Home लक्षणीय अस्तित्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे

अस्तित्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे

कराडच्या सुलभा ब्रह्मनाळकर या एक विज्ञानवादी लेखक आहेत. मी सुलभा ब्रह्मनाळकर यांचे ‘गोफ जन्मांतरीचे’हे पुस्तक वाचून खूपच प्रभावित झालो. विज्ञान विषय इतका सोपा करून सांगणारे या पुस्तकाइतके उत्तम पुस्तक मराठीत अजूनतरी माझ्या पाहण्यात आलेले नाही. या पुस्तकाने विवेकवादी दृष्टिकोनाला व वैज्ञानिक दृष्टिकोनाला एकाच वेळी बुलंद करण्याचे काम केले आहे, असे मला वाटते. डॉ. सुलभा बालरोगतज्ज्ञ असून, त्यांनी1983 पासून कराड येथे वैद्यकीय सेवा सुरू केली. त्या लिहित्या 2002 पासून झाल्या. त्यांनी ‘पद्मगंधा’, ‘छात्रप्रबोधन’ या नियतकालिकांमधून लेखन केले आहे. त्यांचा ‘बंद खिडकीबाहेर’ हा ललित लेखसंग्रह ‘मौज प्रकाशना’ने प्रकाशित केला आहे. त्यांची ‘गोफ जन्मांतरीचे’ आणि ‘डॅाक्टर म्हणून जगताना’ ही दोन पुस्तके ‘राजहंस प्रकाशना’ने प्रकाशित केली आहेत. त्यांच्या ‘गोफ जन्मांतरीचे’ या पुस्तकाला नाशिकच्या ‘सार्वजनिक वाचनालया’तर्फे ललितेतर ग्रंथासाठी असणारा डॅा. वि.म. गोगटे पुरस्कार 2013 साली मिळाला. सुलभा ब्रह्मनाळकर यांच्याशी ‘गोफ जन्मांतरीचे’ या पुस्तकाविषयी मारलेल्या या (काल्पनिक) गप्पा. डॉ. सुलभा यांनी पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणात, ईश्वराचे अस्तित्व नाकारल्यावर माणसाने जगावे कसे व वागावे कसे याची सविस्तर चर्चा केली आहे. त्या चर्चेसंबंधातील प्रश्न मुलाखतीत अंतर्भूत केलेले नाहीत. कारण, त्यासाठी चर्चेतील अनेक संकल्पना स्पष्ट कराव्या लागतील व तोच एक विस्तृत विषय होऊन जाईल.

मी: मी तुमचे ‘गोफ जन्मांतरीचे’ हे, 2012 साली प्रकाशित झालेले पुस्तक 2018 साली वाचले. पुस्तकाच्या नावात ‘अस्तित्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे’ हे  वाक्य जोडण्याचे कारण काय?

सुलभा : मी जशी मोठी होत गेले, तसे मला अनेक प्रश्न भेडसावू लागले. मी कोण? कशी बनले? कोठून आले? कोठे जाणार आहे? ही सजीव सृष्टी कोणी निर्माण केली? या सगळ्याचा निर्माता असेल तर त्याला कोणी निर्माण केले? या प्रश्नांची उत्तरे प्रचलित विज्ञानात मिळत नव्हती. अभ्यासकांना माहीत नसतो तो घटक बीजगणितात ज्याप्रमाणे ‘क्ष’ धरावा हे ठरलेले असते, त्याप्रमाणे ज्याचे उत्तर मिळत नाही त्याचे उत्तर ‘ईश्वर’ धरावे असे व्यवहारात ठरूनच गेले होते. लहानपणापासून मला वाचनाचे व्यसन लागले होते. मी वाचत होते त्यातून मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. मी विज्ञानशाखा उच्च शिक्षणासाठी निवडली. मला विज्ञान व गणित हे विषय आवडायचे. मला वैज्ञानिक दृष्टिकोन आपलासा रोजचे आयुष्य जगतानाही वाटू लागला होता. माझे जगणे चालू होते, पण माझ्या मनातील प्रश्नांनी माझा पिच्छा सोडलेला नव्हता. ‘सजीव सृष्टीचे अस्तित्व’ हे माझ्या मनातील सर्वात मोठे कोडे होते!

