Home वैभव मराठी भाषा अहिराणी – खानदेशची मध्यवर्ती बोली

अहिराणी – खानदेशची मध्यवर्ती बोली

carasole

महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांत बोलली जाणारी ‘अहिराणी’ ही एक भारतीय आदिम बोली. तिच्‍या थोड्या वेगळ्या स्‍वरूपाला ‘खानदेशी’ असे म्हणतात. मराठीची पोटभाषा म्हणून समजली जाणारी ही बोली सर ग्रिअर्सन संपादीत ‘लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया’च्या नवव्या खंडाच्या तिस-या भागात अहिराणीचा उल्‍लेख आला असून त्‍यांनी या भाषेचा भिल्‍लांची भाषा म्‍हणून उल्‍लेख केला आहे.

महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांत बोलली जाणारी ‘अहिराणी’ ही एक भारतीय आदिम बोली. तिच्‍या थोड्या वेगळ्या ‘खानदेशी’ असे म्हणतात. मराठीची पोटभाषा म्हणून समजली जाणारी ही बोली सर ग्रिअर्सन संपादीत ‘लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया’च्या नवव्या खंडाच्या तिस-या भागात अहिराणीचा उल्‍लेख आला असून त्‍यांनी या भाषेचा भिल्‍लांची भाषा म्‍हणून उल्‍लेख केला आहे. मात्र त्‍यांचे हे संशोधन चुकीच्‍या माहितीवर बेतले असून अहिराणी ही सर्व जातीजमातीच्‍या लोकांची लोकभाषा आहे. अहिर लोकांची भाषा म्‍हणून अहिराणी अशी या भाषेच्‍या नावाची व्‍युत्‍पत्‍ती आहे. अहिराणी ही लोकभाषा आजही जवळजवळ अंदाजे एक कोटी लोक बोलतात. महाराष्‍ट्रातील तीनशे किलोमीटर लांब व दोनशे किलोमीटर रूंद एवढ्या मोठ्या भौगोलिक क्षेत्रात ही भाषा बोलली जाते.

– डॉ. सुधीर देवरे यांनी ‘थिंक महाराष्‍ट्र’वर लिहिलेल्‍या ‘अहिराणी बोली – सामाजिक अनुबंध’ या लेखातून.

—————————————————

जळगाव व धुळे या दोन जिल्हयांनी मिळून होणा-या प्रदेशास ‘खानदेश’ म्हणून ओळखले जाते. दख्खनच्या पठाराचा हा अगदी उत्तरेकडील भाग आहे. खानदेश हा पूर्वी मुंबई इलाख्याचा जिल्हा होता.

खानदेशाचा विस्तार प्राचीन काळी सातपुडा पर्वतापासून दक्षिणेकडील सातमाळ व अजिंठ्याचा डोंगर येथपर्यंत, पूर्वेस वर्‍हाड प्रांत, निमाड जिल्ह्यापासून पश्चिमेकडील बडोदे संस्थान व रेवाकाठ जहागिर येथपर्यंत विस्तारलेला होता.

खानदेशचे अतिप्राचीन नाव ‘ऋषिकदेश’ म्हणून आढळते. ‘खानदेश’ हे नाव मोगलांच्या कारकिर्दीत पडले. पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे दोन भाग व्यवस्थापनाच्या दृष्टीने ब्रिटिश राजवटीत, १९०६मध्ये पाडण्यात आले. पूर्व खानदेश हा जळगाव जिल्हा व पश्चिम खानदेश हा धुळे जिल्हा अशा नावाने १९६०पासून करण्यात आला.

‘खानदेश’ मूळचा अभीर किंवा अहीर यांचा देश होता. अभीर किंवा अहीर हे आर्योत्पन्न की अनार्योत्पादन याबाबत एकमत आढळत नाही. अभिरांचा उल्लेख रामायण, महाभारत आणि पुराणे यांच्यातही आढळतो. अहीर यांचा उल्लेख त्यामध्ये शेतक-यांची व गवळ्यांची मोठा जात म्हणून आलेला आहे. त्यांना महाभारत व पुराणात शूद्र म्हणून संबोधले आहे.

अहीर लोकांचे खानदेशात राज्य चौथ्या शतकात होते. त्यांनीच ‘अशिरगढ’ किल्ला बांधलेला आहे.

