अशोक दातार- वाहतूकवेडा!

0
39
Ashok_Datar

वाढवून मिळालेले आयुष्य सत्कारणी कसे लावावे हे अशोक दातारकडून शिकावे! त्याने सन 1995 च्या सुमारास, तो वयाच्या पंचावन्नच्या आसपास असताना करिअरमधील लक्ष काढून घेतले; व्यवसाय चालू ठेवला, परंतु त्याबरोबर शहर वाहतुकीच्या व्यवस्थेचा अभ्यास सुरू केला, त्यातील गुंता सोडवण्याचे मार्ग सुचवले आणि सरकारी यंत्रणेवर काही प्रमाणात प्रभावदेखील पाडला. त्याचा तो ध्यास मुंबई एन्व्हायर्न्मेंट ग्रूपच्या माध्यमातून चालूच आहे.
 

तो महाराष्ट्रातल्या पहिल्या काही टॉप एक्झिक्युटिव्हजपैकी पहिला. त्याने 1960 च्या आसपास स्टॅनफर्ड या जगद्विख्यात अमेरिकन विद्यापीठात एकॉनॉमिक्सचे पदव्युत्तर शिक्षण घेतले, भारतात येऊन एस्सो, डीसीएम, कोकाकोला, गरवारे, रिलायन्स अशा कंपन्यांत दिल्ली-मुंबईमध्ये जवळजवळ तीस वर्षे उच्चाधिकारपदे भूषवली आणि करिअरचा डाव अर्ध्यावर त्यागून तो त्याची मूळ ओढ, जी समाजसेवा त्या क्षेत्राच्या वळणावर आला. ते मूळ अशा अर्थाने, की त्याने वडिलांबरोबर विनोबांच्या भूदान मोहिमेत पदयात्रा केली होती. त्याचे वडील पुण्याचे मोठे डॉक्टर होते, तरी निस्वार्थ बुद्धीने गांधी-विनोबांच्या मोहिमांत, स्वराज्य चळवळीत सामील झाले. तो संस्कार अशोकवर आहे. त्यामुळे उत्तम सांपत्तिक स्थिती व स्वास्थ्य लाभले असूनदेखील त्याने मुंबई महानगरीचे प्रश्न जाणून घेण्यासाठी वणवण सुरू केली.
 

ती पदयात्रा आणि ही वणवण! असे का? कारण तो गेल्या पंधरा वर्षांत या विषयात ज्ञानी झाला असला, त्याच्या संग्रही जगभरच्या मोठ्या शहरांतील दाखले तयार असले तरी त्याचे ‘ऐकायला’ कोणी तयार नाही. या शहरातले नागरिक; सरकारी अधिकारी आणि राजकारणी तर ‘निरोचे बाप’ शोभावेत अशा मस्तीत आणि चैनीत आहेत (जणू फिडल वाजवत आहेत!). त्यांना जनसुविधांची काही फिकीरच पडलेली नाही. दातार त्यांना म्हणतो, “मी मांडतोय या प्रश्नांना थोडी ‘माइंड स्पेस’ द्या. तुमचे तुम्हाला या प्रश्नांचे गांभीर्य आणि त्यातून सोडवणुकीचे मार्ग दिसतील.”

तो सरकारी व महापालिकेच्या वाहतूकविषयक काही कमिट्यांचा मेंबर आहे. कमिट्यांच्या बैठकींचा त्याचा अनुभव ऐकावा…. तास-दोन तास चहा-बिस्किटे खाण्यात जातात, जुजबी बोलणे होते, गाडे पुढे सरकत नाही आणि पंधरा-पंधरा उच्च विद्याविभूषित, उच्चपदस्थ लोक काही न करता, मनाची कवाडे बंद ठेवून एकत्र बसलेले वेगवेगळे होतात आणि आपापल्या गाड्यांतून निघून जातात. त्यांच्या संवेदनेला आपला सभोवताल एवढा बिकट आहे याची जाणीव कशी होत नाही याचा अचंबा अशोक दातारला वाटतो. त्यात चीड, संताप, उद्वेग या सर्व भावना असतात.
 

अशोक एवढा अस्वस्थ, बेचैन असतो, याचे कारण तो संवेदनशील आहे, विचारी आहे, शिकलेला आहे, जिज्ञासू आहे, त्याचा जन्म पुण्यातला, 23 नोव्हेंबर 1940 चा. सदाशिवपेठेत एकत्र कुटुंबात सात्त्विक वातावरणात बालपण गेले, शालेय शिक्षण पुण्याच्या ‘नुमवित’ (नुतन मराठी विद्यालय) झाले. उच्च शिक्षण फर्ग्युसन कॉलेजात. तो एकॉनॉमिक्स घेऊन बी.ए. झाला. तेथेच छाया भेटली, ती पूर्वाश्रमीची केळकर. त्याने पदव्युत्तर शिक्षण एकॉनॉमिक्समध्येच स्टॅनफर्ड विद्यापीठात (अमेरिका) घेतले. त्यानंतर त्याने खाजगी कंपन्यांत काम केले. तेथे त्याच्यावर अर्थपुरवठा आणि प्रकल्प विकास अशा जबाबदार्‍या होत्या.
 