मी बालरोगतज्ज्ञ बनले. कराडला वैद्यकीय व्यवसायही सुरू केला. माझे वाचन चौफेर वाढले होते. माझा जीवनसाथी अजय यालाही माझ्यासारखाच वाचनाचा नाद आहे. नवनवीन पुस्तके आणणे, ती वाचणे आणि त्यावर चर्चा करणे हे नेहमी चाले. एके दिवशी, अजयने रिचर्ड डॅाकिन्सचे ‘सेल्फिश जीन्स’ हे पुस्तक आणले. मी जेव्हा ते वाचले तेव्हा अनपेक्षित आनंदाने हरखून गेले. मला माझ्या प्रश्नाची उत्तरे मिळण्याची शक्यता दिसू लागली. तुम्ही माझ्या पुस्तकापर्यंत पोचायला सहा वर्षें लागली. मला रिचर्ड डॅाकिन्सच्या पुस्तकापर्यंत पोचायला चोवीस वर्षें लागली होती! ते पुस्तक 1976 साली प्रकाशित झाले. मी ते 2000 साली वाचत होते. मी रिचर्ड डॅाकिन्सची त्या विषयावरील सर्व पुस्तके वाचून काढली. इतर संदर्भपुस्तकेही हाताशी लागत गेली आणि मला पडलेल्या प्रश्नांची समर्पक वैज्ञानिक उत्तरे मिळत गेली. म्हणून पुस्तकाच्या नावात ‘अस्तित्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे’ हे विधान अंतर्भूत करणे आवश्यक वाटले.

मी : तुम्हाला ‘कोssहम’ टाईप पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही ईश्वर किंवा अध्यात्म या मार्गाने शोधण्याचा कधी प्रयत्नच केला नाहीत का?

सुलभा : तसा प्रयत्न कसा करणार? ईश्वर हा त्याच्यावर विश्वास ठेवल्याशिवाय दिसणार नाही ही अध्यात्माची अट आणि दिसल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही ही माझी अट. मग तो दरवाजा उघडणार तरी कसा?

मी: तुम्हाला ‘विज्ञान’ हाच ज्ञानमार्ग अस्तित्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी विश्वासार्ह का वाटला?
सुलभा : विज्ञानात ‘वाटणे’, ‘पटणे’, ‘अंतःप्रेरणा’ यांना फार मर्यादित स्थान आहे. मानवी अस्तित्व संवेद्य जगात आहे, पण मानवी अस्तित्वाच्या प्रश्नांची उत्तरे संवेद्य जगाच्या परिघाबाहेर आहेत. तेथे ईश्वर असणे, चमत्कार असणे, जगन्नियंता असणे या शब्दांना काडीइतकेही महत्त्व नाही. संवेद्य जगाच्या परिघाबाहेर फक्त विज्ञानाची भाषा चालते. अस्तित्वाच्या प्रश्नांची उत्तरे विज्ञानाचे बोट धरूनच शोधली पाहिजेत. तेथे अध्यात्म, अनुभूती वगैरे गोष्टी कुचकामी ठरतात.

‘कालयंत्र’ हे माणसाचे स्वप्न आहे. स्वप्नांनी विज्ञानाला दिशा दिलेलीदेखील आहे, पण विज्ञानात स्वप्नांचे काम तेवढेच. स्वप्न, कल्पनाविलास, साक्षात्कार, शब्दप्रामाण्य किंवा ग्रंथप्रामाण्य म्हणजे विज्ञान नव्हे. विज्ञानाला पदोपदी पुरावे लागतात; कार्यकारणभाव सांगावा लागतो. सिद्ध करून दाखवावे लागते. विज्ञानाच्या अभ्यासकाला प्रश्न विचारण्याचा आणि पुरावे मागण्याचा हक्क असतो. वाटेतील प्रत्येक दगड (शक्यता) उलटून पाहणे ही विज्ञानाची अट असते. डार्विनच्या उत्क्रांती तत्त्वाच्या प्रतिपादनानंतर असंख्य शास्त्रज्ञांनी अविरत कष्ट करून, संशोधन करून उत्क्रांतीच्या तत्त्वाला भरभक्कम वैज्ञानिक पुरावे गेल्या शतकात दिले आहेत; असंख्य प्रश्नांची उत्तरे निर्विवाद दिली आहेत. जे प्रश्न अनुत्तरित आहेत त्यांची उत्त्तरे शोधणे चालू आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणारही नाहीत, पण ज्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत तीही जिज्ञासू माणसाच्या शंका फेडण्यासाठी पुरेशी आहेत.

