेश्वरचे मंदिर, रतनवाडीचे अमृतेश्वर आणि अंबरनाथचे अम्बरेश्वर मंदिर यांवरील नक्षिकामाशी साधर्म्य असणारे नक्षिकाम मंदिराच्या शिल्लक वास्तूवर आणि अवशेषांमध्ये दिसते. त्यामुळे मंदिरांच्या बांधणीचा कालावधी त्याच सुमाराचा असावा असे वाटते.

ते मंदिर कोणी बांधले त्याबद्दल कोणताही लिखित पुरावा आढळत नाही, तो पुरावा सापडू शकेल असे मंदिराच्या उभ्या असलेल्या गर्भगृहाच्या प्रत्येक शिळेकडे पाहिले की वाटते. मंदिर मोडकळीस कसे आले? की कोणी उध्वस्त केले? की त्याचे बांधकाम अपूर्णच राहिले असे अनेक प्रश्न आहेत. मात्र, मंदिराच्या परिसरात विविध प्रकारच्या स्मृती शिळा पाहण्यास मिळतात. त्या शिळा त्या मंदिराचा किंवा परिसराचा इतिहास बोलका करण्यास काही अंशी उपयोगी ठरतील. पंडित भगवानलाल इंद्रजी यांच्या निबंधाची मूळ प्रत मिळाली नाही. त्यात मंदिरात चार-पाच फूट उंच आणि 1 फूट X 1 फूट (एक चौरस फूट) जाड अशा तीन स्मारकशिळा होत्या असा उल्लेख आहे. त्या शिळा तेथे अखंड स्वरूपात दिसत नाहीत. इतस्त: विखुरलेले त्यांचे अवशेष सहज दिसतात. त्यांच्यावर चारही बाजूंना युद्धप्रसंग कोरून वीरगती पावलेला योद्धा आणि सती गेलेली त्याची पत्नी कैलासात शिवाराधना करताना दाखवले आहेत. काहींमध्ये गार्इंच्या रक्षणासाठी युद्ध झाल्याचे दाखवले आहे. योद्ध्यांच्या केसांची गुंडी, दाढी, शस्त्रे व कपडे यांचे बारकावेसुद्धा कोरले आहेत. काही वीरगळ अजून सुस्थितीत आहेत.

शंकराचे ‘दक्षिणमूर्ती’ प्रकारातील शिल्पाशी साम्य असणारे एक शिल्प दिसले, ते नियमाप्रमाणे मंदिराच्या दक्षिणेकडील देवकोष्ठात असते. तसे एका छायाचित्रात ते दक्षिणेकडील देवकोष्ठात आढळले, पण शिल्प झिजले असल्यामुळे ते शिवाचे आहे की नाही ते स्पष्ट होत नाही.

मंदिराच्या बाबतीत वेगळेपण जाणवते ते म्हणजे, मंदिराच्या आजूबाजूस पाण्याचा प्रवाह नाही की कोठे कुंड नाही. टेटविलकर यांच्या पुस्तकातील छायाचित्रे आणि इंटरनेटवर सापडलेली तीन ते चार वर्षें जुनी छायाचित्रे यांमध्ये सिमेंटचा कोबा नव्हता. तो कोबा टाकण्याचा पराक्रम एक-दोन वर्षांपूर्वीच केलेला वाटतो. कदाचित कोबा टाकला, त्याजागी छोटी पुष्करणी असावी.

केवळ गर्भगृह सुस्थितीत असलेले तशाच प्रकारचे लोणाडचे लोणादित्य मंदिर तर पुरातत्त्व खात्याकडून संरक्षित झाले. मात्र आटगावजवळील डोंगरकुशीतील ते प्राचीन मंदिरशिल्प मात्र अजूनही उपेक्षित, वंचित आहे. सह्याद्रीतील गडकोटांप्रमाणे गतवैभव सांगणारी देवालयेसुद्धा संवर्धनाच्या मदतीची साद देत उभी आहेत. पुरातत्त्व खात्याने त्या वास्तूंचे संरक्षण करणे गरजेचे आहे.

– सात्विक पेणकर

About Post Author