अशोकचे कॉलेजपुढील आयुष्य कोणाही सुजाण मध्यमवर्गीय तरुणाचे असावे तसेच आहे. तो काळही थोडा गुंतागुंतीचा आहे. तरुणास स्वत:च्या आयुष्याच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी नोकरीधंदा आवश्यक असे, पण तो कष्टाने मिळत होता. त्यामुळे तो मिळाला की तरुण स्वस्थ होई. अशोककडे एकॉनॉमिक्स विषयातील शिक्षण होते. त्या शास्त्राने जगव्यवहाराचा कब्जा घेण्याची वेळ अजून यायची होती, पण अशोकची गती अनेक विषयांत चाले. त्याला समाजशास्त्र, राज्यव्यवहार, आधुनिक शास्त्रे यांतील सर्व तर्‍हेच्या खोचा अचूक कळत. त्यामुळे उत्तम नोकरी शाबूत ठेवून तो साहित्यकला-सामाजिक चळवळी यांबाबत आस्था बाळगे. अशोकचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला परंपरेचे भान आहे, परंतु आधुनिकतेची ओढ आहे. तो सहजपणे आजच्या जागतिक जीवनाचा अंगिकार करू शकतो. मुंबईत जे पहिले काही पर्सनल कॉम्प्युटर आले, त्यांपैकी एक अशोककडे होता. छायादेखील बुद्धिवान, स्वतंत्र बाण्याची, तिने स्वीकारलेल्या स्त्रीविद्येचा उत्तम अभ्यास असलेली त्याची साथीदार आहे. त्यांचे मुलगे समीर आणि सलील हे दोघे आई-बाबांइतकेच कर्तबगार असून ते आपापल्या क्षेत्रांत उच्चस्थानी आहेत.
 

अशोकने त्या काळात उत्तम कथा लिहिल्या. त्याना पुरस्कारदेखील मिळाले. त्याने चित्रपट- नाटके- पुस्तके यांची परीक्षणे केली, त्यांतील मार्मिकता लगेच लक्षात येई. त्याने अनेक साहित्यिक-सामाजिक उपक्रमांना अर्थसहाय्य केले आहे, पण बिनबोभाटपणे. तो जेवढे पैसे कमावतो, त्यापेक्षा जास्त देत असतो. मन:पूर्वक, स्वत:होऊन.
 

अशोकने नोकर्‍यांच्या ठिकाणी झकास कर्तबगारी दाखवून उच्चाधिकारपदे भोगली, त्या काळात सामाजिक जाणीव-सांस्कृतिक रसिकता जपली. तो व छाया दादर परिसरातील कलाक्षेत्राचा अविभाज्य भाग होते. आम्ही ‘ग्रंथाली ’ स्थापन केली तेव्हा तोही आमच्या ‘कोअर ग्रूप’चा महत्त्वाचा भाग झाला. नंतर जवळ जवळ वीस वर्षे, त्याने एक जबाबदारी म्हणून ‘ग्रंथाली’चे अध्यक्षस्थान भूषवले. मला वाटते, त्याची बुद्धी आम्हा सर्वांत अधिक प्रगल्भ व तीव्र असावी. तीमधून एकेक अफाट सिद्धांत बाहेर पडत. त्याचे ते वाकतुषार म्हणजे आम्हाला चर्चेसाठी मोठे खाद्य असे. त्याचे सहजस्वाभाविकतेने मांडलेले एकच सूत्र सांगतो. तो काळ डाव्या प्रभावाचा होता. समाजात तशीच कामेही उभी राहात होती. अशोकचा त्यामध्ये उचित सहभाग असे. डावे विचारसूत्र महत्त्वाचे, कालानुरूप वाटे. अशोक एकदा जोरजोराच्या चर्चेत म्हणाला, की ‘मार्क्सिझमदेखील कॅपिटॅलिस्ट मेथडने आणला पाहिजे’. मला हे विचारसूत्र मोलाचे वाटते. ज्यांना हे दोन ‘इझम’ सर्वार्थ कळले आहेत त्यांना अशोकच्या म्हणण्याचा प्रत्यय आलेलादेखील जाणवेल. अशोकच्या सहवासातले असे कितीतरी बुद्धिप्रगल्भ क्षण मनात असतात. नव्हे, त्यामुळे आमची मन-बुद्धी घडलेली आहे.