मी : तुम्ही पुस्तकात सजीव सृष्टीच्या उत्क्रांतीचे सखोल दर्शन घडवले आहे. तुम्ही उत्क्रांतीच्या अभ्यासाला इतके महत्त्व का देता?
सुलभा : उत्क्रांती निसर्गाच्या नियमांमधून जन्म घेते आणि माणूस उत्क्रांतीच्या नियमांमधून जन्माला येतो. केवळ माणूस नाही तर सर्व जीवसृष्टी जन्माला येते. माणूस आणि त्याचा भवताल यांमधील नाते उत्क्रांतीच्या अभ्यासातून उमगते. उत्क्रांती हे वैज्ञानिक तत्त्व आहे. ते शास्त्रकाट्याची कसोटी लावून पारखून घेता येते. ते सारे समजावून घेणे आणि रोजच्या आयुष्यात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे सगळ्यांच्या दृष्टीने हिताचे आहे.

उत्क्रांती हा अपघात किंवा योगायोग नव्हे. उत्क्रांती ही वैज्ञानिक नियमांनी बांधलेली, अतिशय सावकाश, पायरी पायरीने घडणारी आणि दिशा असलेली प्रक्रिया आहे. माणूस त्याच्या मापनात ‘काळाला ‘बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण तो तर अनंत आहे. जीवसृष्टी उत्क्रांत झाली म्हणजे जैविक यंत्रेच निर्माण झाली! त्या जैविक यंत्रांचा अभियंता कोण? विज्ञानाचे आंधळे नियम आणि त्या आंधळ्या नियमांच्या क्रीडेसाठी उपलब्ध असलेला अब्जावधी वर्षांचा काळ! हे सारे समजून घेणे अद्भुत, उत्कंठावर्धक आहे!

मी : माझ्यासारख्या माणसाला विश्वाची निर्मिती, पृथ्वीची निर्मिती, पृथ्वीवर निर्माण झालेली सजीव सृष्टी हे सारे खरोखर अनाकलनीय वाटते. काही वेळा, ते सारे गूढ म्हणजे मिस्टरीही वाटते. त्या गूढातून वाट कशी काढावी ?

सुलभा : तुमचं म्हणणं काही अंशी खरं आहे. नुकते जन्मलेले सुदृढ निरोगी बाळ हा माणसाला नेहमीच चमत्कार वाटत आलेला आहे. एका फलित पेशीपासून अनेक पेशी आईच्या गर्भाशयात तयार होतात. संख्यात्मक फरक होता होता त्यांच्यात गुणात्मक फरक होत जातो. प्रत्येक पेशीचा आकार – रंग – गुणधर्म बदलत जातो. हळूहळू प्रत्येक पेशीला स्वतंत्र ‘व्यक्तिमत्व’ मिळते. एक पेशी हृदयाची पेशी बनते, दुसरी पेशी त्वचेची पेशी बनते, तर तिसरी मेंदूची पेशी बनते. अगदी ठरल्याप्रमाणे ठरलेल्या दिवशी ठरलेला बदल होत होत एका पेशीपासून बाळ बनते. हे सगळे चकित करणारे आहे; कारण या संपूर्ण प्रक्रियेत कोठेही केंद्र नाही, कोणतेही एक सत्तास्थान नाही, नेमून देणारा-करवून घेणारा-लक्ष ठेवणारा कोणीही नाही. हा चमत्कार नेमका कसा होतो याचा उलगडा विज्ञानाने केला आहे. या साऱ्या प्रक्रियांची उत्तरे मिळतात. एका पेशीपासून बाळ कसे बनते हे समजून घेतले तर वाटते, ते सारे कोणतेही गूढ शास्त्र नाही. ते आहे रसायनशास्त्र (World is not mystery,it is all chemistry) !
उत्क्रांती हे वैज्ञानिक तत्त्व आहे. हे वैज्ञानिक तत्त्व निसर्गनियमांमधून आकाराला आले आहे. ते समजावून घेतले तर तुमच्या मनावर असलेले गूढपणाचे सारे पडदे बाजूला सारून निसर्गाकडे स्वच्छ नजरेने पाहता येईल.

मी : वा! निसर्ग म्हटले, की डोळ्यांसमोर सुखद चित्र येते. निरागस निसर्ग! सगळीकडे आनंदी आनंद पसरवणारा निसर्ग! अनेक पर्यावरणप्रेमी सतत सांगत असतात, की ‘निसर्गाकडे चला’ तुम्हाला असं निसर्गाकडे जावंसं वाटतं का?

