असंतोषाचे आंदोलन

    0
    26

    फ्रान्समध्ये असंतोषाचे आंदोलन शांतपणे उभे राहिले आहे. त्याचे कारण आहेत स्टीफन हेसेल. त्यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये छोटी पुस्तिका लिहिली आणि सध्याच्या जगाच्या रीतीवर कडाडून हल्ला चढवला. जागतिकीकरणातील बाजारी वृत्तीला त्यांचा विरोध आहे. सध्या जी पर्यावरण हानी चालली आहे तिलाही त्यांचा विरोध आहे. अशा अनेक बाबी घेऊन त्यांनी पुस्तिकेत त्यांचा समाचार घेतला आहे. स्टीफन यांचे चरित्र आणि चारित्र्य असे आहे की फ्रेंच जनतेने त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला आहे आणि तेदेखील विद्यमान व्यवस्थेवर तूटुन पडले आहेत.

         फ्रान्समध्ये असंतोषाचे आंदोलन शांतपणे उभे राहिले आहे. त्याचा परिचय पत्रकार दिलीप पाडगावकर यांनी त्यांच्या साप्ताहिक स्तंभात करून दिला आहे. पाडगावकर यांची आरंभीची मुख्य कारकीर्द पत्रकार म्हणून फ्रान्समध्ये गेली. त्यांना स्वाभाविकच, फ्रान्समधील घटनांबद्दल विशेष आस्था असते.

         फ्रान्समधील सध्याच्या असंतोषाचे जनक आहेत चौर्‍याण्णव वर्षांचे स्टीफन हेसेल. त्यांची ‘चला, उठा!’ या शीर्षकाची पुस्तिका गेल्या ऑक्टोबरात (2010) प्रसिध्द झाली. आरंभी, तिच्या फक्त आठ हजार प्रती छापल्या गेल्या. त्यांची कोणतीही जाहिरात न होता त्या आठवडाभरात विकल्या गेल्या. त्या डिसेंबरपर्यंत अक्षरश: लक्षावधी फ्रेंच लोकांच्या हाती होत्या. पुस्तिकेचे चार भाषांत भाषांतर करण्यात आले होते.

         हेसेल यांनी या पुस्तिकेची रॉयल्टी अर्थक्षेत्रातील मक्तेदारी, पर्यावरणाची हानी, राजकारणाचे व संस्कृतीचे व्यापारीकरण, शिक्षण व सार्वजनिक आरोग्य यांची बिघडलेली प्रकृती आणि मानवी हक्कांची जगभर –अगदी लोकशाही सरकारांनीसुध्दा चालवलेली पायमल्ली यांविरुध्द ज्या ज्या व्यक्ती व संस्था काम करतात त्यांना देण्यात यावी असे जाहीर केले आहे. हेसेल यांच्या मतप्रणालीचा आणि लोकांमधील असंतोषाचा त्यावरून अंदाज येईल.

         हेसेल उच्चारतील तो प्रत्येक शब्द फ्रान्समध्ये विलक्षण आदराने व अनुकरणीय म्हणून उचलला जात आहे. त्यांचा अन्यायाविरुध्द उठून उभे राहा हा मंत्र आहे आणि फ्रेंच तरुण उत्कटतेने त्यास प्रतिसाद देत आहेत.

         स्टीफन हेसेल यांचा जन्म 1917चा, जर्मनीमधला. स्टीफनच्या बालपणीच त्यांचे कुटुंब पॅरिसमध्ये स्थलांतरित झाले. त्यानंतरचे त्यांचे आयुष्य़ म्हणजे प्रदीर्घ लढ्याची कहाणी आहे. स्टीफन पॅरिसमध्ये मोठ्या लेखक-कलावंतांच्या सहवासात आले. त्यांची ज्याँ पॉल सार्त्र यांच्याबरोबर प्रदीर्घ मैत्री होती. त्यांनी दुसर्‍या युध्दात फ्रेंचांच्या बाजूने भाग घेतला. वेळोवेळी जर्मनांचा तुरुंगवास भोगला. त्यांचा कारावास, त्यांची पलायने, फ्रेंच प्रतिकार चळवळीतील सहभाग ही सारी कहाणी रोमांचकारी आहे. त्यांची आत्मकथा 1997 साली प्रसिध्द झाली. त्यांनी दुसर्‍या महायुध्दानंतर युनोसाठी, मुख्यत: मानवी हक्कांसंबंधात कार्य केले.

          फ्रेंच सामाजिक जीवनातील मोकळेपणा हादेखील हेसेल यांच्या वाट्याला आला आणि त्यामुळेही हेसेल यांचे व्यक्तिमत्त्व फ्रेंच लोकांना अधिक भावत असावे असे सांगून पाडगावकर म्हणतात, की त्यांच्या आईला व्यक्तीचे जीवन कोंदटून टाकणारी मध्यमवर्गीय मूल्ये मान्य नव्हती. त्या पॅरिसला आल्यावर फ्रेंच लेखक हेंरी पिअरी रोशे यांच्या प्रेमात पडल्या. तेव्हा त्यांनी आपल्या पतीला (हेसेल यांच्या वडिलांना) सोडले व त्या रोशेकडे जाऊन राहू लागल्या. रोशेने त्यांच्या या प्रेमत्रिकोणाची कहाणी काल्पनिक कथा म्हणून लिहिली. त्या कथेवरून फ्रँक्वा त्रुफाँ यांनी ‘ज्युल्स एट जिम’ हा  चित्रपट बनवला व तो जगभर गाजला. हेसेल यांनी ही हाकिगत त्यांच्या आत्मकथेत मोकळेपणाने लिहिली आहे. त्यांना ना त्या आईवडिलांबद्दल वा रोशे यांच्याबद्दल राग आहे. त्यांच्या या पारदर्शी प्रामाणिक व सच्चा व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी फ्रेंचांची मने जिंकली आहेत. (संकलित)

    {jcomments on}

    About Post Author

    Previous article‘टिंबख्तू’: एक विदारक सत्य!
    Next articleदोन बातम्या
    दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.