खानदेशी ही खानदेशातील लोकांची भाषा. दैनंदिन व्यवहारात खानदेशातील सर्व जातीजमातींचे लोक ‘खानदेशी बोली’ बोलतात. पण काही जातीजमाती आपल्या कुटुंबांत आपापल्या स्वतंत्र जातीच्या बोलीचा वापर करतात. जसे, की लेवा पाटीदारांची ‘लेवापाटीदार’ बोली, लाडसिक्की वाण्यांची बोली, भिल्लांची बोली, बडगुर्जरांची बोली(बडगुजरी), मुसलमान बोली, राजपूतांची बोली, तवडीबोली, दखनीबोली, महाराऊबोली, खानदेशाच्या सातपुड्याच्या रांगेत पावरे भिल्ल राहतात. त्यांची बोली ‘पावरी’ म्हणून ओळखली जाते.

पावरी बोलीच्या शब्दांचे काही नमुने :

पावरी बोली – १. आखा, २. उडीन, ३. ढापून, ४. ओता, ५, आंदारो, ६. जायन

अहिराणी बोली – १. आख्खा, २. उडीसन, ३. ढापन, ४. व्हता, ५. अंधार, ६. जाईसन

मराठी – १. संपूर्ण, २. रडून, ३. झाकण, ४. होता, ५. अंधार, ६. जाऊन

काटोनी भिल्लांची भाषा – १. जेवण करना का? २. के चालनस?

अहिराणी – १. जेवण झायं का? कुठे चाल्हनात?

मराठी – १. जेवण झाले काय? कुठे चाललात?

गुर्जरी – शेतमदी कापूस येची आन.

अहिराणी – वावर म्हातून कापूस(पह्यं)येची आन.

मराठी- शेतातून कापूस वेचून आण.

परदेशी – खेतमेसे कापूस बिनकन ला.

खानदेशच्या दक्षिणेकडील काही भागात दखनी किंवा घाटोळी म्हणून ओळखली जाणारी कुटुंबे आढळतात. यांची बोली ‘दखनी’ म्हणून ओळखली जाते.

स्त्री क्रियापद सर्वनामे
दखनी करती, खाती माला, तेल
अहिराणी करस, खास माले, तेल
मराठी करते, खाते मला, त्याला .

अहिराणी ही खानदेशची मध्यवर्ती बोली आहे. खानदेशी बोलीवर शेजारच्या भू-प्रदेशात बोलल्या जाणा-या बोलीचा प्रभाव पडून खानदेशी बोलीचा वेगळा प्रभेद निर्माण होतो. नाशिक जिल्ह्यातील बागलाण परिसरातील खानदेशी बोलीवर नाशिक जिल्ह्याच्या बोलीचा प्रभाव आढळतो. नंदुरबारी बोलीवर गुजरातीचा प्रभाव आढळतो. विदर्भालगतच्या पूर्वेकडील प्रदेशात वैदर्भी बोलीचा प्रभाव जाणवतो. खानदेशपेक्षा खानदेशी बोलीभाषेचे क्षेत्र हे मोठे आहे. खानदेश हा जळगाव व धुळे या दोन जिल्ह्यांचा भूप्रदेश आहे तर खानदेशी बोलीच्या क्षेत्रात धुळे आणि जळगाव यांना जवळ असणा-या औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यांच्या काही तालुक्यांतील गावांचाही समावेश होतो. औरंगाबादच्या कन्नड व सोयगाव या तालुक्यांचा तर नाशिकमधील मालेगाव, कळवण, सटाणा व नाशिक या तालुक्यांचा समावेश झालेला आढळतो.
संकलन – राजेंद्र शिंदे
(‘अहिराणी भाषा – वैज्ञानिक अभ्‍यास’ प्रकाशन ऑक्टोबर १९९७ – प्रा.डॉ. रमेश सुर्यवंशी. या ग्रंथाच्‍या आधारे)

About Post Author

2 COMMENTS

  1. अहिराणी बोलीचे अनेक पैलू
    अहिराणी बोलीचे अनेक पैलू ऊलगडून दाखवणारा अत्यंत रोचक असा लेख.

Comments are closed.

Exit mobile version