सुलभा : मला असं मुळीच वाटत नाही. त्याबाबतीत मला अनेक प्रश्न पडतात. निसर्गाकडे जायचे ते कसे? अंगभर कपडे घालून गाडीने जायचे? की आपल्या आदी पूर्वजांप्रमाणे उघड्या अंगाने जायचे? निसर्गाकडे चला म्हणजे चार दिवस सहल म्हणून चला? की कायमच्या वास्तव्यासाठी, चला? मग आपण जेथे राहतो तो निसर्ग नाही का? ‘निसर्गाकडे चला’ म्हणणाऱ्यांनी निसर्ग व जंगल यांचे कायदे समजून घेतलेले नसतात. जंगलात ‘वृद्धापकाळाने निधन’ होण्याच्या घटना क्वचित घडतात. बहुतेक प्राण्यांचा क्रूरपणे खून होतो, उरलेले उपासमारीने मरतात. जंगलात राहणाऱ्या प्राण्यांचे दुःख, वेदना, यातना एवढ्या भयानक आहेत, की संवेदनशील माणूस त्याविषयी विचार करण्याचेही टाळतो. निसर्ग फक्त ‘असतो’. तो सुष्ट नाही, दुष्टही नाही. तो सुंदर नाही, कुरूपही नाही. तो कनवाळू नाही, क्रूरही नाही. तो फक्त त्याच्या स्वयंभू स्वरूपात अंगभूत नियमांनुसार असतो.

मी : तुमचं उत्तर पूर्वापार विचार करणाऱ्याला धक्का देणारं आहे. तुमचं हे निसर्गभान विचारात घ्यायला हवं हे जाणवत आहे. विचारांच्या या पार्श्वभूमीवर, तुम्हाला माणसाच्या वागण्यात काही विसंगती दिसतात का?

सुलभाताई : हो. काही ठळक विसंगती दिसतात. माणसे रोज घरबसल्या पोटभर जेवतात, अंगभर कपडे घालतात, उबदार घरात सुरक्षित राहतात, मोटारीने-विमानाने फिरतात, फोन-टी.व्ही-कुकर-मिक्सर-फ्रिज ही आणि इतर बरीचशी यंत्रे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत. माणसे आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधक लसी टोचून घेतात, दिसेनासे झाले तर चष्मा वापरतात, ऐकू येईनासे झाले तर यंत्राची मदत घेतात, लेकी-सुनांचे सिझेरियन करून घेतात, बायपास सर्जरी, अवयवारोपण सहजपणे केले जाते. भारतातील माणसाचे सरासरी आयुष्य पस्तीस वर्षें पन्नास वर्षांपूर्वी होते, ते पासष्ट वर्षें झाले आहे. ते कसे झाले? कोणत्या यज्ञयागामुळे वा व्रतवैकल्यांमुळे झाले? की एखाद्या ‘चमत्कारा’मुळे झाले?

आयुष्य तुलनेने किती सुखाचे झाले आहे! त्यासाठी अगणित शास्त्रज्ञांनी आयुष्यभर तपश्चर्या केली आहे, किती हाल सोसले आहेत, कधीकधी मृत्यूदंड स्वीकारले आहेत. त्याबद्दल आपण त्यांचे साधे उतराई होऊ नये? आणि जे लोक साक्षात्कार, चमत्कार, या भूलथापांनी, गंडे-दोरे-ताईत असल्या खुळचट आयुधांनी अज्ञ माणसांची लूटमार करतात, त्यांच्यापुढे मात्र कसलेही स्पष्टीकरण न मागता, कोणत्याही पुराव्याची अपेक्षा न करता लोटांगण घालावे? ही केवढी मोठी विसंगती आहे!

मी : तुमच्या पुस्तकाच्या विषयाचा आवाका खूप मोठा आहे. शिवाय, ते अनेक वैज्ञानिक संकल्पनांनी ओसंडून वाहत आहे. तरीही तुम्ही तो विषय अतिशय प्रसन्न व खेळकर पद्धतीने हाताळला आहे. प्रसन्न व खेळकर शैली हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे का? तुम्ही प्रत्येक वैज्ञानिक संकल्पना सुस्पष्टपणे उलगडल्याशिवाय पुढे जात नाही. शिवाय, तुम्ही विवेचन सोप्या करण्याच्या नादात विज्ञानाचा परीघ कोठेही ओलांडत नाही! तुम्ही हे कसे साध्य केले? तुमच्या लेखनावर रिचर्ड डॅाकिन्सच्या शैलीचा प्रभाव आहे का?