अशोकने वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी जे मार्ग सुचवले त्यांचे आधारसूत्र हेच आहे, की उच्च स्तराच्या लोकांना सर्व सुविधा द्या, पण त्याची किंमत चोख मोजायला लावा. आज जवळजवळ फुकटात गाड्या सार्वजनिक ठिकाणी पार्क केल्या जातात, त्यांना जमिनीच्या किमतीच्या आकारात भाडे लावले तर वाहतूक सरळ व सुलभ होऊ शकेल. त्याने त्याच्या अभ्यास व अनुभवा आधारे ‘वाहतूक ठप्प बसू नका गप्प’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. ‘ग्रंथाली’ने ते प्रसिद्ध केले आहे.
 

दातार वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय प्रश्नांनी सतत अस्वस्थ असतो. त्याचबरोबर, त्यामधून पुढे कसे जायचे याबाबतचे त्याचे चिंतनही सतत चालू असते. राष्ट्रकूल स्पर्धा, टुजी, आदर्श सोसायटी, बेलारी खाणी… अशी भ्रष्टाचाराची प्रकरणे एकामागोमाग एक बाहेर आल्यामुळे साधनशुचितेबद्दल व व्यवहारातील शुद्धाशुद्धतेबद्दल विशेषत: मध्यमवर्गामध्ये नवी जागरुकता निर्माण झाली आहे. जुन्या लोकांना यामुळे ‘बोफोर्स’चे दिवस आठवतात. भ्रष्टाचारांच्या नव्या प्रकारांपुढे बोफोर्स हे तर पिल्लूच वाटते! आणि त्यामुळे त्याच मध्यमवर्गात निराशाही दाटली जाते. अशा परिस्थितीत ते ‘कालच्यासारखा आजचा दिवस’ अशा मानसिकतेत दिवस ढकलत राहतात. ही जशी मध्यमवर्गाची मनोवस्था आहे तशी राजकारण्यांची, प्रशासकांची, उद्योगकांची, बांधकाम ठेकेदारांचीही आहे. देशात ही जी लूट चाललेली आहे तिच्यामध्ये आपण सारे सामील आहोत याची मनोमन जाणीव या सर्वांना आहे. अशी विकल, हताश सद्यस्थितीची मांडणी करत असताना अशोकला त्यातूनही बाहेर पडले पाहिजे असे वाटते, तो म्हणतो, की मी माझ्या परीने दोन मुद्दे लावून धरत आहे. प्रत्येकाने आपल्याला महत्त्वाचे वाटणारे प्रश्न याच प्रकारे पुढे नेत राहिले पाहिजे. अशोकच्या मते, महत्त्वाचे मुद्दे: जमिनविक्री व्यवहारात सर्व नवीन इमारतींच्या दर्शनी भागात पुढील माहिती निर्देशित केली जाणे महत्त्वाचे आहे, भूखंडाचा आकार, बांधकामाखालील क्षेत्र, कार्पेट क्षेत्र, खरेदीची किंमत, (ज्या कोणला भूखंड विकला अथवा विकसित करण्यास दिला त्याचे नाव व तारीख). यामुळे जमीन विक्री व्यवहारात पारदर्शकता येईल.
 

सेवानिवृत्तीनंतर अशोकने घनकचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काही प्रयोग केले. त्यातून कार्यकर्त्यांचा एक संच उभा राहिला. हा संच कचर्‍यामधून स्वयंपाकाचा गॅस अथवा वीजनिर्मितीचे प्रकल्प उभे करू शकतो व तशी कामे तो करत आहे.
 

अशोकने गेल्या सहा वर्षांमध्ये त्याच्या दोन मित्रांच्या सहकार्याने ‘http://www.mesn.org/ ’ नावाची वेबसाईट निर्माण केली आहे. त्या माध्यमातून मुंबईच्या वाहतूकीच्या प्रश्नांची सोडवणूक साधण्याचा त्यांचा खटाटोप चालू असतो. सक्षम कारभार आणि आर्थिक शिस्त हे त्यांच्या योजनांचे मुख्य घटक असतात. त्यांनी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडसाठी ‘बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम्स’ची आखणी केली. त्यातील कल्पकतेचे सर्वांकडून कौतुक झाले आहे.

 दिनकर गांगल – भ्रमणध्वनी: 9867118517, इमेल:thinkm2010@gmail.com

अशोक दातार – भ्रमणध्वनी: 9867665107, 022-24449212 , इमेल – datar.ashok@gmail.com

About Post Author

Previous articleअस्थिरतेकडे वाटचाल
Next articleजनता गाढव आहे का?
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.