लेखिका प्रस्तावनेत म्हणते, की “त्यांनी कोणत्याही काल्पनिक प्रसंगाची भर घातलेली नाही. इतिहासातील घटना ज्या लेखनात थोडक्यात येतात त्या पाठीमागे भावना काय असतील ते मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.”
दीर्घकवितेची सुरुवात येशूची थोरवी गाऊन होते. त्यात पहिली चार पाच पाने गेली आहेत. त्यानंतर अहिल्याबार्इंविषयीच्या कवनाला आरंभ होतो. पहिला प्रसंग अहिल्याबाई त्यांच्या पुत्राच्या बिछान्यापाशी बसून शोक आणि त्याबरोबर प्रार्थना करत आहे अशा स्वरूपाचा आहे. माल्कम यांनी म्हटले आहे, की “अहिल्याबार्इंचा मुलगा मालेराव याने एका माणसाचा खून मत्सरापोटी करवला. तो मुलगा ज्याचा खून झाला त्याचे निरपराधीत्व सिद्ध झाल्यावर त्याने केलेल्या अन्यायाच्या प्रखर जाणिवेने हादरला. त्यातच तो आजारी पडला. अहिल्याबाई मृत व्यक्ती त्यांच्या मुलाचा सूड घेत आहे असे वाटून मृतात्म्याची करुणा भाकत आहे असा प्रसंग कवयत्रीने कल्पला आहे. ती लिहिते –
ती होती एक कृती मत्सरापोटी झालेली. खरे नव्हता समजू शकला, फसगत त्याची झाली
केला आहे यत्न त्याने चूक सुधारण्याचा, तुझी पत्नी आणि मुले यांची तजवीज करण्याचा
एक संस्मरणीय स्मारक होईल तुझ्या नावाने, स्वच्छ होईल तुझे नाव दप्तरातील नोंदीने.
तिने शोक केला, मृतात्म्याची करुणा भाकली, पण व्यर्थ! – अशा तऱ्हेने दिवस रात्र अश्रू ढाळत राहिली,
बिछान्याशी त्याच्या बसून करूणा भाकत राहिली ; तिच्या नजर लावण्याची मात्रा नाही चालली
राजवाड्यात सर्वत्र घनदाट शांती भरली. भीषण अशा विकाराने त्याचे काम केले. राजपुत्राचे पार्थिव तेवढे उरले!
अहिल्याबाईने मुलगा निधन पावल्यानंतर राज्य स्वतः सांभाळण्याचे ठरवले. कवयत्री त्या निर्णयाचे वर्णन असे करते –
पण ब्रह्मदेवाने तिच्यावर एक होती सोपविली, एका खूप वेगळ्या कुटुंबाची जबाबदारी .
विविध जाती, मिसळलेली घराणी; काही मंद काही भडकू, उद्धट आणि भयकारी;
आता तिने कसली पाहिजे तिची कंबर नाजूक भावनांचाही केला पाहिजे आदर
अहिल्याबाईने न्यायनिवाडा करण्यास सुरुवात केली तेव्हा प्रजेला काय वाटले? त्याचे वर्णन कवयत्री असे करते –
होते प्रजाजन कोणत्याही तऱ्हेचे, सगळ्यांनी आनंदाने एकच दृश्य पाहिले;
त्यांची खानदानी बाई न्यायदानावर बसली, न्याय देताना तिने न्यायदृष्टीच ठेवली.
अहिल्याबार्इंनी गरिबांच्या कल्याणाची काळजी सतत केली. त्यांना गरिबांच्यावर झालेल्या अन्यायाची फार चीड येत असे. कवयत्री लिहितात –
जर तिच्या कानावर, आली अन्यायाची खबर; क्षणात मनात पेटे अंगार, भुवई जाई वर;
तिचा आवाज विधवांना वाटे एरवी मधुर. तो होई जरबेचा आणि कानात करी गजर.
तिच्या शेतीविषयक सुधारणांनी काय बदल झाला? याबाबत कवयत्रीने लिहिले आहे –
रयत कसु लागली वाडवडिलांची जमीन कष्ट करताना नाही उरली श्रमांची जाणीव.
अहिल्याबार्इंना त्यांच्या पतीच्या निधनानंतर सती जाण्यापासून त्यांच्या सासऱ्यांनी परावृत्त केले, परंतु आश्चर्य म्हणजे त्यांची मुलगी तिच्या पतीच्या निधनानंतर सती गेली. त्या सतीच्या मिरवणुकीचे विस्तृत वर्णन कवितेत आहे. काही ओळी अशा –
जड पावलांनी उठवला जमिनीवर दबका आवाज मित्रांनी वेढलेला आला पार्थिवाचा साज
जेंव्हा गंभीर ब्राह्मणांबरोबर, दिसली त्यांना त्यांची राणी, नजर तिच्याचवर खिळली,
तिच्याबद्दल कणव दाटून आली.
मला वाटते, वाचकांची मूळ पुस्तक वाचण्याची उत्सुकता आता जागृत होईल. ते उपलब्ध आहे – https://www.rarebooksocietyofindia.org/postDetail.php?id=196174216674_10151523420631675 या साइटवर.
अहिल्याबाई होळकर यांच्या साहित्याच्या अभ्यासक विनया खडपेकर म्हणाल्या, की जोनाबेली या ब्रिटीश कवयत्रीने अहिल्याबाईंवर कविता रचल्या आहेत.
– रामचंद्र वझे 9820946547
vazemukund@yahoo.com
रामचंद्र वझे हे निवृत्त बँक अधिकारी. त्यांनी ‘बँक ऑफ इंडिया‘मध्ये चाळीस वर्ष काम केले. त्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. प्रवासवर्णनांचा अभ्यास करत असताना त्यांना काही जुनी पुस्तके सापडली. ती पुस्तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्यांना वाटू लागले. त्यांनी तशा पुस्तकांचा परिचय लिहिण्यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ‘शेष काही राहिले‘, ‘क्लोज्ड सर्किट‘, ‘शब्दसुरांच्या पलिकडले‘ आणि ‘टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर‘ ही पुस्तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यांनी लिहिलेल्या कथा हंस, स्त्री, अनुष्टुभ, रुची अशा अनेक मासिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचे ‘महाराष्ट्र टाईम्स‘ आणि ‘लोकसत्ता‘ या दैनिकांमधून लेख आणि पुस्तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.
————————————————————————–
माहितीपर लिखाण आहे,