सुलभा : प्रथम तुम्ही माझ्या लेखनाला ‘समजायला सोपे’ ही पोचपावती दिल्याबद्दल आनंद व्यक्त करते. तुम्ही म्हणत आहात त्यात बरंच तथ्य आहे. स्वभावात असतं ते लेखनात सहसा उतरतं. त्यामुळे प्रसन्न खेळकरपणा माझ्या स्वभावात आहे, हे खरंच आहे.

रिचर्ड डॅाकिन्स हा डार्विनचा वैचारिक वारसदार. त्याची प्राणी स्वभावशास्त्रातील डॅाक्टरेट आहे. तो ऑक्सफर्ड विद्यापीठात कार्यरत होता. त्याने त्याचे जीवनधेय्य म्हणून सर्वसामान्यांमध्ये विज्ञानाचा प्रसार करणे, त्यांना विज्ञान समजावून देणे हे स्वीकारले आहे. त्याचे लेखनही नेटके व सोपे आहे. तो विज्ञानाच्या सगळ्या क्षेत्रांत लीलया वावरतो. तो अगदी विज्ञानाच्या सीमारेषेवरूनही वाचकाला फिरवून आणतो. तरीही तो विज्ञानाची सीमारेषा ओलांडत नाही. त्याच्या लेखनशैलीचा प्रभाव माझ्यावर नक्की आहे. शिवाय, मी मॅट रिडली या लेखकाचीही पुस्तके वाचली. मॅट रिडली हाही सोप्या भाषेत उत्क्रांतीचे विज्ञान मांडणारा लेखक आहे. तो मोठा गोष्टीवेल्हाळ माणूस! तो तत्वज्ञान्यांच्या, वैज्ञानिकांच्या गोष्टी, इतिहासातील घटना, प्राणिशास्त्रातील गंमती रसाळ भाषेत सांगता सांगता महत्त्वाची वैज्ञानिक तत्त्वे वाचकाच्या मनावर बिंबवून जातो. त्याच्या लेखनशैलीचा प्रभावही माझ्यावर पडला आहे.

मानवी जगाबद्दल लिहिताना मात्र माझा जीवनसाथी अजय याच्याशी घातलेले वादविवाद, आमचा कुटुंबमित्र राजीव साने याच्याशी केलेल्या चर्चा यांमुळे तत्त्वज्ञानातील अनेक संकल्पना घासुनपुसून घेता आल्या.

मी माझी आई नलिनी देशपांडे हिला पुस्तकातील सोप्या लेखनशैलीसाठी बरेचसे श्रेय देते. ती माझे कच्चे लिखाण वाचत असे. प्रत्येक वाचनानंतर तिचा एकतरी ‘पण’ असायचा. मी माझे लिखाण तिचे सगळे ‘पण’ जिंकायचे या जिद्दीने अजून सोपे, अजून स्पष्ट असे करत गेले. पुस्तक समजण्यास या सगळ्या घटकांमुळे सोपे झाले असावे.

विद्यालंकार घारपुरे 9420850360, vidyalankargharpure@gmail.com
डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर 9960697818, drsulabha.b@gmail.com

 

About Post Author

Previous articleडोळस गाव – कोळगाव (Kolgav)
Next articleपुणेरी पगडीची प्रतिष्ठा!
विद्यालंकार घारपुरे यांचा जन्म 26 सप्टेंबर 1960 मध्ये झाला. त्यांचे शिक्षण बी. कॉम. झाले आहे. त्यांनी भारतीय स्टेट बँकेतून उपप्रबंधक (डेप्युटी मॅनेजर) या पदावरून स्वेच्छानिवृत्ती 2007 साली घेतली. ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'चे सक्रिय कार्यकर्ता म्हणून 1986 ते 1997 या काळात काम करत होते. त्यांना बालसाहित्यात विशेष रुची आहे. त्यांचे 'बबडूच्या गोष्टी' 'वनशाहीच्या कथा' व 'बेटू आणि इतर कथा' हे बालकथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. तसेच 'छोटा डॉन' आणि 'लिंबू तिंबू' हे बालकविता संग्रह आणि 'बदल' ही बालकादंबरीही प्रकाशित झाली आहे. त्यांना 'चालनाकार अरविंद राऊत पुरस्कार' 2015 सालासाठी मिळाला आहे. सध्या त्यांनी त्यांचा पूर्ण वेळ हा लेखन व सामाजिक कामासाठी दिलेला आहे. लेखकाचा दूरध्वनी 9420850360

Exit mobile version